शाळा

Showing posts with label कृतार्थ. Show all posts
Showing posts with label कृतार्थ. Show all posts

Wednesday, 6 October 2021

बाप माणूस...

 बाप माणूस.......

साधारणपणे ५-१० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग! दिवाळीची सुट्टी लागली म्हणून गावाकडे निघालो होतो. 

दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती. 

माझ्या शेजारी जागा रिकामी होती. 

एक पन्नाशीला टेकलेला मनुष्य घाम पुसत माझ्या जवळ आला. 

जागा रिकामी आहे का चौकशी केली. 

मी अगदी मनमोकळेपणाने बॅग वर टाकून जागा करून दिली.

गाडी नगरहून निघाली आणि 

गावाच्या दिशेने निघाली. 

माझं तरुण वय आणि हातात अग्निपंख पुस्तक पाहून न राहवून त्या सद्गृहस्थाने माझी चौकशी केली.

मी सांगितलं की, कॉलेजमध्ये आहे. सुटीला घरी जातोय.

गप्पांच्या ओघात ती व्यक्ती शिक्षक असल्याचं कळलं! मी पण उत्सुकतेने शाळेतल्या गमतीजमती विचारायला सुरुवात केली

 आणि

 त्यांनी पण त्या मोठ्या आवडीने सांगायला सुरुवात केली.

बोलता बोलता त्यांनी मला विचारलं,  तू कोणता व्यवसाय करणार?

मी म्हटलं - मला व्यवसाय करायला आवडेल पण मला शिकवायला आवडतं!

*माझ्या उत्तरावर त्यांनी कुतूहलाने माझ्याकडे पाहिलं. 

आणि

 म्हणाले - "शिक्षक होणं ही साधी गोष्ट नाही.

 त्यासाठी पाठ हे स्वतः जगावे लागतात 

आणि 

विद्यार्थ्यांना जगायला शिकवावे लागतात."

कोणत्या तरी धड्याचा संदर्भ देऊन हे त्यांनी सांगितलं. 

वाक्य आवडलं म्हणून लक्षात राहिलं.

 पण पुढे त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती.

आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. 

नगरपासून ४०-५० किलोमीटर वर गाव होतं त्यांचं! 

गेली २० ते २५ वर्षे एसटी ने अप डाऊन करुन नोकरी केली होती.

 माणूस प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक होता. 

पोरगा नुकताच १२ वी झाला. 

मार्क पण चांगले पडले होते. 

नगरला यायला त्रास होऊ नये, म्हणून सरांनी मुलाला दुचाकी गाडी घेऊन दिली होती. 

साहजिकच पोराच्या हुशारीचं कौतुक बापाच्या डोळ्यातून पाझरत होतं.

गाव १० किमीवर आलं, तसा सरांनी मुलाला एसटी स्टॅन्डवर घ्यायला ये असा फोन केला. 

पोराने पण लगेच तत्परता दाखवून येतो असं उत्तर दिलं 

आणि 

एसटी स्टॅण्डकडे निघाला. गाव आलं..

एसटी थांबली. 

तसा पोरगा 

आणि 

त्याचे मित्र सरांना घेण्यासाठी गाडीवर आले होते.

सर खाली उतरले. 

नवीन कोऱ्या गाडीवर एका राजकीय पक्षाचे चिह्न आणि 

त्याचा फोटो चिकटवलेला दिसला. 

पुढच्या क्षणी एसटी स्टॅन्ड मुस्काडात मारल्याचा आवाजाने चपापले!

सरांनी पोराच्या जोरदार कानाखाली वाजवलीं होती. सरांचा आवाज 

आणि 

राग दोन्ही चढत होते.

 " तुझा बाप गेली वीस वर्षे तुझ्या बुडाखाली गाडी असावी, या करिता झिजतोय आणि तू मात्र नव्या कोऱ्या गाडीवर अनोळखी नेत्याचा फोटो लावून हिंडतोय?

 तुझ्या बापापेक्षा भारीय का रे .... तो?

तो पण जिवंत आहे 

आणि 

तुझी आई 

आणि 

बाप पण! 

मग आईबाप विसरुन तुला त्याचा फोटो का लावावा वाटला?

राजकारण करायचंय जरुर कर! 

मास्तरांचा पोरगा मास्तर व्हावा असा काही नियम नाही. 

पण कर्तृत्व असं घडवं की नेता तुझ्या दारात येऊन म्हंटला पाहिजे - "साहेब माझ्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. ह्या वेळी तिकीट तुम्हाला द्यायचं ठरलं आहे."

