बदली

Monday, 13 February 2023

सागरी तापमानाचे मोजमाप

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 सागरी तापमानाचे मोजमाप


सागराचा पृष्ठभाग म्हणजे जणू वातावरण आणि सागर यांचा संगम. येथे पाण्याचे बाष्पीभवन होते, बाष्प हवेत वर जाते, ढग तयार होतात, ढगातून पाऊस खाली पडतो. या सर्व प्रक्रियांत ऊर्जेची देवाणघेवाणही होते. सागराच्या तापमानानुसार बाष्पीभवन कमी जास्त होते. किनारी प्रदेशात सागरी तापमान आणि जमिनीचे तापमान यांच्यातील तफावतीमुळे दिवसा व रात्री विरुद्ध दिशेने स्थानिक वारे वाहतात. जमीन जशी लवकर तापते तशीच ती लवकर थंडही होते. म्हणून जमिनीवरील वेधशाळेत दिवसात अनेकदा तापमान मोजले जाते. त्याशिवाय कमाल  आणि किमान तापमानही स्वतंत्रपणे मोजले जाते. समुद्राचे तसे नाही. त्याला तापायला वेळ लागतो आणि थंड व्हायलाही वेळ लागतो, कारण त्याची उष्णता साठवायची क्षमता अधिक असते. समुद्रावर वेधशाळा उभारता येत नाहीत आणि सागरी तापमानात फारसा चढ-उतारही होत नाही.


अगदी मागील शतकापर्यंत सागरी तापमान मोजायची एक सोपी पद्धत उपयोगात होती. जहाजाच्या कडेला एक खलाशी उभा राहून एका लांब दोरीला बांधलेली रिकामी बादली समुद्रात सोडत असे. तिच्यात पाणी भरले की, तिला वर ओढून तिच्यात एक तापमापी घालून तो त्या पाण्याचे तापमान मोजत असे. अशा प्रकारची माहिती गोळा करून आणि तिचे अभ्यासपूर्वक विश्लेषण करून सागरी तापमानाचे जागतिक नकाशे बनवले गेले. सागरी तापमान विषुववृत्तावर सर्वाधिक म्हणजे सुमारे ३० अंश सेल्सिअस असते आणि ते ध्रुवांच्या दिशेने कमी होत जाऊन ध्रुवीय प्रदेशात समुद्रातील पाण्याचा बर्फ झालेला असतो.


१९६०पासून उपग्रहांमार्फत संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण होऊ लागल्याने सागरी तापमानाचे अंतराळातून मोजमाप करणे शक्य झाले. या आधुनिक पद्धतीत समुद्राच्या पृष्ठभागावरून जे विकिरण होते ते अंतराळातून मोजले जाते आणि स्टीफन्स लॉ या मूलभूत भौतिक नियमाच्या आधारे सागरी तापमानाचा अचूक अंदाज लावला जातो. पण समुद्रावर जेव्हा ढग असतात तेव्हा उपग्रहांना फक्त ढग दिसतात, त्याखालचा समुद्र दिसत नाही. मान्सूनच्या चार महिन्यांत आपल्या निकटचे समुद्र मेघाच्छादित राहतात. अशा परिस्थितीत सागरी तापमान आधी नीट मोजता येत नसे. पण आता ही समस्या पुष्कळशी दूर झाली आहे कारण अनेक उपग्रहांद्वारे आता मायक्रोवेव्ह चॅनलद्वारे विकिरण मोजता येते जे ढगातून आरपार जाते आणि समुद्रापासून उपग्रहापर्यंत ढगांचा अडथळा न येता पोहचते.


🖊डॉ. रंजन केळकर

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १४ फेब्रु २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...