शाळा

Showing posts with label लेखमाला. Show all posts
Showing posts with label लेखमाला. Show all posts

Monday, 1 May 2023

साहित्यरत्न व शिक्षकरत्न गौरव पुरस्कार

 साहित्यरत्न व शिक्षकरत्न गौरव पुरस्कार


आज दि.1 मे महाराष्ट्र दिन रोजी

"सर्वांगीण विकास विचार सभा संस्था" आणि "आई कनकाई सामाजिक संस्था" यांच्या तर्फे मातृभाषेच्या प्रती परिश्रमपूर्वक कार्य करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिक व आदर्शवत शिक्षकांचा कृतज्ञता सन्मान सोहळ्यात आदरणीय श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब शिक्षक आमदार ,आदरणीय श्री.एकनाथ आव्हाड सुप्रसिद्ध कवी,बालसाहित्यिक,कथाकथनकार  यांच्या हस्ते "साहित्यरत्न व शिक्षकरत्न गौरव पुरस्काराने आपल्याला कल्याण शहर ह्या ऐतिहासिक नगरीत सन्मानित करण्यात आले.







Thursday, 13 April 2023

हिंदू कोड बिल पूर्व इतिहास

 हिंदू कोड बिल पूर्व इतिहास


              स्वातंत्रपूर्व काळात तत्कालीन परिस्थिती पहाता ब्रिटिशांनी भारतात कोणती राजकीय क्रांती केली असेल तर ती म्हणजे कायद्यापुढे सगळ्यांना त्यांनी समान मानले.त्या काळी हीच संकल्पना हिंदू कायद्याच्या आणि मुस्लिम कायद्याच्या पूर्णता विरोधी होती.हिंदू प्राचीन कायदा परंपरागत जातीयव्यवस्था मान्य करीत असल्यामुळे समान अपराधासाठी जातिपरत्वे भिन्न भिन्न शिक्षेचे प्रावधान होते.त्याच प्रमाणे मुस्लिम कायद्यात सुद्धा शिक्षेच्या बाबतीत मुस्लिम माणूस व काफिर यांच्यात फरक होत असे. इंग्रजी अमदानीतील कायदा व्यवस्थामध्ये मात्र इंग्रजी कायद्याबरोबरच हिंदू कायदा आणि मुस्लिम कायदा भारतामध्ये पाळला जात असे.परंतु भाषेच्या अडचणीमुळे हिंदू आणि मुस्लिम कायद्याची परिभाषा लक्षात येत नसे.नेहमी इंग्रजांना हिंदू पंडित आणि मुस्लिम काझी यांच्यावर अवलंबून राहावे लागत असे.हे परावलंबित्व इंग्रज अधिकाऱ्यांना अत्यंत गैरसोयीचे होत असे.लॉर्ड मेकॉलेच्या कारकिर्दीत सुधारणाविषयक कायदे इंग्रजानी बनविण्यास सुरुवात केली.हिंदू कायद्यातील सुधारणेची मुहूर्तमेढ इंग्रजानी प्रथम "बालहत्या प्रतिबंधक कायदा" करून रोवली.या कायद्यानंतर 27 वर्षांनंतर "सतीची चाल" बंद केली.त्यानंतर व्यक्तिगत कायद्यातील सुधारणा घडवून आनल्यात.जसे धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा,विधवा विवाहाचा कायदा,विशिष्ट विवाहाचा कायदा,संमती वयाचा कायदा,वारसा हक्कासबंधीचा कायदा,बालविवाह प्रतिबंधक कायदा.असे विविध सुधारणाविषयक कायदे इंग्रजी राजवटीत करण्यात आले.



            तत्कालीन परिस्थितीच्या पाश्वभूमीवर संपूर्ण हिंदू कायद्याची संहिता(हिंदू कोड)तयार करण्याचा विचार मांडण्यात आला. विशेषतः हा विचार 1937 सालच्या देशमुख यांनी केंद्रीय कायदेमंडळात एक बिल मांडले ते बिल अथक प्रयत्नांनी 14 एप्रिल 1937 रोजी "हिंदू स्त्रीच्या मालमत्तेच्या हक्काचा कायदा " म्हणून पास केले गेले.याच कायद्याला "देशमुख कायदा" असे ही म्हटले जाते.परंतु हा कायदा अगदी छोटा होता.त्याची केवळ पाचच कलमे होती आणि म्हणून या कायद्याचे दोष नाहीसे करण्यासाठी या कायद्याची पुन्हा छानणी केली जावी आणि त्यामध्ये हिंदू वारसा हक्कात दुरुस्त्या सुचवणारे बिल,पोटगी हक्काचे बिल,मालमत्तेच्या हक्काचे बिल या सर्वांवर पुन्हच्छ विचार व्हावा असे ठरवण्यात आले.

          देशमुख कायद्याचा सर्वांगीण विचार करण्यासाठी मध्यवर्ती सरकारने शेवटी एक हिंदू कायदा कमिटी सर बेनेगल नरसिंहराव यांच्या अध्यक्षते खाली नेमली.पाच महिन्यानंतर ह्या कमिटीने आपला अहवात म्हटले की, देशमुख कायद्यात वेगवेगळी ठिगळे जोडण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा संपूर्ण हिंदू कायद्याचा विचार करून ब्रिटिश हिंदुस्थानसाठी एक हिंदू कोडच तयार करणे सयुक्तिक राहील.परंतु अशा प्रकारचे हिंदू कोड निर्माण करण्याच्या संदर्भात महत्वाचे पाऊल उचलण्याचे धैर्य राव कमितीला दाखवता मात्र आले नाही.

              राव कमिटीच्या शिफारसी नुसार हिंदू कोड निर्मितीची जी प्रक्रिया निर्माण झाली त्याचप्रमाणे सरकारने दोन बिले तयार केली.एक वारसा कायद्याचे बिल व दुसरे विवाह कायद्याचे बिल.ही दोन्ही बिले लोकसभेच्या संयुक्त समितीकडे सोपविली गेली.संयुक्त समितीने एक वेगळी "सिलेक्ट कमिटी" नेमण्याचा आणि मसुदा तयार करण्याचा आदेश दिला.

               बी. एन. राव यांच्याच अध्यक्षतेखाली   सिलेक्ट कमिटी नियुक्त झाली.या समितीने हिंदू कोड बिलाचा प्राथमिक स्वरूपाचा मसुदा तयार केला.तो मसुदा देशी भाषांत अनुवादित केला.विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या.सिलेक्ट कमिटीने अत्यंत चिकित्सकपणे आणि बारकाईने अभ्यास करून पक्का मसुदा 21 फेब्रुवारी 1947 रोजी सरकारपुढे सादर केला.

              हे बिल केंद्रीय सरकारने आपल्या गॅझेटमध्ये 19 एप्रिल 1947 रोजी प्रसिद्ध केले.प्रांतिक सरकारने आपले मते - प्रतिक्रिया केंद्रीय सरकारकडे पाठविल्या.काहींनी आपली मते दिलीच नाही काहींनी असमर्थ असल्याचे कळविले.परंतू कोणत्याच प्रांतिक सरकारने हिंदू कोड बिलाला विरोध दर्शवला नव्हता. परंतू राव कमिटीला आपल्या सहा वर्षाच्या कालावधीत बऱ्याच चांगल्या - वाईट गोष्टींचा अनुभव गाठी बांधावा लागला.सनातन्यांना तर हिंदू कोडाची कल्पनाच मान्य नव्हती.हिंदुधर्मशास्त्रावर आधारित कायदे बदलून पाश्चात्य विचारसरणीवरील कायदे हिंदूंना लागू करावेत हा विचारच त्यांना पटण्यासारखा नव्हता.त्यामुळेच सिलेक्ट कमिटीच्या दौऱ्याच्या वेळेस ठिकठिकाणी काळी निशाणे दाखवून आपला प्रखर विरोध व्यक्त केला गेला.वि. के. पाळेकर यांनी "अप्रबुद्ध" या टोपण नावाने "हिंदू कोडाचे कृष्ण कारस्थान" या नावाने लेखमाला प्रसिद्ध केली होती.राव कमिटीतील सदस्यांचे चारित्र्यहनन करण्यात आले.

                     हिंदू कायद्यात सुधारणा करून एक हिंदू कायदे संहिता निर्माण करायची या कल्पनेला सगळ्यांनीच विरोध केला होता असे नाही.लोणावळ्यातील "धर्मनिर्णय मंडळा" सारख्या सुधारणावादी हिंदू संस्थेने हिंदू कोडासबंधी आपले अत्यंत अनुकूल मत नोंदवले होते.

                  सदर बिल 11 एप्रिल 1947 रोजी लोकसभेपुढे विचारार्थ मांडले,परंतू हिंदू कोड बिलावरील सोपस्कार अजून पूर्ण झालेला नव्हता.सतांतराच्या मोठ्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. 3ऑगस्ट1947 रोजी भावी स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश करण्यात आला.भारताचे संविधान बनविण्याचे महान ऐतिहासिक कामगिरी कायदेमंत्री डॉ.बाबासाहेब यांच्याकडे सोपविण्यात आली.

                      एकात्मतेच्या दृष्टीने बाबासाहेबांना स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधुत्व ह्या तत्वांचा पाठपुरावा करायचा होता.एवढेच नव्हे तर संविधानासोबतच संपूर्ण भारताला एक सूत्रात गोवणारा एक हिंदू कायदासुद्धा तयार करायची गरज होती.कायदेमंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक पुन्हा सिलेक्ट कमिटी नेमून तिचे राव यांचे हिंदू कोड बिल फेरतपासणीसाठी हातात घ्यावे असे ठरले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वारसा आणि विवाह सोबतच दत्तक विधान,उत्तराधिकार, घटस्फोट,पोटगी इ.गोष्टींचा विचार करावा लागणार होता.आणि म्हणूनच हिंदू कोडाची पुनबांधणी आवश्यक होती.इथेच राव कमिटीचे हिंदू कोड बिल आणि डॉ.आंबेडकर यांच्या कमिटीचे हिंदू कोड बिल यात मूलभूत फरक आहे.संपूर्ण हिंदू कोड बनवण्याच्या बाबतीत क्रांतिकारक पावले उचलण्याचे धैर्य राव कमेटीला दाखवता आले नव्हते.परंतू ते धैर्य डॉ.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या कमिटीने दाखले होते.पुढे असे निर्माण झालेले हिंदू कोड बिल कायदेमंडळापुढे 12 ऑगस्ट 1948 रोजी सादर केले.आणि हे कोड बिल पुढे बाबासाहेबांच्या नावानेच ओळखले जाऊ लागले.हिंदू कोड बिल आणि बाबासाहेब हे समीकरण पुढील काळात अभिन्न असे झाले.जेवढा विरोध राव यांच्या हिंदू कोडाला झाला नव्हता त्याहुन अत्यंत प्रखर विरोध डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेल्या हिंदू कोडाला झाला होता.बाबासाहेबांनी इ.स. 1947 पासून सतत 4 वर्षे 1 महिना 26 दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत 5 फेब्रुवारी 1951 रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह 3+1 अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.प्रतिगामी विचारांच्या हिंदू सभासदांनी त्याला विरोध केल्यामुळे ते संमत होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी 25 सप्टेंबर 1951ला पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे राजीनामा पाठविला. त्यात त्यांनी लिहिले, ‘हिंदू कोड बीलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी मंत्रीपदाचा त्याग केला. सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी सत्तेसाठी तत्त्व सोडले नाहीत, तर तत्त्वासाठी सत्तात्याग केला.           