सरांच्या डोळ्यातून आग

 आणि

 मुखातून शिशाचा रस कानात ओतला जात होता.

" जो पोरगा त्याच्या आईबापाच्या रक्ताच्या कमाईला कुणा नेत्याच्या प्रचाराचं लेबल लावत असेल, तर ती औलाद हरामखोर म्हणावी लागेल.

 अशी औलाद असण्यापेक्षा नसलेली परवडली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पण स्वराज्याचं तोरण बांधलं, पण माता आणि 

मातृभूमीला वंदन करून, शिवशंकराला साक्षी ठेवून!

 आणि 

पित्याला विश्वासात घेवून! लाचारी 

आणि

 लाळघोटेपणा करून नाही.

 घरी येईपर्यंत जर गाडीवरची ठिगळ जर निघाली नाहीत तर गाडी जाळून टाकेन.

 " असं म्हणून सर पायीचं घराकडे निघाले.

मी म्हटलं, साधी गोष्ट होती. जी घरी पण समजावून सांगणे शक्य होते. इतकं आक्रमक होण्याची गरज नव्हती. 

सर

 पायीच घरी निघाले. 

तसं पोराने आधी भराभर स्टिकर फाडले. 

पुढचं दृश्य फार पाहण्या सारखं होतं.

सर 

फक्त त्यांच्या मुलाला बोलले, पण त्याच्या मित्रांना पण ते लागलं होतं. पोरांनी भराभर स्टिकर फाडली. सरांच्या शब्दांत दम होता.

 उद्या हा प्रसंग आपल्या कुणाच्या वाट्याला येणार नाही असं नाही.

 आणि 

त्यात चूक काहीच नाही. पोरांनी नीट घरचा रस्ता धरला.

 पोरगा मात्र घरी जायला धैर्य एकवटत होता.

सरांनी स्वतःच्या मुलाच्या थोबाडात वाजवून वेदना मात्र सगळ्यांच्या हृदयात जागवल्या होत्या. 

पाठ जगणे कशाला म्हणतात हे सरांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं होतं.

गप्पा आणि अचानक घडलेला पुढचा प्रसंग यात सरांचं नाव विचारायचं राहून गेलं. 

इतक्यात कंडक्टरने डबल बेल मारली आणि गाडीतल्या अनेक बापांच्या मनात एक नवीन विचार

 आणि

 पोरांच्या मनात कृतज्ञतेच्या जाणिवा जाग्या करून गाडी गावाच्या दिशेने निघाली.

वेळीच घातलेला एक टाका पुढचे शंभर टाके वाचवतो ते असं! 

नातं वृद्धाश्रमात पोहोचण्या इतकं फाटल्यानंतर त्याला सहानुभूतीचे टाके घालण्यापेक्षा वेळीच जबाबदारीच्या जाणिवा थोडं कठोर होऊन जाग्या केलेल्या उत्तम नाही का ?


नेत्याला बाप समजणाऱ्या सगळ्या गाढव तरुणांना आवर्जून पाठवा.. कदाचित अक्कल येईल आणि त्यांच्या आयुष्याचे मातेरे होणार नाही... 


प्रत्येक तरुणाला पाठवा, म्हणजे तो जागा होईल आणि कार्यकर्ता नावाचा एक प्राणी पृथ्वीवरून नामशेष होईल

कॉपी पेस्ट🌸

Tuesday, 3 August 2021

सेनेगल तुला सलाम...!

 आफ्रिकेचा जगप्रसिद्ध  29 वर्षाचा फुटबॉल खेळाडू सादिओ माने ( सेनेगल) याची भारतीय चलनानुसार पाहायला गेले तर एका आठवड्याची कमाई 1 करोड 40 लाख रूपये आहे. ह्या खेळाडूला अनेक वेळा लोकांनी त्याला हातात तुटलेल्या फोन सह पाहिलेले आहे. 


एक मुलाखती दरम्यान शेवटी मुलाखत घेणा-यांने त्याला डिवचलेच की, तुमचा फोन तुटला आहे, तर त्यांनी सहजपणे पत्रकाराला उत्तर दिले की, "मी ठीक करून घेईल." परंतु पत्रकाराचे ह्या उत्तराने समाधान झाले नाही म्हणून त्याने सेनेगलला दुसरा प्रश्न विचारला की, तुम्ही नवीन फोन का घेत नाही?? त्यावर सेनेगल बोलले की, असे हजार फोन मी घेवू शकतो, 10 फेरारी घेवू शकतो. 2 जेट विमान खरेदी करू शकतो. डायमंडची घड्याळे खरेदी करू शकतो. 


