बदली

Monday, 4 July 2022

जगण्याचं प्रयोजन

 प्रिय दादास (अनिल गणवीर)


       ज्या आयुष्याचं परीक्षण केलं गेलं नाही ते आयुष्य जगण्यास योग्य नाही असं सॉक्रेटिस म्हणतो.

       आयुष्याचं केवळ परिक्षणच नाही तर त्यामागचं प्रयोजनही ज्याला कळलं आणि त्याप्रमाणे ज्याने जीवन जगलं असं तुझ्याबद्दल लिहितांना भावना ही निःशब्द झाल्यात.खरेतर मनावर राज्य करणारी आताच्या या क्षणाची शांतताच तुझ्या आयुष्याबद्दल खूप काही सांगून जातेय, पण तरीही लिहावं तर लागेलच कारण हे लिहिणं तुझ्यासाठी नाहीये तर माझ्याच साठी खूप गरजेचं आहे. खूप काळ लोटलाय प्रत्यक्ष सहवास अनुभवून तरीही ही मैत्री आजही इतकी टवटवीत आहे. आजही त्यावर आपलं मैत्र चिरतरुण भासतंय. सगळ्या आठवणी एकामागोमाग सरसर  जातायत...मन क्षणात कॉलेजच्या दिवसांत भरारी मारून येतंय नि मग भावना उचंबळून येतायत....



 ...वेळ झाली भरमध्यान्ह... माथ्यावर तळपतो सूर्य.... वसंत ऋतुपुर्वी पानगळ अनुभवून आयुष्याचं रितेपण जपणारा निसर्ग भर उन्हात नव्याने जगण्याची वाट पाहतो....कोवळ्या पालवीने बहरतो.. सकारात्मकतेचा सूर जागवणारा निसर्ग आपल्यालाही खूप काही शिकवतो.  निवृत्तिकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आपल्याला मिळतो. सामाजिक नैतिकता तर अत्यावश्यकच पण त्याहून सुंदरता असते ती विचारांची... आणि ती स्वतःच जपायची असते. ही विचारांची समृद्धी कलासक्त मन असणाऱ्या माणसाकडे असते आणि ही वैचारिक ,भावनिक,सामाजिक श्रीमंती तुझ्यात पहायला मिळते.तू माणूस म्हणून साधा आहे म्हणजे तू गरीब आहे अस नाही. कारण गरज आणि चैन ह्यातला फरक कळलेल्या माणसाचं राहणीमान साधंच असतं बरेचदा...आणि याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे तू आहेस मित्रा.

           ....आजच्या प्रचंड झकापकीच्या दुनियेत तुझ्यासारखा माणूस विरळाच. तुझ्या इतका संवेदनशील माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. हळवं स्त्री मन असलेला तू शिक्षकी पेशासाठीच नियतीने घडवला असावा असे कित्येकदा वाटते,कारण शिक्षकांचे आयुष्य हे जगात सर्वात जास्त असते  ...जोपर्यंत त्याचा विद्यार्थी जिवंत तोपर्यंत शिक्षकही संस्काररूपाने त्याच्यात असतो, आणि  आपल्या सारखे शिक्षक तर भाग्यवानच,कारण आईच्या उबदार कुशीतून मुल अलगद शिक्षकांच्या आश्वासक हातात येते आणि असे धरलेले ते बोट त्या मुलाला निःसंकोचपणे जीवनप्रवासात मुक्त विहरु देते.... असे कित्येक विद्यार्थी मुक्त विहरत असतील,स्वतःच स्थान निर्माण करत असतील.आजच्या कोरड्या जगात मायेचा ओलावा, मनाचा मोठेपणा,जीवनाकडे पाहण्याचा नितळ दृष्टिकोण या मुलांमध्ये तुझ्यासारख्या शिक्षकामुळे नक्किच पाझरला असेल.

             जीवन मार्ग फुलत अन फुलवत असतांना आपण एकटं काहीही करू शकत नाही.आपलं कुटुंब ,आपले मित्र,सहकारी,शिक्षक,ज्यांनी आपल्या  सुखदुःखात आपल्याला संगत केली असे सहृदयी,दूर कुठंतरी शिक्षण नोकरी साठी गेले असता तेथील हॉस्टेल,रूम पार्टनर...असे किती तरी लोकं आपले जीवन फुलवण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत.आज एवढे वर्ष उलटून गेली.तरी देखील आजही भंडारा येथील त्या स्मारकात बसून आयुष्य, समाज आणि संगीत वरील चर्चा आठवते.नाशिकनगरच्या रस्त्यावरील वेल्हाळ गप्पागोष्टी आजही तरुण आहेत.आपल्या रुम मधील ऐकलेल्या अहमद आणि महंमद हुसेन यांच्या चल मेरे साथ ही चल, मै हवा हु ,डस न जाये ह्या आणि इतर गझल मेंदू आणि हृदयावर कब्जा करून आहेत.लताबाई आणि आशाबाई यांच्यातल्या गायकीत कोण सरस म्हणत त्यांची गाणी आणि गाण्यातील बारकावे शोधत झालेली चर्चा आणि तो अजब निष्कर्ष आज ही कुठंतरी आशाबाईंच्या गाण्याकडे घेऊन जातांना दिसतो.अमृता प्रितम आणि त्यांचं साहित्य त्यांच्या जीवना विषयी सांगितलेली कहाणी आज ही बंड काय असतं याचं प्रत्येय देतं.वाचलेल्या पुस्तकातील कोटेशन आणि विविध कवींच्या काव्यावर झालेली चर्चा, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील संगीत- गायकाचा आवाज,  कॉलेज ग्रंथालय आणि तेथील विखुरलेली पुस्तके आणि आपण रूमवर आणलेली त्यातील काही पुस्तके त्यावरील चर्चा आजही मनाच्या कप्प्यात घर करून आहेत.त्या दोन वर्षात आरमोरी,धारगाव,तुमसर येथील आई बाबा यांचं प्रेम खोल खोल आत आजही सुगंध देतंय. आरमोरीच्या घरामागील गुलाबाची बाग, टॉकीजला पाहिलेला अमिरचा 'जो जिता वही सिकंदर' नंतर घरी येऊन आईने केलेलं गरम गरम पिठलं आणि भात याची चव आज ही जिभेवर जशीच्या तशी आहे.धारगाव येथे मुबारकच्या घरची बिर्याणी आणि रुमवर बिर्याणी भरून पाठवलेला डबा उघडला असता त्यातील तो घमघमाट आजही मेंदूत साठलेला आहे.

