शाळा

Showing posts with label सहजच.... Show all posts
Showing posts with label सहजच.... Show all posts

Saturday, 9 May 2026

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर


                     महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव केवळ एका व्यक्तीचे नसून ते एका युगांतराचे प्रतीक आहे. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या अफाट कार्याचा पट डोळ्यासमोर उभा राहतो, तेव्हा जाणवते की, ज्या काळात अज्ञान आणि विषमतेचा अंधकार समाजाला पोखरत होता, त्या काळात भाऊरावांनी ज्ञानाची मशाल पेटवून एक नवा इतिहास रचला. त्यांनी सातारा जिल्ह्याच्या काळेवाडीत १९१९ मध्ये 'रयत शिक्षण संस्थेचा' जो छोटासा वेल लावला, त्याचे आज एका महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कर्मवीरांच्या कार्याचा गाभा हा केवळ शाळा काढणे हा नसून, समाजातील शेवटच्या स्तरातील माणसाला आत्मसन्मानाने उभे करणे हा होता. त्यांनी हे ओळखले होते की, जोपर्यंत बहुजन समाजाचा मुलगा शिकून शहाणा होत नाही, तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. म्हणूनच त्यांनी राजवाड्यांच्या सावलीतून शिक्षणाची गंगा बाहेर काढून ती डोंगरदऱ्यातील झोपड्यांपर्यंत नेली. त्यांच्या या ध्येयवेड्या प्रवासामुळेच आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत.

                   भाऊरावांच्या शैक्षणिक क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा आणि जिवंत पैलू म्हणजे 'कमवा आणि शिका' ही योजना. ही केवळ एक आर्थिक मदतीची तरतूद नव्हती, तर ती विद्यार्थ्याला स्वावलंबनाचे बाळकडू देणारी एक जीवनपद्धती होती. हाताला काम आणि बुद्धीला ज्ञान देणारे हे सूत्र आजही जगभरातील शिक्षणतज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय आहे. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणे हे किती कठीण काम आहे, हे त्या काळातील परिस्थितीवरून लक्षात येते. मात्र, कर्मवीरांनी स्वतः हातात कुदळ-फावडे घेऊन विद्यार्थ्यांसोबत काम केले आणि 'कष्टातूनच प्रगती होते' हा मंत्र रुजवला. यामुळे तयार झालेला विद्यार्थी हा केवळ पदवीधर नव्हता, तर तो संकटांशी दोन हात करणारा एक कणखर नागरिक होता. आजच्या बाजारीकरण झालेल्या शिक्षण व्यवस्थेत, जिथे शिक्षणाकडे केवळ 'गुंतवणूक' म्हणून पाहिले जाते, तिथे कर्मवीरांचा हा स्वावलंबनाचा विचार अधिकच प्रेरक ठरतो. त्यांनी शिक्षणाचे लोकशाहीकरण केले आणि ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले.

                      केवळ शिक्षणच नव्हे, तर सामाजिक समतेच्या क्षेत्रातही कर्मवीरांचे योगदान क्रांतीकारी राहिले आहे. महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे ते खऱ्या अर्थाने पाईक होते. त्यांनी स्थापन केलेली वसतिगृहे ही जातीभेद गाडणारी महत्त्वाची केंद्र होती. ज्या काळात अस्पृश्यता उच्च टोकाला होती, त्या काळात सर्व जाती-धर्माच्या मुलांनी एकाच छताखाली राहणे, एकाच पंगतीत जेवणे आणि एकाच मातीत राबणे ही फार मोठी सामाजिक हिंमत होती. कर्मवीरांनी जातीपातींच्या भिंती पुस्तकी ज्ञानाने नव्हे, तर सहजीवनाच्या प्रयोगातून पाडल्या. संस्थेच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःचे घरदार विसरून काम केले. पत्नी लक्ष्मीबाईंनी आपल्या अंगावरील दागिने, अगदी सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्रही विद्यार्थ्यांच्या अन्नासाठी आनंदाने दिले, हा त्याग शब्दातीत आहे. अशा त्यागातूनच 'रयत' उभी राहिली आणि लाखो गरिबांची मुले डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी होऊ शकली.

                         आज कर्मवीरांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करताना त्यांच्या विचारांची प्रासंगिकता पुन्हा एकदा अधोरेखित होते. केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे, तर चारित्र्यनिर्मिती आणि सामाजिक बांधिलकी म्हणजे शिक्षण, ही त्यांची धारणा होती. आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत असलो तरी, श्रमाची आवड आणि माणुसकीचे मूल्य जपणे हीच काळाची गरज आहे. रयतेच्या या लाडक्या 'विठ्ठला'ने उभ्या केलेल्या या ज्ञानयज्ञातून अनेक पिढ्या घडल्या आणि आजही घडत आहेत. त्यांचे कार्य हे केवळ एका संस्थेपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहे. त्यांनी लावलेला हा वटवृक्ष असाच बहरत राहो आणि त्यांच्या विचारांची सावली महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रवासाला सदैव मार्गदर्शन करत राहो, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या निस्वार्थी सेवाभावातून प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक वंचिताला ज्ञानाच्या प्रवाहात सामील करणे, हेच आपले आजचे मुख्य ध्येय असायला हवे.