परंतु ह्या सर्वांची मला गरज काय आहे ?? 


मी गरीब घरातूनच आलेलो आहे. गरीबी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून मी शाळा, कॉलेजेस बांधले आहेत. माझ्या जवळ चांगले बुट नव्हते, तेव्हा मी विना शुज सह खेळत होतो. अंगावर घालण्यासाठी चांगली कपडे नव्हती. एक वेळच्या जेवणाची चिंता आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पाणी पिऊन आम्ही झोपायचो . आणि आज सर्व काही मला मिळत आहे तर त्याचा देखावा करण्याऐवजी मी माझी संपत्ती माझ्या लोकांसाठी खर्च करतो ज्यामुळे मला त्यांच्या चेह-यावरील आनंद पाहून मानसिक समाधान मिळते.

 

Great ...Salute ...salute..




Friday, 30 July 2021

गणपतराव, हे मोह तुम्हाला का झाले नसतील...??

 गणपतराव, हे मोह तुम्हाला का झाले नसतील...?? 


असल्या लाल डब्यातून जाण्यापेक्षा लाखांच्या गाडीतून मग्रूर नजरेने आजूबाजूला बघत जावं असं का नसेल वाटलं ? 


आमदार निधीच्या १० कोटीला टक्केवारीचे कोंदण का घालावेसे वाटले नसेल ? 


मुंबईत समुद्र नजरेत घेणारा, आलिशान फ्लॅट टक्केवारीतून घेत, सामाजिक ताणाचा विरंगुळा का घ्यावासा वाटला नसेल ? 


मतदार संघात अवैध धंदे,बिल्डर लॉबीच्या उद्योगाकडे फक्त 'दुर्लक्ष' करण्याच्या रकमेतून देश विदेशी पर्यटनाची शक्यता का अजमावली नसेल ? 


मुंबईत पंचतारांकित हॉटेलात बुद्धिजीवी घेऊन देशातील दारिद्र्यावर चर्चा का करावीशी वाटली नसेल..? 


नष्ट होत चाललेल्या पक्षात थाम्बण्यापेक्षा जनतेच्या विकासाच्या नावाखाली पक्षांतर करून लाल दिवा का पेटवला नसेल..? 


असे अनेक प्रश्न पडतात गणपतराव,


ज्याची उत्तरे माहीत असूनही 

नीट समजत नाहीत

की बेरीज वजाबाकी समजूनही 

हिशोब लागत नाही अशा अहिशोबी आयुष्याचा... 


मोहाच्या क्षणावर ही माणसं कशी मात करत असतील ?


इतरांच्या गाड्या,वैध,अवैध संपत्ती बघून नसेल का मनात येत यांच्या असे असावे आपलेही काही...? 

१० पिढ्याची सोय करणारे आजूबाजूला असताना 

किमान पुढच्या दोन पिढ्यांची सोय तरी करावी...? 


इतके निष्कलंक समर्पित जगून तुम्हाला समाधान सोडून काय मिळाले असेल गणपतराव....? 


हे सारं सोडून तुम्ही काय मिळवता पैसे कमावणारे यंत्र झालेल्या आम्हाला कळत नाही 


हे ऐहिक आनन्द गमावताना, तुम्ही काय कमावता ? हे आमच्या पिढीला कळत नाही

कळलं तरी वळत नाही.. 


  आमच्या रेंजबाहेर जगणारी तुमच्यासारखी आयुष्ये आम्हाला अनरिचेबल वाटतात.....


हे सारे कुठून येते.....?

कुठल्या मातीची बनलेले असता तुम्ही....?

Google search करूनही याची उत्तरं मिळत नाही


संपत्ती उधळून देणारा कुसुमाग्रजांचा नटसम्राट गणपतराव

आणि इथे आयुष्य उधळून देणारा हा गणपतराव


नष्ट होणाऱ्या प्रजातीतील तुम्ही शेवटच्या काही वनस्पती...

नंतर उरेल फक्त वाळवंट,

 इथे वनस्पती होत्या हे सांगणारे.... 



हेरंबकुलकर्णी (8208589195)

Wednesday, 28 July 2021

माझी आई काय म्हणाली असती ?

माझी आई काय म्हणाली असती ?


               केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, अबेलने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, तेवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून अंतिम रेषेच्या एक मीटर आधीच थांबला. 


त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की अंतिम चिन्ह न समजल्यामुळे तो अंतिम रेषेच्या आधीच थांबला आहे. 


