शाळा

Showing posts with label थोडसं. Show all posts
Showing posts with label थोडसं. Show all posts

Wednesday, 4 November 2020

थोडसं

 थोडंसं.....

शोध माणसाचा...

             प्रत्येकाचा स्थायीभाव हा वेगवेगळा असतो...उद्भवलेल्या परिस्थितीला प्रत्येक व्यक्ती    आपापल्या परीने सामोरा जात असतो...कधी त्याच्या पदरी अत्यानंदाचे क्षण पडतात तर कधी दुःखाची मालिका सुरू होते...आणि अशा बऱ्या वाईट अनुभवातून तो आपला जीवन मार्ग आक्रमित असतो...

             आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला मोठं व्हायचं आहे.जगाच्या रंगमंचावर अनेक चांगले -वाईट मुखवटे परिधान करून आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत हे दाखवण्याची सर्कस चालू आहे.जे चांगलं ते चांगलं अन जे वाईट ते वाईट अस कोणी स्पष्ट सांगत नसल्यामुळे सर्वांचा मार्ग खोल अज्ञानात  कुठंतरी जातांना दिसतोय.

               खरं तर प्रयत्नाने माणूस 'माणूस' बनत असतो.दुसऱ्याच निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण करायला आपण आता शिकलं पाहिजे.आपल्याला आपल्या मनातील  द्वंद्व आपल्या मनातील अंतर्विरोध समजला पाहिजे.अंतर्मनातील द्वंद्व अंतर्मनातील विरोध जेवढं आपण समजून घेऊ तेवढं 'समाज' समजायला सोपं जाईल. द्वंद्व आणि अंतर्विरोध आपल्या आयुष्याचं नवीन नाव आहे.

          जीवन मार्ग फुलत अन फुलवत असतांना आपण एकटं काहीही करू शकत नाही.आपलं कुटुंब ,आपले मित्र,सहकारी,शिक्षक,ज्यांनी आपल्या  सुखदुःखात आपल्याला संगत केली असे सहृदयी,दूर कुठंतरी शिक्षण नोकरी साठी गेले असता तेथील हॉस्टेल,रूम पार्टनर...असे किती तरी लोकं आपले जीवन फुलवण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत.आपण हे कधीच विसरता कामा नये.

               खरं तर माणसानं अंतर्मुख असलं पाहिजे. निश्चलता आणि सादगी ही अंतर्मनात असली पाहिजे.आतून - बाहेरून आहे तसेच असले पाहिजे.कोणताही बडेजाव आतपर्यंत पोहचता कामा नये.अंतर्मुख माणूस कसा असावा तर आपल्या बाबत स्टेजवर जरी वाह- वाह चालत असेल तरी एका कोपऱ्यात बसून ते ऐकावं पण मंचावर  जाऊन उगाच छाती फुलून हार तुरे घेणारा नसावा अस मला प्रामाणिकपणे वाटतं.

            आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि आपला गोतावळा  याचं भान आपण ठेवलं पाहिजे.आजची पिढी आणि त्यांची व्यक्त होण्याची पद्धत हे आपण डोळसपणे समजून घेऊन आपली पारंपारिक जिद्द सोडून थोडं मोकळं व्हायला आपण शिकलो पाहिजे.

एकांतात एकट राहता आलं पाहिजे.आणि रडताही आलं पाहिजे.

आयुष्याच्या कोणत्याची वळणारवर प्रयत्न न सोडता आपल्यातील चांगल्या माणसाचा शोध घेतला पाहिजे....


