शाळा

Showing posts with label कला - मनोरंजन. Show all posts
Showing posts with label कला - मनोरंजन. Show all posts

Friday, 9 April 2021

ती यादगार मैफिल,स्मशानातली...

 ती यादगार मैफिल , स्मशानातली ...

👉 https://youtu.be/RD9y_Q8cfnU


प्रिय मित्रांनो ... अपार स्नेह !


मागे मी तुम्हाला बोललो होतो ना , 

माझ्या गज़लेच्या आयुष्यातील दोन विशेष यादगार मैफिलींबद्दल !

त्यापैकी पुण्याच्या येरवडा कारागृहातील बंदी बांधवांसाठी सादर केलेल्या मैफिलीबद्दल मी लिहिले होते .

आज सांगणार आहे , स्मशानात पेश केलेल्या मैफिलीची हकीकत ...


आपले जानदार गज़ल रसिक ऐकायला असतील तिथे पेश होणे हा आनंदाचा भाग असल्यामुळे कुठेही मैफिल करण्यात कधीच दिक्कत वाटली नाही .

अं.नि.स. वर्धा यांनी आयोजित केलेल्या  ' लोकजगर ' हॉलिकोत्सवाचे ( मार्च , २०१६ ) निमंत्रण आले .

मैफिलीचा मंच होता - स्मशानभूमी .

मी खुशी खुशी हो म्हटले ...


मनात राजनिशांचे शब्द रुंजी घालत होते -  " जीवन अगर उत्सव है , मृत्यू भी उत्सव होना चाहिये ."

तेव्हापासूनच जीवनाच्या 'मृत्यू' या अटळ सत्याचं आणि 'स्मशान' या शाश्वत विसाव्याचं भान मनात रुजायला लागलं होतं ...


पूर्वसूचना मृत्युने कोणा दिली

वेळ झाली की , निघावे लागते ...


मित्रांनो , जेंव्हा-केंव्हा निघायची वेळ येईल तेंव्हा  ' त्या '  अपूर्व घटनेला समाधानाने सामोरं जाण्यासाठी रियाज तर हवाच ना !

शिवाय या शांत आणि अपरिहार्य जागेबद्दलची आपल्या सर्वांच्या मनातली भीती सुद्धा जायला हवी .

लोकजागर चे निमंत्रण म्हणजे , त्या रियाजाचाच एक भाग वाटला मला ...


काय यादगार क्षण .., काय नजारा होता तो ..!


छोटंसं स्टेज , रसिकांची तुडुंब गर्दी , मुलं-स्त्रिया-माणसं असे सगळेच जमलेले...

दोन चिता जळत होत्या , वारा वाहता असल्यामुळे मधेच झुळुक यायची व प्रेतांच्या जळण्याचा तीव्र वास नाकातोंडात जायाचा . तरी पण 

मलाच काय , कुणालाच काही वाटलं नाही त्याचं ...


मनसोक्त गायलो , ...  उचंबळून दाद दिली रसिकांनी ...


अखेरची गज़ल पेश केली ती अशा एका बुलंद शायराची - सुरेश भटांची , ज्याने जिवंतपणीच साक्षात मृत्यूची अनुभूती कथन केलेली आहे ...


मी एकटाच त्या रात्री , आशेने तेवत होतो

मी विझलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते

इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते 

मरणाने केली सुटका , जगण्याने छळले होते ...


त्या  ' ऐतिहासिक '  मैफिलीतली 

ही रचना तुम्हीही जरूर ऐका - 

मित्रांनो !


आपला , 

गज़लनवाज़ भीमराव पांचाळे

Gazal Nawaz #BhimraoPanchale​​

#SureshBhat #Marathi #Gazal #Ghazal

Saturday, 13 March 2021

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती



विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती 

गीतकार :- अरविंद जगताप 


हिंदीतले नामवंत कवी दुष्यंतकुमार यांचा एक शेर आहे, 


मैं जिसे ओढ़ता-बिछाता हूँ

वो ग़ज़ल आपको सुनाता हूँ


कलाकृतीच्या माध्यमातून जीवनाचे विविध कंगोरे वाचक, श्रोते, प्रेक्षकांना दाखवताना ’मला खूप काही कळलंय’ ही वृत्ती बाजूला ठेवावी लागते. मला सापडलेल्या एका पायवाटेवर कदाचित मी दोन पावले पुढे आलो आहे म्हणून मागून येणा-यांना या मार्गातले खाचखळगे माझ्या पध्दतीने समजावून सांगतो आहे, हा एकच भाव शेवटी महत्त्वाचा ठरतो. अर्थातच सगळ्या सुविचारांप्रमाणे हा ही बोलायला सोपा आणि आचरणात आणायला अवघड. खूप कमी कलाकारांना अभिनिवेष विसरून सातत्याने ’जगणं’ लिहायला जमतं, त्यातलचं एक ठळक नाव म्हणजे ’अरविंद जगताप’. अरविंदचं कुठलंही लेखन थेट काळजाला भिडतं, आपलं वाटतं याचं माझ्यामते एकमेव कारण म्हणजे तो जे जगतो तेच लिहितो आणि जे लिहितो ते जगत राहतो. त्याची गाणी आपल्याला ’लाईक,लव्ह,हिट्स’ च्या पल्याड घेऊन जातात त्यापैकी हे एक गाणं. 