त्याने ओरडुन अबेलला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हानने त्याला ढकलुन अंतिम रेषेपर्यंत पोचविले, त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला. 


पत्रकारांनी इव्हानला विचारले, "तू असे का केलेस? तुला संधी असतांना तू पहिला क्रमांक का घालवलास ?"


इव्हान ने सांगितले, "माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू जी एकमेकांना मदत करेल. आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही." 


रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस ?"


यांवर इव्हान म्हणाला, "तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती !"


पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू सुवर्ण पदक जिंकू शकला असतास !"


"त्या जिंकण्याला काय अर्थ होता ? माझ्या मेडलला मान मिळाला असतां ? माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते ?"


"दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे."



Forwarded post

Thursday, 3 June 2021

केनियाच्या मदतीची गोष्ट...

 केनियाच्या मदतीची गोष्ट...


केनियानं पाठवलेल्या बारा टन खाद्य सामुग्रीवरून अनेकजण टिंगल टवाळी करताहेत. सोशल मीडियावर केनियाला भिकारी, भिकमागे, दरिद्री वगैरे विशेषणे लावली जात आहेत.


एक छोटीशी घटना आहे. 


तुम्ही अमेरिकेचं नाव ऐकलं असेल. मॅनहटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ओसामा बिन लादेन वगैरे नावंही ऐकली असतील.


बहुतेक लोकांनी ऐकलं नसेल ते 'इनोसाईन' गावाचं नाव. हे गाव आहे केनिया आणि टांझानियाच्या बॉर्डरवर.  इथल्या स्थानिक जमातीचं नाव आहे, मसाई!


अमेरिकेतल्या 9/11 च्या हल्ल्याची बातमी इथल्या लोकांच्या कानावर जायला कित्येक महिने लोटावे लागले होते. 


या गावाशेजारच्या गावात राहणारी किमेली नाओमा नावाची मुलगी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत मेडिकलला होती. ती सुट्टीसाठी गावी आल्यावर तिनं या मसाई लोकांना 9/11 च्या घटनेचं आंखो देखा वर्णन सांगितलं.

तेव्हा दुःखावेगानं सगळे रडायला लागले.


एखादी इमारत इतकी उंच असू शकते, की ज्यावरून पडून जीव जाऊ शकतो ही गोष्ट झोपडीत राहणाऱ्या मसाई लोकांसाठी अविश्वसनीय होती. तरीही त्यांनी अमेरिकन लोकांचे दुःख समजून घेतलं आणि त्या मेडिकलच्या विद्यार्थिनीमार्फत केनियाची राजधानी नैरोबी येथील अमेरिकन दूतावासाचे उपमुख्य अधिकारी विल्यम ब्रांगिक

यांना एक पत्र पाठवलं. ते पत्र वाचून ब्रांगिक यांनी आधी विमानानं प्रवास केला, त्यानंतर अनेक मैल कच्च्या रस्त्याने खडतर प्रवास करून मसाई जमातीच्या इनोसाईन गावात पोहोचले.



ते तिथं पोहोचल्यावर मसाई लोक एकत्र जमले आणि एका रांगेत चौदा गाई घेऊन त्यांच्याजवळ गेले.

त्यांच्यातल्या ज्येष्ठ माणसानं गायी बांधलेली दोरी त्यांच्या हातात सोपातानाच एका पाटीकडं त्यांचं लक्ष वेधलं. त्या पाटीवर काय लिहिलं होतं माहीत आहे ?

त्यावर लिहिलं होतं : या दुःखाच्या प्रसंगी अमेरिकेतील लोकांच्या मदतीसाठी आम्ही या गायी दान करीत आहोत.


त्यांच्या पत्रातल्या तशाच भावना वाचून अमेरिकेसारख्या शक्तिमान देशाचे राजदूत चौदा गायी घेण्यासाठी शेकडो मैल खडतर प्रवास करून तिथपर्यंत आले होते. 


गाईंची वाहतूक करण्यातील तसेच अन्य काही कायदेशीर अडचणींमुळे गायी अमेरिकेला जाऊ शकल्या नाहीत. मात्र त्या गायी विकून एक मसाई अलंकार खरेदी करून 9/11 म्युझियममध्ये ठेवण्याची शिफारस करण्यात आली.


ही गोष्ट सामान्य अमेरिकन नागरिकांच्या कानावर गेली तेव्हा काय घडलं माहीत आहे ?

लोकांनी अलंकाराऐवजी गायी आणण्याची मागणी केली.

