▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव केवळ एका व्यक्तीचे नसून ते एका युगांतराचे प्रतीक आहे. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या अफाट कार्याचा पट डोळ्यासमोर उभा राहतो, तेव्हा जाणवते की, ज्या काळात अज्ञान आणि विषमतेचा अंधकार समाजाला पोखरत होता, त्या काळात भाऊरावांनी ज्ञानाची मशाल पेटवून एक नवा इतिहास रचला. त्यांनी सातारा जिल्ह्याच्या काळेवाडीत १९१९ मध्ये 'रयत शिक्षण संस्थेचा' जो छोटासा वेल लावला, त्याचे आज एका महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कर्मवीरांच्या कार्याचा गाभा हा केवळ शाळा काढणे हा नसून, समाजातील शेवटच्या स्तरातील माणसाला आत्मसन्मानाने उभे करणे हा होता. त्यांनी हे ओळखले होते की, जोपर्यंत बहुजन समाजाचा मुलगा शिकून शहाणा होत नाही, तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. म्हणूनच त्यांनी राजवाड्यांच्या सावलीतून शिक्षणाची गंगा बाहेर काढून ती डोंगरदऱ्यातील झोपड्यांपर्यंत नेली. त्यांच्या या ध्येयवेड्या प्रवासामुळेच आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत.
भाऊरावांच्या शैक्षणिक क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा आणि जिवंत पैलू म्हणजे 'कमवा आणि शिका' ही योजना. ही केवळ एक आर्थिक मदतीची तरतूद नव्हती, तर ती विद्यार्थ्याला स्वावलंबनाचे बाळकडू देणारी एक जीवनपद्धती होती. हाताला काम आणि बुद्धीला ज्ञान देणारे हे सूत्र आजही जगभरातील शिक्षणतज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय आहे. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणे हे किती कठीण काम आहे, हे त्या काळातील परिस्थितीवरून लक्षात येते. मात्र, कर्मवीरांनी स्वतः हातात कुदळ-फावडे घेऊन विद्यार्थ्यांसोबत काम केले आणि 'कष्टातूनच प्रगती होते' हा मंत्र रुजवला. यामुळे तयार झालेला विद्यार्थी हा केवळ पदवीधर नव्हता, तर तो संकटांशी दोन हात करणारा एक कणखर नागरिक होता. आजच्या बाजारीकरण झालेल्या शिक्षण व्यवस्थेत, जिथे शिक्षणाकडे केवळ 'गुंतवणूक' म्हणून पाहिले जाते, तिथे कर्मवीरांचा हा स्वावलंबनाचा विचार अधिकच प्रेरक ठरतो. त्यांनी शिक्षणाचे लोकशाहीकरण केले आणि ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले.
केवळ शिक्षणच नव्हे, तर सामाजिक समतेच्या क्षेत्रातही कर्मवीरांचे योगदान क्रांतीकारी राहिले आहे. महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे ते खऱ्या अर्थाने पाईक होते. त्यांनी स्थापन केलेली वसतिगृहे ही जातीभेद गाडणारी महत्त्वाची केंद्र होती. ज्या काळात अस्पृश्यता उच्च टोकाला होती, त्या काळात सर्व जाती-धर्माच्या मुलांनी एकाच छताखाली राहणे, एकाच पंगतीत जेवणे आणि एकाच मातीत राबणे ही फार मोठी सामाजिक हिंमत होती. कर्मवीरांनी जातीपातींच्या भिंती पुस्तकी ज्ञानाने नव्हे, तर सहजीवनाच्या प्रयोगातून पाडल्या. संस्थेच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःचे घरदार विसरून काम केले. पत्नी लक्ष्मीबाईंनी आपल्या अंगावरील दागिने, अगदी सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्रही विद्यार्थ्यांच्या अन्नासाठी आनंदाने दिले, हा त्याग शब्दातीत आहे. अशा त्यागातूनच 'रयत' उभी राहिली आणि लाखो गरिबांची मुले डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी होऊ शकली.
आज कर्मवीरांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करताना त्यांच्या विचारांची प्रासंगिकता पुन्हा एकदा अधोरेखित होते. केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे, तर चारित्र्यनिर्मिती आणि सामाजिक बांधिलकी म्हणजे शिक्षण, ही त्यांची धारणा होती. आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत असलो तरी, श्रमाची आवड आणि माणुसकीचे मूल्य जपणे हीच काळाची गरज आहे. रयतेच्या या लाडक्या 'विठ्ठला'ने उभ्या केलेल्या या ज्ञानयज्ञातून अनेक पिढ्या घडल्या आणि आजही घडत आहेत. त्यांचे कार्य हे केवळ एका संस्थेपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहे. त्यांनी लावलेला हा वटवृक्ष असाच बहरत राहो आणि त्यांच्या विचारांची सावली महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रवासाला सदैव मार्गदर्शन करत राहो, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या निस्वार्थी सेवाभावातून प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक वंचिताला ज्ञानाच्या प्रवाहात सामील करणे, हेच आपले आजचे मुख्य ध्येय असायला हवे.
▪️संजय गरबड मराठे
9421973888
No comments:
Post a Comment