                पुढे सत्तेत आलेल्या नेहरूंनी ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. या वेळी ही प्रचंड विरोध झाला परंतू बहुमत नेहरूंच्या बाजूने असल्यामुळे ते पास करण्यात आलेत.इ.स. 1955-56 मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे:

हिंदू विवाह कायदा

हिंदू वारसाहक्क कायदा

हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा

हिंदू दत्तक व पोटगी कायदा

हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.” नंतर जरी हे कायदे पास होतांना बाबासाहेब सभागृहामध्ये नव्हते तरीही त्यांचं योगदान हा देश विसरला नाही.त्या स्वरूपातल्या कायद्याने सुद्धा स्त्रियांना जे हक्क दिले जे अधिकार दिले त्याच पितृत्व निःसंशयपणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच जातं.


                 संकलन आणि लेखन

                   संजय ग. मराठे

                     उल्हासनगर - 4

                    9421973888

Tuesday, 24 January 2023

पराग प्रतिष्ठान निर्मित अत्रेमय 'अ' अर्थात अत्रेंचा.

 पराग प्रतिष्ठान निर्मित अत्रेमय 'अ' अर्थात अत्रेंचा.

    

              प्रल्हाद केशव अत्रे हे एक महाराष्ट्रातील झंझावाती व्यक्तिमत्व मानलं जातं. साहित्य,शिक्षण,नाटक,चित्रपट, राजकारण,पत्रकारिता अशा विविध क्षेत्रामध्ये त्यानी आपला भारदस्त ठसा उमटवला. या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा विलक्षण दबदबा होता. महाराष्ट्रातील जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. ते एक उत्तम वक्ते होते.त्यांच्या भाषणाचा   अवघा महाराष्ट्र दिवाना होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांची भूमिका महत्वपूर्ण होती. त्यावेळचे त्यांचे वाद आणि किस्से अवघा महाराष्ट्र जाणतो.

             मराठी साहित्य,नाट्य,चित्रपट,राजकारण इत्यादी गोष्टींचा अभ्यास करायचा म्हटल्यास आचार्य अत्रें शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यांच्या लेखणी आणि वाणीवर अवघा महाराष्ट्र फिदा होता. अत्रे एक आदर्श शिक्षक ,कवी,कादंबरीकार,नाटककार,चरित्रकार,पटकथाकार,विडंबन,बालसाहित्य, अग्रलेख, चित्रपट ,लेखक, दिग्दर्शक,लोकप्रिय संपादक,प्रभावी वक्ता,झुंजार पत्रकार या सर्व गोष्टींचा विचार करून पराग प्रतिष्ठान यांनी आचार्य अत्रे यांच्या एकशे पंचविसाव्या जन्मवर्षं निमित्ताने अत्रेमय 'अ' अर्थात अत्रेंचा हा कार्यक्रम शनिवार दि.21 जानेवारी 2023 रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे पार पडला.   



            अत्रेमय   नावातच सर्व....तरीही त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतुन  निखळ आनंद गवसतो.आज सादर झालेल्या सर्व कलाकृती त्यांचे साहित्य कालातीत असल्याची साक्ष पटवते. त्यांची विनोदबुद्धी दैनंदिन जीवनात ही तितकीच बहरायची. अत्रेंच्या नाटकांतील (तो मी नव्हेच) असो की मोरूची मावशी आपण आजही त्या नात्यात तल्लीन होऊन जातो. 



              कॉलेज जीवनात ऐकलेली वाचलेली प्रेमाचा गुलकंद ही कविता आजच्या अति वेगवान आणि प्रेमाचे सर्व मापदंड बद्दलल्यानंतरही मिश्किल भाव मनात आणण्यात यशस्वी होते.

            पाठ्यक्रमात असलेली आजीचे घड्याळ या नाद ,ताल ,लय यांनी परिपूर्ण कविता पुन्हा बालपणात घेऊन जाते..... आणि खरोखर त्याकाळी याच घड्यालावर सर्व काही चालायचे याची मनाशी नोंद होते.

             श्यामची आई ही महाराष्ट्राची संस्कृती जपण्यास हातभार लावणारी संवेदनशील कलाकृती अजरामर केली ती श्यामची आई या चित्रपटाने,या चित्रपटाची भुरळ आजही कायम आहे.तसेच महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित कलाकृती व त्यातील बोलके प्रसंग,तो मी नव्हेच या  नाटकातील एक मिश्किल प्रसंग साजरा करून  तो विनोद आजही तितकाच ताजा असल्याची जाणीव झाली,

           देह देवाचे मंदिर ऐकताना संपूर्ण सभागृह तल्लीन झाले होते...यमुनाजळी खेळ खेळूया हे दोन्ही काळाचे संदर्भ देऊन सादर केले गेले नि रंगांची  योग्य रचना किती तरी शब्दांचे काम स्वतःच करते ,अप्रतिम परिणाम साधते.

ब्रम्हचारी, मोरूची मावशी हे आपल्या चित्रपट सृष्टीतले  कधीही विसमरणात न जाणारे चिरकाल टिकणारे ऐवज आहेत.



           नाटक, कथा,कादंबऱ्या,त्यावर आधारित चित्रपट इथपर्यंतच अत्रेंचा वावर मर्यादित न राहता त्याकाळच्या समाजावर त्यांच्या विचारसरणीचा ठसा उमटलेला आपल्याला दिसतो. समकालीन साहित्यिक,विचारवंत यांच्याबरोबरीचे त्यांचे नाते , महाराष्ट्र मुक्ती संग्रामातले त्यांचे योगदान, मुंबई महाराष्ट्राचीच रहावी म्हणून सरकार विरोधात केलेले आंदोलन किंवा मराठा पत्र मधून सरकारला धारेवर धरण्याची त्यांची बुलंद लेखणी... असे कितीतरी पैलूंना गवसणी घालण्यात हा कार्यक्रम यशस्वी झाला.

           अत्रे यांच्याबद्दल महाराष्ट्राला माहिती आहेच परंतु कालौघात त्यांचे विचार, स्पष्टोक्ती, धडाडी, समाजाप्रती जाणीव  यांची आजच्या पिढीला माहिती होणे महत्त्वाचे त्यादृष्टीने हा कार्यक्रम खूप काही देऊन जातो.

कार्यक्रम लेखनाची धुरा श्री.सुनिल सावंत यांनी सांभाळली असून कार्यक्रमाचं दिग्दर्शन श्री.अभिजित अरुण कांबळी यांनी लिलया आणि डोळ्याचं पारणं फिटेल असं केलंय. श्री.नितीन गलांडे यांचं संगीत मंत्रमुग्ध करतं. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी रागिणी यादव कांबळी यांनी चोख बजावली आहे.नेपथ्य कला श्री.पराग शितोळे ,सिद्धी तळाशिलकर यांनी आहे. गायक प्रिया लोणकर,पल्लवी बुलाखे,संतोषकुमार वाघमारे आणि सार्थक खैरनार यांनी कार्यक्रमाला उत्तम आवाज लावलाय.चार्वाक जगताप यांचा तबल्यावरची बोटे,नितीन गलांडे याची ढोलकीवरील थाप,प्रथमेश मोहिते यांचा किबोर्ड, आणि अभिराग कांबळी यांची गिटार आपल्याला गतकाळात घेऊन जाते.

        श्री.सुनील सावंत आणि उर्मिला सावंत यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.अजय गांगण, कबीर जगताप,सुप्रिया तळेकर,अभिजित कांबळी,अभिजित बावळे, आर्यन तळेकर,अन्वय देवधर,अनया तळेकर,प्रणय चव्हाण,सार्थक खैरनार,स्वराज केळुस्कर,सोनाक्षी कांडकर अश्विनी परदेशी,माधवी भोसले,आर्ची गांगण,हेमंत शिंदे,निलेश खानोरे, विजय जाधव इत्यादी कलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली.एक दर्जेदार आणि हशा आणि टाळ्यांनी रेलचेल म्हणजे पराग प्रतिष्ठान निर्मित "अत्रेमय 'अ' अर्थात अत्रेंचा" प्रयोग.


                     संजय गरबड मराठे

                        उल्हासनगर - 4  

                       9421973888

Sunday, 15 January 2023

छंद - जगण्याचा ध्यास (एक ग्रेट भेट)

 छंद - जगण्याचा ध्यास

             (एक ग्रेट भेट)     


           जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोणता न कोणता छंद असतो.काहीतरी वेगळं करण्याची आवड असते.आणि त्यातून त्याला आनंद मिळत असतो.तो आनंद त्याला जगण्याची नवी दिशा देत असतो. आवड आपल्याला अनेक गोष्टींची असू शकते.उदाहरण द्यायचं झाल्यास गाणी ऐकणे, क्रिकेट खेळणे,चित्रपट पहाणे इत्यादी.आवड आपण फावल्या वेळेत जोपासू शकतो. परंतु छंद मात्र फार कमी गोष्टींचा असतो.छंद जोपासण्यासाठी ध्यास घ्यावा लागतो.थोडासा वेडेपणा असावा लागतो.एखाद्या गोष्टीचा छंद लागला की ती मिळवण्यासाठी मनुष्य जीवाचा आटापिटा करतो. छंद जोपासण्यासाठी बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो.


           आज बालभवन डोंबिवली येथे मुलाला घेऊन गेलो असता गुलाब प्रदर्शन आणि दुर्मिळ टपाल तिकिटे यांचं प्रदर्शन पहायला मिळालं.त्या प्रसंगी संग्रहकार श्री.गजानन पटवर्धन सर यांच्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी रंगल्या.सरांनी सांगितले की शालेय जीवनापासून टपाल तिकिटे संग्रहित करण्यास सुरुवात केली.त्यातूनच इतिहास आणि जागतिक वारसा,ठेवा जतन करण्याचे कार्य टपाल खाते करत असते; त्याचे महत्व समजल्यामुळे हा छंद माझ्या आयुष्यातील पुढे टर्निंग पॉईंट ठरला.त्यामुळे वर्गीकरणाच्या माध्यमातून विश्वदर्शन ह्या संग्रहातून होत गेलं.सरांच्या संग्रहात देश विदेशातील 50,000 टपाल तिकिटे व त्या अनुषंगाने टपाल साहित्य (प्रथम दिवस आवरणे,मिनीएचर्स,विशेष कव्हर्स इ.)जगातील पहिले आणि भारतातील काढलेले प्रथम तिकीट पासून सुवर्ण तिकिटापर्यंतचा होत गेलेला प्रसार व त्याचा प्रवास सरांच्या जीवनात संग्रहित होत गेला.