                                                        संजय ग मराठे

                                                       9421973888

Wednesday, 30 September 2020

थोडसं

 

थोडसं

प्रिय दादा,

तुझं लिखाण हे हृदयाला अगदी पिळवटून टाकतं.त्यात जीव ओतून प्राण कंठात आणून भावनांची मांडणी असते..खूप खोलवरचं आहे हे सर्व...येऊ दे ते.कदाचित तुझ्या एवढा मी ही वास्तववादी मांडणी नाही करू शकत...कारण मी ही नागरिकरणाला काहीसा भुललो आहेचं...
आयुष्यरुपी जिन्याच्या काही पायऱ्या चढताना कित्येकदा ठेचाळलो खरा....पण ते वास्तव लिहितांना त्याची मांडणी करतांना नाही धीर होत कधीचं ,याला तू माझं दुबळेपण म्हण हवं तर नाहीतर न्यूनगंड असावा माझा तो. "नातं" बाबत म्हणशील तर मला ही काही अनुभव आलेत....पण तुझ्या एवढं मी खरंच नाही लिहू शकत....
जन्म आणि मृत्यू यांच्यातील काळ म्हणजे जीवन असं आपण ढोबळ मानाने मानतो.पण त्या दोन शब्दांमधील अंतर पार करतांना कित्येकदा आपण गलितगात्र झालो...त्याला काय म्हणायचं नेमकं...मग आपण खरंच जगलो का ? असा प्रश्न निर्माण होतो...याचं उत्तर ही निर्दालयचं.
खरं तर माणुसकीचा दिपस्तंभच दुर्गातीच्या वाटेवर सोडलायं आपण... मनोविकार वाढताहेत जुलमी अजगरासारखे.हा कृतघ्न विस्तव आता आपलीचं राख करायला निघालायं...आणि आपण ही आता कोणताही प्रतिकार न करता त्याला बळी पडत जातोय...आपल्या शिदोरीतले अनुभव तरी आपले होते का? की तेही आभास होते...? खूप वेळा स्वप्नात दचकून उठतो आताशा.खूप सारं सुटलं....आहे तेही निसटत चाललं आहे...खोल खोल डोहाच्या गोल गोल भोवऱ्यात आत मध्ये ओढला जातोय...नाकातोंडात पाणी गेलंय... श्वास गुदमरून मी आयुष्याला पूर्णविराम दिलाय...असे भास होतायतं ...जगणं खरच एवढं अवघड होऊन बसले का रे?
असं सर्व सध्या उठल्या बसल्या होत असतं...प्राण एकवटून हे सर्व लिहायला बसतो तर भावना शब्दात उतरत नाही.सध्या त्या ही मेल्यात असं आपलेच माझ्या बाबतीत म्हणतात...मग खूप गोंधळ उडतो.त्यात मी नास्तिक मग काय...अजून श्वास गुदमरतो.... आपल्या अवती -भवती सारेच अस्तिकतेचा बाजार मांडणारे. त्यांचे व्रत,पुज्या,उपवास....मग काय आपण त्यांच्या लेखी नतद्रष्ट. खरं तर खूप घुसमट होत आहे....एकदाच पूर्ण विराम दयावा आयुष्याला असं कित्येकदा वाटतं... आणि परत कर्तव्याची आठवण येऊन काही काळ वाट पहावा ...कर्तव्य कर्तव्य म्हणजे तरी काय म्हणा आपल्याचं मनाचे खेळ .आपला एखादा माणूस शरीराने दूर झाला तर चालेल पण मनाने,विचाराने दूर झाला तर फार वाईट.त्यात एखाद्याच्या मनात एखादी वाईट गोष्ट घुसली की ती बाहेर निघण म्हणजे खूप मुश्किल...आणि तो काळ खूप अस्वस्थ करणारा असतो....कदाचित पूर्ण विरामाजवळ पोहचवणारा.वपु म्हणायचे "आपल्या विचारांची -भावनांची तीव्रता आपल्यालाच.ते मग पुष्कळदा खरे असोत,भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे असोत. काही काळ ते विचार,त्या भावना तुमच्यावर हुकमत गाजवून जातात हेच खरं! म्हणूनच त्यातली उत्कटता ज्याची त्यालाच जाणवते,इतरांना नाही.माणूस तशा अर्थाने एकटाच..".आताशा ठरवलंय दुःखाशी गट्टी करून काही काळ मुक्काम वाढवून घ्यायचा आहे....स्वाभाविक-अस्वाभाविक,प्रयोजक-अप्रयोजक,निद्य-स्तुत्य हे सारे भेदभाव आता हृदयाच्या कप्प्यात ठेवून मुक्काम घेतोच काही काळ वाढवून...मग मोजत राहू आयुष्यनामक चढलेल्या जिन्याच्या एक एक पायऱ्या.... आणि कंठलेले सुख दुःखाचे क्षण....आणि समक्ष भेटू कुठल्याशा वळणावर....त्याचं वेल्हाळ स्वप्नाना घेऊन जे फक्त तुझे नि माझे होते....

