शाळा

Monday, 21 March 2022

तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला..

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला..


एक खेडेगाव. छान निसर्ग. शुद्ध हवा. निर्मळ वातावरण. सुखी, संपन्न, परंपरेचा वसा सांभाळणारी कर्ती मंडळी. तिथल्या दोन मैत्रिणी जिवाभावाच्या होत्या. एकीचे नाव गोदा आणि दुसरीचे भीमा. दोघींची लग्ने झाली. भीमा शेजारच्या गावात नांदायला गेली. दोघी आपापल्या घरात सुखी होत्या. पण गोदेचा पती अकाली गेला. तो कर्तृत्ववान, मनगटात खूप बळ असणारा होता. त्याने खूप मेहनत करून गाठी संपत्ती जमा केली होती. पुढच्या दोन, तीन पिढय़ा सुखाने बसून खातील अशी तरतूदही घरात होती. पण गोदेचा मुलगा आपल्या वडिलांच्या निधनानंतर ‘उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये’ही उक्ती विसरला. सगळय़ांशी उद्दामपणे वागू लागला. त्याची झळ गोदेला फार लागू लागली. ती मनातल्या मनात कुढू लागली.

अशीच एकदा भीमा काही कारणाने गावात आली. दोघी बऱ्याच वर्षांनी एकमेकींना भेटल्या. भीमाने आपल्या मैत्रिणीची मन:स्थिती ओळखली. वडिलांनी मिळवलेल्या संपत्तीवर हा ‘आयत्या बिळावर नागोबा’ होऊन बसला आहे. याचा माज कोणीतरी उतरवायला पाहिजे. गोदाने भीमाला जेवायला बोलावले. जेवण झाल्यावर शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या. सगळय़ा लेकी सुनांनी तिला ओव्या म्हणण्याचा आग्रह केला. गोदेचा उद्दामपणे वागणारा मुलगाही तिथेच बसला होता. ही संधी साधून भीमा ओव्या म्हणू लागली. 


‘तवा खातो भाकर, चुल्हा राही रे भुकेला,


 अन पोहरा पितो पाणी, रहाट तहानलेला ’ .. गोदेच्या त्या मस्तवाल मुलाला भीमा म्हणाली, ‘‘पोरा ! ही खरे तर एक जुनी म्हण आहे. चालीत ऐकवली तुला. काही म्हणी समजायला खूप सोप्या पण फार अर्थगर्भित असतात, त्यातली ही म्हण आहे. जो मेहनत करतो तो कोरडाच राहतो आणि त्याचा लाभ मात्र दुसराच घेतो, खूपदा असे चित्र आपण बघतो. नाही का ? ज्यांच्या जिवावर तू उडय़ा मारतो आहेस, त्यांचे विस्मरण नको रे बाबा होऊ देऊस ! माझ्या मैत्रिणीला सुखात ठेव इतकंच मागणं आहे बाबा !’’ आणि एका म्हणीने पोराच्या डोळय़ात अंजन घातले.


🖊डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com


🎯चूकभूल


‘भाषासूत्र’ या सदरात २१ मार्चच्या अंकातील यास्मिन शेख यांच्या लेखात शेवटी ‘अल्प संख्याक’ व ‘बहु संख्याक’ असे शब्दरूप प्रसिद्ध झाले आहे. ते चूक असून ते ‘अल्पसंख्याक’ व ‘बहुसंख्याक’ असे एकत्रच हवेत. तांत्रिक दोषामुळे झालेल्या या चुकीबद्दल दिलगीर आहोत. 

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

 दिनांक- २२ मार्च २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...