जगन्याच्या वारीत मिळेना वाट, 

साचले मोहाचे धुके घनदाट

आपली माणसं, आपलीच नाती 

तरी कळपाची मेंढरास भिती 

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती 


कुठल्याही गाण्याची सुरुवात कशी होते यावरही बरेचदा त्याचं यशापयश अवलंबून असावं. ’जगन्याच्या वारीत मिळेना वाट’ ही ओळ सरळ सरळ प्रत्येक मराठी मनाचा ताबा घेते. भारंभार प्रतिकांच्या ओझ्याने वाकलेली अनेक सालंकृत गाणी आपण ऐकतो, वाचतो. वरकरणी देखण्या दिसणा-या या गाण्यांमधे आत्मा हरवलेला दिसतो. अरविंद प्रतिकांच्या मोहात कधीच ’म्हणणं’ हरवू देत नाही हे विशेष. आयुष्याच्या वारीतला विठ्ठल म्हणजे ध्येय, स्वप्न, उद्दिष्टं, ध्यास, आदर्श. त्याची अशी कितीतरी मनोहारी रुपे आपण डोळ्यांत साठवून चालत असतो. अशावेळी जेव्हा आपल्याबरोबर चालणारा एक वारकरी ’वाट मिळेना’ म्हणतो तेव्हा अठरा पगड जातीच्या करोडो हळव्या जनांचा ठोका चुकतो. ही वाट का मिळत नाहीये हे सांगताना अरविंद ’साचले’ मोहाचे धुके घनदाट असं लिहितो तेव्हा स्तिमित व्हायला होतं. धुकं म्हणा किंवा अगदी मोहाचं धुकंही म्हणा, हे तसं मराठी गीतलेखनात नवीन नाही पण धुके ’साचणे’ ही कमाल आहे. जवळपास सगळ्यांनी धुके ’दाटले’ लिहिले असते पण ’साचले’ लिहून अरविंदने त्याची छटा इतकी गडद केली आहे की मुलायम धुक्याची दलदल झाल्यासारखी वाटते. गाणं भिडण्याची ही बारीक सारीक कारणे आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत. हे गाणं, हे ’गा-हाणं’ अगदी आतून आलेलं आहे त्याचा हा आणखी एक पुरावा. 


आपला जिवलग असो, डॉक्टर असो किंवा देव, गा-हाणं मांडताना आधी काय दुखतंय हे सांगावं लागतं आणि ते ही थोडक्यात! ’आपली माणसं, आपलीच नाती..तरी कळपाची मेंढरास भीती’ या एका ओळीत जन्माचा सल मांडून अरविंद कळीचा सवाल टाकतो आता सांग, ’विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’


आजवर ज्यांची वाहिली पालखी

भलताच त्यांचा देव होता

पुरे झाली आता उगा माथेफोडी 

दगडात माझा जीव होता

उजळावा दिवा म्हणुनीया

किती मुक्या बिचा-या वाती जळती 

वैरी कोण आहे इथे कोण साथी

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती 


डोळ्यांदेखत आदर्श ढासळण्यासारखं दु:ख नाही. आपण ज्याची तत्वं स्वीकारतो, काळजावर गोंदून घेतो त्याची तत्वं काही वेगळीच, नव्हे भलतीच होती हे जेव्हा कळतं अवघं अस्तित्व सोलून काढावसं वाटतं. 


वल्कलांनीही सुटेना प्रश्न आता

सावली फेडून व्हावे नग्न आता


जगणं व्यर्थ आहे, नश्वर आहे, हे आपण अनेकदा वाचलेलं असतं पण अनेकांसारखं लिहिल ती अरविंदची लेखणी कसली! 


बुजगावण्यागत व्यर्थ हे जगनं

उभ्या उभ्या संपून जाई 

खळं रितं रितं माझं 

बघुनी उमगलं 

कुंपन हिथं शेत खाई 


राजकीय पार्श्वभूमीचा सिनेमा, पिढ्यानुपिढ्या कार्यकर्त्यांचा होत असलेला वापर एका ’बुजगावणं’ या शब्दाने ठळक होतं. त्याचवेळी ते बारा बलुतेदारांपासून नोकरदारांपर्यंत सगळ्यांनाही लागू होतं. प्राणांतिक टाहोला प्रामाणिक वेदनेची जोड नसली की तो आक्रस्ताळेपणा होतो. दु:ख आहे,शब्दसंपदा आहे म्हणून उठसूठ थयथयाट करून चालत नाही. अरविंदचं लेखन पसरट नाही म्हणूनच त्याच्या तोंडी टोकदार सवाल शोभतात. अशाच काही लेखण्यांना प्रत्यक्ष विठ्ठलासमोर त्याच्याच विश्वातली विसंगती मांडून जाब मागायचा अधिकार प्राप्त होतो. 


भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी 

झेंडे येगळे, येगळ्या जाती

सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीती

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ??


’झेंडा’ हा दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्तेचा पहिला सिनेमा. अवधूत संगीतकार, गायक तर आहेच पण त्याने अनेक उत्तम गाणीही लिहिलेली आहेत. तसं असूनही कुठलं गाणं कधी कुणाला लिहायला द्यायचं हे त्याला अचूक कळतं हे मी माझ्या अनुभवावरून खात्रीने सांगू शकतो. स्वत: लिहायच्या किंवा गायच्या मोहक धुक्यात न अडकता अवधूतने हे गाणं अरविंदला लिहायला सांगितलं आणि ज्ञानेश्वर मेश्राम या नवीन गायकाकडून गाऊन घेतलं. कलेवर निस्सीम प्रेम करणारी अशी माणसं एकत्र येतात तेव्हाच अशा कालातीत कलाकृती तयार होत असाव्यात.


’मला ते मीटर वगैरे येत नाही रे वैभव आणि ते अमुक एक वेळेत, अमक्या चालीवर शब्द लिहिणंही जमत नाही’ अरविंद काल हसत फोनवर म्हणाला. ना का येईना रे, तू तुझा कल्लोळ मांडत राहा, बाकीचं संगीतकार बघून घेतील आणि तुझ्या ओळींचे सुविचार होत राहतील. शेवटी ’डेड’लाईनची गाणी लिहिणं वेगळं आणि ’हेड’लाईनची गाणी लिहिणं वेगळं मित्रा! 