           अशाच छंदातून "गुलाब" (फुलांचा राजा) या एकाच विषयास केंद्रस्थानी मानून त्या संबंधीची टपाल तिकिटे संग्रहित करतांना सरांच्या संग्रहित जवळ जवळ 70 देशांची काढलेली सुमारे 1000 तिकिटे कशी संग्रहित झाली त्याचे त्यातूनच त्याला महत्व देण्यात आले.किंबहुना हा प्रवास खूप खडतर आणि कष्टाचा होता असं ते सांगतात. सर सांगतात पुण्यातील एका गुलाब प्रदर्शनामधून मी भारतीय गुलाब संस्था (Indian Rose Fedration)आजीव सदस्य झालो.आणि अनेक मोठं मोठ्या गुलाब प्रदर्शन- अधिवेशन मध्ये सहभागी होऊन प्रथम पारितोषिके मिळवली.त्यातूनच कोलकत्ता येथे 2020 साली भरलेल्या जागतिक गुलाब संघटने तर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

            सर सांगतात ह्या छंदाचा आधार घेऊन 2002 साली स्वाक्षरी संग्रहित करण्याचा छंद जडला.भारतरत्न,गान-कोकिळा लता मंगेशकर यांना संगीत क्षेत्रा विषयी दुर्मिळ तिकिटे त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत दाखवून पहिला अभिप्राय आणि स्वाक्षरी प्राप्त झाली.त्यांचाच आदर्श आणि प्रेरणा समोर ठेऊन देश- विदेशातील प्रख्यात व्यक्तींना भेटून 1500 च्या वर अशा वैशिष्ट्यपूर्ण स्वाक्षऱ्या व त्या संबंधीच्या विशेष नोंदी संग्रहित ठेवल्या आहेत.

        सध्या सर अनेक लहान मोठ्या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन त्यातून विशेष करून शालेय,कॉलेज विध्यार्थ्याना या छंदाचे महत्व पटविण्यासाठी ,वाईट व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी ,आणि सामाजिक कार्य व त्यातून मिळणारा तणाव मुक्त आनंद. ह्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.

▪️या कार्यामुळे सरांना अनेक सन्मान - पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

▪️"पिलर्स ऑफ हिंदुस्थानी सोसा.2009" हा आंतर राष्टीय पुरस्कार

▪️"राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार 2021"

▪️"राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2021"

▪️स्वाक्षरी छंदाविषयी सही रे सही   ह्या पुस्तकाला "साहित्य गौरव "पुरस्कार

▪️स्वाक्षरी संवादकार पुरस्कार

आणि इतर बरेच पुरस्कार सरांना मिळालेत.


                        संजय ग. मराठे

                        उल्हासनगर - 4

                       9421973888

शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर

 शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर


             तंत्रज्ञान आधुनिक काळाचा मंत्रच जणू. कोणतीही गोष्ट तंत्रज्ञानाशिवाय अशक्य वाटावी इतकी अत्यावश्यक गोष्ट आहे आज तंत्रज्ञान.आपल्या दैनंदिन जगण्यात तंत्रज्ञान आहे.आपल्या दिवसाची सुरुवातच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होते. आपले जीवन खूप सहज सोपे तर झालेच आहे परंतु संपूर्ण जगच विकासाच्या क्रांतिकारी बदलाने व्यापले आहे.


            कोरोना काळात तर सर्वांनाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटले आहे. प्रत्यक्ष संपर्कात न येऊनही अनेक कामं आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने करायला शिकलो आणि आतापर्यंत ज्या विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे दुरून कौतुक करत होतो ते प्रत्यक्षात सर्वांनी वापरायला सुरुवात केली. तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऑनलाइन शाळा सुरू झाल्या, पाठांचे पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन, अँनिमेशन्स , व्हिडीओज,वर्कशिटस, तस्संम सॉफ्टवेअरचा वापर शिक्षण पद्धतीत करायला सुरुवात केली.

               आपल्या शिक्षणाचा प्रवास गुरुकुल ते ऑनलाइन असा झाला. गरज ही शोधाची जननी म्हटली जाते आणि त्याचाच प्रत्यय या सर्व काळात आला. एक वाट बंद झाली की दुसऱ्या मार्गाचा विचार करण्याची माणसाची सवय, त्यालाच अनुसरून ऑनलाइन शिक्षणाचा विचार होऊ लागला. आणि मग मोबाईल,संगणक,लॅपटॉप,टॅबलेट, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही अशा उपलब्ध प्रत्येक गोष्टीचा वापर करून दर्जेदार शिक्षण देण्यास सुरुवात झाली. अनेक शिक्षकांचा खडूशी असलेला संबंध कमी झाला, अनेक शिक्षक तंत्रज्ञानाचा वावर करून जास्त विद्यार्थी केंद्रित अध्ययन व्हावे म्हणून आज प्रयत्न करत आहेत. यामध्ये टच स्क्रीन, स्मार्टबोर्ड, ऑनलाइन इंटरऍक्टिव्ह , क्विझ सारख्या गोष्टींचा फार उपयोग होत आहे. इंटरनेटच्या प्रभावी वापरामुळे वेळ नक्कीच वाचतो आहे. इंटरनेट वरील वाचन वाढत चालले आहे, विशेषतः संदर्भ शोधण्यासाठी ग्रंथालयात जाण्याची सवय जवळपास मोडीत निघाली आहे. पाश्चात्य तसेच भारतीय वृत्तपत्र , वेबसाईटवरील लेख, शैक्षणिक ब्लॉग,युट्युब यांचा वापर वाढताना दिसतोय.

              आज तंत्रज्ञानाने मानवी जीवनातील सर्व क्षेत्रे व्यापून टाकली असताना कुणीही त्यापासून दूर राहू शकत नाही. भारतीय शिक्षण व्यवस्था ही खूप प्राचीन आहे, त्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. असे असले तरीही आज अध्यापनात योग्य व विचारपूर्वक तंत्रज्ञान वापरल्याने अध्ययन अध्यापन आनंददायी होऊ शकते. परिणामकारक  अध्यापणाने विचारांची क्षेत्रे रुंदावण्यास मदत होते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत शिक्षक व विद्यार्थी शिक्षण देत- घेत आहेत. दर्जेदार व प्रभावी अध्यापनात पूरक साहित्य म्हणून  नव्या तंत्रज्ञानाची  मदत होतेय, स्व-निर्मित शै.व्हिडीओ,ब्लॉगवरील शै. साहित्य , विविध शैक्षणिक अँप , सामाजिक माध्यमांद्वारे आज उपलब्ध होत आहे. दूरस्थ शिक्षण तर सहज शक्य झालेय,जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट मुळे शिक्षण पोहचत आहे, विद्यार्थी स्वप्रेरणेने तंत्रज्ञान वापरून आज स्वयंध्ययन करत आहेत.यापुढे जाऊन विद्यार्थी स्वतःच्या शैक्षणिक  प्रगतीचा आलेख ब्लॉग, युट्युब आणि इतरही अन्य सामाजिक माध्यमातून सादर करत आहेत.बऱ्याच गोष्टी आज विद्यार्थी स्वतः शिकत आहेत, त्याप्रमाणे नवनवीन माहितीची भर पडत आहे. गरज ओळखून स्वतः तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर होत आहे, जीवन सुसह्य होत आहे. खरेतर तंत्रज्ञान हा आज परवलीचा शब्द झाला आहे.  शिक्षण,कृषी ,अवकाश,वैद्यकीय असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे तंत्रज्ञान नाही, त्यामुळे आजच्या जगात विज्ञान तंत्रज्ञान ही आवश्यक बाब आहे.आज कोणतीही माहिती एका क्लिक वर उपलब्ध होते आहे, कोणतीही माहिती क्षणार्धात दुसर्यापर्यंत पोहचवली जात आहे, एकावेळी असंख्य लोकांशी संवाद साधता येत आहे, संपूर्ण जग खऱ्या अर्थाने जवळ येत आहे आणि खऱ्या अर्थाने ही रूढार्थाने पुस्तके, दप्तर,शाळा याशिवायची शिक्षणाची वाटचाल आहे.

          आजचं विज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान आहे आणि डिजिटल स्कुल, E-स्कुल, टॅब्लेटस्कुल या संकल्पना पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करतील अशी अपेक्षा आहे. कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते , त्रुटी याही माध्यमाच्या असतील पण जे जे योग्य ते ते स्वीकारून नव्या जुन्याची सांगड घालून राजहंसाप्रमाणे निरक्षीर विवेकी जगणं अंगीकारता येणं ही काळाची गरज आहे. बदल तर सातत्याने होतच राहणार आहेत, परंतु त्या बदलाचा मुळ उद्देशावर परिणाम न होऊ देता बदल स्वीकारले तर नक्कीच त्याचे फायदे मिळतील. आणि नव्या जुन्याची सांगड घालत तंत्रज्ञान वापरत शिक्षण आणखी आनंदादायी, ज्ञानरचनावादी करता येईल.


                       संजय गरबड मराठे

                           उल्हासनगर 4

                          9421973888

Monday, 4 July 2022

जगण्याचं प्रयोजन

 प्रिय दादास (अनिल गणवीर)


       ज्या आयुष्याचं परीक्षण केलं गेलं नाही ते आयुष्य जगण्यास योग्य नाही असं सॉक्रेटिस म्हणतो.

       आयुष्याचं केवळ परिक्षणच नाही तर त्यामागचं प्रयोजनही ज्याला कळलं आणि त्याप्रमाणे ज्याने जीवन जगलं असं तुझ्याबद्दल लिहितांना भावना ही निःशब्द झाल्यात.खरेतर मनावर राज्य करणारी आताच्या या क्षणाची शांतताच तुझ्या आयुष्याबद्दल खूप काही सांगून जातेय, पण तरीही लिहावं तर लागेलच कारण हे लिहिणं तुझ्यासाठी नाहीये तर माझ्याच साठी खूप गरजेचं आहे. खूप काळ लोटलाय प्रत्यक्ष सहवास अनुभवून तरीही ही मैत्री आजही इतकी टवटवीत आहे. आजही त्यावर आपलं मैत्र चिरतरुण भासतंय. सगळ्या आठवणी एकामागोमाग सरसर  जातायत...मन क्षणात कॉलेजच्या दिवसांत भरारी मारून येतंय नि मग भावना उचंबळून येतायत....



 ...वेळ झाली भरमध्यान्ह... माथ्यावर तळपतो सूर्य.... वसंत ऋतुपुर्वी पानगळ अनुभवून आयुष्याचं रितेपण जपणारा निसर्ग भर उन्हात नव्याने जगण्याची वाट पाहतो....कोवळ्या पालवीने बहरतो.. सकारात्मकतेचा सूर जागवणारा निसर्ग आपल्यालाही खूप काही शिकवतो.  निवृत्तिकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आपल्याला मिळतो. सामाजिक नैतिकता तर अत्यावश्यकच पण त्याहून सुंदरता असते ती विचारांची... आणि ती स्वतःच जपायची असते. ही विचारांची समृद्धी कलासक्त मन असणाऱ्या माणसाकडे असते आणि ही वैचारिक ,भावनिक,सामाजिक श्रीमंती तुझ्यात पहायला मिळते.तू माणूस म्हणून साधा आहे म्हणजे तू गरीब आहे अस नाही. कारण गरज आणि चैन ह्यातला फरक कळलेल्या माणसाचं राहणीमान साधंच असतं बरेचदा...आणि याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे तू आहेस मित्रा.

           ....आजच्या प्रचंड झकापकीच्या दुनियेत तुझ्यासारखा माणूस विरळाच. तुझ्या इतका संवेदनशील माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. हळवं स्त्री मन असलेला तू शिक्षकी पेशासाठीच नियतीने घडवला असावा असे कित्येकदा वाटते,कारण शिक्षकांचे आयुष्य हे जगात सर्वात जास्त असते  ...जोपर्यंत त्याचा विद्यार्थी जिवंत तोपर्यंत शिक्षकही संस्काररूपाने त्याच्यात असतो, आणि  आपल्या सारखे शिक्षक तर भाग्यवानच,कारण आईच्या उबदार कुशीतून मुल अलगद शिक्षकांच्या आश्वासक हातात येते आणि असे धरलेले ते बोट त्या मुलाला निःसंकोचपणे जीवनप्रवासात मुक्त विहरु देते.... असे कित्येक विद्यार्थी मुक्त विहरत असतील,स्वतःच स्थान निर्माण करत असतील.आजच्या कोरड्या जगात मायेचा ओलावा, मनाचा मोठेपणा,जीवनाकडे पाहण्याचा नितळ दृष्टिकोण या मुलांमध्ये तुझ्यासारख्या शिक्षकामुळे नक्किच पाझरला असेल.