▪️संजय गरबड मराठे 

       9421973888

Friday, 1 May 2026

महाराष्ट्र: सांस्कृतिक वारसा ते जागतिक महास्वप्न

 महाराष्ट्र: सांस्कृतिक वारसा ते जागतिक महास्वप्न


                मराठी मातीची जडणघडण आणि भविष्यातील महाराष्ट्राचे स्वरूप याचा विचार करताना, हा प्रदेश केवळ भौगोलिक सीमांचा समूह नसून तो विचारांच्या क्रांतीची आणि कष्टाच्या घामातून नंदनवन फुलवणारी एक जिवंत प्रयोगशाळा आहे. महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक आणि वैचारिक प्रवासाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला. "पसायदानाच्या" माध्यमातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची आणि 'खळांची व्यंकटी' सांडण्याची भाषा करणाऱ्या ज्ञाऊलींनी मराठी भाषेला अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य दिले. इथूनच खऱ्या अर्थाने मराठी अस्मितेचा आणि "महाराष्ट्र धर्माचा" उगम झाला, जो पुढे जाऊन सामाजिक न्यायाचा आधार बनला.

                   याच आध्यात्मिक अधिष्ठानाला संत तुकारामांनी आपल्या रोखठोक अभंगांतून व्यावहारिक आणि विद्रोही रूप दिले. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" हा तुकोबांचा विचार आजही महाराष्ट्राच्या संवेदनशील समाजमनाचा मूळ मंत्र आहे. तुकोबांनी दांभिकतेवर प्रहार करत सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. याच वैचारिक वारशाचा सुवर्णकाळ म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे 'स्वराज्य'. महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर रयतेच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले. अठरापगड जाती-धर्माच्या अठरा हजार हातांना एकत्र आणून त्यांनी उभा केलेला महाराष्ट्र हा आजही जगासाठी सुशासन, व्यवस्थापन आणि न्यायाचा सर्वश्रेष्ठ आदर्श आहे.

                      स्वराज्याच्या या वारशाला आधुनिक काळात लोकशाहीच्या चौकटीत प्रबळ करण्यासाठी १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या धुरिणांच्या संघर्षातून 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' उभी राहिली. १ मे १९६० रोजी जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी अस्मितेचा नवा सूर्योदय झाला. पण आज जेव्हा आपण एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात उभे आहोत, तेव्हा भविष्यातील महाराष्ट्राचे जे 'महास्वप्न' आपण पाहतो, तिथे प्रगत तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांचा सुंदर मिलाफ होणे हीच काळाची गरज आहे.

                       भविष्यातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचा सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे बळीराजाचे सक्षमीकरण होय. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असलेल्या शेतकऱ्यासाठी शेती हा केवळ नशिबावर अवलंबून असलेला व्यवसाय न राहता, तो एक विज्ञाननिष्ठ उद्योग बनायला हवा. अभ्यासात्मक शेतीची संकल्पना प्रत्येकाच्या बांधावर पोहोचणे अनिवार्य आहे. माती परीक्षण, इस्रायली पद्धतीचे ठिबक सिंचन आणि ड्रोनद्वारे फवारणी यांसारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेणारा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. शेतकऱ्याचा माल थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सज्ज असावेत आणि ग्रामीण भागात शेतीमाल प्रक्रिया केंद्रे उभारली जावीत. जेव्हा उन्हात राबणारा माझा बाप सुखी होईल, तेव्हाच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होईल.

                        शिक्षणाच्या बाबतीत विचार करताना भविष्यातील महाराष्ट्राची शिक्षण पद्धती ही केवळ नोकर घडवणारी नसून निर्माते आणि संशोधक घडवणारी असावी. महात्मा फुलेंनी "विद्येविना मती गेली..." असे सांगून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले होते. तोच वारसा पुढे नेत जिल्हा परिषद शाळांना महानगरांच्या तोडीच्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात. डिजिटल साक्षरता हा प्राथमिक शिक्षणाचा अविभाज्य भाग असायला हवा. केवळ पदव्यांचा डोंगर उभा करण्यापेक्षा कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणे ही काळाची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, "मराठी भाषा टिकली पाहिजे" हा केवळ भावनिक नारा न राहता, ती ज्ञानाची आणि रोजगाराची भाषा व्हायला हवी. विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड गळून पडेल आणि त्यांच्यातील कल्पकतेला नवी उभारी मिळेल.

                    प्रगतीचे हे चक्र फिरत असताना माणुसकीचा शोध आणि सामाजिक सलोखा जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान हाती आले तरी, जर मनात माणुसकी नसेल तर त्या प्रगतीला अर्थ उरत नाही. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे", हाच आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. संतांच्या शिकवणीचा वारसा आचरणात आणणारा सुसंस्कृत तरुण वर्ग आणि सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष संवादाकडे, साहित्याकडे व छंदबद्ध कवितेच्या रसाळ अनुभूतीकडे वळलेली पिढी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव असेल. तसेच, विकास हा निसर्गाचा बळी देऊन नसावा. ग्लोबल वार्मिंगच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सौर ऊर्जा, शाश्वत जलव्यवस्थापन आणि जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन करणे अनिवार्य आहे.

