शाळा

Friday, 12 May 2023

समुद्री जीवित संसाधने व पारिस्थितिकी संस्था

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 समुद्री जीवित संसाधने व पारिस्थितिकी संस्था


भारतीय केंद्र सरकारच्या मत्स्य विभागाची पूर्णत: मत्स्य आणि समुद्रशास्त्र संशोधनाला वाहिलेली, विशेष सोयींनी युक्त अशी ‘सागरसंपदा’ नौका आहे. सागरसंपदावर खोल समुद्राच्या अभ्यासासाठी एक लहानसा विभाग होता. तो ‘डिपार्टमेंट ऑफ ओशन डेव्हलपमेंट’च्या अखत्यारीत येत असे. आता त्याचे नियंत्रण पृथ्वीविज्ञान मंत्रालय करते. केंद्र सरकारच्या पाचव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९९८मध्ये या विभागाचा विस्तार होऊन ‘समुद्री जीवित संसाधने आणि पारिस्थितिकी संस्था’ (सेंटर फॉर लिव्हिंग रिसोर्सेस अँड इकॉलॉजी-सीएमएलआरई) कोचीनला स्थापन झाली.


केंद्र शासनाच्या आदेशानुसार सीएमएलआरई सागरी जैवसंपदा कोणती आणि किती प्रमाणात आहे, याची सूची तयार करते. समुद्री सस्तन प्राणी, काही शैवालांचे हानिकारक ठरेल इतक्या प्रचंड प्रमाणात शीघ्रगतीने होणारे पुनरुत्पादन, सागरी वनस्पती-प्राणीप्लवक सर्वेक्षण आणि जैवविविधतेचा अभ्यास, ही सीएमएलआरईची कामे आहेत. २००४मध्ये आलेल्या त्सुनामीच्या समुद्री जीवांवरील परिणामांवर सीएमएलआरईने संशोधन केले. नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत अन्य संस्थांबरोबर जैवविविधतेच्या अभ्यासाविषयी समन्वय साधला. नवव्या, दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी उपलब्ध करावा हे ठरवण्याची जबाबदारी सीएमएलआरईकडेच होती.


सागरी जैवसंपदा कशी टिकविता व वाढविता येईल, हे सीएमएलआरई, पृथ्वीविज्ञान मंत्रालयाबरोबर ठरविते. पर्यावरणाची हानी न करता, राष्ट्रहितासाठी संसाधनांचा प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर उत्तम उपयोग कसा होईल, हे सीएमएलआरई पाहते. अकराव्या पंचवार्षिक योजनेत सीएमएलआरईने कोणती जैविकदृष्टय़ा क्रियाशील संयुगे समुद्री सजीवांत सापडतात यावर संशोधन केले. संशोधन आणि विकास कार्यक्रमांना गती देऊन, ते कार्यान्वित राहतील याची खात्री केली. विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून कालमर्यादेत उद्दिष्टपूर्ती होईल याची काळजी घेणे आणि अंदमान, निकोबार ते दक्षिण ध्रुवाजवळच्या अंटाक्र्टिकातील समुद्री जीवित संसाधनांच्या संशोधनाची जबाबदारी सांभाळणे, ही सीएमएलआरईची कामे आहेत.


सीएमएलआरईचे नियंत्रण केंद्र सरकारच्या पृथ्वीविज्ञान मंत्रालयाकडे असल्याने एक महत्त्वाचा फायदा होतो, तो म्हणजे, भारतीय समुद्रतटापासून २०० नाविक मैलापर्यंतचे ‘अनन्य आर्थिक क्षेत्र’ अधिकृतरीत्या वापरणे सुलभ होते. पूर्व, पश्चिम, दक्षिण भारताचे हे क्षेत्र २० लाख चौरस किलोमीटरपेक्षा मोठे आहे. सीएमएलआरईचा जन्म ‘सागरसंपदा’ या नौकेत झाला आणि आजही तिच्या कामांसाठी ‘सागरसंपदा’च पायाभूत आहे.


🖊नारायण वाडदेकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १२ मे २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...