बदली

Friday, 8 April 2022

भारतीय संगीत संस्कृतीचं दर्शन -"मी वसंतराव"

 भारतीय संगीत संस्कृतीचं दर्शन -"मी वसंतराव"


           संगीत हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतात एकाहून एक सरस गायक होऊन गेले. त्यातच महाराष्ट्राने अभिमानाने आपल्या शिरपेचात खोचावंआणि दिमाखात मिरवावं, अशी गायकी असणारं नाव म्हणजे पं. वसंतराव देशपांडे. ज्यांच्या गायकीने रसिकांना काही वेगळं ऐकण्याची दृष्टी दिली, त्या वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर ‘मी वसंतराव’ हा सिनेमा खूप काही आपणास देऊन जातो.

             "भाई व्यक्ती की वल्ली" पाहिला त्या दिवसापासून वसंतराव देशपांडे यांच्या विषयी अधिक काहीतरी भव्यदिव्य रंगभूमीवर यावं असं नेहमी वाटायचं.वसंतराव देशपांडे म्हणजे बगळ्यांची माळ फुले,दाटून कंठ येतो,एवढं आपल्याला माहीत आहे.प वसंतराव देशपांडे त्यांचा जीवन संघर्षाचा प्रवासच नव्हे, तर समाजाच्या कटू मानसिकतेवरही "मी वसंतराव" हा चित्रपट एक कटाक्ष टाकतो.वयाच्या चाळीशीतही  अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना सगळ्या गोष्टींसाठी लढाई करावी लागते हे खूप काही सांगून जाते.तत्कालीन संगीत घराणेशाही आणि पारंपारिक गायन यांना छेद देऊन स्वरांना मुक्तपणे गळ्यात साठवत, कोणत्याही चौकटीत न बसता आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहणारे हे वेगळं व्यक्तिमत्व तत्कालीन स्वयंघोषित अमात्यांना कसे बरे पचणार?



        वसंतरावांची संघर्ष गाथा पाहतांना बऱ्याच वेळा डोळे पाणावतात.प्रसिद्धी मिळेपर्यतच्या त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार चित्रपटात दाखवले आहेत. एकट्या आईने त्यांचे संगोपन करणे,आर्थिक दारिद्र्याला सामोरं जाणे,कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरी सांभाळणे या दोन्ही पातळ्यांवर कसरत करणे,नागपूर,पुणे,लाहोर असा प्रदीर्घ प्रवास किती गोष्टी सांगता येतील...

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या तोंडी  असलेलं एक वाक्य "या जगातील सर्वात मोठं दुःख म्हणजे,आपल्याला गायचं असणं. पण,समोरच्याला ते ऐकायचं नसणं. हे वाक्य समाजातील वैचारिक दारिद्र्य आणि खूप काही सांगून जातं.आपल्या गायनाला लोकमान्यता मिळण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली वसंतरावांना....आणि त्या प्रतीक्षा प्रवासात कुटुंब,मित्र परिवार यांनाही खूप काही परिश्रम घ्यावे लागले आणि सोसावेही लागले.

         जेव्हा आई म्हणते "तुझ्यासमोर एक कबुली द्यायचीय.तुझ्यावर मी सतत कुटुंबाचा विचार करायचे संस्कार केले.पण आता गाण्यावर अन्याय होऊ देऊ नकोस." हा संवाद खऱ्या अर्थानं हृदयाला आंतरबाह्य ढवळून काढतो.असे अनेक संवाद आहे की जे चित्रपट पाहतांना आपणास अंतर्मुख करतात.

           चित्रपटात शंकरराव सप्रे,मास्तर दीनानाथ मंगेशकर,पु. ल.देशपांडे,उस्ताद खान,बेगम अख्तर,वसंतरावांचे मामा,आई,वडील,पत्नी यांची पात्रे ही तेवढ्याच ताकदीची झाली आहेत.चित्रपटाची बांधणी उत्तम झाली आहे.योग्य त्या वेळी धक्के ही दिले आहेत आणि असंख्य नाट्यमय घटनांनी चित्रपट पुढे पुढे सरकता ठेवला आहे. तब्बल 20-22 गाणी आणि एकसे बढकर एक संवाद ऐकताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही.

          तुमचं घराणं कोणतं? या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं.वसंतराव देशपांडे यांनी स्वताःला त्यांच्या गायकीतून सिद्ध केलं.वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसानसात भिनलेली होती.सर्व गोष्टींनी परिपूर्ण अशी ही कलाकृती आपणास नावीन्य देऊन जाते...आणि तत्कालीन समाजाचं वैचारिक दारिद्रय़ाचे प्रतिबिंब दाखवून जाते.

         उपेंद्र सिद्धये आणि निपुण धर्माधिकारी या दोघांनीही खरी माणसं  पडद्यावर उभी केली आहेत... राहुल देशपांडे यांचा अभिनय अप्रतिम तर आहेच पण जोडीला अमेय वाघ,कौमुदी वालोळकर,पुष्कराज चिरपुटकर आणि अनिता दाते यांनी भूमिका अक्षरशा जिवंत केल्या आहेत.

           आपल्या आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली अनेक वर्षे राहुल देशपांडे वसंतोत्सव हा सांगीतिक महोत्सव आयोजित करत आहेत. आपल्या आजोबांच्या गायन साधनेचा प्रवास कायमस्वरूपी चित्रबद्ध व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यातूनच हा चित्रपट साकार झाला आहे."मी वसंतराव" म्हणजे एका नातवाने आजोबांना वाहिलेली आदरांजली आहे.महाराष्ट्रात अशी आदरांजली खूप कमी आजोबांना 

मिळाली असेल..."मी वसंतराव" हा केवळ चित्रपट नसून आपल्या भारतीय संगीत संस्कृतीचं दर्शन आहे असं म्हणायला काही एक हरकत नाही.

                             संजय ग. मराठे

                              उल्हासनगर-4

                             9421973888

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...