             तुझ्यातली साहित्याची भूक मी जवळून पाहिली आहे.तुझं लिखाण हे हृदयाला अगदी पिळवटून टाकतं.त्यात जीव ओतून प्राण कंठात आणून भावनांची मांडणी असते..खूप खोलवरचं आहे हे सर्व....कदाचित तुझ्या एवढा मी ही वास्तववादी मांडणी नाही करू शकत...कारण मी ही नागरिकरणाला काहीसा भुललो आहेचं...आयुष्यरुपी जिन्याच्या काही पायऱ्या चढताना कित्येकदा ठेचाळलो खरा....पण ते वास्तव लिहितांना त्याची मांडणी करतांना नाही धीर होत कधीचं याला तू माझं दुबळेपण म्हण हवं तर, नाहीतर न्यूनगंड असावा माझा तो.पण तुझ्या एवढं मी खरंच नाही लिहू शकत...तुझं लिखाण मी आजही मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलं आहे.आणि हो मी जे काही थोडंबहुत लेखन करतो ती तुझीच प्रेरणा आहे हे आज मला सांगितलंच पाहिजे.

            आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि आपला गोतावळा याचं भान आपण ठेवलं पाहिजे.ही तुझी शिकवण आजही मनाच्या पटलावर कोरून ठेवली आहे.आजची पिढी आणि त्यांची व्यक्त होण्याची पद्धत हे आपण डोळसपणे समजून घेऊन आपली पारंपारिक जिद्द सोडून थोडं मोकळं व्हायला आपण शिकलो पाहिजे.हा तू दूरध्वनीवर दिलेला डोस आयुष्य सुंदर करून गेलाय.

             प्रेरक आठवणींची भरजरी वस्त्र जपताना आठवणींकडून प्रेरणा मिळतात आणि त्या आठवणींवर सगळं आयुष्य सहज जगता येत,आपल्या मैत्रीच्या आठवणीही तशाच....सगळ्या पातळ्यांवर आपल्यात चर्चा झाल्यात, वादविवाद झाले, विचार विनिमर्ष ही घडले आणि वैचारिक पातळीवर जुळलेली ही मैत्री म्हणूनच आजही अखंड आहे. 

              कितीतरी माणसं  तरुणपणीच नोकरी करताना म्हातारी होतात, पण काही रिटायर्ड झाली तरी म्हातारी होत नाहीत कारण त्यांना *जिवीका* आणि *उपजीविका* यातला फरक कळलेला असतो, म्हणूनच उपजीविका म्हणून नोकरी करत असताना जीविका म्हणून जोपासलेला छंद, आवड,कला आणि वाचनाचा व्यासंग,कवितेचा ध्यास आणि  जीवनाबद्दल नितांत आदर ह्या गोष्टी तुला नोकरीची पोकळी कधीही जाणवू देणार नाही याची खात्री वाटते.

तुझी निवृत्ती म्हणजे आनंद,दुःख,हुरहूर अशा अनोख्या संमिश्र भावनांचे मिश्रण.कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाने नटलेल्या तुझ्या व्यक्तिमत्वाचा आज पुन्हा एकदा नव्या वाटेवर पाऊल टाकण्याचा दिवस...  घरचेही तुझ्या या निवृत्तीची वाट पहात असतील,आतापर्यंत नोकरीमुळे जे छंद, जगणे राहून गेले असेल ते यापुढे मिळणाऱ्या वेळात भरभरून जगून घे,मुलींना, सहधर्मचारिणीला वेळ दे,राहिलेल्या सर्व स्वप्नांना गवसणी घाल .....म्हणूनच तर निवृत्ती नसून जगण्याची नवी आवृत्ती आहे ही.

तुझ्या मनातील अपार प्रेमळ भावना ,जगाप्रति असणारी सहवेदना तुला नोकरीची पोकळी कधीच जाणवू देणार नाही, जगण्याच्या या नव्या वाटेवर तुला माझ्याकडून मनस्वी सदिच्छा.....!!💐🙏🏻

                                                        तुझाच                         

                                                    संजय ग. मराठे

                                                    9421973888

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...