पराग प्रतिष्ठान निर्मित अत्रेमय 'अ' अर्थात अत्रेंचा.
प्रल्हाद केशव अत्रे हे एक महाराष्ट्रातील झंझावाती व्यक्तिमत्व मानलं जातं. साहित्य,शिक्षण,नाटक,चित्रपट, राजकारण,पत्रकारिता अशा विविध क्षेत्रामध्ये त्यानी आपला भारदस्त ठसा उमटवला. या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा विलक्षण दबदबा होता. महाराष्ट्रातील जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. ते एक उत्तम वक्ते होते.त्यांच्या भाषणाचा अवघा महाराष्ट्र दिवाना होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांची भूमिका महत्वपूर्ण होती. त्यावेळचे त्यांचे वाद आणि किस्से अवघा महाराष्ट्र जाणतो.
मराठी साहित्य,नाट्य,चित्रपट,राजकारण इत्यादी गोष्टींचा अभ्यास करायचा म्हटल्यास आचार्य अत्रें शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यांच्या लेखणी आणि वाणीवर अवघा महाराष्ट्र फिदा होता. अत्रे एक आदर्श शिक्षक ,कवी,कादंबरीकार,नाटककार,चरित्रकार,पटकथाकार,विडंबन,बालसाहित्य, अग्रलेख, चित्रपट ,लेखक, दिग्दर्शक,लोकप्रिय संपादक,प्रभावी वक्ता,झुंजार पत्रकार या सर्व गोष्टींचा विचार करून पराग प्रतिष्ठान यांनी आचार्य अत्रे यांच्या एकशे पंचविसाव्या जन्मवर्षं निमित्ताने अत्रेमय 'अ' अर्थात अत्रेंचा हा कार्यक्रम शनिवार दि.21 जानेवारी 2023 रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे पार पडला.
अत्रेमय नावातच सर्व....तरीही त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतुन निखळ आनंद गवसतो.आज सादर झालेल्या सर्व कलाकृती त्यांचे साहित्य कालातीत असल्याची साक्ष पटवते. त्यांची विनोदबुद्धी दैनंदिन जीवनात ही तितकीच बहरायची. अत्रेंच्या नाटकांतील (तो मी नव्हेच) असो की मोरूची मावशी आपण आजही त्या नात्यात तल्लीन होऊन जातो.
कॉलेज जीवनात ऐकलेली वाचलेली प्रेमाचा गुलकंद ही कविता आजच्या अति वेगवान आणि प्रेमाचे सर्व मापदंड बद्दलल्यानंतरही मिश्किल भाव मनात आणण्यात यशस्वी होते.
पाठ्यक्रमात असलेली आजीचे घड्याळ या नाद ,ताल ,लय यांनी परिपूर्ण कविता पुन्हा बालपणात घेऊन जाते..... आणि खरोखर त्याकाळी याच घड्यालावर सर्व काही चालायचे याची मनाशी नोंद होते.
श्यामची आई ही महाराष्ट्राची संस्कृती जपण्यास हातभार लावणारी संवेदनशील कलाकृती अजरामर केली ती श्यामची आई या चित्रपटाने,या चित्रपटाची भुरळ आजही कायम आहे.तसेच महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित कलाकृती व त्यातील बोलके प्रसंग,तो मी नव्हेच या नाटकातील एक मिश्किल प्रसंग साजरा करून तो विनोद आजही तितकाच ताजा असल्याची जाणीव झाली,
देह देवाचे मंदिर ऐकताना संपूर्ण सभागृह तल्लीन झाले होते...यमुनाजळी खेळ खेळूया हे दोन्ही काळाचे संदर्भ देऊन सादर केले गेले नि रंगांची योग्य रचना किती तरी शब्दांचे काम स्वतःच करते ,अप्रतिम परिणाम साधते.
ब्रम्हचारी, मोरूची मावशी हे आपल्या चित्रपट सृष्टीतले कधीही विसमरणात न जाणारे चिरकाल टिकणारे ऐवज आहेत.
नाटक, कथा,कादंबऱ्या,त्यावर आधारित चित्रपट इथपर्यंतच अत्रेंचा वावर मर्यादित न राहता त्याकाळच्या समाजावर त्यांच्या विचारसरणीचा ठसा उमटलेला आपल्याला दिसतो. समकालीन साहित्यिक,विचारवंत यांच्याबरोबरीचे त्यांचे नाते , महाराष्ट्र मुक्ती संग्रामातले त्यांचे योगदान, मुंबई महाराष्ट्राचीच रहावी म्हणून सरकार विरोधात केलेले आंदोलन किंवा मराठा पत्र मधून सरकारला धारेवर धरण्याची त्यांची बुलंद लेखणी... असे कितीतरी पैलूंना गवसणी घालण्यात हा कार्यक्रम यशस्वी झाला.
अत्रे यांच्याबद्दल महाराष्ट्राला माहिती आहेच परंतु कालौघात त्यांचे विचार, स्पष्टोक्ती, धडाडी, समाजाप्रती जाणीव यांची आजच्या पिढीला माहिती होणे महत्त्वाचे त्यादृष्टीने हा कार्यक्रम खूप काही देऊन जातो.
कार्यक्रम लेखनाची धुरा श्री.सुनिल सावंत यांनी सांभाळली असून कार्यक्रमाचं दिग्दर्शन श्री.अभिजित अरुण कांबळी यांनी लिलया आणि डोळ्याचं पारणं फिटेल असं केलंय. श्री.नितीन गलांडे यांचं संगीत मंत्रमुग्ध करतं. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी रागिणी यादव कांबळी यांनी चोख बजावली आहे.नेपथ्य कला श्री.पराग शितोळे ,सिद्धी तळाशिलकर यांनी आहे. गायक प्रिया लोणकर,पल्लवी बुलाखे,संतोषकुमार वाघमारे आणि सार्थक खैरनार यांनी कार्यक्रमाला उत्तम आवाज लावलाय.चार्वाक जगताप यांचा तबल्यावरची बोटे,नितीन गलांडे याची ढोलकीवरील थाप,प्रथमेश मोहिते यांचा किबोर्ड, आणि अभिराग कांबळी यांची गिटार आपल्याला गतकाळात घेऊन जाते.
श्री.सुनील सावंत आणि उर्मिला सावंत यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.अजय गांगण, कबीर जगताप,सुप्रिया तळेकर,अभिजित कांबळी,अभिजित बावळे, आर्यन तळेकर,अन्वय देवधर,अनया तळेकर,प्रणय चव्हाण,सार्थक खैरनार,स्वराज केळुस्कर,सोनाक्षी कांडकर अश्विनी परदेशी,माधवी भोसले,आर्ची गांगण,हेमंत शिंदे,निलेश खानोरे, विजय जाधव इत्यादी कलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली.एक दर्जेदार आणि हशा आणि टाळ्यांनी रेलचेल म्हणजे पराग प्रतिष्ठान निर्मित "अत्रेमय 'अ' अर्थात अत्रेंचा" प्रयोग.
संजय गरबड मराठे
उल्हासनगर - 4
9421973888
No comments:
Post a Comment