तुझा
भाकऱ्या

Tuesday, 29 September 2020

आठवणी - माध्यमिक विद्यालय वेल्हाणे


थोडसं...

आठवणी - माध्यमिक विद्यालय वेल्हाणे


आजची पोष्ट ही नुसती पोष्ट नाही तर ती आहे आमच्या हृदयात त्रिकाल साठवलेली आठवणींची माळ.आमच्या आयुष्यातील एक असं वळण की तेथून मागे पाहिलं तर असंख्य वेल्हाळवाटा... आणि पुढे पाहिलं तर आयुष्यातील मोहक जीवन सौंदर्य.
तेव्हाचं वेल्हाणे आजाच्या एवढं पुढारलेलं आणि एवढं सर्व गोष्टींची परिपूर्ण नव्हतं. मुळात गावात हायस्कुल काढायची तर त्या साठी वर्गांसाठी जागा,शिकवण्यासाठी शिक्षक आणि हा सर्व डोलारा चालवण्यासाठी आर्थिक बाजू ह्या आणि अश्या खूप गोष्टी महत्वाच्या असाव्या लागतात... गावात दरवर्षी हायस्कुल काढायची जोरात चर्चा व्हायची आणि त्याच जोरात ती चर्चा निवळूनही जायायची.
....खूप प्रयत्नाने 8 वीचा वर्ग सुरू करायचे ठरले.मग मराठी शाळेतील 7 वी पास झालेल्या विद्यार्थ्याना आपल्याच गावातील 8 वी च्या वर्गात ऍडमिशन घ्यायचं असं ठरलं.त्या वेळी आपली हायस्कुल ही बोरविहिरची एक तुकडी वर्ग म्हणून मंजुरी मिळाली. शिक्षक वर्ग कोण असावेत शोधाशोध सुरू झाली...आदरणीय श्री.ईश्वर पवार सर,आदरणीय श्री.सुभाष बोरसे सर,आदरणीय श्री.शिवाजी माळी सर यांची तात्पुरती नियुक्ती झाली.
सर्वात मोठा प्रश्न पुढे होता "विद्यार्थी"... आणि मुलं यायला तयार नव्हते...सर्व बाबी नवीन आणि किती दिवस चालेल याची शाश्वती कमी ...मग जे विद्यार्थी बोरविहिर येथे जाऊ लागले त्यांना सांगण्यात आले की आम्ही तुम्हाला इथं ऍडमिशन देणार नाही... आम्ही तुमच्या गावात 8 वी चा वर्ग सुरू केला आहे तेथेच शिका...या मुळे काही विद्यार्थी शिरूड येथे जाऊ लागले...यात माझी ही वेगळी अशी स्थिती नव्हती....पण नाविलाज म्हणून मी 4-5 दिवस आठवी चा विद्यार्थी म्हणून एकटा बसलो, समोर श्री. सुभाष बोरसे ,श्री.ईश्वर पवार,श्री.शिवाजी माळी असायचे शिक्षक म्हणून.सर्व पालक वर्गाला विश्वासात घेऊन वरील आदरणीय व्यक्तींनी थोरामोठयांच्या आशीर्वादाने विद्यार्थी वळवले....आणि आठवीच्या वर्गाचा श्रीगणेशा झाला....
तद्नंतर काही बेंच बोरविहिर येथून मागविण्यात आले...तो पर्यंत आपली भारतीय बैठक होतीच की जी आम्ही मराठी शाळेत सात वर्षे सर्हाईत पणे बसत होतो.....मूळ प्रश्नांची सुरुवात पुढे सुरू झाली....काही महिनेच लोटले गेले तर आर्थिक बाब उभी राहिली...स्टेशनरी ,खडू, शिक्षकांचे मानधन या बाबी पुढे येऊ लागल्या....खूप चर्चेअंती प्रत्येक विद्यार्थ्यानी 20 रु महिना द्यावा असे ठरविण्यात आले...गाडी थोडी रुळावर येत होती... अडचणींवर मात करत दिवस जात होते, अध्यापनाचे शास्त्र वरील मान्यवर प्रत्यक्ष अमलात आणत होते विद्यार्थी ही अध्यापनात रस घेत होते.