             जीवन मार्ग फुलत अन फुलवत असतांना आपण एकटं काहीही करू शकत नाही.आपलं कुटुंब ,आपले मित्र,सहकारी,शिक्षक,ज्यांनी आपल्या  सुखदुःखात आपल्याला संगत केली असे सहृदयी,दूर कुठंतरी शिक्षण नोकरी साठी गेले असता तेथील हॉस्टेल,रूम पार्टनर...असे किती तरी लोकं आपले जीवन फुलवण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत.आज एवढे वर्ष उलटून गेली.तरी देखील आजही भंडारा येथील त्या स्मारकात बसून आयुष्य, समाज आणि संगीत वरील चर्चा आठवते.नाशिकनगरच्या रस्त्यावरील वेल्हाळ गप्पागोष्टी आजही तरुण आहेत.आपल्या रुम मधील ऐकलेल्या अहमद आणि महंमद हुसेन यांच्या चल मेरे साथ ही चल, मै हवा हु ,डस न जाये ह्या आणि इतर गझल मेंदू आणि हृदयावर कब्जा करून आहेत.लताबाई आणि आशाबाई यांच्यातल्या गायकीत कोण सरस म्हणत त्यांची गाणी आणि गाण्यातील बारकावे शोधत झालेली चर्चा आणि तो अजब निष्कर्ष आज ही कुठंतरी आशाबाईंच्या गाण्याकडे घेऊन जातांना दिसतो.अमृता प्रितम आणि त्यांचं साहित्य त्यांच्या जीवना विषयी सांगितलेली कहाणी आज ही बंड काय असतं याचं प्रत्येय देतं.वाचलेल्या पुस्तकातील कोटेशन आणि विविध कवींच्या काव्यावर झालेली चर्चा, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील संगीत- गायकाचा आवाज,  कॉलेज ग्रंथालय आणि तेथील विखुरलेली पुस्तके आणि आपण रूमवर आणलेली त्यातील काही पुस्तके त्यावरील चर्चा आजही मनाच्या कप्प्यात घर करून आहेत.त्या दोन वर्षात आरमोरी,धारगाव,तुमसर येथील आई बाबा यांचं प्रेम खोल खोल आत आजही सुगंध देतंय. आरमोरीच्या घरामागील गुलाबाची बाग, टॉकीजला पाहिलेला अमिरचा 'जो जिता वही सिकंदर' नंतर घरी येऊन आईने केलेलं गरम गरम पिठलं आणि भात याची चव आज ही जिभेवर जशीच्या तशी आहे.धारगाव येथे मुबारकच्या घरची बिर्याणी आणि रुमवर बिर्याणी भरून पाठवलेला डबा उघडला असता त्यातील तो घमघमाट आजही मेंदूत साठलेला आहे.

             तुझ्यातली साहित्याची भूक मी जवळून पाहिली आहे.तुझं लिखाण हे हृदयाला अगदी पिळवटून टाकतं.त्यात जीव ओतून प्राण कंठात आणून भावनांची मांडणी असते..खूप खोलवरचं आहे हे सर्व....कदाचित तुझ्या एवढा मी ही वास्तववादी मांडणी नाही करू शकत...कारण मी ही नागरिकरणाला काहीसा भुललो आहेचं...आयुष्यरुपी जिन्याच्या काही पायऱ्या चढताना कित्येकदा ठेचाळलो खरा....पण ते वास्तव लिहितांना त्याची मांडणी करतांना नाही धीर होत कधीचं याला तू माझं दुबळेपण म्हण हवं तर, नाहीतर न्यूनगंड असावा माझा तो.पण तुझ्या एवढं मी खरंच नाही लिहू शकत...तुझं लिखाण मी आजही मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलं आहे.आणि हो मी जे काही थोडंबहुत लेखन करतो ती तुझीच प्रेरणा आहे हे आज मला सांगितलंच पाहिजे.

            आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि आपला गोतावळा याचं भान आपण ठेवलं पाहिजे.ही तुझी शिकवण आजही मनाच्या पटलावर कोरून ठेवली आहे.आजची पिढी आणि त्यांची व्यक्त होण्याची पद्धत हे आपण डोळसपणे समजून घेऊन आपली पारंपारिक जिद्द सोडून थोडं मोकळं व्हायला आपण शिकलो पाहिजे.हा तू दूरध्वनीवर दिलेला डोस आयुष्य सुंदर करून गेलाय.

             प्रेरक आठवणींची भरजरी वस्त्र जपताना आठवणींकडून प्रेरणा मिळतात आणि त्या आठवणींवर सगळं आयुष्य सहज जगता येत,आपल्या मैत्रीच्या आठवणीही तशाच....सगळ्या पातळ्यांवर आपल्यात चर्चा झाल्यात, वादविवाद झाले, विचार विनिमर्ष ही घडले आणि वैचारिक पातळीवर जुळलेली ही मैत्री म्हणूनच आजही अखंड आहे. 

              कितीतरी माणसं  तरुणपणीच नोकरी करताना म्हातारी होतात, पण काही रिटायर्ड झाली तरी म्हातारी होत नाहीत कारण त्यांना *जिवीका* आणि *उपजीविका* यातला फरक कळलेला असतो, म्हणूनच उपजीविका म्हणून नोकरी करत असताना जीविका म्हणून जोपासलेला छंद, आवड,कला आणि वाचनाचा व्यासंग,कवितेचा ध्यास आणि  जीवनाबद्दल नितांत आदर ह्या गोष्टी तुला नोकरीची पोकळी कधीही जाणवू देणार नाही याची खात्री वाटते.

तुझी निवृत्ती म्हणजे आनंद,दुःख,हुरहूर अशा अनोख्या संमिश्र भावनांचे मिश्रण.कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाने नटलेल्या तुझ्या व्यक्तिमत्वाचा आज पुन्हा एकदा नव्या वाटेवर पाऊल टाकण्याचा दिवस...  घरचेही तुझ्या या निवृत्तीची वाट पहात असतील,आतापर्यंत नोकरीमुळे जे छंद, जगणे राहून गेले असेल ते यापुढे मिळणाऱ्या वेळात भरभरून जगून घे,मुलींना, सहधर्मचारिणीला वेळ दे,राहिलेल्या सर्व स्वप्नांना गवसणी घाल .....म्हणूनच तर निवृत्ती नसून जगण्याची नवी आवृत्ती आहे ही.

तुझ्या मनातील अपार प्रेमळ भावना ,जगाप्रति असणारी सहवेदना तुला नोकरीची पोकळी कधीच जाणवू देणार नाही, जगण्याच्या या नव्या वाटेवर तुला माझ्याकडून मनस्वी सदिच्छा.....!!💐🙏🏻

                                                        तुझाच                         

                                                    संजय ग. मराठे

                                                    9421973888

Monday, 6 June 2022

शोध माणसाचा

 शोध माणसाचा


             प्रत्येकाचा स्थायीभाव हा वेगवेगळा असतो...उद्भवलेल्या परिस्थितीला प्रत्येक व्यक्ती    आपापल्या परीने सामोरा जात असतो...कधी त्याच्या पदरी अत्यानंदाचे क्षण पडतात तर कधी दुःखाची मालिका सुरू होते...आणि अशा बऱ्या वाईट अनुभवातून तो आपला जीवन मार्ग आक्रमीत असतो...

             आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला मोठं व्हायचं आहे.जगाच्या रंगमंचावर अनेक चांगले -वाईट मुखवटे परिधान करून आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे दाखवण्याची सर्कस चालू आहे.जे चांगलं ते चांगलं अन जे वाईट ते वाईट अस कोणी स्पष्ट सांगत नसल्यामुळे सर्वांचा मार्ग खोल अज्ञानात  कुठंतरी जातांना दिसतोय.

               खरं तर प्रयत्नाने माणूस 'माणूस' बनत असतो.दुसऱ्याच निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण करायला आपण आता शिकलं पाहिजे.आपल्याला आपल्या मनातील  द्वंद्व आपल्या मनातील अंतर्विरोध समजला पाहिजे.अंतर्मनातील द्वंद्व अंतर्मनातील विरोध जेवढं आपण समजून घेऊ तेवढं 'समाज' समजायला सोपं जाईल. द्वंद्व आणि अंतर्विरोध आपल्या आयुष्याचं नवीन नाव आहे.

          जीवन मार्ग फुलत अन फुलवत असतांना आपण एकटं काहीही करू शकत नाही.आपलं कुटुंब ,आपले मित्र,सहकारी,शिक्षक,ज्यांनी आपल्या  सुखदुःखात आपल्याला संगत केली असे सहृदयी,दूर कुठंतरी शिक्षण नोकरी साठी गेले असता तेथील हॉस्टेल,रूम पार्टनर...असे किती तरी लोकं आपले जीवन फुलवण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत.आपण हे कधीच विसरता कामा नये.

               खरं तर माणसानं अंतर्मुख असलं पाहिजे. निश्चलता आणि सादगी ही अंतर्मनात असली पाहिजे.आतून - बाहेरून आहे तसेच असले पाहिजे.कोणताही बडेजाव आतपर्यंत पोहचता कामा नये.अंतर्मुख माणूस कसा असावा तर आपल्या बाबत स्टेजवर जरी वाह- वाह चालत असेल तरी एका कोपऱ्यात बसून ते ऐकावं पण मंचावर  जाऊन उगाच छाती फुलून हार तुरे घेणारा नसावा अस मला प्रामाणिकपणे वाटतं.

            आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि आपला गोतावळा  याचं भान आपण ठेवलं पाहिजे.आजची पिढी आणि त्यांची व्यक्त होण्याची पद्धत हे आपण डोळसपणे समजून घेऊन आपली पारंपारिक जिद्द सोडून थोडं मोकळं व्हायला आपण शिकलो पाहिजे.

एकांतात एकट राहता आलं पाहिजे.आणि रडताही आलं पाहिजे.

आयुष्याच्या कोणत्याची वळणारवर प्रयत्न न सोडता आपल्यातील चांगल्या माणसाचा शोध घेतला पाहिजे....


                         संजय ग. मराठे

                      उल्हासनगर ४(ठाणे)

                         ९४२१९७३८८८

Sunday, 29 May 2022

जीवन वाट...



जीवन वाट...


          आयुष्य म्हणजे काय तर जगणं आणि मरणं यातलं अंतर.आयुष्य म्हणजे जीवन आणि मृत्यू यांना जोडणारा पूल.असं असलं तरी जीवन आणि मृत्यू मधील जे अंतर आहे तो काळ आपण कधी, कुठे, कसा घालवला-कंठला, हे ज्याचे त्याने अनुभवलेले असते.आयुष्याची ही पायवाट कोणाची खडतर तर कोणाची अगदीच सहज सोपी असते असं वाटतं....ते तसं वाटतं कारण आपण लांबून हे सर्व पहात असतो...माझ्यापेक्षा तो किती सुखी आहे असं कितीही म्हटलं तरी प्रत्येकाचं जीवनाचं गणित हे वेगळं असतं.प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं. दुःखाची खोली ,तीव्रता वेगवेगळी असते.तरी आपआपल्या जीवन वाटा धुंडाळून वाटसरू चालत असतो.



