🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 #कुतूहल 🤔
🎯 समुद्रसपाटी
शाळेत असताना आपण वाचलेले असते की पाणी हे नेहमी आपली पातळी गाठते. धरतीवरचे सागर हा अखंड जलसंचय आहे. त्याच्यामध्ये अधूनमधून जमीन वावरते. त्यामुळे सगळीकडे सागराची एक समान पातळी, ‘मीन’ सी लेव्हल, असेल अशी अपेक्षा धरल्यास ती वावगी ठरू नये. पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. त्याची काही कारणे आहेत. वारे, समुद्राच्या पोटात असलेले निरनिराळे प्रवाह, नद्यांनी आणून टाकलेल्या पाण्याचे प्रमाण, गुरुत्त्वाकर्षणातला तसेच तापमानातला फरक, यांचा फार मोठा प्रभाव समुद्राच्या पातळीवर पडत असतो. त्यामुळे निरनिराळय़ा ठिकाणची समुद्राची सरासरी पातळी किंवा तुमच्या आमच्या भाषेत समुद्रसपाटी वेगवेगळी असते. त्यापायीच मग स्थानिक समुद्रसपाटी, लोकल ‘मीन’ सी लेव्हल, ही संकल्पना आता रूढ झाली आहे. तिच्या संदर्भातच मग जमिनीवरच्या निरनिराळय़ा नैसर्गिक तसेच मानवनिर्मित वास्तूंची उंची किंवा खोली मोजली जाते.
निरनिराळय़ा कालखंडांतल्या हवामानाचा परिणामही समुद्रसपाटीवर होत राहिला आहे. हिमयुगाच्या काळी हवामान चांगलेच थंड होते. पाण्याचे हिमखंडांमध्ये रूपांतर जलदगतीने होत होते. आणि ते हिमनद्यांच्या अवस्थेत साठून राहिले होते. अर्थात समुद्राच्या पाण्यात घट झाली होती. साहजिकच समुद्रसपाटी आजच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होती. शेवटच्या हिमयुगाच्या अंतसमयी म्हणजेच साधारण १८,००० वर्षांपूर्वी सध्याच्या पातळीपेक्षा ती शंभर मीटरनी कमी असल्याचे अनुमान काढले गेले आहे.
सध्याचा जमाना हवामान बदलाचा आणि जागतिक तापमानवाढीचा आहे. त्याचा परिणाम होऊन हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढत आहे, असे वैज्ञानिकांनी दाखवून दिलेले आहे. त्यातून घनरूप हिमाचे रूपांतर द्रवरूप पाण्यात होणार आहे. ते अतिरिक्त पाणी अर्थात सागरातच वाहून येईल. त्यापायी समुद्रसपाटीची उंची वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साहजिकच समुद्रसपाटी हा चिंतेचा विषय झाला आहे. धरतीच्या पाठीवर कित्येक बेटे जेमतेम या पातळीवर तरंगत आहेत. समुद्रसपाटी उंचावली तर हे बेटरूप देश पाण्याखाली जाण्याची भीती आहे. बेटेच कशाला सागरकिनाऱ्यावरच्या न्यूयॉर्क, सिडनी किंवा आपली मुंबई यांसारख्या सागरी किनाऱ्यांवरच्या शहरांनाही हा धोका आहे. त्यामुळेच समुद्रसपाटी ही केवळ वैज्ञानिक संकल्पना न राहता तिच्या, तुमच्या आमच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष देणे अगत्याचे ठरते.
🖊 डॉ.बाळ फोंडके
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन अर्जुन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- १५ मे २०२३
==============
No comments:
Post a Comment