....आणि आदरणीय श्री सुभाष बोरसे यांची धुळे जि. प. येथून प्रा शिक्षक या पदासाठी नेमणूक झाली...श्री पवार सर आणि श्री माळी सर यांनी जिवाच्या प्रयत्नाने वर्ष लोटले..आदरणीय श्री शिवाजी माळी सरांना नाशिक येथे शिक्षक म्हणून स्थिर नोकरी मिळाली...मग परत बिनपगारी शिक्षकांची शोधाशोध....(आमच्या वेळी असलेले सर्व आदरणीय शिक्षक छोटे वेल्हाने येथील श्री राजेंद्र पाटील सर,सिम खडकी येथील श्री खैरनार सर,बोरकुंड येथील श्री जगन माळी सर), असे कितीतरी शिक्षक वर्ग काही दिवसासाठी-महीन्यासाठी आले आणि त्यांना हक्काची नोकरी मिळाली तिकडे गेले...
आठविचा वर्ग पास तर झालो आम्ही... पण 9 वि साठी खूप अडचणी... कारण आता 2 वर्ग... शिक्षक जास्त लागणार....म्हणून कधी बोरविहिर येथून आदरणीय श्री.के. पी. बोरसे, श्री. वाय.डी. सर,श्री. सूर्यवंशी सर ,श्री.ए. पी. खैरनार,श्री.डी. पी. खैरनार,श्री.सी.एफ.वाघ आणि इतर शिक्षक वर्ग आठवड्याच्या पाळीपाळीने अध्यापनासाठी येत गेले...
आणि आम्ही 10 वि ला गेलो...वरील सर्व गोष्टी आलटून पालटून चालू होत्याच...आता गावात 3 वर्ग चालू झाले तिसरा वर्ग कुठे बसवावा हा प्रश्न होता...कारण दोन वर्ग धर्मशाळेत बसत होते...मग नवीनच ग्रामपंचायत ऑफिस बांधलेलं होत तिथं एक वर्ग सुरू केला...आमचा मात्र वर्ग बदलला नाही..8 वी,9वी आणि 10वी आम्ही एकाच वर्गात काढली..आदरणीय श्री ईश्वर पवार यांनी मात्र बिगर पगाराची नोकरी धरून ठेवली होती....नुसती धरून नव्हे तर मुलांच्या मनामध्ये देखील ते घट्ट बसले होते... आता इयता 10 वि साठी झटून विध्यार्थी आणि श्री.ईश्वर पवार अभ्यासाला लागले होते...रात्रीचा क्लास सुरू झाला....योग्य मार्गदर्शन वेळ प्रसंगी साम,दाम,दंड देऊन अभ्यास घेतला जाऊ लागला....(नाईट क्लास च्या खूप आठवणी आहेत ते इथं नको)पवार सर रात्री 11: 30 ला बेशरमची काठी(जरीनागीन) घेऊन यायचे ..झोपलेल्या विध्यार्थ्याना प्रसाद मिळायचा..सकाळी परत 4 :30ते 5 वाजता उठवायचे -सर्वांना धावायला घेऊन जायचे -त्या नंतर अभ्यास 6:30 पर्यंत मग घरी असा दिनक्रम ठरलेला....
सर्व विद्यार्थ्यानी खूप कष्ट घेऊन 100% रिझल्ट लागला.त्या वेळी प्रोत्साहन म्हणून प्रथम क्रमांक येणाऱ्या मुलांना बक्षीस मिळत असे.सत्कार होत असे...आणि तो क्षण माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता.... खूप भरून पावलो होतो...आज ही ते हायस्कुलचे दिवस एखादया चित्रपटाप्रमाणे पुढे पुढे सरकतात....
(अनावधानाने एखादे नाव राहील असेल शिक्षकांचा क्रम खाली वर असू शकतो...क्षमस्व)

संजय गरबड मराठे
9421973888

शाळेचा पहिला दिवस...

