काही प्रवास कायम आठवणीत राहणारे असतात. काही खूप सुंदर तर काही अगदी नकोसे तर काही मन कासावीस करणारे. आणि जर असा एक प्रवास त्या प्रवासात गरिबी,पायपीट,उपासमार,मजबुरी,हताश मन,जगाचा कठोरपणा,आणि एक मोलाचा संदेश कोवळ्या बालवयात जर अनुभवला तर ??
आताच एक विचार वाचण्यात आला रिकामा खिसा,मोकळे पोट,तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जगण्याची कला शिकवते एव्हना जगातले आपले अस्तित्व दाखवते असे म्हणले तरी चालेल.
हो अनेक चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे.त्यापैकी जगातले एक विदारक पण कटू सत्य दाखवणारा प्रवास म्हणजेच "७२ मैल एक प्रवास "हा चित्रपट.
अगदी चिड आणणारा आणि हताश हतबल व्यक्ति साठी जग काय असते याची एक सत्य कहाणी लेखक अशोक व्हटकर यांच्या त्या कोवळ्या बालवयात आलेल्या प्रवासावर आधारित आहे.
दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या टीम ने २०१३ मध्ये हा मराठी चित्रपट मांडून हि सत्य कथा प्रदर्शित केली. अशोक व्हटकर यांची भूमिका चिन्मय संत या बालकलाकाराने उत्कृष्ट केली.
लेखकाची घरची परिस्थिती हलाखीची. वडिल नाटक कंपनीत काहीतरी काम करत त्यामुळे मुंबई ला असत. घरी अजून दोन छोटी भावंडे.लेखक त्या वयात खूप निगरगट्ट,हट्टी,अभ्यासाचा कंटाळा,दिवसभर भटकणे खेळणे असे प्रकार त्यामुळे वैतागलेले कुटुंब. शेवटी हा सुधारावा म्हणून बोर्डिंग ला ठेवावे असे ठरते बालवयात बोर्डिंग बद्दल खूप काही भीती वाटत. तिथे आई वडिलांपासून लांब राहावे लागते. स्वतःची कामे स्वतः करावी लागतात.त्रास देता येत नाही. जर त्रास दिला तर खूप मार मिळतो अमुक तमुक.
थोडक्यात बोर्डिंग म्हणजे काहीतरी खूप डेंजर!!!! अशीच मनस्थिती लेखकाची होते.
आणि त्यांना अखेर सातारच्या प्रसिद्ध अशा बोर्डिंग मध्ये त्यांचे मुळातच रागीट असलेले वडील दाखल करतात. अजिबात ऐकत नाही,अभ्यास करत नाही,मस्ती करतो असे काही मास्तरांना सांगून मास्तरांबद्दल अजूनच एक अनामिक भीती लेखकाच्या मनात घर करून राहते.वडील निघून जातात लेखक हिरमुसून जातो तिथे इतर मुले त्याची समजूत काढतात, मास्तर पण इथे किती छान मुले राहतात रमतात असे सांगून पाहतात पण मनात ठाम केलेले कि इथे राहायचेच नाही बस्स!! त्यामुळे तिथे रमण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि अखेर लेखकाला ती संधी मिळते. पळून जाण्याची. अर्थातच त्याच्या घरी कोल्हापूरला.
तो पळून जाताना तिथली वसतिगृहातली काही मुले त्याचा पाठलाग करतात,हा कसाबसा तिथून सटकतो.
आणि सुरु होतो प्रवास एक असा प्रवास जिथे त्या बालवयात वय अवघे १३ वर्ष अनेक कटू अनुभवांची विदारक सत्य,भय,चिंता,हाल आणि खूप काही.
१९५०-६० चा तो काळ.दूरदूर वर गावे. निर्मनुष्य रस्ता.खिशात दमडी नाही कि पायात चप्पल. मग तिकीट काढायला पैसे नाहीत म्हणून एस.टी मधून हाकलून बाहेर काढले, तर वाटेत दारुड्यानी केलेली अडवणूक, तर कुठे बैलगाडी वाला गाडीत बसवतो पण खालच्या जातीचा आहे कळताच मारहाण करत हाकलतो. मग वाटेत मिळतात सहप्रवासी. हो सहप्रवासी या साठी कि एक दुःखीच दुसऱ्याचे दुःख समजू शकतो आणि या कुटुंबाने लेखकाची विचारपूस करून आपल्या समवेत घेतले. प्रवासात घेतले. त्या कुटुंबात एक स्त्री{ राधाक्का - अभिनय स्मिता तांबे }. गांजलेली.तिची दहा बारा वयाच्या दोन मुली {भिमी आणि बायजी },एक जरा मोठा मुलगा{ रानू - अभिनेता चिन्मय कांबळी}. अन एक हातात तान्हुले बाळ.नवरा एकेकाळी खूप मेहनती प्रामाणिक पण काही कारणास्तव पोलीस आरोप आणि त्यांच्या कुटुंबाचा झालेला विस्कट. पण ती स्त्री हार मानणारी नव्हती. ती जगत होती तिच्या लेकरांसाठी. शिरवळ वरून सांगली कडे पायी निघाले होते ते कुटूंब.
मग त्यांच्या प्रवासात झालेली उपासमार,कुठे ऊस खाऊन तर कुठे भीक मागून मिळेल तो तुकडा सर्वानी वाटून खाऊन मनाचा दाखवलेला मोठेपणा, वाटेत लोकांनी दिलेली वागणूक अन माणसातला न ओळखलेला देव. रस्ता लांबलचक होता जायचे कुठे ते हि माहित होते पण टीचभर पोट समाधानी कुठे होते ??
