"भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 सदोष वाक्यरचना
अनेक मराठी माणसांच्या बोलण्यात व लिखाणातही (दूरचित्रवाणीच्या मराठी मालिकांत कधी कधी ऐकू येणारी) आढळणारी पुढील सदोष वाक्यरचना वाचा- ‘त्याने हे काम करायला पाहिजे नको होतं.’
या वाक्याचा अर्थ कळत नाही, असे नाही, पण वाक्यरचना चुकीची आहे, हे निश्चित. वरील वाक्यात ‘पाहिजे’ हे सकारात्मक क्रियापद आहे. ‘नको’ हे नकारात्मक क्रियापद आहे. या वाक्यात ‘पाहिजे’ या क्रियापदाची मुळीच आवश्यकता नाही. हे वाक्य असे हवे- ‘त्याने हे काम करायला नको होतं.’ ‘पाहिजे नको होतं.’ अशा चुकीच्या शब्दयोजनेमुळे आपल्या भाषेविषयी आपली अनास्था दिसून येते.
अशीच एक चमत्कारिक वाक्यरचना बोलण्यात ऐकलेली आहे. (अशी वाक्ये माझ्या वाचनात आलेली नाहीत.)
हे वाक्य असे आहे- ‘तुला हे काम नाही आलं पाहिजे.’ याही वाक्यात ‘पाहिजे’ हे क्रियापद अनावश्यक आहे. किंबहुना, ही वाक्यरचना सदोष आहे. हे वाक्य असे हवे- ‘तुला हे काम जमणार नाही.’ किंवा ‘तुला हे काम करणं जमणार नाही.’
भाषेचा वापर करताना, आशय योग्य पद्धतीने व्यक्त होतो की नाही, याचा विचार अनेक जण करत नाहीत, हे आपल्या भाषेचे दुर्दैव होय. अशा वेडय़ावाकडय़ा वाक्यांतील आशय आपण समजून घेतो, पण ही वाक्यरचना चुकीची आहे, या चुकीला विरोध करत नाही किंवा ती दुरुस्त करण्याचा प्रयत्नही करत नाही. ती आपण चालवून घेतो!
काही शाब्दिक चुका- अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक या शब्दांत ‘ख्या’ या अक्षरावर अनुस्वार नको. या शब्दांचे स्वरूप असे आहे- अल्प संख्या क, बहु संख्या क. ‘क’ हा प्रत्यय आहे. या शब्दांचा अर्थ आहे- ज्यांची संख्या अल्प आहे ते अल्प संख्याक, ज्यांची संख्या बहु(खूप) आहे ते बहु संख्याक. ही विशेषणे आहेत. ‘क’ प्रत्यय लावलेले इतरही शब्द आपल्या परिचयाचे आहेत. अभ्यास क= अभ्यासक, संपादक, वाचक, पूजक इ.
– यास्मिन शेख
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- २१ मार्च २०२२
No comments:
Post a Comment