                     थोडक्यात सांगायचे तर, भविष्यातील महाराष्ट्र हा असा असेल जिथे विज्ञानाची दृष्टी असेल आणि नैतिकतेची वृत्ती असेल. जिथे शेतात राबणाऱ्या हातांना प्रतिष्ठा असेल आणि वर्गात शिकणाऱ्या डोळ्यांत उद्याच्या जगाची स्वप्ने असतील. प्रगतीची शिखरे सर करताना आपल्या मातीचा सुगंध आणि भाषेचा अभिमान जपणारा विचार हाच जागतिक स्तरावर आपली ठळक ओळख ठरेल. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे, "माझ्या मराठीची गोडी, मला वाटे बहु मोडी", हा स्वाभिमान बाळगत, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपण जगाच्या नकाशावर एक समर्थ आणि संपन्न महाराष्ट्र उभा करूया. हाच खरा महाराष्ट्राचा कालसुसंगत विचार आणि हेच आपले महास्वप्न आहे.


संजय गरबड मराठे 

उल्हासनगर, ठाणे.

9421973888




चौकटीतील लेखन

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांच्या क्रांतीची एक जिवंत प्रयोगशाळा आहे. ज्ञानेश्वरांचे 'पसायदान', तुकोबांची 'रोखठोक माणुसकी' आणि शिवरायांचे 'स्वराज्य' हा आपला भक्कम पाया आहे. भविष्यातील महाराष्ट्र घडवताना बळीराजाला विज्ञाननिष्ठ उद्योजक बनवणे, शेतीमध्ये इस्रायली तंत्रज्ञान आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणे ही काळाची गरज आहे. शिक्षणाने केवळ नोकर नव्हे, तर 'निर्माते' घडवावेत आणि मराठी ही ज्ञानाची व रोजगाराची भाषा व्हावी, हेच आपले उद्दिष्ट असावे. प्रगतीच्या या प्रवासात साने गुरुजींनी सांगितलेली माणुसकी आणि निसर्ग संवर्धनाचे भान जपत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाच्या नकाशावर एक समर्थ, सुसंस्कृत आणि संपन्न महाराष्ट्र उभा करणे, हेच आपले 'महास्वप्न' आहे.

Wednesday, 29 April 2026

महाराष्ट्राची ध्येयधुंदी आणि श्रमिकांची प्रतिष्ठा

 महाराष्ट्राची ध्येयधुंदी आणि श्रमिकांची प्रतिष्ठा


                  १ मे हा दिवस महाराष्ट्राच्या मातीत दोन महत्त्वाच्या प्रवाहांचा ऐतिहासिक संगम घेऊन येतो. एकीकडे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून तावून-सुलाखून निघालेल्या मराठी अस्मितेचा सोहळा आणि दुसरीकडे जगाच्या प्रगतीचा कणा असलेल्या कष्टकरी वर्गाचा, म्हणजेच कामगार दिनाचा गौरव. आजच्या बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि तंत्रज्ञानाच्या युगात या दोन्ही संकल्पनांचा पुनर्विचार करणे गरजेचे झाले आहे. १ मे हा दिवस केवळ कॅलेंडरवरील सुटीचा दिवस नसून, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि जागतिक कष्टकऱ्यांच्या संघर्षाचा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. १९६० सालची मराठी भाषिक राज्याची स्थापना आणि कामगार चळवळीचा जागतिक वारसा यांचा हा मिलाफ आपल्याला एकात्मिक विचार करण्यास प्रवृत्त करतो.

                    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला असता, राज्याची सामाजिक वीण ही संत परंपरा आणि समाजसुधारकांच्या विचारांवर आधारित असल्याचे दिसते. फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या या राज्यात आज सामाजिक स्तरावर काही मूलभूत प्रश्न उभे आहेत. आरक्षणाचे जटिल मुद्दे आणि जाती-जातींमधील वाढता संघर्ष ही राज्याच्या सामाजिक आरोग्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. वाढते शहरीकरण ग्रामीण भागातील संसाधनांवर ताण निर्माण करत असून, शहरांचे 'कॉस्मोपॉलिटन' स्वरूप टिकवताना ग्रामीण संस्कृतीचे जतन करणे हे मोठे आव्हान ठरत आहे. शैक्षणिक परीघातही गुणवत्ता आणि प्रवेश यांत मोठी दरी दिसते. केवळ पदवीधर निर्माण करण्यापेक्षा उद्योगाभिमुख कौशल्ये देण्याची गरज असून, 'महाराष्ट्र कौशल्य विकास अभियान' सारख्या योजनांना अधिक गती मिळणे आवश्यक आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणे आणि नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे.

                     राज्याची आर्थिक घडी पाहता, महाराष्ट्र आजही देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. परकीय गुंतवणूक खेचून आणण्यात राज्य आघाडीवर असले, तरी शेजारील राज्यांकडून मिळणारी स्पर्धा तीव्र आहे. समृद्धी महामार्ग आणि कोस्टल रोड यांसारख्या पायाभूत सुविधा प्रगतीचा कणा असल्या, तरी कृषी क्षेत्रातील संकट दुर्लक्षित करून चालणार नाही. आजही निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, हवामान बदल आणि बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतीला खऱ्या अर्थाने उद्योगाचा दर्जा देऊन प्रक्रिया उद्योगांना बळ देणे हाच आर्थिक विकासाचा शाश्वत मार्ग ठरेल. राजकीय स्थितीचा विचार केला असता, महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे आलेली अस्थिरता आणि नैतिकतेचा ऱ्हास सामान्य मतदारांमध्ये उदासीनता निर्माण करत आहे. अशा वेळी प्रशासकीय पारदर्शकता आणि सत्तेचे विकेंद्रीकरण अधिक प्रभावी करण्याची गरज असून, केवळ राजकारण न करता लोकहिताची 'नीती' घडवणाऱ्या अभ्यासू नेतृत्वाची राज्याला आवश्यकता आहे.