                आयुष्याची पायवाट कितीही दीर्घ झाली तरी वाटसरू आलेला शीण घालवण्यासाठी अधून मधून कुठंतरी विसावा घेत असतो. कधी तो टेकतो विस्तीर्ण वृक्षाच्या छायेत.कधी हिरव्यागार आणि बहरलेल्या पठारावर.अशाच निर्मनुष्य ठिकाणी  आपण कंठलेल्या आयुष्याची विविध रंगी बेरंगी मालिका सुरू होते मनात...आयुष्यातील नागमोडी वळणं आणि सरधोपट रस्ता यातील सोडवलेली जीवनाची गणितं तो पुन्हा पुन्हा आपल्या क्षीण नजरेने न्याहाळत असतो. जीवनाची काही गणितं सुटतात काही सोडून दिलेली असतात....सुटलेल्या - न सुटलेल्या आयुष्याच्या गणितांची गोळाबेरीज लावत बसतो स्थिर शून्य नजरेने.

               कितीही जीवनात चांगले -वाईट वळणं आले असले तरी तो प्रवास त्याचा स्वत:च्या अनुभव विश्वाने डोळे आणि कान उघडे ठेवून केलेला असतो.असा प्रवास कितीतरी प्रसंगांनी रंगतदार झालेला असतो.कधीही न विसरले जाणारे असंख्य व्यक्तिमत्वाचे ठसे आपल्या मनावर उमटत गेलेले असतात.अनेक वादळांचा आवेग आपण अनुभवतो.अनेकवेळा जीवनाच्या चक्रव्युवात आपण अडकतो. आपण आपलीच सुटका करून घेतल्यानंतर आपण किती घाबरलो होतो हा विचार करून आपलेच आपल्याला नवल वाटते. अशा कितीतरी आठवणी जीवनवाटेवर येत असतात.आठवणींना कधी क्रम नसतो.आठवणी कधी अकस्मात कोसळणाऱ्या पावसागत असतात तर कधी एखाद्या बुडबुड्यागत सावकाश अलवार .आठवणी कधी खूप वेदनादायी असतात तर कधी सुखाची फुंकर घालणाऱ्या असतात.पण मजा अशी असते की आठवणी कालांतरानं आनंदच देणाऱ्या ठरतात.आयुष्याच्या प्रवासात आलेले अनुभव त्या त्या क्षणी अनुकूल किंवा प्रतिकूल असतात...पण कालांतरानं काळाच्या किमयेनुसार त्या आठवणी आनंदच देत असतात...

               असंख्य वेळा आपण स्वप्नांच्या पाठी लागून सर्वदूर अगदी बेभानपणे चालत सुटतो.स्वप्नांची पालखी घेऊन आपण न थकता चालत राहतो. कदाचित स्वप्न पूर्ततेसाठी आपण सर्वदूर भरकटतो. वाटा चुकतो...तरीही त्याच ओढीनं आपण धावत असतो वेड्यागत......ठेचाळलो की आसवं जमतात डोळ्यात. मग वाटतं अरे ही तर आपली वाट नव्हेच मुळी.... अन आता खऱ्या अर्थाने मागचे मार्ग बंदिस्त होतात....मग उरतं फक्त पुढे पुढे सरकत जाणे...एवढंच आपल्या हाती असतं. मनासारखं नाही जगता आलं याची सल कायम अंतर्मनात राहते.अशा असंख्य वाटा खुणावत राहतात आजूबाजूला....आपण आपली वाट निवडायची आणि पुढं पुढं चालत राहायचं .....मागून येणाऱ्या वाटसरूला आयुष्याच्या वाटांचा अनुभव फक्त देत राहायचे बस्स....


                           संजय ग. मराठे

                          ९४२१९७३८८८

                            उल्हासनगर 4

Wednesday, 25 May 2022

आसवांचा व्यापार गझल व्हिडीओ लॉन्च

 आसवांचा व्यापार गझल व्हिडीओ लॉन्च

https://youtu.be/2dusUDakvik


कवी श्री.संजय मराठे सर यांची मराठी गझल आसवांचा व्यापार   शुक्रवार दिनांक 20/05/2022 रोजी pipilika या You tube चॅनेलवर लॉन्च करण्यात आली.

          मराठे सरांची कविता वाचण्याची सवय असलेल्या वाचकांना  गझल रूपाने एक पर्वणीच जणू उपलब्ध झाली आहे.



       एक आदर्श शिक्षक, हळव्या मनाचा कवी,संवेदनशील माणूस ते गझलकार संजय मराठे हा प्रवास तसा बराच दीर्घ...पण म्हणतात ना अशक्यावर  विश्वास ठेवणं आणि ते शक्य करणं प्रेम करणाऱ्यालाच जमू शकतं आणि तेच कवितेवर अतोनात प्रेम करणाऱ्या किंबहुना कविता जगणाऱ्या माणसाला जेव्हा त्याच्या मनातले शब्द प्रत्यक्ष साकार होताना दिसतात तेव्हा ते पाहतांना - ऐकतांना मनाची होणारी कातर अस्वस्थता, मना-शरीरावर येणारी विलक्षण बेचैनी, शब्दातला भाव मनाला भिडल्यावर येणारा सुन्नपणा... सारेच कसे विलक्षण...

          दोन व्यक्ती कितीही एकमेकांच्या प्रेमात असल्या तरी त्या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या भौतिक, मानसिक, भावनिक ,सामाजिक गरजा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची मतं, इच्छा,आकांक्षा वेगळ्या असतात. सहवासात जसं माणूस खुलतो तसेच ते स्पेस न मिळाल्याने रसहीन ही होतो. हीच कसरत करतांना कधीतरी छोटी-मोठी भांडणं ही होतातच, लहान-सहान कुरबुरी होतात... नि त्यामुळे होणारी मनाची घालमेल,घुसमट या गझलमध्ये अचूक टिपलीय.

         शब्द तर हृदयाला भिडतातच पण अतिशय समृद्ध,सशक्त अभिनयाने सार्थक खैरनार आणि सोनाक्षी कांडरकर या दोन्ही कलाकारांनी ती आर्तता,व्याकुळता प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहचवलीय, मनाची ही अवस्था स्वत: सार्थक खैरनार यांनी तितक्याच हृदयाला भिडणाऱ्या आवाजाने साधलीय आणि कवींच्या शब्दांना साजेशी स्थळ काळाची योजना अभिषेक जगताप या नवोदित दिगदर्शकाने केलीय.प्रत्येक फ्रेम अचूक आणि समर्पक झालीय, आशय मांडणी आणि तितक्याच ताकदीने ती कॅमेऱ्याने टिपणे यामुळे विचारांची ,भावनांची तीव्रता पोहचविण्यात सर्वचजण यशस्वी झालेत.कविता वाचण्यात...ऐकण्यात....पाहण्यात आणि अनुभवण्यातला आनंद ही गझल पाहतांना मिळतो.व्हिडीओ संकलन करतांना अभिजीत अरुण कांबळी ,चैतन्य पवार यांची ताकद आपणास दिसून येते.... 

          नात्यात आलेला तात्पुरता दुरावा नि मग अबोला,जोडीदाराचा कासावीस चेहरा ..... मानवी भाव भावनांचा आणि प्रेमाचा बंध  कमकुवत होण्याचा क्षण ...आणि तेथूनच सुरू होतो *आसवांचा व्यापार....


गझलकार : संजय मराठे

संगीत /गायक : सार्थक खैरनार

तबला : संगीत कुलकर्णी

दिग्दर्शन /छायाचित्रण : अभिषेक जगताप

संकलन : चैतन्य पवार / अभिजीत अरुण कांबळी

कलाकार

सोनाक्षी कांडरकर

सार्थक खैरनार

Saturday, 30 April 2022

निवृत्ती? छे! जगण्याची नवी आवृत्ती!!

 🌹ऋणनिर्देश...🌹


निवृत्ती? छे! जगण्याची नवी आवृत्ती!!


         आदरणीय श्री.बागुल सरांची निवृत्ती म्हणजे आनंद,दुःख,हुरहूर अशा अनोख्या संमिश्र भावनांचे मिश्रण.

           गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत अनेक आदर्शवत पिढ्या अन हजारो विद्यार्थ्यांना सुजाण, सुसंस्कृत, समृद्ध करणाऱ्या श्री.बागुल सरांचा आजचा निवृत्तीचा दिवस.कर्तृत्व,दातृत्व आणि नेतृत्वाने  नटलेल्या एका व्यक्तिमत्वाचा आज पुन्हा एकदा नव्या वाटेवर पाऊल टाकण्याचा दिवस...  कारण शिक्षकाचे आयुष्य हे जगात सर्वांपेक्षा जास्त असते.... जोपर्यंत त्याचा विद्यार्थी जीवंत तोपर्यंत शिक्षकही संस्काररूपाने  त्याच्यात असतो. प्राथमिक शिक्षक हा त्यामानाने भाग्यवानचं, कारण आईच्या उबदार कुशीतून  मूल अलगद शिक्षकाच्या आश्वासक हातात येते आणि असे धरलेले ते बोट त्या मुलाला निःसंकोचपणे जीवनप्रवासात मुक्त विहरू देते....सरांचे असे कित्येक विद्यार्थी आज मुक्त विहरत असतील , स्वतःच स्थान निर्माण करत असतील.

           संस्कारक्षम पिढ्या घडवणारे श्री.बागुल सर शिक्षकांना ही आदर्शवत ठरले. आधुनिक जगाला आपलेसे करत तंत्रज्ञानाला सहज आत्मसात करत फक्त विद्यार्थी, शाळाच नव्हे तर सहकारी शिक्षक आणि शिक्षण विभाग कार्यालयालाही तंत्रज्ञानातील स्वतःचे सर्व ज्ञान पणाला लावून तळमळीने आणि समर्पित भावनेने मदत केली. कोणत्याही गोष्टीचे शंका निरसन ते आपल्या एका क्लिक ने करून देत असत. कधीही कोणत्याही कामाला त्यांनी कधी नकार दर्शवला नाही, किंबहुना नकार हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता... इतके ते आयुष्याप्रती सकारात्मक आहेत.शालार्थ असो,आयकर असो, शाळेची-विद्यार्थ्यांची कामे, पंचायत समितीची कामे असो वा वैयक्तिक कामे  ...श्री.बागुल सर त्याच तळमळीने  प्रत्येकाचे काम करत.

     प्रत्येक कामातील कार्यकुशलता आणि  कार्यतत्परता  केवळ वाखाणण्याजोगी...लहान असो मोठा असो ,ज्युनियर की सिनियर सरांनी सर्वांना कायम आदरभावानेच वागवले.कामप्रति निष्ठा असणे ही नैतिकता झाली परंतु ते काम कळकळीने निभावणं ही फार दुर्लभ गोष्ट आहे आजच्या जगात... आणि म्हणून साऱ्या गर्दीतही श्री.बागुल सरांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते ते त्यांच्या स्वभाव गुणवैशिष्ट्यांसह.

        त्यामुळे फक्त आदर्श शिक्षक, मार्गदर्शक सहकारीच नव्हे तर विश्वसनीय कर्मचारी म्हणूनही सरांचा नावलौकिक आहे.

             ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही म्हणतात,मन आनंदी असले की त्याची झळाळी चेहऱ्यावर दिसते, म्हणूनच सर अजूनही पुढील 10 वर्षेही याच खळाळत्या ऊर्जेने कार्यरत राहू शकतील असे वाटते.

            अनेकदा सरकारी कर्मचारी हा इतका त्रासलेला असतो की निवृत्ती आधीच 10 वर्षे तो निवृत्त झाल्यासारखा त्रासिक चेहऱ्याने वावरत असतो, त्यामुळे स्टाफ ला वाटते हा घरी बरा आणि घरच्यांना वाटते हा ऑफिसमध्येच ठीक. परंतु सरांच्या जिंदादिल स्वभावामुळे घरचेही सरांच्या निवृत्तीची नक्कीच वाट पाहत असतील आणि आपण सर्वच त्यांचे मार्गदर्शन यापुढेही लाभत राहील यासाठी प्रयत्न करणारच आहोत. आतापर्यंत नोकरीच्या व्यस्ततेमुळे जे छंद, जगणे राहून गेले असतील तेही यापुढे मिळणाऱ्या वेळात भरभरून जगता येईल, मुलांना, सहधर्मचारिणीला वेळ देता येईल, राहिलेल्या सर्व स्वप्नांना गवसणी घालता येईल, म्हणूनच तर निवृत्ती नसून जगण्याची नवी आवृत्ती आहे .

           प्रत्येकजण जगत असतोच, पण *जीविका* आणि *उपजीविका* यातला फरक फार कमी जणांना कळतो.... तो सरांना कळलाय म्हणूनच उपजीविका म्हणून नोकरी करण्याबरोबरच जीविका म्हणून कला,छंद, आवड,ध्यास,नाविन्याची आस आणि तंत्रज्ञानाची कास त्यांनी कधीच सोडली नाही. त्यामुळे नित्य नवं शिकण्याची इच्छा त्यांना यापुढेही कधीच नोकरीची पोकळी जाणवू देणार नाही याची खात्री वाटते.

          सदैव नम्र आणि स्नेहभाव जपणाऱ्या श्री.बागुल सरांना भावी आयुष्यासाठी केवळ शुभेच्छाच नाही तर त्यांच्या कार्याप्रती  ऋणनिर्देश... 🙏🏻


                    संजय गरबड मराठे

                       9421973888

Friday, 8 April 2022

भारतीय संगीत संस्कृतीचं दर्शन -"मी वसंतराव"

 भारतीय संगीत संस्कृतीचं दर्शन -"मी वसंतराव"


           संगीत हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतात एकाहून एक सरस गायक होऊन गेले. त्यातच महाराष्ट्राने अभिमानाने आपल्या शिरपेचात खोचावंआणि दिमाखात मिरवावं, अशी गायकी असणारं नाव म्हणजे पं. वसंतराव देशपांडे. ज्यांच्या गायकीने रसिकांना काही वेगळं ऐकण्याची दृष्टी दिली, त्या वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर ‘मी वसंतराव’ हा सिनेमा खूप काही आपणास देऊन जातो.

             "भाई व्यक्ती की वल्ली" पाहिला त्या दिवसापासून वसंतराव देशपांडे यांच्या विषयी अधिक काहीतरी भव्यदिव्य रंगभूमीवर यावं असं नेहमी वाटायचं.वसंतराव देशपांडे म्हणजे बगळ्यांची माळ फुले,दाटून कंठ येतो,एवढं आपल्याला माहीत आहे.प वसंतराव देशपांडे त्यांचा जीवन संघर्षाचा प्रवासच नव्हे, तर समाजाच्या कटू मानसिकतेवरही "मी वसंतराव" हा चित्रपट एक कटाक्ष टाकतो.वयाच्या चाळीशीतही  अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना सगळ्या गोष्टींसाठी लढाई करावी लागते हे खूप काही सांगून जाते.तत्कालीन संगीत घराणेशाही आणि पारंपारिक गायन यांना छेद देऊन स्वरांना मुक्तपणे गळ्यात साठवत, कोणत्याही चौकटीत न बसता आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहणारे हे वेगळं व्यक्तिमत्व तत्कालीन स्वयंघोषित अमात्यांना कसे बरे पचणार?



        वसंतरावांची संघर्ष गाथा पाहतांना बऱ्याच वेळा डोळे पाणावतात.प्रसिद्धी मिळेपर्यतच्या त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार चित्रपटात दाखवले आहेत. एकट्या आईने त्यांचे संगोपन करणे,आर्थिक दारिद्र्याला सामोरं जाणे,कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरी सांभाळणे या दोन्ही पातळ्यांवर कसरत करणे,नागपूर,पुणे,लाहोर असा प्रदीर्घ प्रवास किती गोष्टी सांगता येतील...

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या तोंडी  असलेलं एक वाक्य "या जगातील सर्वात मोठं दुःख म्हणजे,आपल्याला गायचं असणं. पण,समोरच्याला ते ऐकायचं नसणं. हे वाक्य समाजातील वैचारिक दारिद्र्य आणि खूप काही सांगून जातं.आपल्या गायनाला लोकमान्यता मिळण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली वसंतरावांना....आणि त्या प्रतीक्षा प्रवासात कुटुंब,मित्र परिवार यांनाही खूप काही परिश्रम घ्यावे लागले आणि सोसावेही लागले.

         जेव्हा आई म्हणते "तुझ्यासमोर एक कबुली द्यायचीय.तुझ्यावर मी सतत कुटुंबाचा विचार करायचे संस्कार केले.पण आता गाण्यावर अन्याय होऊ देऊ नकोस." हा संवाद खऱ्या अर्थानं हृदयाला आंतरबाह्य ढवळून काढतो.असे अनेक संवाद आहे की जे चित्रपट पाहतांना आपणास अंतर्मुख करतात.

           चित्रपटात शंकरराव सप्रे,मास्तर दीनानाथ मंगेशकर,पु. ल.देशपांडे,उस्ताद खान,बेगम अख्तर,वसंतरावांचे मामा,आई,वडील,पत्नी यांची पात्रे ही तेवढ्याच ताकदीची झाली आहेत.चित्रपटाची बांधणी उत्तम झाली आहे.योग्य त्या वेळी धक्के ही दिले आहेत आणि असंख्य नाट्यमय घटनांनी चित्रपट पुढे पुढे सरकता ठेवला आहे. तब्बल 20-22 गाणी आणि एकसे बढकर एक संवाद ऐकताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही.

          तुमचं घराणं कोणतं? या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं.वसंतराव देशपांडे यांनी स्वताःला त्यांच्या गायकीतून सिद्ध केलं.वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसानसात भिनलेली होती.सर्व गोष्टींनी परिपूर्ण अशी ही कलाकृती आपणास नावीन्य देऊन जाते...आणि तत्कालीन समाजाचं वैचारिक दारिद्रय़ाचे प्रतिबिंब दाखवून जाते.

         उपेंद्र सिद्धये आणि निपुण धर्माधिकारी या दोघांनीही खरी माणसं  पडद्यावर उभी केली आहेत... राहुल देशपांडे यांचा अभिनय अप्रतिम तर आहेच पण जोडीला अमेय वाघ,कौमुदी वालोळकर,पुष्कराज चिरपुटकर आणि अनिता दाते यांनी भूमिका अक्षरशा जिवंत केल्या आहेत.

           आपल्या आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली अनेक वर्षे राहुल देशपांडे वसंतोत्सव हा सांगीतिक महोत्सव आयोजित करत आहेत. आपल्या आजोबांच्या गायन साधनेचा प्रवास कायमस्वरूपी चित्रबद्ध व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यातूनच हा चित्रपट साकार झाला आहे."मी वसंतराव" म्हणजे एका नातवाने आजोबांना वाहिलेली आदरांजली आहे.महाराष्ट्रात अशी आदरांजली खूप कमी आजोबांना 

मिळाली असेल..."मी वसंतराव" हा केवळ चित्रपट नसून आपल्या भारतीय संगीत संस्कृतीचं दर्शन आहे असं म्हणायला काही एक हरकत नाही.

                             संजय ग. मराठे

                              उल्हासनगर-4

                             9421973888

Monday, 17 January 2022

नवी दृष्टी.....

 नवी दृष्टी.....


       आपण दुःखी का होतो? याची प्रत्येकाची अनेक कारणे असू शकतात.मुळात दुःखाचं कारण हा मनावरील ताण आहे.मन तुमचं आनंदी असेल तर तुमच्या समोर  कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही आनंदाने सामोरे जाल; पण मन जर आनंदी नसेल तर तुम्हाला दुसऱ्याचा साधा आवाजही सहन होणार नाही.ही मानवी मनाची गत आहे.त्यासाठी आपण आपल्या मनावरील ताण कमी केला पाहिजे.जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर अंतर्मनातील ताण आधी कमी केला पाहिजे.आपल्याला कोणत्या गोष्टींचा ताण येतो त्या गोष्टी सवयीने बदलून टाकायला हव्यात.लोकांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ते आपल्या हातात नाही.लोकांचं वागणं आपण बदलू शकत नाही.त्यामुळे आपल्या हातात काय आहे त्या गोष्टीचा उपयोग करून आपण आपलं स्वास्थ्य टिकवू शकतो त्यासाठी काहीतरी उपाय करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे.जगामध्ये असे किती लोक आहेत की जे आपल्यापेक्षा सर्वच बाबतीत कमी आहेत तरी ते आनंदी आहेत.आपण नेहमी आपल्या पेक्षा अधिक असलेल्या लोकांचे विचार करून तुलना करतो आणि दुःखी होतो.मुळात तुलना हेच दुःखाचं कारण आहे.जे आहे त्याचा आनंद न घेता जे नाही त्याचा विचार करण्यात आपण सारं आयुष्य घालवतो.



                खरं तर संकटे, अडचणी, नैराश्य, दु:ख, सुख..आनंद, या गोष्टींमुळेच जगणं समृद्ध होत असतं. जगण्याला चव या गोष्टींमुळेच येते. कधी कधी दु:खाची मालिका जरा जास्त काळ स्थिरावते,  पण तेही कधी तरी संपतेच. सुख जसे कायमस्वरूपी नसते तसेच दु:खही कायम राहत नाही. उलट सुखापेक्षा दुःखात जीवन अधिक डोळस आणि परिपक्व बनते.अशा वेळी दुःखाला आपण आपला गुरु किंवा मार्गदर्शक मानलं पाहिजे.मग पहा पुढचं आयुष्य किती सहजपणे आणि समृद्ध जगता येतं...