आम्हाला अलंकार नको गायी पाहिजेत, अशा ऑनलाईन याचिकांची मोहीम राबवली गेली.

प्रशासनाला ईमेल पाठवले.

नेत्यांकडे तशी मागणी केली.

लाखो अमेरिकन लोकांनी मसाई लोकांच्या अभूतपूर्व प्रेमाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.


बारा टन खाद्य समुग्रीचा आनंदाने स्वीकार करा. ( टिंगल करायची असेल, दोष द्यायचा असेल तर, ज्या निष्क्रिय आणि बेजबाबदार माणसामुळं देशावर ही परिस्थिती ओढवली आहे त्याला दोष द्या.)

दान नव्हे, तर ते देणाऱ्याची त्यामागची भावना समजून घ्या.

धूळ नव्हे, तर ती आणून सेतू बांधण्यासाठी योगदान देणाऱ्या खारुटीची श्रद्धा बघा !


(फेसबुक आणि ट्विटरवर हिंदीतील ही पोस्ट गेले दोन दिवस प्रचंड व्हायरल झाली आहे. वेगवेगळ्या लोकांनी निरनिराळ्या लोकांचे संदर्भ दिलेत, त्यामुळं ती पोस्ट मूळ कुणाची आहे समजत नाही. परंतु ती एवढी थोर वाटली, की तिचं भाषांतर करण्याचा मोह आवरता आला नाही.)


- विजय चोरमारे

Saturday, 15 May 2021

निशब्द

   निशब्द....

सुरमई साडेसातशेला मिळते. पापलेट  तेराशे रुपयांना. मटण साडेआठशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे  याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.’ मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’ ‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला. दुपारी अठ्ठावण्ण रुपये लीटरची दुधाची पिशवी, दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोनं ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची. साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला. म्हणाला, ‘सायेब आत्ता जमलं का भेटायला ?’ वैतागत म्हणालो, ‘अरे बाबा आत्ता लय उन हे. मी येतो की संध्याकाळी. ’केविलवान्या आवाजात तो म्हणाला, ‘साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत.’  मला धक्काच बसला. म्हणालो, ‘अरे तु एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय? खुपच गरज आहे का पैशांची?’ हतबल होत म्हणाला, ‘होय साहेब.’ भुवयांचा आकडा करत म्हणालो, ‘किती पैशे पाहिजेत?’ तसा दबक्या आवाजात म्हणाला, ‘शंभर रुपये पायजे होते साहेब.’ ‘थांब थांब आलो मी.’ असं म्हणत गाडी चालू करुन चौकात गेलो. मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदबीनं हसला. म्हणालो, “काय रे कशाला एवढे अर्जंट पैसे पायजे होते ? सासऱ्याना दारू पाहिजे का मेहुणा हारला जुगारात? 

तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला, ‘साहेब तीन दिवस झालं हाजरीच नाय मिळाली. काल दळण टाकलय हितल्या गिरणीत. ते आणाय पैशेच नाय. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी. पण आता भुक लागली म्हणून रडाय लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला.

’याची एक पोरगी दोन वर्षांची, दुसरी तीन महिन्याची.

 दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभरच्या दोन नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, ‘एवढे नको साहेब. शंभर बास होत्यान. पगार झाल्याव तुम्हाला वापस करीन.’त्याच्या उत्तरांनी तोंडातली थुंकीच सुकली. दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला.

माझ्या घरातले मासे, श्रीखंड, दुध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीच पीठ आणायला निघाला होता.माझी बायको दोन अडीच हजारच्या साडया पाहुन जेवढी खुश झाली, त्याहुन जास्त खुश याची बायको होणार होती….

निशब्द…

  

मित्रांनो, सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशाचं व पोटाच सोंग नाही करता येत. आपल्यापैकी बरेच लोकं चांगल्या नोकरीला आहेत. कुटुंबाच्या सर्व गरजा सर्वोपरी पूर्ण जरूर करा. पण काबाड कष्टकऱ्यांना ५०-१०० देताना हात आखडू नका. आज मजुरांचे दिवस वाईट आहेत. बऱ्याच लोकांवर खरोखर कठीण प्रसंग आहे. 


व्हॉटअप स्टोरी...

Saturday, 24 April 2021

म्हणुनच "त्यांचे " नाव अजरामर राहील.....

 म्हणुनच "त्यांचे " नाव अजरामर राहील.....


