🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 सागरी सस्तन प्राण्यांतील संगोपन
पिल्लांना सुखरूप वाढवताना त्यांच्या संगोपनाचा विचार आवश्यक असतो. यात संगोपनामुळे पिल्लांना होणारा फायदा आणि त्यासाठी पालकांना गमवावी लागणारी ऊर्जा, त्यांची जगण्याची शक्यता तसेच प्रजनन हंगामातील कालावधी अशा बाबी महत्त्वाच्या ठरतात. संगोपनाला परहितनिष्ठा असेही म्हणतात. कारण, त्यात केवळ पिल्लांची तंदुरुस्ती वाढवून त्यांना जगण्याची अधिक चांगली संधी देणे हा नि:स्वार्थ हेतू असतो.
सस्तन प्राण्यांमध्ये संगोपनातील आईची गुंतवणूक दीर्घकाळासाठी असते. गर्भधारणा, गरोदरस्थिती, जन्म देणे, स्तनपान अशा गोष्टींमध्ये खूप जास्त ऊर्जेची गरज असते. सागरातील सस्तन प्राण्यांत मादीवर पाण्यात पोहताना स्तन्य देणे आणि प्रत्येक श्वासासाठी पिल्लाला आपल्याबरोबर पृष्ठभागावर आणणे या अधिकच्या जिकिरीच्या जबाबदाऱ्या आहेत.
डॉल्फिन सामाजिकदृष्टय़ा कुशल, बुद्धिमान, खेळकर आणि चपळ सस्तन प्राणी आहे. परंतु त्याच्या पिल्लांना हे सर्व शिकेपर्यंत संगोपनाची खूप गरज भासते. समुद्रातील डॉल्फिन सर्वसाधारणपणे एकाच पिल्लाला जन्म देतात. आई पिल्लाच्या जवळपास राहून सर्वप्रथम त्याला श्वास घेण्यास, अन्न घेण्यास आणि योग्य हालचाल करण्यास शिकवते. आईच्या पोषणयुक्त दुधामुळे शरीरावरील चरबीचा थर लवकर विकसित होण्यात मदत होते. पिल्लाला स्वत:बरोबर घेऊन जाताना आईची खूप शक्ती खर्च होते, त्यामुळे आईची पोहण्याची गती, अन्न मिळवण्याचा प्रयत्न, तसेच तिच्या ऊर्जेच्या ताळेबंदावर विपरीत परिणाम होतो. आई आणि पिल्लातील ‘एकेलोन’ प्रकारच्या पोहण्याच्या क्रियेमध्ये पिल्लू आईच्या शरीराच्या मधल्या भागाच्या बाजूकडे अगदी जवळ असते. आईच्या पोहण्याच्या हालचालीमुळे तयार होणाऱ्या ‘स्लीप स्ट्रीम’ भागात पिल्लू असते. त्या वेळी पिल्लाला जलगतीचे फायदे मिळतात. पिल्ले स्वतंत्रपणे आईच्या मागे जाऊ शकत नाहीत, म्हणूनच हे वर्तन विकसित झाले असावे.
सी ऑटरची पिल्ले ६-१२ महिने आईचे दूध पितात. आई पिल्लांना पोहण्याचे आणि अन्न मिळवण्याचे प्रशिक्षण देते. व्हेलच्या पिल्लांच्या संगोपनात आईबरोबरच त्यांची काकी, आजी यांचा समावेश असलेली बहुस्तरीय व्यवस्था असते. त्या पिल्लांना हालचाल, शिकार आणि संभाषणकौशल्ये शिकवतात. रेसिडेंट किलर व्हेल्समध्ये पिल्ले झोपतच नाहीत, त्यामुळे आईला सतत जागे राहून खूप मोठा काळ पिल्लाच्या संगोपनात घालवावा लागतो. धोका जाणवल्यास ती पिल्लाला आपल्या पराच्या (फ्लिपर्सच्या) साहाय्याने जवळ घेऊन छातीजवळ धरून ठेवते.
🖊डॉ. नीलिमा कुलकर्णी
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- २० एप्रिल २०२३
==============
No comments:
Post a Comment