शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर
तंत्रज्ञान आधुनिक काळाचा मंत्रच जणू. कोणतीही गोष्ट तंत्रज्ञानाशिवाय अशक्य वाटावी इतकी अत्यावश्यक गोष्ट आहे आज तंत्रज्ञान.आपल्या दैनंदिन जगण्यात तंत्रज्ञान आहे.आपल्या दिवसाची सुरुवातच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होते. आपले जीवन खूप सहज सोपे तर झालेच आहे परंतु संपूर्ण जगच विकासाच्या क्रांतिकारी बदलाने व्यापले आहे.
कोरोना काळात तर सर्वांनाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटले आहे. प्रत्यक्ष संपर्कात न येऊनही अनेक कामं आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने करायला शिकलो आणि आतापर्यंत ज्या विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे दुरून कौतुक करत होतो ते प्रत्यक्षात सर्वांनी वापरायला सुरुवात केली. तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऑनलाइन शाळा सुरू झाल्या, पाठांचे पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन, अँनिमेशन्स , व्हिडीओज,वर्कशिटस, तस्संम सॉफ्टवेअरचा वापर शिक्षण पद्धतीत करायला सुरुवात केली.
आपल्या शिक्षणाचा प्रवास गुरुकुल ते ऑनलाइन असा झाला. गरज ही शोधाची जननी म्हटली जाते आणि त्याचाच प्रत्यय या सर्व काळात आला. एक वाट बंद झाली की दुसऱ्या मार्गाचा विचार करण्याची माणसाची सवय, त्यालाच अनुसरून ऑनलाइन शिक्षणाचा विचार होऊ लागला. आणि मग मोबाईल,संगणक,लॅपटॉप,टॅबलेट, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही अशा उपलब्ध प्रत्येक गोष्टीचा वापर करून दर्जेदार शिक्षण देण्यास सुरुवात झाली. अनेक शिक्षकांचा खडूशी असलेला संबंध कमी झाला, अनेक शिक्षक तंत्रज्ञानाचा वावर करून जास्त विद्यार्थी केंद्रित अध्ययन व्हावे म्हणून आज प्रयत्न करत आहेत. यामध्ये टच स्क्रीन, स्मार्टबोर्ड, ऑनलाइन इंटरऍक्टिव्ह , क्विझ सारख्या गोष्टींचा फार उपयोग होत आहे. इंटरनेटच्या प्रभावी वापरामुळे वेळ नक्कीच वाचतो आहे. इंटरनेट वरील वाचन वाढत चालले आहे, विशेषतः संदर्भ शोधण्यासाठी ग्रंथालयात जाण्याची सवय जवळपास मोडीत निघाली आहे. पाश्चात्य तसेच भारतीय वृत्तपत्र , वेबसाईटवरील लेख, शैक्षणिक ब्लॉग,युट्युब यांचा वापर वाढताना दिसतोय.
आज तंत्रज्ञानाने मानवी जीवनातील सर्व क्षेत्रे व्यापून टाकली असताना कुणीही त्यापासून दूर राहू शकत नाही. भारतीय शिक्षण व्यवस्था ही खूप प्राचीन आहे, त्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. असे असले तरीही आज अध्यापनात योग्य व विचारपूर्वक तंत्रज्ञान वापरल्याने अध्ययन अध्यापन आनंददायी होऊ शकते. परिणामकारक अध्यापणाने विचारांची क्षेत्रे रुंदावण्यास मदत होते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत शिक्षक व विद्यार्थी शिक्षण देत- घेत आहेत. दर्जेदार व प्रभावी अध्यापनात पूरक साहित्य म्हणून नव्या तंत्रज्ञानाची मदत होतेय, स्व-निर्मित शै.व्हिडीओ,ब्लॉगवरील शै. साहित्य , विविध शैक्षणिक अँप , सामाजिक माध्यमांद्वारे आज उपलब्ध होत आहे. दूरस्थ शिक्षण तर सहज शक्य झालेय,जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट मुळे शिक्षण पोहचत आहे, विद्यार्थी स्वप्रेरणेने तंत्रज्ञान वापरून आज स्वयंध्ययन करत आहेत.यापुढे जाऊन विद्यार्थी स्वतःच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख ब्लॉग, युट्युब आणि इतरही अन्य सामाजिक माध्यमातून सादर करत आहेत.बऱ्याच गोष्टी आज विद्यार्थी स्वतः शिकत आहेत, त्याप्रमाणे नवनवीन माहितीची भर पडत आहे. गरज ओळखून स्वतः तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर होत आहे, जीवन सुसह्य होत आहे. खरेतर तंत्रज्ञान हा आज परवलीचा शब्द झाला आहे. शिक्षण,कृषी ,अवकाश,वैद्यकीय असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे तंत्रज्ञान नाही, त्यामुळे आजच्या जगात विज्ञान तंत्रज्ञान ही आवश्यक बाब आहे.आज कोणतीही माहिती एका क्लिक वर उपलब्ध होते आहे, कोणतीही माहिती क्षणार्धात दुसर्यापर्यंत पोहचवली जात आहे, एकावेळी असंख्य लोकांशी संवाद साधता येत आहे, संपूर्ण जग खऱ्या अर्थाने जवळ येत आहे आणि खऱ्या अर्थाने ही रूढार्थाने पुस्तके, दप्तर,शाळा याशिवायची शिक्षणाची वाटचाल आहे.
आजचं विज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान आहे आणि डिजिटल स्कुल, E-स्कुल, टॅब्लेटस्कुल या संकल्पना पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करतील अशी अपेक्षा आहे. कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते , त्रुटी याही माध्यमाच्या असतील पण जे जे योग्य ते ते स्वीकारून नव्या जुन्याची सांगड घालून राजहंसाप्रमाणे निरक्षीर विवेकी जगणं अंगीकारता येणं ही काळाची गरज आहे. बदल तर सातत्याने होतच राहणार आहेत, परंतु त्या बदलाचा मुळ उद्देशावर परिणाम न होऊ देता बदल स्वीकारले तर नक्कीच त्याचे फायदे मिळतील. आणि नव्या जुन्याची सांगड घालत तंत्रज्ञान वापरत शिक्षण आणखी आनंदादायी, ज्ञानरचनावादी करता येईल.
संजय गरबड मराठे
उल्हासनगर 4
9421973888

No comments:
Post a Comment