एकदा अब्दुल कलामांना एरोडे येथे एका कार्यक्रमात बोलावलं होतं,तिथे त्यांना भेट म्हणुन प्रायोजकाने त्यांच्या कंपनीचा मिक्सर देउु केला,तो घेण्यास कलामांनी नकार दिला मात्र त्यांच्या कुटुंबाकरीता त्यांना मिक्सर हवा होता . त्यामुळे त्यांनी त्या मिक्सर च्या किंमतीएवढा ४८५० रुपयांचा धनादेश प्रायोजकांना देऊ केला अन तो मिक्सर विकत घेतला. पण त्या प्रायोजक कंपनीने एक महिना झाला तरी तो धनादेश बँकेत जमा न करता तसाच ठेवला.


एक महिना झाला तरी धनादेश वटला नाही हे पाहून कलामांच्या कार्यालयातून त्या कंपनीला फोनकरून धनादेश न वटल्या बद्दल चौकशी केली गेली. त्या प्रायोजक कंपनीने देखील धनादेश जमा करणार नसल्याचे सांगून टाकले. त्यावर धनादेश जमा करणार नसाल तर ते मिक्सर कंपनीच्या पत्त्यावर परत पाठवून देऊ अशी बतावणी कलामांनी कंपनीला केली, त्यावर त्या कंपनीने तो धनादेश बँकेत जमा करण्याची तयारी केली, तत्पूर्वी त्या धनादेशाचे एक प्रत छायांकित करून संग्रही ठेवली .


दुसऱ्याच दिवशी धनादेश बँकेत जमा होऊन तो वटवला गेल्याचे काळातच कलामांच्या कार्यालयातून पुनःश्च आभार मानणारा दूरध्वनी गेला, ही घटना ऑगस्ट २०१४ मधील असून त्या कंपनीचे नाव सौभाग्या ग्राइंडर्स असे आहे. सोबत त्या धनादेशाचे प्रत जोडत आहे .


काही पालक तर आपल्या मुलांचे संपूर्ण शिक्षण आफीसच्या स्टेशनरीवर करतात असे ऐकतो .नाहीतर बगा ना सध्या हजारो करोड चा घोटाळा करून एक कुटुंब सहानुभूती मिळवण्यासाठी धडपडत आहे.


आणि एका निवृत्त राष्ट्राध्यक्षानी तर सैनिकांची जमीन स्वतःच्या बंगल्यासाठी वापरली .कलामांचे वागणे आदर्श ठेवणारे होते . दुसरे एक राष्ट्रपती होते ते परदेश दौऱ्यावर जाताना आपल्या 20 / 25 नातेवाईकांना बरोबर घेऊन जात . तो त्यांचा आदर्श . नंतर त्यांनी बंगल्यासाठी लष्कराची जमीन घेऊन अजून एक आदर्श घालून दिला.आम्ही तर सरकारी बंगल्यातल्या नळाच्या तोट्यापण चोरुन नेतो.

अत्यंत निगर्वी व्यक्तिमत्त्व..मोठेपणाचं कुठलंच प्रदर्शन कधीच न रणारे,त्यामुळेच सर्वसामान्यांच्या मनात कायम राहतील.



विनम्र अभिवादन!

फेसबुक साभार

Tuesday, 13 April 2021

शिक्षणाची खरी गुढी

 आदिवासी गावात स्वतःची 10 गुंठे जागा सरकारला 'दान पत्राने ' देवून शिक्षणाची गुढी उभारणाऱ्या या असामान्य दात्याला त्रिवार वंदन....


'छोटी गावे, मोठी मने   

फुकटे ( दुर्दैवाने सध्या त्यांची ओळख काही शहरी सुशिक्षित अशी करून देतात)) की स्वबळावर गावाचा विकास साधणारे ' श्रीमंत '??? संवेदना जागृत करणारी 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी' जरूर वाचा.

कमान आदिवासी ठाकरवस्ती. जेमतेम ५० उंबरठ्यांचे, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक गाव.राजगुरुनगर पासून २० की मी आणि मुख्य रस्त्यापासून ४ की मी अंतरावर. सर्वांच्या नजरेपासून दूर आणि म्हणून पूर्णपणे दुर्लक्षित अशी आदिवासी  वस्ती. पावसाळ्यात सर्वांपासून तोडली जाते ही वस्ती. अशा भीमा शंकरच्या पायथ्याशी 100 पेक्षा जास्त आदिवासी वस्त्या अजूनही अस्तित्वात आहेत ( पुणे पासून फक्त 40 की मी अंतरावर). हा अव्यक्त समाज कोणालाही दोष न देता आनंदाने राहते.

     अनंते ठेविले तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान 

याचे तंतोतंत पालन करत जगतो हा समाधानी समाज!!!!

