🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 शार्कची ज्ञानेंद्रिये
शार्कची ज्ञानेंद्रिये आपल्याप्रमाणे शार्कनाही दृष्टी, ध्वनी, गंध, रुची, स्पर्श संवेदना असतात. त्याखेरीज प्रवाह-संवेदना, विद्युतग्रहण संवेदना या खास संवेदनाही शार्कना जाणवतात.शार्कना दृष्टिसंवेदना देणारे त्यांचे दोन डोळे चेहऱ्याच्या दोन विरुद्ध बाजूंना असतात. त्यामुळे त्यांना जवळजवळ सर्व दिशांना ३६० अंशात दिसते. डोळय़ांच्या ठेवणीमुळे शार्कना तोंड आणि शेपटीकडचे दिसत नाही. शार्कसाठी ही अंधक्षेत्रे आहेत. त्यांच्या दृष्टीपटलाखाली ‘टॅपेटम’ हा चमकदार, परावर्तक थर असतो. मांजरांच्या डोळय़ातही असा थर असल्याने शार्क आणि मांजरांना मंद प्रकाशात माणसापेक्षा चांगले दिसते. शार्कच्या दृष्टीपटलात शंकू, दंड अशा संवेदीपेशी असतात. शंकूंच्या मदतीने शार्कना रंगज्ञान होते, तर दंडपेशींमुळे काळोख व उजेड जाणवतो.
शार्कना उत्तम ऐकू येते. त्यांचे कान त्यांच्या डोळय़ांमागे असतात. बाह्यकर्ण नसतो. बाह्यकर्णाच्या जागी दोन लहान छिद्रे दिसतात. आंतर्कर्णात द्रवयुक्त नळय़ा असतात. नळय़ांच्या अस्तरातील सूक्ष्म रोमकधरी (केसांसारखे अतिशय लहान तंतू) पेशी, द्रवाच्या संपर्कात असतात. ध्वनिलहरी कानावर आदळतात, तेव्हा पेशींवरील रोमकांची टोके झुकतात. ही हालचाल आवेगाच्या रूपात चेतातंतूंतून मेंदूपर्यंत पोहोचते आणि शार्कना ध्वनिज्ञान होते.काही शार्कना तोंडाजवळच्या स्पृशांमुळे स्पर्श कळतो. शार्कना त्वचेतून तसेच दातातूनही स्पर्शज्ञान होते. दातांच्या आत दंतमगजात चेतातंतू असतात. शार्कने दातांचा स्पर्शासाठी उपयोग करणे माणसांसाठी धोक्याचे ठरू शकते. कुतूहल म्हणून आपण बोटांनी वस्तूला स्पर्श करतो तसे काहीवेळा शार्क पोहणाऱ्या माणसाला चावा घेऊन बघतात. शार्कना चवीचे ज्ञान फारसे चांगले नसते. चवीसाठी नमुना म्हणून शार्कने पोहणाऱ्या माणसाचा चावा घेतला तरी चव आवडत नाही म्हणून थुंकतात. पण तोडलेला लचका ना शार्कला उपयोगी पडतो ना त्या माणसाला. दात टोकेरी असल्याने सहज चाव्यामुळेही खोल जखम होऊन माणसाच्या प्राणावर बेतू शकते.
खोल, अंधाऱ्या सागरजलात राहणाऱ्या शार्कना गंधज्ञान फारच चांगले असते. त्यांच्या मेंदूचा अध्र्याहून जास्त भाग गंधसंवेदनेला समर्पित असतो. स्वत:चे अन्न शोधायला, जोडीदार शोधायला आणि शत्रूचे अस्तित्व कळून सुरक्षित अंतर ठेवायला शार्कना वासाचे ज्ञान उत्तम असावेच लागते. रक्ताच्या एका थेंबाचाही शार्कना कित्येक किमीवरून वास येतो ही मात्र अतिशयोक्ती आहे.
🖊नारायण वाडदेकर
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- २४ एप्रिल २०२३
==============
No comments:
Post a Comment