बदली

Saturday, 30 April 2022

निवृत्ती? छे! जगण्याची नवी आवृत्ती!!

 🌹ऋणनिर्देश...🌹


निवृत्ती? छे! जगण्याची नवी आवृत्ती!!


         आदरणीय श्री.बागुल सरांची निवृत्ती म्हणजे आनंद,दुःख,हुरहूर अशा अनोख्या संमिश्र भावनांचे मिश्रण.

           गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत अनेक आदर्शवत पिढ्या अन हजारो विद्यार्थ्यांना सुजाण, सुसंस्कृत, समृद्ध करणाऱ्या श्री.बागुल सरांचा आजचा निवृत्तीचा दिवस.कर्तृत्व,दातृत्व आणि नेतृत्वाने  नटलेल्या एका व्यक्तिमत्वाचा आज पुन्हा एकदा नव्या वाटेवर पाऊल टाकण्याचा दिवस...  कारण शिक्षकाचे आयुष्य हे जगात सर्वांपेक्षा जास्त असते.... जोपर्यंत त्याचा विद्यार्थी जीवंत तोपर्यंत शिक्षकही संस्काररूपाने  त्याच्यात असतो. प्राथमिक शिक्षक हा त्यामानाने भाग्यवानचं, कारण आईच्या उबदार कुशीतून  मूल अलगद शिक्षकाच्या आश्वासक हातात येते आणि असे धरलेले ते बोट त्या मुलाला निःसंकोचपणे जीवनप्रवासात मुक्त विहरू देते....सरांचे असे कित्येक विद्यार्थी आज मुक्त विहरत असतील , स्वतःच स्थान निर्माण करत असतील.

           संस्कारक्षम पिढ्या घडवणारे श्री.बागुल सर शिक्षकांना ही आदर्शवत ठरले. आधुनिक जगाला आपलेसे करत तंत्रज्ञानाला सहज आत्मसात करत फक्त विद्यार्थी, शाळाच नव्हे तर सहकारी शिक्षक आणि शिक्षण विभाग कार्यालयालाही तंत्रज्ञानातील स्वतःचे सर्व ज्ञान पणाला लावून तळमळीने आणि समर्पित भावनेने मदत केली. कोणत्याही गोष्टीचे शंका निरसन ते आपल्या एका क्लिक ने करून देत असत. कधीही कोणत्याही कामाला त्यांनी कधी नकार दर्शवला नाही, किंबहुना नकार हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता... इतके ते आयुष्याप्रती सकारात्मक आहेत.शालार्थ असो,आयकर असो, शाळेची-विद्यार्थ्यांची कामे, पंचायत समितीची कामे असो वा वैयक्तिक कामे  ...श्री.बागुल सर त्याच तळमळीने  प्रत्येकाचे काम करत.

     प्रत्येक कामातील कार्यकुशलता आणि  कार्यतत्परता  केवळ वाखाणण्याजोगी...लहान असो मोठा असो ,ज्युनियर की सिनियर सरांनी सर्वांना कायम आदरभावानेच वागवले.कामप्रति निष्ठा असणे ही नैतिकता झाली परंतु ते काम कळकळीने निभावणं ही फार दुर्लभ गोष्ट आहे आजच्या जगात... आणि म्हणून साऱ्या गर्दीतही श्री.बागुल सरांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते ते त्यांच्या स्वभाव गुणवैशिष्ट्यांसह.

        त्यामुळे फक्त आदर्श शिक्षक, मार्गदर्शक सहकारीच नव्हे तर विश्वसनीय कर्मचारी म्हणूनही सरांचा नावलौकिक आहे.

             ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही म्हणतात,मन आनंदी असले की त्याची झळाळी चेहऱ्यावर दिसते, म्हणूनच सर अजूनही पुढील 10 वर्षेही याच खळाळत्या ऊर्जेने कार्यरत राहू शकतील असे वाटते.

            अनेकदा सरकारी कर्मचारी हा इतका त्रासलेला असतो की निवृत्ती आधीच 10 वर्षे तो निवृत्त झाल्यासारखा त्रासिक चेहऱ्याने वावरत असतो, त्यामुळे स्टाफ ला वाटते हा घरी बरा आणि घरच्यांना वाटते हा ऑफिसमध्येच ठीक. परंतु सरांच्या जिंदादिल स्वभावामुळे घरचेही सरांच्या निवृत्तीची नक्कीच वाट पाहत असतील आणि आपण सर्वच त्यांचे मार्गदर्शन यापुढेही लाभत राहील यासाठी प्रयत्न करणारच आहोत. आतापर्यंत नोकरीच्या व्यस्ततेमुळे जे छंद, जगणे राहून गेले असतील तेही यापुढे मिळणाऱ्या वेळात भरभरून जगता येईल, मुलांना, सहधर्मचारिणीला वेळ देता येईल, राहिलेल्या सर्व स्वप्नांना गवसणी घालता येईल, म्हणूनच तर निवृत्ती नसून जगण्याची नवी आवृत्ती आहे .

           प्रत्येकजण जगत असतोच, पण *जीविका* आणि *उपजीविका* यातला फरक फार कमी जणांना कळतो.... तो सरांना कळलाय म्हणूनच उपजीविका म्हणून नोकरी करण्याबरोबरच जीविका म्हणून कला,छंद, आवड,ध्यास,नाविन्याची आस आणि तंत्रज्ञानाची कास त्यांनी कधीच सोडली नाही. त्यामुळे नित्य नवं शिकण्याची इच्छा त्यांना यापुढेही कधीच नोकरीची पोकळी जाणवू देणार नाही याची खात्री वाटते.

          सदैव नम्र आणि स्नेहभाव जपणाऱ्या श्री.बागुल सरांना भावी आयुष्यासाठी केवळ शुभेच्छाच नाही तर त्यांच्या कार्याप्रती  ऋणनिर्देश... 🙏🏻


                    संजय गरबड मराठे

                       9421973888

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...