गावाला सुविधां नाहीत पण पुढील पिढी घडविण्यासाठी शाळेची सुध्दा सोय नव्हती. जमिनीच्या शोधात आहोत हे ठराविक उत्तर असे प्रशासनाचे.


श्री  लालू तत्याबा जाधव गावातील रहिवासी स्वतःची थोडीशी जमीन बाळगून होते. .पुढील पिढीतील मुलांना शिक्षणास मुकल्याने आपल्यासारखेचं आयुष्य जगावे लागणार ही चिंता सदैव सतावत होती त्यांना. मनाची घालमेल स्वस्थ बसू देत नव्हती.१० गुंठे जागा त्यांनी  शाळेसाठी सरकारला दान पत्राने दिली. केवढे मोठे दान, अनेक पिढ्या घडविणाऱ्या या दानाची किंमत जो करू शकेल तो थोर!!!

आता मात्र  सारी यंत्रणा कामास लागली शाळा उभी राहिली. हेतू उत्तम असल्याने श्री सुरेश नईकरे यांचे सारखा उत्साही आणि  अलौकीक नेतृत्व गुण असलेला उमदा शिक्षक मिळाला आणि शाळा उभी राहिली. शाळेची संरक्षक भिंत(१००* ६ फूट ) गावाने वर्गणी काढून श्रमदानाने बांधली.  

शहरी जीवन जवळून पाहणाऱ्या मला या गोष्टी ऐकून अंगावर काटे आले आणि पाच मिनिटे निश्चल झालो!!! सहभागी होत  देशांकडून दुर्लक्षित  राहिलेल्या स्वतःच्या गावाचा आणि ओघाने देशाचा विकास साधणारे हे  देशप्रेम भावले मनाला!!! माझ्यातील टीकाकार येथे संपला आणि यात सहभागी होत शाळा सुधारण्याचे नक्की केले. शाळेला ई लर्निग देत शाळा डिजिटल बनविली, सौर ऊर्जा देत वीज बिलातून मुक्ती दिली. या प्रत्येक सुधारणे साठी १५%भाग भांडवल देवून गावातील मोलमजुरी करून उदर निर्वाह करणार्या या  ' माणसांनी खूप शिकविले मला.'  त्याचा देखभालीचा खर्च सुध्दा संपूर्ण उचलत त्यांनी  ' श्रीमंत ' या शब्दाला एक वेगळेच परिमाण दिले.


अशा अनेक ग्रामीण शाळा या ग्रामस्थांच्या दानपत्राने दिलेल्या जागांमुळे अस्तित्वात आहेत हे कळल्यावर मन वेगळ्या दुनियेत जाते आणि चांगल्या माणसाची कमी नाही हे प्रकर्षाने जाणवले. सकारात्मक विचार सर्णीचे असे अनेक पाठ मिळाले मला या वस्त्यामधून फिरताना. दाता या दाना बद्दल कधी शब्द सुधा काढत नाही तोंडातून!!!

अशा अचंबित करणाऱ्या अनेक सत्यकथा माझ्या मनात खोलवर रुजल्या. मला माणूस म्हणून जगण्यास प्रवृत्त केले यांनी!!!!

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे!!

(डॉ माधव नारायण साठे यांच्या फेसबुक वाल वरून)

Friday, 19 March 2021

शिक्षक

 शिक्षक

मी दारात आलो, नेहमीसारखे जोडे काढून हातात घेतले आणि ओपीडीत आलो. समोरच एक वृद्ध उभा होता. 

"सर, तुम्ही?" मी त्या वृद्धाचा हात धरत म्हटलं.

"कोण?"

"मी xxx....तुमचा विद्यार्थी." मी माझं नाव सांगितलं.

"होय काय?....चेहऱ्यात खूप फरक पडलाय रे!...तब्बेतीनं पण मोठा झालायस....शाळेत होतास तेव्हा केवढा मरतुकडा होतास." सरांच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्ट तोंड धरून हसली.

"चला की सर!....आत चला." मी हातातले चप्पल रिसेप्शनिस्टच्या काऊंटरखाली ठेवत सरांना म्हटलं.

"नको,तू जा....मी येतो माझा नंबर आल्यावर."

"सर, नंबराचं काय घेऊन बसलाय?....तुम्ही माझे गुरू आहात... माझ्याबरोबर चला आत."