                      कामगार विश्वाचा विचार करता, आज कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. १९६० साली मुंबईच्या गिरणी कामगारांनी या शहराला वैभव मिळवून दिले, मात्र आजचा श्रमिक 'गिग इकॉनॉमी' आणि आयटी क्षेत्राशी जोडला गेला आहे. 'वर्क फ्रॉम होम' आणि ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा, विमा आणि निवृत्ती वेतन मिळणे हा त्यांचा मानवी हक्क आहे. असंघटित क्षेत्रातील बांधकाम मजूर आणि शेतमजूर यांच्या कल्याणासाठी असलेल्या मंडळांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे पारंपरिक कामे लोप पावत असताना, कामगारांचे 'अपस्किलिंग' करणे हे राज्य आणि उद्योजक दोघांचेही कर्तव्य ठरते.

                   महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधताना केवळ उत्सवात न रमता 'अभ्यासू कृती'वर भर दिला पाहिजे. जेव्हा राज्याचा शेतकरी कर्जमुक्त असेल, तरुण हाताला शाश्वत काम असेल आणि सामाजिक सलोखा अबाधित असेल, तेव्हाच संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीचा खऱ्या अर्थाने आनंद साजरा होईल. श्रमिकांच्या घामाने आणि विचारांच्या तेजाने महाराष्ट्राची ही मंगल भूमी सदैव प्रकाशमान राहो, हाच संकल्प आजच्या दिनी करणे सयुक्तिक ठरेल. मराठी मनाची जिद्द आणि कष्टकऱ्यांचे बाहू एकत्र आले, तरच महाराष्ट्राची "महा-राष्ट्र" होण्याकडे सुरू असलेली वाटचाल अधिक प्रगल्भ आणि यशस्वी होईल. श्रमाच्या घामातूनच संस्कृतीचे सुवर्ण उगवते आणि एकतेच्या बळातूनच राज्याचे भाग्य उजळते, हेच त्रिकालबाधित सत्य आहे.


संजय गरबड मराठे

  9421973888

मिशन भरारी : कष्टाच्या मातीतून अंतराळाकडे

 ✈️मिशन भरारी : कष्टाच्या मातीतून अंतराळाकडे...🚀


                 ग्रामीण भारताच्या विकासाची चर्चा जेव्हा होते, तेव्हा ती बहुधा रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या भौतिक पायाभूत सुविधांभोवतीच रेंगाळते. मात्र, खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास हा तिथल्या मानवी क्षमतेच्या विकासावर अवलंबून असतो. ठाणे जिल्हा परिषदेचा ‘मिशन भरारी’ हा उपक्रम याच मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधणारा आणि ग्रामीण सुप्त गुणवत्तेवर टाकला गेलेला एक आश्वासक विश्वास आहे. "शिका आणि मोठे व्हा" या पारंपरिक ब्रीदवाक्याला "बघा, अनुभवा आणि सिद्ध करा" या आधुनिक कृतीशीलतेची जोड दिल्याने कष्टाच्या मातीतूनही भविष्यातील शास्त्रज्ञांचे 'साज' फुटू शकतात, हे या उपक्रमाने जगाला दाखवून दिले आहे.

                    कोणताही मोठा बदल हा नेतृत्वाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. ठाणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासन यांचे या निमित्ताने विशेष कौतुक व्हायला हवे. शासकीय कामकाजात केवळ फाईली आणि आकडेमोड यात न अडकता, ग्रामीण मुलांच्या डोळ्यांत जागतिक स्वप्ने कशी पेरता येतील, याचा ध्येयवादी विचार त्यांनी केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेपर्यंत ग्रामीण मुलांचा प्रवास सुकर करणे, हे केवळ प्रशासकीय कल्पकतेचे उदाहरण नाही, तर ती भविष्यातील देशासाठी केलेली मोठी गुंतवणूक आहे. केवळ भौतिक विकासावर निधी खर्च करण्यापेक्षा मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर आणि त्यांच्या जाणिवांच्या विस्तारावर खर्च करणे, हा 'मानवी भांडवल' (Human Capital) विकसित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

                   या संपूर्ण मोहिमेचे खरे सारथी म्हणजे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. ज्या व्यवस्थेला अनेकदा टीकेचे लक्ष केले जाते, त्याच व्यवस्थेतील शिक्षकांनी प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक ठिणगी ओळखली. पाठ्यपुस्तकातील निर्जीव धड्यांना 'इस्रो'च्या प्रत्यक्ष अनुभवाची जिवंत जोड देण्याचे काम या शिक्षकांनी केले. निवडीच्या पारदर्शक प्रक्रियेपासून ते मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यापर्यंत शिक्षकांनी घेतलेली भूमिका या मोहिमेचा कणा आहे. त्यांच्या या सकारात्मक भूमिमेमुळेच आज जिल्हा परिषदेची मुले शास्त्रज्ञांच्या समोर पूर्ण आत्मविश्वासाने उभी राहू शकली. हा आत्मविश्वास केवळ वैज्ञानिक ज्ञानापुरता मर्यादित नसून, तो न्यूनगंड नाकारण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे.