सुरेश भट म्हणाले होते तसं 


जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती

सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती


’विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ काय लिहिलंयस यार!!!


:- वैभव जोशी

फेसबुक साभार

Thursday, 4 March 2021

सुंबरान...मराठी चित्रपट...


सुंबरान...मराठी चित्रपट...

गजेंद्र आहीरे यांचा हा चित्रपट बघायच्या अगोदर, एक छोटासा पुर्वाग्रह माझ्या मनात होता की मकरंद अनासपुरे , सिद्धार्थ जाधव आहेत म्हणजे काहीतरी विनोदी मसाला असणार.

पण जेंव्हा सिनेमा चालू होतो आणि एका सुरूवातीच्या सीन मधे मकरंद रेल्वे मधून बायको बरोबर प्रवास करत आपल्या मूळ गावी येत असतो. प्रवासात त्याची नजर समोरच्या सीटवर बसलेल्या एका नवतरुणीवर पडते, ती तरुणी त्याला तरूण वयातल्या पहील्या प्रेमाची आठवण करुन देत त्याला रेल्वेच्या अगोदर आठवणी च्या रुपात त्याच्या गावात घेऊन जाते,  फ्लॅशबॅक मधे मकरंद चा सायकल चालवताना चा सीन अतीशय उत्कृष्ठपणे मनावर कोरल्या जातो, सायकलचे पुढे सरकणारे प्यांडेल व वाऱ्याने ऊडणारा कच्च्या रस्त्यावरील फुफाटा याने सिनेमाचा फ्लॅशबॅक सुरु होतो. 

दिग्दर्शकीय वैचारिक प्रग्ल्भता, जाणीवेची खोली, वेदनांची झुळूक, मनाचा ठाव, अंतकरणात गहीवरलेला व भावनांचा गजबजलेला गाव असा काही माझ्या मनाला  स्पर्श करून गेलाला हा ' गजेंद्र आहीरे ' यांचा ' सुंबरान' नावाचा सिनेमा आहे. 

सिनेमा म्हणण्यापेक्षा एखादी ऊचंबळून आलेली दुखःची लाट कुणाच्या तरी गळ्यात रडून आपण मोकळी करतो ना ती म्हणजे ' सुंबरान'....

प्रत्येक पिढीत त्या त्या पिढीचे, संस्कारीक, धार्मिक, आर्थिक, पारंपरिक, रूढीमय, माणसीक , शारीरिक असे एक ओझे घेऊन सगळे तरून बाल्य अवस्थेतून तारुण्यात प्रवेश करतात.

तारुण्यात येणं सोपं असतं पण ते जगणं, जोपासनं, सोसणं, अनूभवनं हे प्रत्येक तरुणाचं सारखं नसतं, ते वेग-वेगळं असतं प्रत्येकाचं, त्याच्या कौटूंबीक, धार्मिक, आर्थिक, जातीय परिस्थिती नुसार.

काहींसाठी तारूण्य हे आनंददायी सन असतो तर काहींसाठी दुखःचे भोग आणि सजा.

सुंबरान हा आरसा आहे प्रत्येक ग्रामीण भागातील बहुसंख्य तरुणांच्या तारुण्याचा...

अतीशय सात्विक, समतोल आणि सकस अभिनय करून घेतलाय दिग्दर्शकाने आणि केलाय सर्वच अभिनेत्यांनी...

गजेंद्र आहीरे यांचं स्वप्न सत्यात ऊतरवण्यामधे प्रत्येकाचा वाटा तितकाच महत्वाचा आहे...

मकरंद अनासपुरे, वृंदा आहीरे, रवी काळे, रवींद्र मंकनी, आश्वीनी कळसेकर, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अदीती भागवत ई.

या फ्रेम साठी संगीताची साजेशी चौकट दिली ती राहुल रानडे आणि विश्वनाथ मोरे यांनी...

प्रत्येक व्यक्तीच्या पुर्वार्धात व तरुणपणात जाण्यासाठी हा सिनेमा ' टाईम ट्रॅव्हल' म्हणून काम करतो...

ज्यांना वाटतं आपलं जगणं राहून गेलय त्यांनी प्रत्येकानी हा सिनेमा बघावा...


लेखक- दत्ता गायकवाड

(Cinema Gully   facebook साभार)

Sunday, 28 February 2021

' 'दिव्या' दृष्टीचे रविंद्र जैन!'

 ' 'दिव्या' दृष्टीचे रविंद्र जैन!' 


रविंद्र जैन यांचा जन्म झाला तेव्हा( 28 फेब्रु 1944) 'बाळाच्या डोळ्यांच्या जागी कातडी' होती...डोळे दिसतच नव्हते.. डॉक्टरनी अॉपरेशन करुन ती त्वचा काढून टाकली तेव्हा कुठे  बाळाचे डोळे दिसू लागले...पण 'बाळाच्या डोळ्यांना' मात्र काहीच दिसत नव्हतं... फक्त अंधार! जन्मतः अंधत्व!




मोठेपणी हा माणूस संगीत- काव्य- गायन अशा त्रिविध कलांत पारंगत झाला. त्यांच्या या तीन भूमिकांतली 'गीतकार' ही भूमिका सर्वाधिक थक्क करणारी आहे. 'जन्मांध व्यक्तीनं कविता करणं' हे जगावेगळं आहे असं नाही. मानवी भावभावना, नातेसंबंध यावर काव्य करणं तुलनेनं सोपं आहे ... पण जो निसर्ग कधी पाहिलाच नाही त्यावर गीत रचणं.. ते ही कथानकाच्या मागणीनुसार... ही खचितच 'दिव्य' गोष्ट आहे. रविंद्र जैन यांच्या गीतातल्या अशा अनेक ओळी नेहमीच अचंबित करतात... वानगीदाखल काही ओळी पहा...