या वेळी ," #देवा #सुंदर #जगामध्ये #का #रे #माणूस #घडविलास, #भीक #मागण्या #भूक #दिली_जन्म #जाळण्या #दुःख #दिले'' अतिशय अर्थपूर्ण गीत रचना आहे.
वाटेत तान्हुला पोर जीव सोडतो आणि त्याचा त्या कठोर जगातला प्रवास कसा संपतो,त्याला माती टाकताना लेखकाची मदत होते. मग हा कोणता ऋणानुबंध होता? पुढे एका विहिरीत भुके पोटी यांनी कोणीतरी टाकलेला उतारा दिसतो (अन्न )मग ते घेतल्यावर त्यांच्या मागे नाग लागतो, त्यांची वाट अडवतो, ती माय त्या नागाला हात जोडते,माफी मागते.वाट सोड म्हणते. नाग काही ऐकत नसतो पण अखेर एक ट्रक त्या नागाला चिरडतो.
”#हात #का #जोडले ?” या लेखकाच्या प्रश्नावर राधाक्का म्हणते, "#या #जगात #टिकायच #असेल #तर #हात #जोडावे #हि #रीत #हाय #जगाची." हतबलतेचे किती मोठं उदाहरण इथे शिकायला मिळते. अन अखेर दुर्दैवाने दुसरा नागच तो थोरल्या कळत्या आणि राधाक्काला आधार असलेल्या एकमेव पोराचा जीव कसा घेतो अतिशय दुःखद घटना घडते. त्या आईच्या यातना दुःख पाहवत नाही.कितीतरी दुःख गिळून यांचा प्रवास चालूच असतो. वाटेत रात्री कुठं तरी छोटेसे हॉटेल दिसते तिथे मूठभर शेवेसाठी मुलांचं भूक भागावी म्हणून राधाक्काला मजबुरी खातीर कसे त्या हॉटेल मधल्या कामगाराला खुश करावे लागते हा प्रसंग खूप राग आणणारा आहे.
या सर्व गोष्टी लेखकाच्या मनावर खोलवर परिणामकारक ठरतात. त्याला कळत असते पण व्यक्त होता येत नव्हते. पुढे लेखकाचे गावाचा फाटा लागतो. राधाक्का आणि तिच्या उरलेल्या दोन मुली मोठ्या जड अंतःकरणाने लेखकाचा निरोप घेतात. लेखकाचे डोळे भरून येतात ३ दिवसांच्या प्रवासात एका आई पेक्षाही तिने त्याला माया लावली होती. त्याने खूप काही कटू अनुभव पाहिलेले असतात.जगात कोणीही विद्वान जे धडे देणार नाही ते धडे लेखक राधाक्काकडून शिकतो. राधाक्का जाताना सांगते," #पोरा #मोठा_हो,शिक.."
ती हार न मानणारी,पुढे कोणतेही ध्येय नसलेली,वाटेत दोन मुले गमावलेली, सोबत अबला दोन लहान मुली असलेली,जिचा भूतकाळ कटू होता वर्तमान भयानक होता आणि भविष्य माहित नव्हते अशी ती अडाणी पण खूप काही माणुसकी, जग आणि वास्तवतेचा धडा देणारी राधाक्का. यांच्या वाटा बदलतात. मागे वळून वळून पाहत असतात. पण नाईलाज असतो. राधाक्का आणि तिच्या दोन मुली नजरेआड होतात इथे कुठं तरी हायसे वाटते कि अखेर तो लेखक घरी तरी पोहोचला.चित्रपट जरी इथे संपत असला तरी पुढे काय होते झाले असेल हे प्रश्न प्रेक्षकांना पडतातच पण मूळ पुस्तक वाचले कि कळते पुढे जाऊन लेखक शिक्षक होतात,एक समाजातील चांगली व्यक्ती सोबत एक जबाबदार सांसारिक होतात पण तो बालवयातील प्रवास त्यांच्या मनावर कायम खोल रुतून बसला आहे. त्यांनी पुढे खूप शोध घेतला राधाक्काच्या सांगली गावी पण काही फायदा नाही. काहीच कळू शकले नाही. त्यांना खूप आभार मानायचे होते त्यांचे कि तुमच्या मुळे मी घडलो!! पण नाही.लेखकाच्या मनाची केविलवाणी अवस्था कशी होत असेल आणि आयुष्भर ती पुन्हा भेट न होणे याचे दुःख ज्याचे त्यालाच कळते.
पण पुढे राधाक्का आणि तिच्या मुलींचा प्रवास कसा झाला असेल? काय झाले असेल? माहित नाही. लेखकाला जर राधाक्का आणि तिचे कुटुंब भेटलेच नसते तर ? मूळ कथा वाचली कि अजून मन हेलावून जाते आणि या सुंदर जगातील कठोरता,गरिबांचे अस्तित्व,मजबुरी,स्त्रीच्या वाटेला आलेला संघर्ष अशी अनेक विदारक सत्य दिसून येतात.
चित्रपटामध्ये काही मर्यादा दाखवून सत्य मांडण्याचा दिग्दर्शक राजीव पाटील यांचा प्रयत्न सुंदर झाला आहे. त्यांनी त्या कथेला जगासमोर आणून जगाची एक बाजू देखील कळू शकली
Twinkle Khanna यांची निर्मीती आहे. स्मिता तांबे यांनी राधाक्का ची केलेली प्रमुख भूमिकेला तोड नाही. सोबत लेखक अशोक व्हटकर यांची भूमिका चिन्मय संत आणि इतर बालकलाकारांचा अभिनय उत्कृष्ट केला आहे.
एक सत्य प्रवास.
व्यक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.काही चुकल्यास सुधारणा सांगावी.
गौरव पाठक (पुणे)
#CinemaGully
खूप छान
ReplyDelete