                     ग्रामीण भागातील पालक आणि समाज यांच्या सहभागाशिवाय हा यशाचा टप्पा गाठणे अशक्य होते. एकेकाळी केवळ शेती किंवा स्थानिक रोजगार हेच मुलांचे भविष्य मानणारा पालक वर्ग आज आपल्या पाल्याला अंतराळ संशोधनासारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात पाहण्याचे स्वप्न पाहू लागला आहे. जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा वाढलेला हा विश्वास, हा या उपक्रमाचा सर्वात मोठा सामाजिक विजय म्हणावा लागेल. ग्रामीण जनता आता केवळ मोफत सुविधांची अपेक्षा करत नाही, तर ती 'गुणवत्तापूर्ण' शिक्षणासाठी जागरूक झाली आहे, हे यातून स्पष्ट होते.

                     भारतीय ग्रामीण भागात बुद्धिमत्ता आणि कष्टाची तयारी ठासून भरलेली असते, मात्र संधींचा अभाव या प्रतिभेला मर्यादा घालतो. 'मिशन भरारी'ने ही मर्यादा तोडण्याचे काम केले आहे. तरीही, हा प्रवास इथेच थांबून चालणार नाही. विज्ञानाची ही ओढ केवळ एका उपक्रमापुरती किंवा एका सहलीपुरती मर्यादित राहू नये. ही भरारी निरंतर राहणे ही काळाची गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी विशेष 'मेंटॉरशिप' (मार्गदर्शन) उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्रामीण शाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि 'अटल टिंकरिंग लॅब्स'चे जाळे अधिक विस्तारले पाहिजे, जेणेकरून इस्रोहून परतलेली ही ऊर्जा शाळेत प्रयोगशाळेच्या स्वरूपात टिकून राहील.

                      'मिशन भरारी' ही केवळ एक शैक्षणिक सहल नसून ती ग्रामीण महाराष्ट्राच्या आकांक्षांचे 'लॉन्चिंग पॅड' आहे. कष्टाच्या मातीतून यशाचे कोंभ फुटू शकतात, हे आता सिद्ध झाले आहे. अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांतून उभी राहिलेली ही चळवळ राज्याच्या शैक्षणिक इतिहासात दिशादर्शक ठरेल. आता गरज आहे ती या ठिणगीचे रूपांतर एका अखंड वैज्ञानिक क्रांतीत करण्याची. हे पाऊल भविष्यात देशाला केवळ पदवीधर नाही, तर राष्ट्र घडवणारे ध्येयवादी नागरिक आणि जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ अर्पण करेल, यात शंका नाही.


✒️संजय गरबड मराठे

 जिल्हा परिषद शाळा पादिरपाडा,

तालुका - अंबरनाथ, जिल्हा - ठाणे.



Monday, 27 April 2026

संवेदनशून्यतेच्या विळख्यात अडकलेला समाज


संवेदनशून्यतेच्या विळख्यात अडकलेला समाज


                  मानवी उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात माणसाने बुद्धीच्या जोरावर निसर्गावर विजय मिळवला, विज्ञानाचे अफाट क्षितिज पादाक्रांत केले आणि भौतिक सुबत्तेचे इमले उभे केले. मात्र, या प्रगतीच्या झगमगाटात मानवी संवेदनांचा जो ओलावा असायला हवा होता, तो आता हळूहळू आटत चालल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आणि वेगाचे आहे, पण या वेगाच्या स्पर्धेत आपण आपल्यातील 'माणूस' हरवून बसलो आहोत की काय, अशी रास्त भीती वाटू लागली आहे. मानवी संवेदना बोथट होणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक शोकांतिका आहे. एकेकाळी ज्या समाजात परोपकार, सहानुभूती आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे हीच जीवनाची सार्थकता मानली जात होती, तोच समाज आज कमालीचा आत्ममग्न आणि आत्मकेंद्री झाला आहे.

                 या संवेदनशून्यतेच्या मुळाशी 'बाजारीकरण' नावाचा एक मोठा राक्षस उभा आहे. आजच्या युगात प्रत्येक गोष्टीची किंमत लावली जात आहे आणि दुर्दैवाने त्यात मानवी भावभावनांचाही समावेश झाला आहे. प्रेम, मैत्री, जिव्हाळा आणि नातेसंबंध हे आता निस्वार्थ राहिलेले नसून ते 'उपयोगिता' आणि 'परतावा' या गणितावर मोजले जात आहेत. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, हे ठरवताना त्या व्यक्तीचा आपल्याला काय आर्थिक किंवा सामाजिक फायदा होईल, असा विचार केला जातो. नात्यांचे हे बाजारीकरण माणसाला आतून पोखरत आहे. जेव्हा भावभावनांचे रूपांतर व्यवहारात होते, तेव्हा मनातील हळवेपणा संपतो आणि तिथे एक प्रकारचा पाषाणहृदयीपणा येतो. आज सण-उत्सव असोत वा कौटुंबिक कार्यक्रम, त्यातील माणुसकीच्या ओलाव्यापेक्षा प्रदर्शनाला आणि मार्केटिंगला अधिक महत्त्व आले आहे. कोणाच्या तरी दुःखाचे किंवा संघर्षाचे भांडवल करून 'व्ह्यूज' आणि 'लाईक्स' मिळवण्याची स्पर्धा सोशल मीडियावर सुरू असते, ही संवेदना मृत झाल्याची सर्वात मोठी पावती आहे.