--- 'खुला खुला गगन ये हरीभरी धरती.. जितना भी देखो तबियत नहीं भरती...'

--- 'चांदीसा चमकता ये नदियाँ का पानी...'

----'हुस्न पहाडोंका क्या कहना के बारों महिने यहाँ मौसम जाडोंका..'

-----'घिर आए मेघ परबतपें बिजुरियाँ चमके..हो गयी दिनमें रात...'

----'नित साँझसवेरे मिलते है.. उन्हें देखके तारे खिलते है...'

----'ऊंचे महलके झरोकेसे तुम अंबर की शोभा निहारो जरा.. रंगोंसे रंगोका मेल ये आँखोंसे दिलमें उतारो जरा...'


रविंद्रजींच्या अन्य गीतांतूनही अशा ब-याच पंक्ती वेचता येतील. त्यांची अतिशय गाजलेली काही गाणी 'डोळ्यांशी' वा 'पाहण्याशी' संबंधित आहेत...

'अखियोंके झरोंकेसें मैंने देखा जो सावरे...'

'दिलमें तुझे बिठाके कर लूंगी मैं बंद आँखे..'

'गोरी तेरा गाँव बडा प्यारा मैं तो गया मारा..'


'ईश्वरनें मेरी आँखोके बजाय मेरे दिमाग को रोशन किया हैं' असं ते म्हणत...खरंच आहे... दोन डोळे हिरावून घेणाऱ्या नियतीनंच प्रतिभेचा हा 'तिसरा डोळा' त्यांना बहाल केला होता. 


एका कवी संमेलनात त्यांनी सादर केलेली  रचना ऐकून एक मुलगी अगदी भारावून गेली.. तिनं घरी येऊन ती कविता आईला ऐकवली.. आईही रसिक असावी.. ती म्हणाली.."माझी मुलगी मोठी असती तर या कवीबरोबर तिचं लग्नच लावून दिलं असतं!"..हे ऐकून ती मुलगी आतल्या खोलीत गेली आणि 'साडी नेसून' आली.. म्हणाली.."आई, मी मोठी झालीय असं तुला वाटत नाही का?"


याच मुलीनं... 'दिव्या'नं... पुढे रविंद्रजींशी विवाह केला व आयुष्यभर प्रेमाची संगत केली..रविंद्रजी म्हणूनच म्हणत... 

"दिव्या मेरी आँखोकी रोशनी है!" 


 'दिव्या' दृष्टीच्या या  कलाकाराला जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 


(धनंजय कुरणे)

फेसबुक साभार

Thursday, 25 February 2021

72 मैल एक प्रवास

 काही प्रवास कायम आठवणीत राहणारे असतात. काही खूप सुंदर तर काही अगदी नकोसे तर काही मन कासावीस करणारे. आणि जर असा एक प्रवास त्या प्रवासात गरिबी,पायपीट,उपासमार,मजबुरी,हताश मन,जगाचा कठोरपणा,आणि एक मोलाचा संदेश कोवळ्या बालवयात जर अनुभवला तर ?? 

आताच एक विचार वाचण्यात आला रिकामा खिसा,मोकळे पोट,तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जगण्याची कला शिकवते एव्हना जगातले आपले अस्तित्व दाखवते असे म्हणले तरी चालेल. 

हो अनेक चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे.त्यापैकी जगातले एक विदारक पण कटू सत्य दाखवणारा प्रवास म्हणजेच "७२ मैल एक प्रवास "हा चित्रपट. 

अगदी चिड आणणारा आणि हताश हतबल व्यक्ति साठी जग काय असते याची एक सत्य कहाणी लेखक अशोक व्हटकर यांच्या त्या कोवळ्या बालवयात आलेल्या प्रवासावर आधारित आहे. 

दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या टीम ने २०१३ मध्ये हा मराठी चित्रपट मांडून हि सत्य कथा प्रदर्शित केली. अशोक व्हटकर यांची भूमिका चिन्मय संत या बालकलाकाराने उत्कृष्ट केली.



लेखकाची घरची परिस्थिती हलाखीची. वडिल नाटक कंपनीत काहीतरी काम करत त्यामुळे मुंबई ला असत. घरी अजून दोन छोटी भावंडे.लेखक त्या वयात खूप निगरगट्ट,हट्टी,अभ्यासाचा कंटाळा,दिवसभर भटकणे खेळणे असे प्रकार त्यामुळे वैतागलेले कुटुंब. शेवटी हा सुधारावा म्हणून बोर्डिंग ला ठेवावे असे ठरते बालवयात बोर्डिंग बद्दल खूप काही भीती वाटत. तिथे आई वडिलांपासून लांब राहावे लागते. स्वतःची कामे स्वतः करावी लागतात.त्रास देता येत नाही. जर त्रास दिला तर खूप मार मिळतो अमुक तमुक. 

थोडक्यात बोर्डिंग म्हणजे काहीतरी खूप डेंजर!!!! अशीच मनस्थिती लेखकाची होते.

आणि त्यांना अखेर सातारच्या प्रसिद्ध अशा बोर्डिंग मध्ये त्यांचे मुळातच रागीट असलेले वडील दाखल करतात. अजिबात ऐकत नाही,अभ्यास करत नाही,मस्ती करतो असे काही मास्तरांना सांगून मास्तरांबद्दल अजूनच एक अनामिक भीती लेखकाच्या मनात घर करून राहते.वडील निघून जातात लेखक हिरमुसून जातो  तिथे इतर मुले  त्याची समजूत काढतात, मास्तर पण इथे किती छान मुले राहतात रमतात असे सांगून पाहतात पण मनात ठाम केलेले कि इथे राहायचेच नाही बस्स!! त्यामुळे तिथे रमण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि अखेर लेखकाला ती संधी मिळते. पळून जाण्याची. अर्थातच त्याच्या घरी कोल्हापूरला. 

