🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 वूड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिटय़ूशन
वूड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिटय़ूशन ही महासागरविषयक संशोधनातील जगातील सर्वात मोठी स्वतंत्र, ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. महासागरविषयक निरनिराळय़ा मोहिमा आणि उच्चशिक्षणातील संस्थेचे कार्य अद्वितीय आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सूचनेनुसार १९३० मध्ये महासागराच्या अभ्यासासाठी या संस्थेची स्थापना झाली. गेली आठ दशके सागरी विज्ञानात भरीव संशोधन केलेल्या या संस्थेने हल्लीच्या काळातील बदलत्या हवामानामुळे महासागरावर होणाऱ्या परिणामांवर अधिक सखोल अभ्यास सुरू केला आहे. त्यांच्या संशोधनामुळे संस्थेची निवड ‘हवामान-बदल रक्षक २०२२’ म्हणून झाली. हा सन्मान कॉमनवेल्थ देशांतील केवळ १९ व्यापारी आणि औद्योगिक संस्थांना मिळाला आहे, इतकेच नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘ग्लोबल महासागर हवामान परिषदे’च्यावेळी वूड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिटय़ूशन या संस्थांचे नेतृत्व करणार आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये या संस्थेला समुद्री-शेतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी संस्था म्हणून पुरस्कार मिळाला.
अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् येथे असणाऱ्या या संस्थेचे वार्षिक बजेट २१५ दशलक्ष डॉलर्स असून सरकारी अनुदान आणि खासगी देणग्यांनी मिळणारा निधी पूर्णपणे सागरी संशोधनासाठी वापरला जातो. संस्थेत उपयोजित सागरी अभियांत्रिकी, भौतिक समुद्रशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र व भूभौतिकी, सागरी रसायनशास्त्र आणि भू-रसायनशास्त्र, सागरी धोरण, असे सहा प्रमुख विभाग कार्यरत आहेत. तसेच, सागरी आणि पर्यावरणीय किरणोत्सार केंद्र आहे. हवा आणि समुद्रात होणाऱ्या आंतरक्रिया आणि सागरी वातावरणशास्त्राचा अभ्यास करणारी संस्था, सागरी सस्तन प्राणी केंद्र, सागरी धोरण केंद्र (मरिन पॉलिसी), ‘सागर आणि हवामान इनोवेशन अॅक्सिलरेटर’ या महत्त्वाच्या केंद्रांबरोबर सागरी आणि मानव आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत वूड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिटय़ूशन काम करते. बदलत्या पृथ्वीग्रहाचे भविष्य अधिक देदीप्यमान करणे, संवेदनक्षम माहितीचा स्रोतसाठा निर्माण करणे, नव्या पिढीला उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देणे, यशस्वी मोहिमांची आखणी करणे आणि भविष्यातील प्रगत आणि नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेणे अशी संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.
वूड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिटय़ूशनचे शास्त्रज्ञ आणि अभियंते जगभरातील भूमी, किनारे, आणि खोल समुद्र अशा सर्वच ठिकाणी भरारी मारून हवामान बदल ते सागराचे आम्लीकरण अशा समस्यांच्या निराकरणासाठी संशोधन करीत आहेत. यासाठी नव्या प्रकारची आयुधेदेखील निर्माण करत आहेत. महासागर सांभाळला तर आपण टिकू हे सत्य त्यांना कळले आहे.
🖊डॉ. नंदिनी वि. देशमुख
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- १० फेब्रु २०२३
==============
No comments:
Post a Comment