                 संवेदना बोथट झाल्याचे दुसरे दाहक उदाहरण म्हणजे प्राणिमात्रांकडे पाहण्याचा आपला बदललेला दृष्टिकोन. निसर्गातील प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे आणि तो जगण्यास पात्र आहे, ही धारणा आपण केव्हाच मोडीत काढली आहे. आज प्राण्यांकडे केवळ एक 'साधन' म्हणून पाहिले जाते. शहरीकरणाच्या हव्यासापोटी आपण त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट केले आणि आता तेच प्राणी जेव्हा अन्नासाठी मानवी वस्तीत येतात, तेव्हा त्यांना शत्रू मानून त्यांच्यावर क्रूर अत्याचार केले जातात. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या प्राण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणारा समाज जेव्हा महागड्या 'ब्रीड्स'चे प्राणी केवळ श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी पाळतो, तेव्हा त्यातील दांभिकपणा स्पष्टपणे जाणवतो. प्राणिमात्रांमधील जिवंत अस्तित्व नाकारून त्यांना केवळ शोभेची वस्तू मानणे, हे आपल्या बोथट होत चाललेल्या करुणेचे निदर्शक आहे. निसर्गाच्या बाबतीतही हेच घडत आहे. निसर्ग हा आपला जीवनदाता आहे, हे विसरून आपण त्याला केवळ उपभोगाची वस्तू मानले आहे. झाडे तोडताना किंवा नद्या प्रदूषित करताना आपल्या मनाला वेदना होत नाहीत, कारण आपण नैसर्गिक घटकांशी असलेले भावनिक नाते तोडून टाकले आहे.

               या संवेदनशून्यतेची व्याप्ती केवळ वैयक्तिक स्तरापुरती मर्यादित नसून ती सामाजिक आणि जागतिक स्तरावरही पसरली आहे. हिंसेचे सामान्यीकरण हे याचे एक भयाण स्वरूप आहे. आज चित्रपट, इंटरनेट आणि बातम्यांतून हिंसेचे इतके उघड प्रदर्शन होते की, आता कोणाचा खून झाला किंवा कोणावर अत्याचार झाला तरी लोकांच्या मनाला जो धक्का बसायला हवा, तो बसत नाही. लोकांचे मन अशा घटनांना सरावले आहे. अपघातग्रस्ताला वाचवण्याऐवजी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल करणे, हे आधुनिक मानवाच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवते. स्पर्धेचा अट्टहास इतका वाढला आहे की, शेजारी राहणाऱ्या माणसाशी संवाद साधायलाही कोणाकडे वेळ नाही. 'डिजिटल जगात' आपण हजारो मित्रांशी जोडलेले आहोत, पण प्रत्यक्षात आपल्या जवळच्या माणसाच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी आपण उपस्थित नसतो. नात्यांमधील ओलावा आटल्यामुळेच आज समाजात एकाकीपणा आणि नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.

                  एकूणच या परिस्थितीवर चिंतन करताना असे लक्षात येते की, आपण भौतिकदृष्ट्या कितीही प्रगत झालो असलो, तरी भावनिकदृष्ट्या आपण दरिद्री होत आहोत. बुद्धीने आपण रॉकेट सायन्स समजू शकतो, पण शेजाऱ्याच्या वेदना समजू शकत नसू, तर अशा बुद्धीचा उपयोग काय? बाजारीकरणाच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा माणुसकीचा झरा वाहता करणे आवश्यक आहे. मुलांच्या शिक्षणात केवळ गुणांना आणि करिअरला महत्त्व न देता, त्यांना संवेदनशील बनवण्यावर भर दिला पाहिजे. दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होणे, प्राण्यांवर माया करणे आणि निसर्गाचा आदर करणे हे संस्कारच माणसाला 'माणूस' म्हणून जिवंत ठेवू शकतात. जर आपण वेळीच सावध झालो नाही, तर भविष्यातील समाज हा केवळ चालत्या-बोलत्या यंत्रांचा असेल, जिथे रक्ताचे नाते नसेल आणि प्रेमाची ऊबही नसेल. मानवी संवेदनांचे पुनरुज्जीवने करणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी आणि तातडीची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज म्हणून ओळखले जाऊ.


संजय गरबड मराठे 

 9421973888

Saturday, 25 April 2026

मातृभाषा आणि प्राथमिक शिक्षण

 ◼️मातृभाषा आणि प्राथमिक शिक्षण


                 शिक्षण ही केवळ पदव्या मिळवण्याची प्रक्रिया नसून ती मानवी मनाच्या मशागतीची पद्धत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाच्या माध्यमावरून अनेक मतप्रवाह पाहायला मिळत असले, तरी शिक्षणाचा मूळ उद्देश जर 'ज्ञानार्जन' आणि 'विचार प्रक्रिया' विकसित करणे हा असेल, तर प्राथमिक स्तरावर मातृभाषेसारखा दुसरा प्रभावी पर्याय नाही. मातृभाषेतून शिक्षण म्हणजे प्रगतीला नाकारणे नव्हे, तर प्रगतीचा पाया अधिक खोलवर रुजवणे होय. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे आकलनाची सुलभता आणि वैचारिक स्पष्टता. मूल जेव्हा शाळेत पाऊल ठेवते, तेव्हा त्याच्याकडे पाच-सहा वर्षांचा प्रदीर्घ भाषिक अनुभव असतो. हा अनुभव त्याच्या मातृभाषेतील असतो. शाळेत जर त्याच भाषेतून शिकवले गेले, तर घराकडून शाळेकडे होणारे संक्रमण सुलभ होते. अनोळखी भाषेचा अडथळा नसल्यामुळे विषयातील आशय थेट मुलाच्या मेंदूपर्यंत पोहोचतो. विज्ञानातील प्रयोग असोत किंवा गणितातील सूत्रे, ती जेव्हा मातृभाषेतून मांडली जातात, तेव्हा मुलांची तर्क करण्याची क्षमता वाढते. पोपटपंची करण्याऐवजी 'हे असेच का?' हा प्रश्न विचारण्याची हिंमत मुलांमध्ये निर्माण होते. ज्या भाषेत आपण स्वप्न पाहतो आणि विचार करतो, त्याच भाषेत शिकणे हे वैचारिक स्पष्टतेसाठी अनिवार्य ठरते.

