पुस्तक परिक्षण
शाब्बास गुरुजी : अध्यापनातील नवी क्षितिजे
-----------------------------
शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मुल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे.ही अविरत चालणारी आहे. सरकारच्या विविध उपाययोजना आणि उपक्रमांमुळे जिल्हा परिषद मधील शाळांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.शिक्षण हे सर्वाधिक सृजनशील क्षेत्र आहे.केवळ पारंपारिक अध्यापन पद्धतीचा अवलंब न करता विविध उपक्रमातून विध्यार्थ्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी केलेली धडपड आणि राबविले उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत.
अशाच उपक्रमशील,सर्जनशील शिक्षकांचे दैनिक सकाळमध्ये राजेंद्र दिघे यांनी शाब्बास गुरुजी या सदराच्या माध्यमातून उपक्रमशील शाळा आणि शिक्षकांच्या कामाचा लेखाजोखा मांडला.त्या लेख मालेतील निवडक ५५ उपक्रमशील हिऱ्याची कहाणी लेखक- राजेंद्र दिघे लिखित चपराक प्रकाशित शाब्बास गुरुजी हे पुस्तक हाती पडलं.
खरं तर खूप दिवसापासून 'सकाळ' च्या माध्यमातून सर्जनशील,उपक्रमशील, प्रयोगशील,तंत्रस्नेही शिक्षक,आणि त्यांनी घडवलेल्या शाळांबाबत माहिती आपण वाचत होतो.अशा शिक्षकांचं आणि त्यांच्या राबवलेल्या उपक्रमांचं संकलन व्हावं अशी मनीषा होती.चपराकने ती पूर्णत्वास आणली.
सकारात्मक,समविचारी लोकं एकत्र आली की त्यांची निर्मिलेली प्रत्येक गोष्ट ही नावीन्य घेऊन येते.अशाच नाविन्यपूर्ण गोष्टींनी समाजाला एक वेगळी परिवर्तनाची दिशा मिळत असते. अशाच परिवर्तनवादी, ध्येयवादी,आणि सकारात्मक शिक्षणातील हिऱ्यांच्या कर्तृत्वावर राजेंद्र दिघे यांनी प्रकाश टाकला. आदिवासी भागातील वर्षभर चालणारी हिवाळी शाळा आणि त्यासाठी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केशव गुरुजींची धडपड, फागंदर वस्तीशाळ तीची आयएसओ पर्यंतची प्रगती- त्यासाठी योगदान देणारे खंडू मोरे,विमान प्रवास घडवणारी कुंदा बच्छावांची शाळा,अभिनय संपन्न वाघ गुरुजींची शाळा,भोयेगावची आंतरराष्ट्रीय शाळा आणि नाविन्यपूर्ण शिक्षण देणारे निवृत्ती आहेर , अंगणगाव शाळेचे राज्यस्तरीय यश आणि मुले रमतांना आनंद शोधणारे गोकुळ वाघ, इंग्रजीची गोडी निर्माण करणारे आणि लेकरांसमवेत भावनिक ऋणानुबंध जुळवणारे तंत्रस्नेही प्रवीण शिंदे, हिरावाडीची निखर्व पर्यंतची संख्या वाचणारी मुले-नकारात्मकतेला झुगारत सकारात्मकतेकडे घेऊन जाणारे शशिकांत शिंदे,अतिदुर्गम धामडकीवाडी येथील प्रमोद परदेशी यांचा राज्यात प्रसिद्ध टी.व्ही. पॅटर्न, सोपान खैरनार यांचा संघर्षमय प्रवास ते गुणवत्ता वाढीचा ज्ञानयज्ञ पर्यंतची वाटचाल,मुलांमध्ये लेखन कौशल्य विकसित करणारे भरत पाटील ,पर्यावरणाचा विचार करून थेट पंतप्रधानांना पत्र लिहणारी पर्यावरण समिती - खालप फाट्याची शाळेतील वैशाली सूर्यवंशी,नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या दहिवड शाळेच्या नीलिमा पगार मॅडम,माणके शाळेत स्थलांतराचे प्रमाण रोखण्यासाठी पालकांची मनस्थिती बदलवणारी -सुजाण समाजाभिमुख पिढी घडवणारी शिक्षिका वैशाली भामरे
टेहरे येथील शाळेत इंग्रजीचे धडे देणाऱ्या नूतन चौधरी ,माधुरी पवार,आशा सोनवणे, नयना वाघ अशा कितीतरी सावित्रीच्या लेकींची नावे घेता येतील.खरं तर दुसऱ्याचं मोठेपण जाणून घेण्यासाठी आपलं मन मोठं असावं लागतं. हे मोठेपण दिघेंच्या लिखाणातून सिद्ध होतं ही बाब इथं नमूद करणे गरजेचे आहे.