तो पळून जाताना तिथली वसतिगृहातली काही मुले त्याचा पाठलाग करतात,हा कसाबसा तिथून सटकतो. 

आणि सुरु होतो प्रवास एक असा प्रवास जिथे त्या बालवयात वय अवघे १३ वर्ष अनेक कटू अनुभवांची विदारक सत्य,भय,चिंता,हाल आणि खूप काही. 

१९५०-६० चा तो काळ.दूरदूर वर गावे. निर्मनुष्य रस्ता.खिशात दमडी नाही कि पायात चप्पल. मग तिकीट काढायला पैसे नाहीत म्हणून एस.टी मधून हाकलून बाहेर काढले, तर वाटेत दारुड्यानी केलेली अडवणूक, तर कुठे बैलगाडी वाला गाडीत बसवतो पण खालच्या जातीचा आहे कळताच मारहाण करत हाकलतो. मग वाटेत मिळतात सहप्रवासी. हो सहप्रवासी या साठी कि एक दुःखीच दुसऱ्याचे दुःख समजू शकतो आणि या कुटुंबाने लेखकाची विचारपूस करून आपल्या समवेत घेतले. प्रवासात घेतले. त्या कुटुंबात  एक स्त्री{ राधाक्का - अभिनय स्मिता तांबे }. गांजलेली.तिची दहा बारा वयाच्या दोन मुली {भिमी आणि बायजी },एक जरा मोठा मुलगा{ रानू - अभिनेता चिन्मय कांबळी}. अन एक हातात तान्हुले बाळ.नवरा एकेकाळी खूप मेहनती प्रामाणिक पण काही कारणास्तव पोलीस  आरोप आणि त्यांच्या कुटुंबाचा झालेला विस्कट. पण ती स्त्री हार मानणारी नव्हती. ती जगत होती तिच्या लेकरांसाठी. शिरवळ वरून सांगली कडे पायी निघाले होते ते कुटूंब. 

मग त्यांच्या प्रवासात झालेली उपासमार,कुठे ऊस खाऊन तर कुठे भीक मागून मिळेल तो तुकडा सर्वानी वाटून खाऊन मनाचा दाखवलेला मोठेपणा, वाटेत लोकांनी दिलेली वागणूक अन माणसातला न ओळखलेला देव. रस्ता लांबलचक होता जायचे कुठे ते हि माहित होते पण टीचभर पोट समाधानी  कुठे होते ?? 

या वेळी ," #देवा #सुंदर #जगामध्ये #का #रे #माणूस #घडविलास, #भीक #मागण्या #भूक #दिली_जन्म #जाळण्या #दुःख #दिले'' अतिशय अर्थपूर्ण गीत रचना आहे. 

वाटेत तान्हुला पोर जीव सोडतो आणि त्याचा त्या कठोर जगातला प्रवास कसा संपतो,त्याला माती टाकताना लेखकाची मदत होते. मग हा कोणता ऋणानुबंध होता? पुढे एका विहिरीत भुके पोटी यांनी कोणीतरी टाकलेला उतारा दिसतो (अन्न )मग ते घेतल्यावर त्यांच्या मागे नाग लागतो, त्यांची वाट अडवतो, ती माय त्या नागाला हात जोडते,माफी मागते.वाट सोड म्हणते. नाग काही ऐकत नसतो पण  अखेर एक ट्रक त्या नागाला चिरडतो. 

”#हात #का #जोडले ?” या लेखकाच्या प्रश्नावर राधाक्का म्हणते, "#या #जगात #टिकायच #असेल #तर #हात #जोडावे #हि #रीत #हाय #जगाची." हतबलतेचे किती मोठं उदाहरण इथे शिकायला मिळते.  अन अखेर दुर्दैवाने  दुसरा नागच तो थोरल्या कळत्या आणि राधाक्काला आधार असलेल्या एकमेव पोराचा जीव कसा घेतो अतिशय दुःखद घटना घडते. त्या आईच्या यातना दुःख पाहवत नाही.कितीतरी दुःख गिळून  यांचा प्रवास चालूच असतो. वाटेत रात्री कुठं तरी छोटेसे हॉटेल दिसते तिथे मूठभर शेवेसाठी मुलांचं भूक भागावी म्हणून राधाक्काला मजबुरी खातीर कसे त्या हॉटेल मधल्या कामगाराला खुश करावे लागते हा प्रसंग खूप राग आणणारा आहे.

या सर्व गोष्टी लेखकाच्या मनावर खोलवर परिणामकारक ठरतात. त्याला कळत असते पण व्यक्त होता येत नव्हते. पुढे लेखकाचे गावाचा फाटा लागतो. राधाक्का आणि तिच्या उरलेल्या दोन मुली मोठ्या जड अंतःकरणाने लेखकाचा निरोप घेतात. लेखकाचे डोळे भरून येतात ३ दिवसांच्या प्रवासात एका आई पेक्षाही तिने त्याला माया लावली होती. त्याने खूप काही कटू अनुभव पाहिलेले असतात.जगात कोणीही विद्वान जे धडे देणार नाही ते धडे लेखक राधाक्काकडून शिकतो. राधाक्का जाताना  सांगते," #पोरा #मोठा_हो,शिक.."

