शाळा

Wednesday, 29 April 2026

मिशन भरारी : कष्टाच्या मातीतून अंतराळाकडे

 ✈️मिशन भरारी : कष्टाच्या मातीतून अंतराळाकडे...🚀


                 ग्रामीण भारताच्या विकासाची चर्चा जेव्हा होते, तेव्हा ती बहुधा रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या भौतिक पायाभूत सुविधांभोवतीच रेंगाळते. मात्र, खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास हा तिथल्या मानवी क्षमतेच्या विकासावर अवलंबून असतो. ठाणे जिल्हा परिषदेचा ‘मिशन भरारी’ हा उपक्रम याच मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधणारा आणि ग्रामीण सुप्त गुणवत्तेवर टाकला गेलेला एक आश्वासक विश्वास आहे. "शिका आणि मोठे व्हा" या पारंपरिक ब्रीदवाक्याला "बघा, अनुभवा आणि सिद्ध करा" या आधुनिक कृतीशीलतेची जोड दिल्याने कष्टाच्या मातीतूनही भविष्यातील शास्त्रज्ञांचे 'साज' फुटू शकतात, हे या उपक्रमाने जगाला दाखवून दिले आहे.

                    कोणताही मोठा बदल हा नेतृत्वाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. ठाणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासन यांचे या निमित्ताने विशेष कौतुक व्हायला हवे. शासकीय कामकाजात केवळ फाईली आणि आकडेमोड यात न अडकता, ग्रामीण मुलांच्या डोळ्यांत जागतिक स्वप्ने कशी पेरता येतील, याचा ध्येयवादी विचार त्यांनी केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेपर्यंत ग्रामीण मुलांचा प्रवास सुकर करणे, हे केवळ प्रशासकीय कल्पकतेचे उदाहरण नाही, तर ती भविष्यातील देशासाठी केलेली मोठी गुंतवणूक आहे. केवळ भौतिक विकासावर निधी खर्च करण्यापेक्षा मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर आणि त्यांच्या जाणिवांच्या विस्तारावर खर्च करणे, हा 'मानवी भांडवल' (Human Capital) विकसित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

                   या संपूर्ण मोहिमेचे खरे सारथी म्हणजे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. ज्या व्यवस्थेला अनेकदा टीकेचे लक्ष केले जाते, त्याच व्यवस्थेतील शिक्षकांनी प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक ठिणगी ओळखली. पाठ्यपुस्तकातील निर्जीव धड्यांना 'इस्रो'च्या प्रत्यक्ष अनुभवाची जिवंत जोड देण्याचे काम या शिक्षकांनी केले. निवडीच्या पारदर्शक प्रक्रियेपासून ते मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यापर्यंत शिक्षकांनी घेतलेली भूमिका या मोहिमेचा कणा आहे. त्यांच्या या सकारात्मक भूमिमेमुळेच आज जिल्हा परिषदेची मुले शास्त्रज्ञांच्या समोर पूर्ण आत्मविश्वासाने उभी राहू शकली. हा आत्मविश्वास केवळ वैज्ञानिक ज्ञानापुरता मर्यादित नसून, तो न्यूनगंड नाकारण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे.

                     ग्रामीण भागातील पालक आणि समाज यांच्या सहभागाशिवाय हा यशाचा टप्पा गाठणे अशक्य होते. एकेकाळी केवळ शेती किंवा स्थानिक रोजगार हेच मुलांचे भविष्य मानणारा पालक वर्ग आज आपल्या पाल्याला अंतराळ संशोधनासारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात पाहण्याचे स्वप्न पाहू लागला आहे. जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा वाढलेला हा विश्वास, हा या उपक्रमाचा सर्वात मोठा सामाजिक विजय म्हणावा लागेल. ग्रामीण जनता आता केवळ मोफत सुविधांची अपेक्षा करत नाही, तर ती 'गुणवत्तापूर्ण' शिक्षणासाठी जागरूक झाली आहे, हे यातून स्पष्ट होते.

                     भारतीय ग्रामीण भागात बुद्धिमत्ता आणि कष्टाची तयारी ठासून भरलेली असते, मात्र संधींचा अभाव या प्रतिभेला मर्यादा घालतो. 'मिशन भरारी'ने ही मर्यादा तोडण्याचे काम केले आहे. तरीही, हा प्रवास इथेच थांबून चालणार नाही. विज्ञानाची ही ओढ केवळ एका उपक्रमापुरती किंवा एका सहलीपुरती मर्यादित राहू नये. ही भरारी निरंतर राहणे ही काळाची गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी विशेष 'मेंटॉरशिप' (मार्गदर्शन) उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्रामीण शाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि 'अटल टिंकरिंग लॅब्स'चे जाळे अधिक विस्तारले पाहिजे, जेणेकरून इस्रोहून परतलेली ही ऊर्जा शाळेत प्रयोगशाळेच्या स्वरूपात टिकून राहील.

                      'मिशन भरारी' ही केवळ एक शैक्षणिक सहल नसून ती ग्रामीण महाराष्ट्राच्या आकांक्षांचे 'लॉन्चिंग पॅड' आहे. कष्टाच्या मातीतून यशाचे कोंभ फुटू शकतात, हे आता सिद्ध झाले आहे. अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांतून उभी राहिलेली ही चळवळ राज्याच्या शैक्षणिक इतिहासात दिशादर्शक ठरेल. आता गरज आहे ती या ठिणगीचे रूपांतर एका अखंड वैज्ञानिक क्रांतीत करण्याची. हे पाऊल भविष्यात देशाला केवळ पदवीधर नाही, तर राष्ट्र घडवणारे ध्येयवादी नागरिक आणि जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ अर्पण करेल, यात शंका नाही.


✒️संजय गरबड मराठे

 जिल्हा परिषद शाळा पादिरपाडा,

तालुका - अंबरनाथ, जिल्हा - ठाणे.



No comments:

Post a Comment

मिशन भरारी : कष्टाच्या मातीतून अंतराळाकडे

 ✈️मिशन भरारी : कष्टाच्या मातीतून अंतराळाकडे...🚀                  ग्रामीण भारताच्या विकासाची चर्चा जेव्हा होते, तेव्हा ती बहुधा रस्ते, पाणी...