राज्यातील असंख्य वाडी- वस्तीतील,अतिदुर्गम भागातील नव्हे तर मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी आजच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये शिक्षकाने केवळ शिक्षणापूरते मर्यादित न राहता शिक्षकाने कोरोना योद्धा म्हणून पोलिसांच्या ,आरोग्य सेवकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.कोविड सर्वेक्षण,लसीकरण जागृतीचे कामे आजही शिक्षणाबरोबर चालू आहे. कोणत्याही कामाला शिक्षक मागं नसतो.समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन जर घडले असेल त्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे.
पुस्तक वाचतांना राजेंद्र दिघे यांचे हळवे कवीमन कायम दिसते.पुस्तकाची भाषा अतिशय ओघवती आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांमध्ये उगाचच काहीही टिपण्णी केलेली किंवा सूचना केलेल्या दिसत नाही.शिक्षकांच्या उपक्रमाची वास्तववादी मांडणी लेखकाने ओघवत्या शैलीमध्ये केलेली आहे. हेच अंतर्मनापर्यंत पोहचतं.महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात असे नाविन्यपूर्ण प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात चालू आहेत आणि त्याची दखल प्रसारमाध्यमे घेत आहेत.ही एक शिक्षणक्षेत्रासाठी आशादायी ,शिक्षकांसाठी प्रेरणादायी बाब आहे
आपल्या अपेक्षित कामांपेक्षा अधिक मेहनत व तीही कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन हे गुरुजण काम करीत आहेत.आज जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकलीय.जीव ओतून धडपडणारे शिक्षक व त्यांचे कार्य हे समाजासमोर व इतर शिक्षकांसमोर लेखकाने "शाब्बास गुरुजी" ह्या पुस्तकाच्या माध्यमातून ठेवले आहे. हे पुस्तक केवळ उपक्रम दर्शवणारं किंवा शिक्षकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देणारं नसून त्यात साहित्यमूल्यही आहे हे मुद्दाम सांगावेसे वाटते. प्रत्येकाच्या वैयक्तिक वाचनालयात संग्रही ठेवावे असेच "शाब्बास गुरुजी" हे वास्तववादी पुस्तक आहे.पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके आणि रंग संगतीयुक्त चित्रकार संतोष घोंगडे यांनी केले आहे.पुस्तकाची छपाई आणि बांधणी उत्तम झाली आहे.शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी पुस्तकाची अतिशय बोलकी आणि अंतर्मनात पोहचणारी अशी सखोल प्रस्तावना दिली आहे.कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सुजाण नागरिक घडवण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या प्रयोगशील शिक्षक,शिक्षिका व नवसर्जनाच्या वाटेवर असलेल्या शाळा यांची समाजाला सखोल माहिती शाब्बास गुरुजी च्या रूपाने मिळेल अशी आशा व्यक्त करून शुभेच्छा रुपी पाठराखण ओघवत्या शैलीत केली आहे.
पुस्तक-शाब्बास गुरुजी
लेखक- राजेंद्र दिघे
प्रकाशक- घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ-संतोष घोंगडे
पृष्ठे-१७६
मूल्य-२५० रू.
पुस्तक परिक्षण -
संजय गरबड मराठे
९४२१९७३८८८
No comments:
Post a Comment