ती हार न मानणारी,पुढे कोणतेही ध्येय नसलेली,वाटेत दोन मुले गमावलेली, सोबत अबला दोन लहान मुली असलेली,जिचा भूतकाळ कटू होता वर्तमान भयानक होता आणि भविष्य माहित नव्हते अशी ती अडाणी पण खूप काही माणुसकी, जग आणि वास्तवतेचा धडा देणारी राधाक्का. यांच्या वाटा बदलतात. मागे वळून वळून पाहत असतात. पण नाईलाज असतो. राधाक्का आणि तिच्या दोन मुली नजरेआड होतात इथे कुठं तरी हायसे वाटते कि अखेर तो लेखक घरी तरी पोहोचला.चित्रपट जरी इथे संपत असला तरी पुढे काय होते झाले असेल हे प्रश्न प्रेक्षकांना पडतातच पण मूळ पुस्तक वाचले कि कळते पुढे जाऊन लेखक शिक्षक होतात,एक समाजातील चांगली व्यक्ती सोबत एक जबाबदार सांसारिक होतात पण तो बालवयातील प्रवास त्यांच्या मनावर कायम खोल रुतून बसला आहे. त्यांनी पुढे खूप शोध घेतला राधाक्काच्या सांगली गावी पण काही फायदा नाही. काहीच कळू शकले नाही. त्यांना खूप आभार मानायचे होते त्यांचे कि तुमच्या मुळे मी घडलो!! पण नाही.लेखकाच्या मनाची केविलवाणी अवस्था कशी  होत असेल आणि  आयुष्भर ती पुन्हा भेट न होणे याचे दुःख ज्याचे त्यालाच कळते. 

पण पुढे राधाक्का आणि तिच्या मुलींचा प्रवास कसा झाला असेल? काय झाले असेल? माहित नाही. लेखकाला जर राधाक्का आणि तिचे कुटुंब भेटलेच नसते तर ? मूळ कथा वाचली कि अजून मन हेलावून जाते आणि या सुंदर जगातील कठोरता,गरिबांचे अस्तित्व,मजबुरी,स्त्रीच्या वाटेला आलेला संघर्ष  अशी अनेक विदारक सत्य दिसून येतात. 

चित्रपटामध्ये काही मर्यादा दाखवून सत्य मांडण्याचा दिग्दर्शक राजीव पाटील यांचा प्रयत्न सुंदर झाला आहे. त्यांनी त्या कथेला जगासमोर आणून जगाची एक बाजू देखील कळू शकली

Twinkle Khanna यांची निर्मीती आहे. स्मिता तांबे यांनी राधाक्का ची केलेली प्रमुख भूमिकेला तोड नाही. सोबत लेखक अशोक व्हटकर यांची भूमिका चिन्मय संत आणि इतर बालकलाकारांचा अभिनय  उत्कृष्ट केला आहे.

एक सत्य प्रवास.  

व्यक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.काही चुकल्यास सुधारणा सांगावी. 

गौरव पाठक (पुणे)


#CinemaGully

जीवन का मतलब तो..

 जीवन का मतलब तो..

लेखक : प्रा.सत्यजीत जाधव

अप्रतिम लेख... वाचायला तर हवाच !

________________

" हजार दुःखे मनास माझ्या..

        हजार जखमा उरात माझ्या.. 

        वसंत असता सभोवताली..

        ऋतू निराळाच आत माझ्या.."


दोन दिवसापूर्वी मिडीया (You tube) वर वारंवार बघण्यात आलेला सुप्रसिद्ध गीतकार संतोषजी आनंद आणि आवडती गायिका नेहा कक्कर यांचा भावनांनी ओतप्रोत असलेला व्हिडीओ  बघण्यात आला.. संवेदनशीलतेच तिक्ष्ण नाक असणाऱ्या तुमच्या माझ्या सारख्या लोकांना हा सदर क्षण बरच काही सांगून गेला .... 

' मनासारखे सारे काही जीवनात या घडते का ....? ' 

अशी काहीशी अगतिक सगळ्यांची अवस्था तो व्हिडीओ पाहून झाली.... असंख्य लोककलाकारांचे अगदी पोटापाण्याचेसुद्धा प्रश्न डोळ्यासमोर फेर धरुन नाचायला लागले ..

मनानं समजूतदार असणारी ही संतोषजी आनंद यांच्यासारखी माणसं , त्यांची अगतिकता व्यक्त करत नाहीत , फक्त आणि फक्त सोसत राहतात ...आयुष्यभर किती सोसलं या माणसानं ..स्तब्ध झालो .

हिंदी चित्रपट सृष्टीच्या मायाजाळात घरातून बाहेर दिसणारी हि दिग्गज माणसं वेगळी ...आणि घरातलं चार भिंतीमधलं त्यांचं एकाकीपण वेगळं ... हे प्रकर्षानं जाणवलं ....


      " इक प्यार का नगमा हैं ..

        मौजों कि रवानी हैं.. 

        जिंदगी और कुछ भी नहीं...

        तेरी मेरी कहाँनी हैं ...!!


अशा शब्दांनी भरगच्च भरलेल्या या गाण्यात जेव्हा ध्रुवपदानंतर ...

ला.. ला..  ला... ला... ला... ला....  हे जेव्हा गाणं माहित असणारा माणूस गुणगुणतो , तेव्हा त्याच्या मनाचा गाभारा हा त्याच्या जुन्या आठवणींच्या प्रतिध्वनींनी बहरल्याशिवाय अन् भरल्याशिवाय राहत नाही .

एकटेपणात प्रत्येक जण भूतकाळात डोकावून आल्याशिवाय राहत नसतो, त्याला कोणीच अपवाद असू शकत नाही .. ' कधी थांबते ना कोठे त्याला म्हणावं जीवन....'  या जीवनाच्या प्रवासात काही गोष्टी मिळवलेल्या हरवायच्या आहेत तर काही अनावधानानं  हरवलेल्या पुन्हा एकदा मिळवायच्या आहेत.