          मित्रांनो आपण कधी आपल्या अंतर्मनाची साद ऐकतो का?कितीदा आपलं मन आपल्याला सांगतं, पण आपण आपल्या व्यापामुळे किंवा जगण्यासाठी आवश्यक जुळवाजुळव करण्याच्या व्यापामुळे अवती भवतीचं वास्तव आपल्याला पहाता येत नाही.कित्येक वेळा रस्त्यावर चालतांना आपल्याकडे आशाळभूत नजरेने पहात असलेले चेहरे,रेल्वे स्टेशनवरील चिमुकले चेहरे आणि त्यांचे याचनेसाठी पसरलेले हात,सिग्नलवरील टाळी,करपलेला आणि वेळेआधी वार्धक्य आलेला चेहरा,वाडीवस्तीत अर्धमेलं जीवन जगणारी माणसं ....या माणसांची अगतिकता लक्षात येऊनही आपण मात्र आपल्या ऐच्छिक ठिकाणी पोहचण्यासाठी असलेल्या धावपळीमुळे या सर्वांकडे आपण दुर्लक्ष करतो... आणि अंतर्मनाची साद ऐकायचं आपण विसरून जातो.खरंच ही धावपळ एवढी महत्वाची आहे का?  ... आपण आपलं जगणं सुकर होण्याच्या नादात आणि भौतिक सुखापायी आपल्या आवडी निवडी,आपले सगे सोयरे,जिवाभावाचे मित्र,आपल्यातील सुप्त कला,निसर्गाच्या अलौकिक घडामोडी,एवढंच काय तर जगण्याचे चैतन्य यालाही तिलांजली देत असतो.

           कधीतरी या धावपळीच्या बाहेर डोकावता आलं पाहिजे.सकाळची उन्हं अंगावर  घेता आली पाहिजे,झाडाखाली उभं राहून अंगावर ऊन सावलीचा खेळ खेळता आला पाहिजे.रानगवताच्या गालिच्यावर अनवाणी चालता आलं पाहिजे,वाऱ्याची शीळ ऐकत मनसोक्त हुंदडता आलं पाहिजे ,माळरानावर पक्षांचा किलबिलाट आणि त्याची कलाकुसर ही उघड्या डोळ्यांनी पाहता आली पाहिजे.जीवन समृद्ध करणारं जे जे काही या चराचरात आहे ते अंगिकारले पाहिजे.

आयुष्य जगायला शिकलं पाहिजे.आलेला दिवस ढकलल्याने जीवन पुढे जाईल पण जीवन जगण्याचा खरा आनंद मात्र मिळणार नाही.जीवनातला आनंद मिळवण्यासाठी आपल्याला  मनाच्या हाकेकडे लक्ष द्यावं लागेल.केवळ भौतिक सुविधा आणि साधनांसाठी धडपड न करता स्वतःच्या आवडी निवडीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.चला तर मग जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहू या आणि नवीन उभारी घेऊ या.......


                        संजय गरबड मराठे

                         उल्हासनगर ,ठाणे

                          9421973888

Sunday, 2 January 2022

शाब्बास गुरुजी : अध्यापनातील नवी क्षितिजे

 पुस्तक परिक्षण


शाब्बास गुरुजी : अध्यापनातील नवी क्षितिजे

-----------------------------



शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मुल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे.ही अविरत चालणारी आहे. सरकारच्या विविध उपाययोजना आणि उपक्रमांमुळे जिल्हा परिषद मधील शाळांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.शिक्षण हे सर्वाधिक सृजनशील क्षेत्र आहे.केवळ पारंपारिक अध्यापन पद्धतीचा अवलंब न करता विविध उपक्रमातून विध्यार्थ्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी केलेली धडपड आणि राबविले उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत.

   अशाच उपक्रमशील,सर्जनशील शिक्षकांचे दैनिक सकाळमध्ये राजेंद्र दिघे यांनी शाब्बास गुरुजी या सदराच्या माध्यमातून उपक्रमशील शाळा आणि शिक्षकांच्या कामाचा लेखाजोखा मांडला.त्या लेख मालेतील निवडक ५५ उपक्रमशील हिऱ्याची कहाणी लेखक- राजेंद्र दिघे लिखित चपराक प्रकाशित शाब्बास गुरुजी हे पुस्तक हाती पडलं. 

          खरं तर खूप दिवसापासून 'सकाळ' च्या माध्यमातून सर्जनशील,उपक्रमशील, प्रयोगशील,तंत्रस्नेही शिक्षक,आणि त्यांनी घडवलेल्या शाळांबाबत माहिती आपण वाचत होतो.अशा शिक्षकांचं आणि त्यांच्या राबवलेल्या उपक्रमांचं संकलन व्हावं अशी मनीषा होती.चपराकने ती पूर्णत्वास आणली. 


                                                 सकारात्मक,समविचारी लोकं एकत्र आली की त्यांची निर्मिलेली प्रत्येक गोष्ट ही नावीन्य घेऊन येते.अशाच नाविन्यपूर्ण गोष्टींनी समाजाला एक वेगळी परिवर्तनाची दिशा मिळत असते. अशाच परिवर्तनवादी, ध्येयवादी,आणि सकारात्मक शिक्षणातील हिऱ्यांच्या कर्तृत्वावर  राजेंद्र दिघे यांनी प्रकाश टाकला. आदिवासी भागातील वर्षभर चालणारी हिवाळी शाळा आणि त्यासाठी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केशव गुरुजींची धडपड, फागंदर वस्तीशाळ  तीची आयएसओ पर्यंतची प्रगती- त्यासाठी योगदान देणारे  खंडू मोरे,विमान प्रवास घडवणारी कुंदा बच्छावांची  शाळा,अभिनय संपन्न  वाघ गुरुजींची शाळा,भोयेगावची आंतरराष्ट्रीय शाळा आणि नाविन्यपूर्ण शिक्षण देणारे निवृत्ती आहेर , अंगणगाव शाळेचे राज्यस्तरीय यश आणि  मुले रमतांना आनंद शोधणारे गोकुळ वाघ, इंग्रजीची गोडी निर्माण करणारे आणि लेकरांसमवेत भावनिक ऋणानुबंध जुळवणारे तंत्रस्नेही प्रवीण शिंदे, हिरावाडीची निखर्व पर्यंतची संख्या वाचणारी मुले-नकारात्मकतेला झुगारत सकारात्मकतेकडे घेऊन जाणारे शशिकांत शिंदे,अतिदुर्गम धामडकीवाडी येथील प्रमोद परदेशी यांचा राज्यात प्रसिद्ध टी.व्ही. पॅटर्न, सोपान खैरनार यांचा संघर्षमय प्रवास ते गुणवत्ता वाढीचा ज्ञानयज्ञ पर्यंतची वाटचाल,मुलांमध्ये  लेखन कौशल्य विकसित करणारे भरत पाटील ,पर्यावरणाचा विचार करून थेट पंतप्रधानांना पत्र लिहणारी  पर्यावरण समिती - खालप फाट्याची शाळेतील वैशाली सूर्यवंशी,नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या दहिवड शाळेच्या नीलिमा पगार मॅडम,माणके शाळेत स्थलांतराचे प्रमाण रोखण्यासाठी पालकांची मनस्थिती बदलवणारी -सुजाण समाजाभिमुख पिढी घडवणारी शिक्षिका वैशाली भामरे

टेहरे येथील शाळेत इंग्रजीचे धडे देणाऱ्या नूतन चौधरी ,माधुरी पवार,आशा सोनवणे, नयना वाघ अशा कितीतरी सावित्रीच्या लेकींची नावे घेता येतील.खरं तर दुसऱ्याचं मोठेपण जाणून घेण्यासाठी आपलं मन मोठं असावं लागतं. हे मोठेपण दिघेंच्या लिखाणातून सिद्ध होतं ही बाब इथं नमूद करणे गरजेचे आहे.

                                                              राज्यातील असंख्य वाडी- वस्तीतील,अतिदुर्गम भागातील नव्हे तर मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी आजच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये शिक्षकाने केवळ शिक्षणापूरते मर्यादित न राहता शिक्षकाने कोरोना योद्धा म्हणून पोलिसांच्या ,आरोग्य सेवकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.कोविड सर्वेक्षण,लसीकरण जागृतीचे कामे आजही शिक्षणाबरोबर चालू आहे. कोणत्याही कामाला शिक्षक मागं नसतो.समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन जर घडले असेल त्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे.


                                                                              पुस्तक वाचतांना राजेंद्र दिघे यांचे हळवे कवीमन कायम दिसते.पुस्तकाची भाषा अतिशय ओघवती आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांमध्ये उगाचच काहीही टिपण्णी केलेली किंवा सूचना केलेल्या दिसत नाही.शिक्षकांच्या उपक्रमाची वास्तववादी मांडणी लेखकाने ओघवत्या शैलीमध्ये केलेली आहे. हेच अंतर्मनापर्यंत पोहचतं.महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात असे नाविन्यपूर्ण प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात चालू आहेत आणि त्याची दखल प्रसारमाध्यमे घेत आहेत.ही एक शिक्षणक्षेत्रासाठी आशादायी ,शिक्षकांसाठी प्रेरणादायी  बाब आहे 

                                                                                       आपल्या अपेक्षित कामांपेक्षा अधिक मेहनत व तीही कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन हे गुरुजण काम करीत आहेत.आज जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकलीय.जीव ओतून धडपडणारे शिक्षक व त्यांचे कार्य हे समाजासमोर व इतर शिक्षकांसमोर लेखकाने "शाब्बास गुरुजी" ह्या पुस्तकाच्या माध्यमातून ठेवले आहे. हे पुस्तक केवळ उपक्रम दर्शवणारं किंवा शिक्षकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देणारं नसून त्यात साहित्यमूल्यही आहे हे मुद्दाम सांगावेसे वाटते. प्रत्येकाच्या वैयक्तिक वाचनालयात संग्रही ठेवावे असेच "शाब्बास गुरुजी" हे वास्तववादी पुस्तक आहे.पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके आणि रंग संगतीयुक्त चित्रकार संतोष घोंगडे यांनी केले आहे.पुस्तकाची छपाई आणि बांधणी उत्तम झाली आहे.शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी पुस्तकाची अतिशय बोलकी आणि अंतर्मनात पोहचणारी अशी सखोल प्रस्तावना दिली आहे.कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सुजाण नागरिक घडवण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या प्रयोगशील शिक्षक,शिक्षिका व नवसर्जनाच्या वाटेवर असलेल्या शाळा यांची समाजाला सखोल माहिती शाब्बास गुरुजी च्या रूपाने मिळेल अशी आशा व्यक्त करून शुभेच्छा रुपी पाठराखण ओघवत्या शैलीत केली आहे.

  

पुस्तक-शाब्बास गुरुजी

लेखक- राजेंद्र दिघे

प्रकाशक- घनश्याम पाटील

 चपराक प्रकाशन, पुणे 

मुखपृष्ठ-संतोष घोंगडे

पृष्ठे-१७६

मूल्य-२५० रू.


            पुस्तक परिक्षण - 

         संजय गरबड मराठे  

           ९४२१९७३८८८

Tuesday, 9 November 2021

जीवन वाट

 जीवन वाट...


          आयुष्य म्हणजे काय तर जगणं आणि मरणं यातलं अंतर.आयुष्य म्हणजे जीवन आणि मृत्यू यांना जोडणारा पूल.असं असलं तरी जीवन आणि मृत्यू मधील जे अंतर आहे तो काळ आपण कधी, कुठे, कसा घालवला-कंठला, हे ज्याचे त्याने अनुभवले असते.आयुष्याची ही पायवाट कोणाची खडतर तर कोणाची अगदीच सहज सोपी असते असं वाटतं....ते तसं वाटतं कारण आपण लांबून हे सर्व पहात असतो...माझ्यापेक्षा तो किती सुखी आहे असं कितीही म्हटलं तरी प्रत्येकाचं जीवनाचं गणित हे वेगळं असतं.प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं. दुःखाची खोली ,तीव्रता वेगवेगळी असते.तरी आपआपल्या जीवन वाटा धुंडाळून वाटसरू चालत असतो.