                  मानवी मेंदूच्या विकासाचे सर्वात महत्त्वाचे टप्पे हे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत पूर्ण होतात. या काळात मेंदूची ग्रहणक्षमता अफाट असते, मात्र त्यावर भाषेचे ओझे लादल्यास मूळ शिक्षणाची गती मंदावते. मातृभाषेतील शिक्षणामुळे मेंदूवर अतिरिक्त ताण येत नाही, परिणामी मुलांची सृजनशीलता बहरते. एका भाषेवर प्रभुत्व आले की, मेंदू 'भाषा शिकण्याची यंत्रणा' विकसित करतो, ज्यामुळे पुढील आयुष्यात इंग्रजीसह अनेक परकीय भाषा शिकणे अधिक सुलभ होते. अनेक पालकांना वाटते की इंग्रजी माध्यमात घातले तरच मुलाला इंग्रजी येईल, मात्र वास्तव याच्या उलट आहे. ज्याचे मातृभाषेतील व्याकरण आणि शब्दसंपत्ती पक्की असते, तोच दुसरी भाषा अधिक दर्जेदार पद्धतीने आत्मसात करू शकतो. भाषेचा हा विकास केवळ मेंदू पुरता मर्यादित नसून तो सांस्कृतिक नाळ आणि आत्मविश्वासाशी जोडलेला असतो. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही; ती आपल्या पूर्वजांचा वारसा आणि संस्कृतीची संवाहक असते. मातृभाषेतून शिकताना मुलाला आपल्या मातीतील लोककथा, म्हणी आणि साहित्याची ओळख होते, ज्यामुळे त्याला आपल्या संस्कृतीचा न्यूनगंड वाटण्याऐवजी सार्थ अभिमान वाटू लागतो. जेव्हा एखादे मूल वर्गात आपल्या भाषेत ठामपणे मत मांडते, तेव्हा त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. याउलट, परकीय भाषेच्या दडपणाखाली वावरणारी मुले अनेकदा उत्तर माहीत असूनही केवळ भाषेच्या भीतीपोटी गप्प राहतात.

                     प्राथमिक शिक्षणाच्या यशात पालकांचा सहभाग हा एक निर्णायक घटक असतो. शिक्षण ही केवळ शिक्षकाची जबाबदारी नसून ती शाळा आणि घर यांच्यातील भागीदारी आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असल्यास घरातील वातावरण शैक्षणिक प्रक्रियेला पूरक ठरते. अशिक्षित किंवा अल्पशिक्षित पालकही मुलाचा अभ्यास घेऊ शकतात आणि त्याच्या शंकांचे निरसन करू शकतात. यामुळे शाळा आणि घर यांच्यात संवादाचा एक भक्कम सेतू निर्माण होतो. आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी ही जागतिक संपर्क भाषा म्हणून महत्त्वाची आहेच, पण ती ज्ञानाची एकमेव भाषा नाही. जपान, जर्मनी किंवा दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनी स्वतःच्या भाषेतून शिक्षण देऊनच जागतिक महासत्ता होण्याचा मान मिळवला आहे. आपण 'इंग्रजी येणे' यालाच 'हुशार असणे' मानण्याची चूक करत आहोत. इंग्रजी हे एक उत्तम साधन आहे, ते साध्य नाही. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेऊन माध्यमिक स्तरावर इंग्रजी एक विषय म्हणून स्वीकारल्यास, विद्यार्थी अधिक प्रगल्भ आणि जागतिक दर्जाचे नागरिक बनू शकतात. थोडक्यात सांगायचे तर, मातृभाषा ही मानवी मनाची जननी आहे. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून दिलेले शिक्षण हे मुलाच्या आयुष्यातील अशा शिदोरीसारखे आहे, जी त्याला आयुष्यभर पुरते. आपली भाषा समृद्ध असेल, तरच आपली मुले विचाराने समृद्ध होतील आणि भविष्यातील आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतील.


✒️संजय गरबड मराठे

      9421973888

Wednesday, 22 April 2026

सत्तेचे रस्ते आणि जबाबदारीचा विसर

 ◼️सत्तेचे रस्ते आणि जबाबदारीचा विसर


                 लोकशाहीच्या प्रवासात सत्तेचे विक्रेंद्रीकरण आणि उत्तरदायित्व हे दोन अत्यंत महत्त्वाचे स्तंभ मानले जातात. मात्र, अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एक अतिशय विसंगत आणि कोड्यात टाकणारी प्रवृत्ती बळावताना दिसत आहे. ज्यांच्याकडे धोरण आखण्याचे, कायदे करण्याचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च अधिकार आहेत, तेच राज्यकर्ते जेव्हा हातात फलक घेऊन रस्त्यावर आंदोलनासाठी उतरतात, तेव्हा लोकशाहीतील ‘संस्थात्मक मर्यादे’चा प्रश्न ऐरणीवर येतो. "सत्ता तुमचीच, मग मोर्चे कोणाविरुद्ध?" हा प्रश्न केवळ राजकीय चिखलफेकीचा भाग नसून, तो आपल्या संसदीय लोकशाहीच्या ढासळत्या रचनेचे एक वास्तववादी प्रतिबिंब आहे.

