शाळा

Tuesday, 18 April 2023

समुद्रपक्ष्यांतील संगोपन

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 समुद्रपक्ष्यांतील संगोपन


पक्षी पर्यावरणाशी उत्कृष्ट पद्धतीने अनुकूलित झालेले असतात. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत त्यांच्यात संगोपनाच्या विविध पद्धती निर्माण झाल्या आहेत. समुद्रीपक्ष्यांमधील पिल्लांच्या संगोपनातदेखील विविधता दिसते. पिल्लाच्या योग्य वाढीसाठी आणि संरक्षणासाठी नर, मादी दोघेही काम करताना दिसतात.


पेंग्विनसारख्या उडू न शकणाऱ्या पक्ष्याच्या पिल्लांच्या संगोपनात सुरुवातीला अंडे उबविणे, ते सुरक्षित ठेवणे आणि नंतरच्या काळात पिल्लाला पुरेसे अन्न मिळवून देणे, त्याचे इतर समुद्री पक्ष्यांपासून रक्षण करणे, अशा दोन टप्प्यांत या प्रक्रिया दिसून येतात. या काळात अन्न मिळवण्यासाठी बहुधा मादी पुन्हा समुद्राकडे येते. एम्परर पेंग्विनमध्ये दोन्ही पालक पिल्लाची काळजी घेतात. मादीने घातलेले एक अंडे नर उबवतो. उबविण्यासाठी नर अंडय़ावर बसत नाही तर तो स्वत:चा तोल सांभाळत अंडे त्याच्या पावलांवर धरून उभा असतो. अंडय़ाला ‘भ्रूणकोष्ठ’ अथवा ‘ब्रूड पाऊच’ नावाच्या पायावरील कातडीने झाकून टाकतो. पिल्लू बाहेर आल्यावरसुद्धा ते बर्फात निसटून जाऊ नये म्हणून न हलता राहणारा नर ३ ते ४ आठवडे अन्नही घेऊ शकत नाही. हा काळ म्हणजे अंटाक्र्टिकाचा हिवाळा असतो. साधारणपणे ६५ दिवसांच्या या काळात संपूर्ण अंधार असतो.


पेंग्विन पक्षी असल्याने सस्तन प्राण्यांप्रमाणे दूध देत नाहीत, परंतु ते पचनसंस्थेतील ‘क्रॉप’ नावाच्या भागात स्रवणारा दाट द्रव पिल्लांना पाजतात. त्याला ‘क्रॉप्स मिल्क’ असे म्हणतात. या दुधात मोठय़ा प्रमाणात प्रथिने आणि स्निग्धपदार्थ असतात. हे दूध पिल्लाच्या वाढीस आवश्यक असणारे पोषण देते. पिल्लाचे आई-वडील दोघेही असे दूध पाजू शकतात.


रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्याची मादी बहुधा एकच अंडे घालते आणि दोन्ही पालक आलटून पालटून त्यावर बसून अंडे उबवितात आणि पिल्लाचीही काळजी घेतात. गवत, वाळू, माती यांनी तयार केलेल्या घरटय़ातून पिल्लू बाहेर पडते, इतर पिल्लांमध्ये मिसळते, परंतु अन्नासाठी पालकांकडे येत राहते. पिल्लू आणि पालक एकमेकांना नजरेने आणि त्यांच्या विशिष्ट आवाजामुळे अचूक ओळखतात. फ्लेमिंगो नर-मादी दोघेही पिल्लांना ‘क्रॉप्स मिल्क’ देतात. रंगद्रव्यामुळे लाल असलेल्या या दुधामध्ये प्रथिने, मेद आणि इतर पोषक घटक असतात. पिल्ले हे रंगद्रव्य यकृतात जमा करून ठेवतात, त्यामुळे त्यांच्या पंखांना तांबूस रंग मिळतो.


🖊डॉ. नीलिमा कुलकर्णी

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १९ एप्रिल २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...