"अरे, नंबराचं काय म्हणजे?" सर माझ्याकडं आश्चर्यानं बघत म्हणाले,"जगात नंबरालाच सर्वात जास्त महत्त्व आहे....तुझा वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा... पण प्रगतीपुस्तकावर मी  उत्तीर्ण क्रमांक १ च्या ठिकाणी उत्तीर्ण क्रमांक २ असंलिहलं असतं तर तुला चाललं असतं का?...नाही ना?...माझा साठावा नंबर आहे....म्हणजे माझ्या आधीचे एकोणसाठ जण माझ्या आधी नंबर लावून बसलेत....त्यांचा हक्काचा नंबर डावलून मी आत येणं बरं दिसतं का?"

"पण सर..."

"तू जा.....कामाला लाग....तू बोर्डवरल्या टायमिंगच्या आधी आलास त्याबद्दल तुझं कौतुक....शाळेत उशीरा आलास म्हणून मी छड्या मारायचो तेव्हा मारक्या म्हशीसारखा माझ्याकडं बघायचास पण आता त्या छड्यांचं महत्त्व लक्षात आलं असेलच.....तेव्हा छड्या दिल्या नसत्या तर आता आला असतास तासभर उशिरानं."

 "सिस्टर, यांचे केसपेपरचे पैसे घेऊ नका." मी केबिनमध्ये जाता जाता रिसेप्शनिस्टच्या कानात कुजबुजलो...पण तेही सरांना ऐकू गेलंच.

"काय बोललास?...पैसे घेऊ नको?" सर माझ्यावर ओरडले,"पैसे तर तुला घ्यावेच लागणार....मी तुझा शिक्षक आहे म्हणून मी काही फुकट शिकवलं नाही तुला.....वीस हजार रुपये पगार घेत होतो सरकारकडनं....हां, आता तुलाही सरकार पैसे देत असेल तर नको घेऊ पैसे."

       मी हसत हसत आत आलो आणि पेशंट बघायला सुरुवात केली. पेशंट बघता बघता सीसीटीव्हीमधून माझं सरांकडे लक्ष होतंच. तीन तासांत सरांनी बसायच्या किमान तीस जागा बदलल्या असतील.

          नंबर आल्यावर सर आत आले. आल्या आल्या त्यांनी माझा हात हातात घेतला. तो आपल्या छातीवर दाबला आणि सर बोलले,"बाळा,मला खूप खूप आनंद झालाय. खूप कमावलंस तू."

"एवढंही काही नाही सर!"

"नाही कसं?....अरे, मघापासून मी तुझ्या सगळ्या नव्या जुन्या पेशंटशी बोलतोय.....पण एकही माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलायला तयार नाही....सगळे गुणगानच गातायत. छाती अभिमानानं भरून आली माझी." बाहेर सर आपल्या बसण्याच्या जागा सारखं का बदलत होते ते आता लक्षात आलं.

"सर, तुम्ही शाळेत शिकवत होतात तेव्हा तरी कुठला विद्यार्थी तुम्हांला नावं ठेवायचा?.....समोरच्या माणसाशी प्रेमानं वागायचं, आपलं काम सचोटीनं करायचं हे तुम्हीच तर शिकवत होतात ना !...आज या वयातही तुम्ही तुमची तत्वं सोडायला तयार नाही आहात....मीही त्याच तत्वानं जगतोय. ...त्यात मी विशेष काही करतोय असं काहीच नाही. प्रेमानं व्यवहार केला की जगणं सुंदर होतं हे शिकवतं तेच तर शिक्षण!"

"तू शाळेत होतास तसाच आहेस....खेड्यातला साधा सरळ मुलगा."

"आता आयुष्यभर हा विद्यार्थी असाच राहू दे असा आशीर्वाद द्या !" मी म्हटलं आणि सरांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

"आईबाप आणि शिक्षक यांचं असंच असतं बघ....मुलं वाईट निपजली तर त्यांना वाईट वाटतं आणि मुलं नीतीवंत जन्मली तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं... पण असे आनंदाश्रू आजकाल दुर्मिळ झालेत रे!"

      सर पुढं बरंच काही काही बोलत होते आणि त्यांचा विद्यार्थी भान हरपून ऐकत होता....वाटत होतं सरांचं हे बोलणं कधी संपूच नये!...असे शिक्षक मिळणं म्हणजे भाग्यच नाही का? दुसऱ्याच्या मुलासाठी अश्रू गाळणारे शिक्षक आजही असतील का हो?


लेखक -अनामिक

 सर्व हक्क लेखकाला

 माझ्या सर्व शिक्षक व शिक्षण स्टाफ ला समर्पित

(व्हॅट्स अँप साभार)

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...