                  वास्तविक पाहता, सरकार ही एक अशी यंत्रणा असते जिच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची शक्ती आणि संविधानिक जबाबदारी असते. प्रशासकीय यंत्रणेवर वचक बसवणे, कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणे आणि जनहिताचे निर्णय घेणे हे सत्तेत असलेल्यांचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, जेव्हा सरकारमधील जबाबदार घटकच मोर्चे काढतात, तेव्हा ते कळत-नकळत हे मान्य करत असतात की त्यांचा स्वतःच्याच प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही किंवा त्यांची प्रशासकीय पकड ढिली झाली आहे. हे चित्र अत्यंत भयावह आहे, कारण सामान्य जनता ज्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करते, तेच लोक जर रस्त्यावर ओरडताना दिसत असतील, तर सर्वसामान्य माणसाने कोणाकडे दाद मागायची?

                   या प्रवृत्तीमागे एक खोलवर रुजलेली राजकीय रणनीती असते, जिला 'इव्हेंट मॅनेजमेंट' किंवा 'व्हिक्टिम कार्ड' खेळणे असे म्हणता येईल. सत्तेत असूनही आपण कसे 'असह्य' आहोत किंवा आपल्याला कसे 'काम करू दिले जात नाही', असा आभास निर्माण करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा एक प्रयत्न असतो. प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा त्या प्रश्नांचे राजकीयीकरण करून विरोधकांना कोंडीत पकडणे किंवा स्वतःचे अपयश झाकणे, यालाच सध्या प्राधान्य दिले जात आहे. प्रशासकीय फाईलवर स्वाक्षरी करून जे काम एका मिनिटात होऊ शकते, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून, सरकारी यंत्रणेचा वापर करून मोर्चे काढणे, हा सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे.

                     समाजाच्या दृष्टीने पाहिल्यास, ही स्थिती अराजकाकडे नेणारी ठरू शकते. आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने ही मुळात विरोधकांची आणि सामान्य जनतेची शस्त्रे आहेत. ज्यांचा आवाज सत्तेच्या दालनापर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यासाठी रस्ता हे शेवटचे न्यायालय असते. पण जर सत्ताधारीच ही जागा बळकावू लागले, तर खऱ्या अर्थाने पीडित असलेल्यांचा आवाज दबला जातो. जेव्हा सत्तेतील पक्ष मोर्चा काढतो, तेव्हा त्याला मिळणारे माध्यमांचे कव्हरेज आणि सरकारी संरक्षण यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न बाजूला राहतात आणि केवळ राजकीय वर्चस्ववादाची चर्चा सुरू होते. हे लोकशाहीचे 'टॅब्लॉईड' संस्कृतीमध्ये झालेले रूपांतर आहे, जिथे गांभीर्यापेक्षा गोंधळाला अधिक महत्त्व दिले जाते.

                   दुसरीकडे, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गावरही याचा विपरीत परिणाम होतो. ज्या मंत्र्यांच्या आदेशाचे पालन प्रशासन करत असते, तेच मंत्री जर रस्त्यावर उतरून प्रशासनावर किंवा व्यवस्थेवर टीका करत असतील, तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होतो. यामुळे व्यवस्था अधिक गंजत जाते आणि निर्णयांच्या प्रक्रियेत एक प्रकारची शिथिलता येते. "आम्ही काहीतरी करत आहोत" हे दाखवण्याच्या नादात "काय करायला हवे होते" याचा विसर पडणे, हेच सध्याच्या वास्तवाचे सार आहे.

                    अखेर, सत्ता ही उपभोगण्यासाठी नसून ती लोककल्याणासाठी वापरण्याचे माध्यम आहे. रस्त्यावरची ताकद ही जनमताचा कौल असतो, पण सत्तेत बसल्यानंतर त्या ताकदीचे रूपांतर धोरणात्मक निर्णयात होणे आवश्यक असते. जर राज्यकर्तेच आंदोलकाच्या भूमिकेत शिरले, तर लोकशाहीची परिभाषा बदलून जाईल. आता गरज आहे ती केवळ घोषणाबाजी करणाऱ्या नेतृत्वाची नव्हे, तर प्रशासकीय चातुर्याने आणि संविधानाच्या चौकटीत राहून प्रश्नांची मुळासकट सोडवणूक करणाऱ्या 'स्टे्ट्समन'ची. सत्तेत असलेल्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, इतिहास तुमच्या आंदोलनांची नोंद घेणार नाही, तर तुम्ही घेतलेल्या ठोस निर्णयांची आणि बदललेल्या समाजजीवनाची नोंद घेईल. रस्त्यावरचा संघर्ष जनतेसाठी राहू द्यावा आणि सत्तेच्या खुर्चीवरून जनतेच्या आयुष्यात प्रकाश कसा येईल, याचा वस्तुनिष्ठ विचार होणे हीच काळाची गरज आहे.


✒️संजय गरबड मराठे

      9421973888

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...