सगळेच दिवस आयुष्यात एकसारखे नसतात ... संतोषजींची पत्नी ,  मुलगा संकल्प,  सून नंदिनी आणि त्यांच्या मुलाबाळांच्या आत्महत्येच्या पश्चात,  संतोषजी अपघातातून वाचलेल्या नातीसाठी का होईना जगले ... पण कुटुंबावर कोसळलेल्या डोंगरावढ्या मोठ्या दुःखानंतरचं त्यांचं जगणं... जगणं म्हणता येईल का..??? असा संमिश्र प्रश्न मनात माझ्या डोकावत राहतो .


       " जगत मी आलो असा की

          मी जसा जगलोच नाही..                

          एकदा तुटलो असा की,

          मग पुन्हा जुळलोच नाही ..                                      

          संपल्यावर खेळ माझा

          आंधळ्या कोशिंबिरीचा..              

          लोक मज दिसले अचानक

          मी कुठे दिसलोच नाही ..!!! "

अशी ही काहीशी भावविवश अवस्था संतोषजी अनुभवतायत, पण या सगळ्यातूनही सावरत  तुम्हारे राँह में.. काँटे हों... गुल हों.. या हों पत्थर...  अपना काम है दामन भर लियाँ जाये ..! असं म्हणत त्यांनी वाटचाल सुरू ठेवलीये .

 

शब्द सिद्ध.. शब्द हस्त.. शब्द प्रभू संतोषजी यांना त्यांच्या उमेदीच्या काळात लिखाणाच्या बळावर सगळं काही मिळालं... हसत्या...खेळत्या.. .माणसांनी भरलेल्या घरातून अचानक सगळी माणसं रेल्वेखाली आत्महत्येनं  मृत्युमुखी पावल्यानं एकटेपणाच दुःख त्यांच्या वाट्याला आलं.. 'भीड़ जमानें में है बढ रहीं.....  पण आतल्या एकटेपणाचं  काय ????

तीन-चार वेळा पायांच ऑपरेशन झालं.. आवाज थरथर कापायला लागला.. हात पाय सुद्धा प्रचंड थरथरायला लागले..  जगण्यासाठी लागणारा पैसा कमी झाला किंबहुना संपला .... पण लिखाणांत प्राण ओतून लिहिण्याचं बळ काही कमी झालं नाही , आणि त्या अनुभवलेल्या आयुष्यातूनच हे असं काहीस सुपिक जन्माला आलं..


       " आँखो में समंदर हैं.. 

         आशाओं का पानी हैं

         जिंदगी और कुछ भी नहीं

         तेरी मेरी कहाँनी हैं ...!! "


 दिल की दुनियाँ बसायेंगे हम ...

 गमकी दुनियाँ का डर छोडकर..

 जीने मरने की किसको पडी...

 प्यार करले घडी़ दो घडी़ ....

हे सुद्धा समजुतदारपणानं आलं,  तुमच्या माझ्यासाठी .


ज्या सरळ मनाच्या प्रेमळ माणसांना भावनेचा पान्हा फुटतो , त्यांच्या अंतरीचा ओलावा सर्वांठायी  झिरपत राहतो ...पाझरत राहतो. सुप्रसिद्ध गायिका ' नेहा कक्कर' ने देऊ केलेले पाच लाख रुपये सुद्धा  या स्वाभिमानी कलाकाराने नाकारले पण नेहाने संवेदनशीलतेनं ,  सामाजिकतेच भान ठेवून त्यांना ते स्वीकारायला भाग पाडले..

 #Indian idol च्या या कार्यक्रम सत्रात  " किसी नें तो याद किया .." असं म्हटल्यावर तर काळीज पिळवटून गेलं ... गहिवरून आलं भडभडून आलं ... भुकेलेलं पोट ,  रिकामा खिसा,  तुटलेल हृदय आपल्याला आयुष्याचे सर्वोत्कृष्ट धडे देतं.. हे सगळं या सच्चा कलाकारानं अनुभवलं..

 

       " तुझेच गाणे अजून असती, 

         थरारणार्‍या स्वरात माझ्या.. 

         हजार जखमा उरात माझ्या..

         हजार जखमा उरात माझ्या...

         हजार जखमा उरात माझ्या .."


शब्दप्रभू सुप्रसिद्ध गीतकार आदरणिय 'संतोषजी आनंद ' यांना सुदृढ आयुष्य लाभो.... उत्तरोत्तर लिखाणासाठी दहा हत्तींच बळ मिळो... त्यांना तुमच्या माझ्यासारख्या असंख्य चाहत्या कडून भरघोस प्रेम मिळो हीच मनःपूर्वक ईच्छा ठेवून ... थांबतो .


तुम्हा सर्वांचा ,

सदैव स्नेहांकीत 


प्रा.सत्यजीत जाधव

8275455815

Monday, 22 February 2021

गीतकार संतोष आनंद

 गीतकार - संतोष आनंद (साभार फेसबुक)

त्यांच्या लेखणीने त्यांना काय नाही मिळवून दिलं? .. नाव, पैसा, प्रसिद्धी, इभ्रत... पण नशिबाचे चक्र असे फिरले की ना पॆसा उरला ना इभ्रत ... सर्वात महत्वाचं म्हणजे ना एकुलता एक मुलगा उरला आणि ना सून! ..  अगदी एकाकी आयुष्य त्यांच्या वाटेला आलं. थोडी कृपा झाली ईश्वराची म्हणून त्यांची नात त्यांच्यासोबत आहे! संतोष आनंद हा तो दुर्दैवी कलाकार!