 थोडंसं....

शाळेचा पहिला दिवस...

आपल्या जि. प. शाळेत शिकत असतांना शाळेच्या ओटीवर शिरूड येथील पुस्तक विक्रेता दत्तू सोनार नवीन करकरीत पुस्तक घेऊन येत असे.पुस्तकांचा तो गंध सर्वत्र ओटीभर पसरत असे.सर्वच पुस्तके आम्हाला नवीन कधीच मिळाली नाही..मागील वर्षाचे विध्यार्थीची पुस्तके मिळाले तरी खूप भरून पावायचो आम्ही मुलं. त्यात दत्तू मामा कडून एखादी नवीन पुस्तकाची,वहीची,पट्टीची खरेची व्हायची ...आणि आनंदाला उधाण यायचं..."तू काय लिन्ह "अशी विचारणा व्हायची , मग काय वस्तू दाखवण्याचा कार्यक्रम....दत्तू मामा यायचा त्या दिवशी आम्हाला अभ्यास नसायचा कारण पूर्ण ओटीभर पालकांची,मुलांची वर्दळ असायची...दत्तू मामा उधारीवरही वस्तू देत असे.…पालक सांगायचे "दत्तूभू पुढला येळले उना का दिसू पैसा" दत्तू मामा त्याच्या कडे पाहून डोळे मोठे करून मान हेलकावून बोलायचे "मांगला भी राहेल शेत " तेव्हा "देसु भो गाव सोडी पई नही चालनुत" हा संवाद हमखास व्हायचा.......

जि. प. शाळेत असतांना शाळा दोन सत्रात भरत असे.सकाळ सत्र 7 ते11 वा असायचे. 11 ते 2 पर्यंत विश्रांती असायची, 2 ते 5 परत दुसरे सत्र सुरू व्हायचे.11 ते 2 विश्रांती सत्रामध्ये आदरणीय गुरू श्री.देविदास एकनाथ वाघ हे आम्हा मुलांना अभ्यासासाठी बोलवायचे.आम्हाला अभ्यास देऊन ते विश्रांती घ्यायचे.आमचा अभ्यास झाला की आम्ही मागील मोठ्या खिडकीतुन "खळ्यात" किव्हा "मळ्यात" पसार व्हायचो.येतांना सिझन नुसार खिशात वस्तू असायच्या. चिंच,बोरे,शेंगा या वस्तू देऊन पेन्सिल घेण्याचा हा व्यापार चाले.(पेन पर चीच,पेन पर बोरे असं असायचं)
केवलसिंग,पुंडलिक,अनिल,नारायण,अर्जुन,(भोपाजी),अर्जुन कोळी,दिनेश,एकनाथ,ज्ञानेश्वर,विजयसिंग,चतुर इ बालपणीचे मित्र आज ही त्याच बालपणीच्या नावाने (एकांतात)एकमेकांना आवाज देतो...खूप वेगळे दिवस होते..
असंख्य बालपणीच्या आठवणी आहेत...आदरणीय गुरुवर्य श्री.विश्राम गुरुजी,श्री.सूर्यवंशी, श्री.देविदास वाघ ,श्री शरद पाटील,श्री.लिंगायत,श्री.व सौ.बडगुजर,श्री.व सौ.पोतदार,श्री.वाघ,श्री.पितांबर बोरसे इत्यादी गुरुवर्यानी आम्हा मुलांवर 1ली ते 7 वी पर्यंत शैक्षणिक संस्कार केले. आज ही सर्व चित्र एकद्या चित्रपटाप्रमाणे पुढे पुढे सरकत जातंय...

                                                     सजय गरबड मराठे
                                                       9421973888

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...