बदली

Sunday, 12 February 2023

सागरी पाणी ते पेय जल

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 सागरी पाणी ते पेय जल


आकाशातून पृथ्वीतलावर पडणारे पाणी शुद्ध असले तरी चातक पक्ष्यासारखे ते आपल्याला सहजगत्या झेलून घेता येत नाही, आणि ते जमिनीवर पडले की त्यात माती, क्षार, सेंद्रिय पदार्थ, इत्यादी मिसळल्याने ते दूषित होते. पृथ्वीवर सागरी पाण्याचा विशाल साठा असला तरी त्यातल्या क्षारतेमुळे ते पिण्यायोग्य नसते. ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ असे असल्यामुळे दर्यावर्दी लोकांनाही मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागते. समुद्राच्या पाण्यात एकूण विद्राव्य क्षार ३५ ग्रॅम/लि. एवढे असतात. त्यातील ३० ग्रॅम/लि. मीठ किंवा सोडिअम क्लोराइड असते. पिण्याच्या पाण्यासाठी विद्राव्य क्षार ५०० मि.ग्रॅम/लि. व क्लोराइड २०० मि.ग्रॅम/लि.पेक्षा कमी असणे इष्ट असते. त्यामुळे समुद्राचे पाणी त्यातील क्षार काढून टाकल्याखेरीज पिण्यायोग्य होऊ शकत नाही. जगभरातील लाखो लोकांना पिण्याच्या पाण्याची चणचण सतत भासत असते. आरोग्य, कल्याण आणि आर्थिक विकासासाठी पिण्याचे पाणी तसेच घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी गोडय़ा पाण्याचा मुबलक पुरवठा आवश्यक आहे.


सागरी पाणी विलवणीकरण (डीसॅलिनेशन) करून म्हणजेच पाण्यातील क्षार काढून टाकण्याच्या प्रक्रियेने ते पिण्यायोग्य होईल, हा विचार फार वर्षांपासून सातत्याने मनुष्याच्या डोक्यात घोळत होता. मानवी प्रयत्न व त्यास मिळालेली तंत्रज्ञानाची जोड यामुळे विलवणीकरणाच्या विविध पद्धती विकसित झाल्या. ऊध्र्वपातन, व्युत्क्रमी परासरण (रीव्हर्स ऑस्मॉसिस), सौर ऊध्र्वपातन (सोलर डिस्टिलेशन), इलेक्ट्रो डायलिसिस, नॅनोफिल्ट्रेशन, गॅस हायड्रेटनिर्मिती, इत्यादी पद्धतींनी सागरी पाण्यातील क्षार व अशुद्धी दूर केल्या जातात. पृथ्वीवर गोडय़ा पाण्याचा पुरवठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने विलवणीकरणाची गरज आहे. यात विविध पद्धतींचा वापर अत्यंत जबाबदारीने करणे आवश्यक आहे कारण या प्रक्रियांमधून निर्माण होणारे सांडपाणी अतिशय क्षारयुक्त व प्रदूषित असल्याने ते समुद्रात अथवा इतर ठिकाणी सोडल्यास परिसंस्थेवर वाईट परिणाम होतो.


जैवतंत्रज्ञानाचा वापर हा एक संभाव्य शाश्वत पर्याय सध्या उदयास येत आहे. याद्वारे समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यास सक्षम सायनो बॅक्टेरियांची जोपासना करून त्यांच्याभोवती कमी क्षारता असलेली क्षेत्रे निर्माण केली जाऊ शकतील. शाश्वत ऊर्जा वापर पद्धती आणि सुरक्षित विसर्जन अवलंबल्यास विलवणीकरणाद्वारे गोडय़ा पाण्याचा अमर्याद पुरवठा करण्याच्या स्वप्नाची पूर्तता निश्चितपणे होऊ शकेल.


डॉ. चित्ररेखा गि. कुलकर्णी

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १३ फेब्रु २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...