इक प्यार का नगमा है... 

मेघा रे मेघा रे...  

तेरा साथ है जो मुझे क्या कमी है... 

मोहब्बत है क्या चीज... 


सारखी कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारा... त्याकाळी नावाजलेला ...दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारा ... एकेकाळी प्रसिद्धीच्या, आप्त मित्र यांच्या वलयात रहाणारा गीतकार..! सगळं ठीक होतं.. एकुलता एक मुलगा, सून आणि एक गोड नात.. पण मुलगा कसल्याशा फ्रॉडमध्ये अडकला...अडकवला गेला आणि अडकतच गेला...  फ्रॉड वाढत वाढत २५० करोडपर्यंत गेलं.. खूप प्रयत्न केले वर निघायचे पण त्या दलदलीतून अधिकच रुतत गेला! एक दिवस निर्णय घेतला आणि पत्नी व ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलीसमवेत एका भरधाव आगगाडीखाली झोकून दिलं. तो आणि त्याची पत्नी तर गेले पण अंगावर गंभीर जखमा झालेली मुलगी सुदैवाने वाचली. कदाचित संतोष आनंद यांना आधार द्यायलाच असावी! मुलाने मृत्यूपूर्वी १० पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली.. मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले पण त्यावर अजूनपर्यंत तरी काही झालं नाही.. झालं तरी मुलगा, सून परत मिळणार नाहीत.. ते दिवस फिरून येणार नाहीत! 


जो बीत गया वो दौर अब फिर न आएगा

मेरे दिल में तेरे सिवा कोई और न आएगा 

घर फुक दिया हमने, अब राख उठानी है.. 

जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है... 


आजोबा आणि नात दोघंच उरले एकमेकांसाठी पण दुर्दैवाचा फेरा अजून सुटला नाही.. गीतकार संतोष आनंद अपंग झाले.. ३-४ वेळा पायाचं ऑपरेशन झालं. व्हील चेअरवर आले.. हातपाय प्रचंड थरथरतात... आवाज कापतो.. जगायला पैसा नसला तरी लेखणीत दम मात्र पाहिलेसारखाच आहे..!


कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है

जीवन का मतलब तो, आना और जाना है

दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी है

जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है... 


काल इंडियन आयडॉल कार्यक्रमात संतोष आनंद यांची कथा ऐकून अगदी भडभडून आलं. कौतुक वाटलं ते नेहा कक्करचं. त्यांना पाहून ती अगदी हमसून हमसून रडली.. त्यांच्या गळ्यात पडून रडली.. त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला.. त्यांना भावनिक धीर दिला.. मुख्य म्हणजे ५ लाखांची आर्थिक मदत केली!.. स्वाभिमानी संतोष आनंद यांनी ती त्याही परिस्थितीत नम्रपणे नाकारली.. 'मी अजूनही काम करतो.. इकडे तिकडे जातो..' हे सांगताना त्यांना आवाज भरून आला आणि ऐकताना आमचे डोळे! नेहाने त्यांना ती भेट तितक्याच स्नेहाने स्वीकारायला भाग पाडलं. 


नेहाबद्दल मी वर्षांपूर्वीच एफबीवर पोस्ट लिहिली होती जेव्हा तिने अशाच एका फुटपाथवर हार्मोनियमवर कला सादर करून गुमनामीत जगणाऱ्या बॉलिवूडच्याच एका अवलियाला १ लाखाची मदत जाहीर केली.. मला तिचं रडणं कधीच नाटकी वाटलं नाही.. यापूर्वीदेखील तिने कितीतरी गरीब स्पर्धकांना १ लाख -२ लाख अशी आर्थिक मदत केली आहे. तशी ती नावाजलेली असली तरी इतर अनेक सेलिब्रिटीजसारखी वर्षानुवर्षे प्रस्थापित नाही. १० वर्षांपूर्वी इंडियन आयडॉलमधूनच वर आली आहे .. गरिबी पाहिलेली आहे.. वयाने लहान आहे...पण दानत असायला सामाजिक जाण असावी लागते, ती तिच्यात ठासून भरली आहे. कुणाचीही समस्या ऐकली की तिचा हात लगेच पुढे येतो मदतीसाठी.. पैसा असला तरी दानत असतेच असं नाही! गायिका पलक मुच्छल नंतर मला मनापासून आदर वाटलेली ही दुसरी संवेदनशील गायिका! ईश्वर तिला खूप सुखी आयुष्य आणि भरभरून यश देवो!!.. 


कालचा इंडियन आयडॉल कार्यक्रम फारच सुंदर झाला.. हृदयस्पर्शी झाला...अगदी पुन्हा पहावा असा!.. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची अवीट गाणी..  तोडीचे स्पर्धक.. सर्वात महत्वाचं म्हणजे काळाआड गेलेल्या एका अशा असामान्य गीतकाराची ओळख ज्याबद्दल आपण कधी ऐकलं नाही आणि तशी शक्यताही नाही! .. तसेही आपण गाणी ऐकतो पण त्यामागील गीतकार संगीतकार यांच्याबद्दल फार कधी जाणूनही घेत नाही! संतोष आनंद यांना जगासमोर आणल्याबद्दल इंडियन आयडॉलचे खूप खूप आभार!.. त्यांचे 'किसी ने तो याद किया..' हे शब्द काळजाला घर करून गेले! घळघळा रडले मी आणि ते सर्वच रडले असतील ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला... 


आँखों में समंदर है, आशाओं का पानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है... 


असामान्य शब्दांचे धनी गीतकार संतोष आनंद यांना ईश्वर सुदृढ आयुष्य देवो ही मनःपूर्वक इच्छा!


आसावरी इंगळे 

(२२ फेब्रुवारी, २०२१)

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...