🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 सरिसृप वर्गातील संगोपन
सरिसृप हे शीतरक्ती असल्याने त्यांना स्वत:चे शरीर ठरावीक तापमानाला स्थिर राखता येत नाही. म्हणूनच त्यांना अंडय़ांचे व पिल्लांचे रक्षण करणे, तापमान आणि ओलावा राखणे, याची विशेष काळजी घ्यावी लागते. किनाऱ्यावर अंडी उबवण्याकरिता ते उबदार जागा शोधतात. वाळूत कुजणाऱ्या पालापाचोळय़ाचा शोध घेऊन त्यात अंडी ठेवतात. अशा प्रकारची ओबडधोबड घरटी किनाऱ्याजवळ आढळतात. मगर, सुसर, पाणसाप, कासव यांसारखे सरिसृप पाण्यात राहत असले तरी श्वसनासाठी त्यांना जमिनीवर यावे लागते. म्हणून प्रजनन करताना ते किनाऱ्यावर अंडी घालतात.
सुसर हा उग्र आणि शिकारी प्राणी, परंतु याची मादी जवळजवळ वर्षभर अंडी आणि पिल्लांची काळजी घेते. ती किनाऱ्यावर वाळूत घरटे बांधते, अंडी घालते आणि पिल्ले बाहेर आली की त्यांना तोंडात धरून पाण्याकडे नेते. पिल्लांच्या संगोपनाच्या बाबतीत मादी मगर फार सुरुवातीपासून जागरूक असते. याउलट पाणसाप आणि कासव! कासवाची मादी किनाऱ्यावर वाळूत अंडी घालून लगेच समुद्राकडे पसार होते. जी पिल्ले अंडय़ातून बाहेर येतात, ती आपली-आपणच समुद्राच्या पाण्याकडे धाव घेतात. पाणसापांपैकी काही प्रजाती किनाऱ्याच्या वाळूत अंडी घालतात. तर बरेचसे छद्म जरायुजता दर्शवतात. म्हणजेच ते जिवंत पिल्लांना जन्म देतात. परंतु सस्तन प्राण्यांसारखी त्या माद्यांत वारेची वाढ होत नाही. सापांत पिल्लांची काळजी घेण्याचेदेखील विशेष सोपस्कार आढळत नाहीत.
अशा सरिसृप प्राण्यांच्या तुलनेत अंडी घातल्यावर मादी मगर घरटय़ाजवळ रेंगाळत राहून लक्ष ठेवून असते. अंडय़ांतून आवाज येऊ लागले की ती पिल्लांना अंडय़ांतून बाहेर येण्यास मदत करते. पिल्लांना अलगद तोंडात धरून वाळूतील घरटय़ातून पाण्यापर्यंत नेते, तसेच उशिराने बाहेर पडणारी पिल्ले असलेली अंडी उचलून दुसरीकडे नेते, क्वचित नरसुद्धा घरटे उकरून पिल्लांना मजबूत जबडे आणि तीक्ष्ण दात असलेल्या तोंडात धरून अलगद पाण्याकडे नेतो.
उत्क्रांतीमध्ये मगर हा प्राणी, पक्षी आणि डायनोसोरच्या जवळ होता. अमेरिकन नॅचरल हिस्टरी सोसायटीचे संचालक ‘जॉर्ज अमाटो’ म्हणतात, ‘‘ विलुप्त न झालेल्या डायनोसोरचा वंश म्हणजे पक्षी. पक्षी आणि डायनोसोर यांच्या सर्वात जवळचा अस्तित्वात असलेला प्राणी म्हणजे मगर.’’ म्हणूनच कदाचित मगरीमधील संगोपन खास प्रकारचे असावे.
🖊डॉ. नीलिमा कुलकर्णी
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- १८ एप्रिल २०२३
==============
No comments:
Post a Comment