                आयुष्याची पायवाट कितीही दीर्घ झाली तरी वाटसरू आलेला शीण घालवण्यासाठी अधून मधून कुठंतरी विसावा घेत असतो. कधी तो टेकतो विस्तीर्ण वृक्षाच्या छायेत.कधी हिरव्यागार आणि बहरलेल्या पठारावर.अशाच निर्मनुष्य ठिकाणी  आपण कंठलेल्या आयुष्याची विविध रंगी बेरंगी मालिका सुरू होते मनात...आयुष्यातील नागमोडी वळणं आणि सरधोपट रस्ता यातील सोडवलेली जीवनाची गणितं तो पुन्हा पुन्हा आपल्या क्षीण नजरेने न्याहाळत असतो. जीवनाची काही गणितं सुटतात काही सोडून दिलेली असतात....सुटलेल्या - न सुटलेल्या आयुष्याच्या गणितांची गोळाबेरीज लावत बसतो स्थिर शून्य नजरेने.

               कितीही जीवनात चांगले -वाईट वळणं आले असले तरी तो प्रवास त्याचा स्वत:च्या अनुभव विश्वाने डोळे आणि कान उघडे ठेवून केलेला असतो.असा प्रवास कितीतरी प्रसंगांनी रंगतदार झालेला असतो.कधीही न विसरले जाणारे असंख्य व्यक्तिमत्वाचे ठसे आपल्या मनावर उमटत गेलेले असतात.अनेक वादळांचा आवेग आपण अनुभवतो.अनेकवेळा जीवनाच्या चक्रव्युवात आपण अडकतो. आपण आपलीच सुटका करून घेतल्यानंतर आपण किती घाबरलो होतो हा विचार करून आपलेच आपल्याला नवल वाटते. अशा कितीतरी आठवणी जीवनवाटेवर येत असतात.आठवणींना कधी क्रम नसतो.आठवणी कधी अकस्मात कोसळणाऱ्या पावसागत असतात तर कधी एखाद्या बुडबुड्यागत सावकाश अलवार .आठवणी कधी खूप वेदनादायी असतात तर कधी सुखाची फुंकर घालणाऱ्या असतात.पण मजा अशी असते की आठवणी कालांतरानं आनंदच देणाऱ्या ठरतात.आयुष्याच्या प्रवासात आलेले अनुभव त्या त्या क्षणी अनुकूल किंवा प्रतिकूल असतात...पण कालांतरानं काळाच्या किमयेनुसार त्या आठवणी आनंदच देत असतात...



               असंख्य वेळा आपण स्वप्नांच्या पाठी लागून सर्वदूर अगदी बेभानपणे चालत सुटतो.स्वप्नांची पालखी घेऊन आपण न थकता चालत राहतो. कदाचित स्वप्न पूर्ततेसाठी आपण सर्वदूर भरकटतो. वाटा चुकतो...तरीही त्याच ओढीनं आपण धावत असतो वेड्यागत......ठेचाळलो की आसवं जमतात डोळ्यात. मग वाटतं अरे ही तर आपली वाट नव्हेच मुळी.... अन आता खऱ्या अर्थाने मागचे मार्ग बंदिस्त होतात....मग उरतं फक्त पुढे पुढे सरकत जाणे...एवढंच आपल्या हाती असतं. मनासारखं नाही जगता आलं याची सल कायम अंतर्मनात राहते.अशा असंख्य वाटा खुणावत राहतात आजूबाजूला....आपण आपली वाट निवडायची आणि पुढं पुढं चालत राहायचं .....मागून येणाऱ्या वाटसरूला आयुष्याच्या वाटांचा अनुभव फक्त देत राहायचे बस्स....


                           संजय ग. मराठे

                          9421973888

                            वेल्हाणे, धुळे

                         ह.मु.उल्हासनगर 4

Thursday, 4 November 2021

परिवर्तनाची गरज

 आर.पी.विशाल यांच्या हिंदी पोस्ट चा अनुवाद.

        सर्व श्रेय आर.पी.विशाल यांचे मी फक्त मराठी अनुवाद केलाय...

   

          चित्रपट हे काल्पनिक असले तरी समाजाचा आरसाही असतात.  तमिळ, तेलुगु, मल्याळम, मराठी इत्यादी भाषांमधील अनेक छोट्या बजेटच्या चित्रपटांनी मोठे विषय हाती घेतले आहेत, विषय सोडवले आहेत आणि लोकांना समजावून सांगितले आहेत.  तमिळ अभिनेत्री ज्योतिका हिचा "मॅडम गीता राणी"नावाचा चित्रपट होता ज्याने शिक्षणाचे व्यापारीकरण आणि राजकीय संबंध सहजतेने दाखवले होते.


 सरकारी शाळांची दुर्दशा समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.  त्याचप्रमाणे तेलगूमध्ये "शरणम गच्छमी" नावाचा चित्रपट आला होता ज्यामध्ये जात आणि आरक्षण या विषयाला अतिशय तर्कशुद्ध स्पर्श करण्यात आला आहे.  जो पर्यंत लोकांना कळणार नाही तो पर्यंत ते कसे बदलतील?  एखादी व्यक्ती कोणत्याही कल्पनेवर तेव्हाच ठाम असते जेव्हा त्याला सर्व पैलूंचे सखोल ज्ञान नसते.


            प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे विचारांचे वर्तुळ असते, त्यावर तो न्याय्य, श्रेष्ठ आणि सत्य माणून बसलेला असतो, परंतु प्रत्यक्षात हे प्रकरण तितकेच मर्यादित नाही.  आमची मते आमच्या श्रद्धा, मान्यता हे पूर्वग्रहांवर आधारित असतात.आणि ते सर्वसाधारणपणे चुकीचे असू शकतात.  त्यामुळेच कधी कधी चांगल्या परिणामांसाठी आणि वैचारिक बदलासाठी वैचारिक संघर्षही आवश्यक असतो.


          हिंदी चित्रपट आणि हिंदी साहित्य अशा विषयांकडे फारसे लक्ष देत नाही, त्यामुळेच हिंदी क्षेत्रात सखोल चर्चा होत नाही.  मी असे म्हणत नाही की दक्षिणेकडे किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये अधिक चांगल्या चर्चा आणि विमर्श होतात, परंतु मला असे म्हणायचे आहे की असंख्य विषयांवर हिंदी भाषिक क्षेत्रात सुरुवात फारच नगण्य आहे, तर तेथे संधी आणि गरज खूप दिसत आहे.


                                  हिंदी लेखन  - आर.पी.विशाल.

                               मराठी अनुवाद- संजय ग. मराठे

Sunday, 31 October 2021

दिवाळी फराळ कार्यक्रम शिळ

जि. प. शाळा शिळ,ता अंबरनाथ येथे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम


आज दि 31ऑक्टोबर 2021वार रविवार रोजी जि. प. शाळा शिळ,ता.अंबरनाथ येथे  दिवाळी फराळाचे वाटप.

       भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत.अशांसाठी पराग प्रतिष्ठान मुंबई यांनी "दिवाळी फराळ " हा उपक्रम हाती घेतला ....



           आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच मानसिकतेने समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून "पराग प्रतिष्ठान मुंबई " यांच्या पुढाकाराने सौ.आर्ची गांगण साठे मॅडम,श्री अभिजित कांबळी सर,श्री.अभिजित बावळे सर यांनी जि. प. शाळा -शिळ ता. अंबरनाथ. येथे समक्ष येऊन मौजे शिळ, कातकरीवाडी,ठाकूरवाडी येथील 150   वंचित, गरजू कुटुंबांना दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप केले.

             पराग प्रतिष्ठान मुंबई  यांचे अनेक वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहकार्य मिळत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शिळ येथे शालेय विध्यार्थ्याना  शैक्षणिक साहित्य वाटप,कपडे वाटप,धान्य वाटप इ उपक्रम पराग तर्फे वर्षभर राबविले जात आहेत.असे श्री संजय मराठे सरांनी सांगितले.

         कार्यक्रम ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक श्री संजय मराठे सर,श्री.संजय तांबे सर, समस्थ ग्रामस्थ मंडळ,तरुण मंडळ उपस्थित होते.

Monday, 25 October 2021

शोध माणसाचा...

 शोध माणसाचा...


             प्रत्येकाचा स्थायीभाव हा वेगवेगळा असतो...उद्भवलेल्या परिस्थितीला प्रत्येक व्यक्ती    आपापल्या परीने सामोरा जात असतो...कधी त्याच्या पदरी अत्यानंदाचे क्षण पडतात तर कधी दुःखाची मालिका सुरू होते...आणि अशा बऱ्या वाईट अनुभवातून तो आपला जीवन मार्ग आक्रमीत असतो...



             आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला मोठं व्हायचं आहे.जगाच्या रंगमंचावर अनेक चांगले -वाईट मुखवटे परिधान करून आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे दाखवण्याची सर्कस चालू आहे.जे चांगलं ते चांगलं अन जे वाईट ते वाईट अस कोणी स्पष्ट सांगत नसल्यामुळे सर्वांचा मार्ग खोल अज्ञानात  कुठंतरी जातांना दिसतोय.

               खरं तर प्रयत्नाने माणूस 'माणूस' बनत असतो.दुसऱ्याच निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण करायला आपण आता शिकलं पाहिजे.आपल्याला आपल्या मनातील  द्वंद्व आपल्या मनातील अंतर्विरोध समजला पाहिजे.अंतर्मनातील द्वंद्व अंतर्मनातील विरोध जेवढं आपण समजून घेऊ तेवढं 'समाज' समजायला सोपं जाईल. द्वंद्व आणि अंतर्विरोध आपल्या आयुष्याचं नवीन नाव आहे.

          जीवन मार्ग फुलत अन फुलवत असतांना आपण एकटं काहीही करू शकत नाही.आपलं कुटुंब ,आपले मित्र,सहकारी,शिक्षक,ज्यांनी आपल्या  सुखदुःखात आपल्याला संगत केली असे सहृदयी,दूर कुठंतरी शिक्षण नोकरी साठी गेले असता तेथील हॉस्टेल,रूम पार्टनर...असे किती तरी लोकं आपले जीवन फुलवण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत.आपण हे कधीच विसरता कामा नये.

               खरं तर माणसानं अंतर्मुख असलं पाहिजे. निश्चलता आणि सादगी ही अंतर्मनात असली पाहिजे.आतून - बाहेरून आहे तसेच असले पाहिजे.कोणताही बडेजाव आतपर्यंत पोहचता कामा नये.अंतर्मुख माणूस कसा असावा तर आपल्या बाबत स्टेजवर जरी वाह- वाह चालत असेल तरी एका कोपऱ्यात बसून ते ऐकावं पण मंचावर  जाऊन उगाच छाती फुलून हार तुरे घेणारा नसावा अस मला प्रामाणिकपणे वाटतं.

            आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि आपला गोतावळा  याचं भान आपण ठेवलं पाहिजे.आजची पिढी आणि त्यांची व्यक्त होण्याची पद्धत हे आपण डोळसपणे समजून घेऊन आपली पारंपारिक जिद्द सोडून थोडं मोकळं व्हायला आपण शिकलो पाहिजे.

एकांतात एकट राहता आलं पाहिजे.आणि रडताही आलं पाहिजे.

आयुष्याच्या कोणत्याची वळणारवर प्रयत्न न सोडता आपल्यातील चांगल्या माणसाचा शोध घेतला पाहिजे....


                              संजय ग मराठे

                             9421973888

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...