🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 समुद्रसपाटीचे_मोजमाप
समुद्रसपाटी किंवा सरासरी सागर पातळी ही नजीकच्या जमिनीच्या संदर्भातच मोजली जाते. ती प्रमाण मानून जमिनीवरील पर्वतराजींची उंची किंवा दऱ्यांची खोली मोजण्यात येते. म्हणजेच समुद्रसपाटी हा एक स्थिरांक मानला जातो. पण ती पातळीही स्थिर नसते. तापमान वाढले की वाढीव उष्णता समुद्राच्या पाण्याकडून शोषली जाते. गरम झालेले पाणी प्रसरण पावल्याने सागराची पातळी वाढते. तसेच वाढीव वैश्विक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळून पाणी समुद्रात वाहून येते. या दोन प्रभावांमुळे १९०० सालापासून समुद्रसपाटीत जवळजवळ २० सेंटिमीटरची वाढ झाली आहे.
तरीही ती कशी मोजली जाते, हा प्रश्न आहेच. निरनिराळय़ा पण ठरावीक ठिकाणी दर तासाला पातळी मोजण्यात येते. हा दिनक्रम तब्बल १९ वर्षे चालतो. त्यातून हाती आलेल्या असंख्य निरीक्षणांवरून सरासरी काढली जाते. याचे मूळ मेटॉनिक सायकल या चंद्राच्या भ्रमणाशी निगडित आहे. चंद्र आपल्या कलेसह आकाशात परत त्याच जागी येण्यासाठी तितका काळ घेतो. म्हणजे समजा आज सप्तर्षीच्या डोक्यावर पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे. तर तो परत आकाशातल्या त्याच जागी येण्यासाठी साधारण २७ दिवसांचा काळ घेतो. याला साईडरीयल महिना म्हणतात. पण त्या वेळी तो पूर्ण दिमाखात नसतो. म्हणजेच पौर्णिमा नसते. ती त्यानंतर साधारण दोन दिवसांनी येते. याला सायनॉड महिना म्हणतात.
असे साधारण २३६ महिने म्हणजेच जवळजवळ १९ वर्षे उलटली की परत पौर्णिमेचा चंद्र सप्तर्षीच्या डोक्यावर दिसेल. चंद्राचे समुद्राच्या पातळीशी असलेले नाते लक्षात घेऊन हा कालावधी निवडला आहे. आता मात्र ते निदान अवकाशातून केले जाते. नासा या अमेरिकी अंतराळसंस्थेचा जमिनीपासून १३०० किलोमीटरवर परिभ्रमण करणारा जेसन ३ हा उपग्रह त्याच्यावर असलेले रडार अल्टीमीटर हे उपकरण वापरून ही कामगिरी पार पाडतो. त्याच्याकडून रेडिओ लहरी प्रक्षेपित होतात. त्या समुद्राच्या पाण्यावरून तसेच पृथ्वीच्या मध्यावरून परावर्तित होण्यासाठी लागणाऱ्या वेळेवरून पृथ्वीच्या मध्यापर्यंतचे तसेच पाण्याच्या पातळीचे अंतर मोजले जाते. त्यांची वजाबाकी करून पृथ्वीच्या मध्यापासून समुद्रसपाटीच्या अंतराचे गणित केले जाते. हा उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने निरनिराळय़ा ठिकाणची पातळी मोजणे त्याला शक्य होते.
🖊 डॉ बाळ फोंडके
office@mavipamumbai.org
=====================
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन अर्जुन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- १६ मे २०२३
======================
No comments:
Post a Comment