बदली

Thursday, 14 July 2022

कारकून आणि काबाडकष्ट

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 कारकून आणि काबाडकष्ट


‘कारकून’ हा शब्द अर्थबदल होऊन शब्द कसे रूढ होतात याचे चांगले उदाहरण आहे. मुळात या फारसी शब्दाचा अर्थ ‘कार कून’ म्हणजे ‘काम करणारा’ असा आहे. ‘चांगला किंवा हुशार माणूस’ या अर्थाने तो वापरला जाई. कारखाना (काम करण्याची जागा) किंवा कारकीर्द (काम करण्याचा कालावधी) हे शब्दही ‘कार’ शब्दाचे विस्तारित रूप आहेत.


कारनामे, कारागीर, कारागिरी, कारवाई, कारभार, कारभारी हे शब्दही तसेच अर्थबदल न होता तयार झाले. पेशवाईत ‘कारकुनास’ मोठय़ा जबाबदारीच्या कामावर पाठवत असत. पण पुढे पुढे अर्थबदल होऊन ‘कारकून’ शब्दाला कमीपणा आला आणि केवळ ‘किरकोळ लिखापढीचे काम करणारा’ असा निंदाव्यजक अर्थ त्याला प्राप्त झाला. फारसीप्रमाणे संस्कृतमध्येही ‘कार’ हा शब्द आहे, पण त्याचा अर्थ ‘शब्द’, ‘आवाज’ असा आहे. ॐकार, मकार, अकार इत्यादी शब्दांतील ‘कार’ हा शब्द ‘आवाज’ याच अर्थाने आहे. 


पण ‘कार’ शब्दाचा एक अर्थ ‘करणारा’ असाही आहे आणि त्या अर्थाची जोड देऊनही अनेक शब्द संस्कृतात व पुढे मराठीत रूढ झाले. चर्मकार, कुंभकार, शिल्पकार, मूर्तिकार, शस्त्रकार, वस्त्रकार, सूचिकार, सुभाषितकार, गीतकार, भाष्यकार इत्यादी. मात्र ते शब्द निर्माण होताना अर्थबदल झाला नाही.


काबाडकष्ट हा असाच एक शब्द. कृ. पां. कुलकर्णी यांच्या व्युत्पत्तिकोशानुसार ‘काबाड’ हा शब्द सकृतदर्शनी वाटतो तसा अरबी किंवा फारसीतून आलेला नाही; कारण त्या दोन्ही भाषांमध्ये ‘ड’ हे अक्षर नसते. संस्कृत ‘कर्पट’पासून हिंदीत ‘कबाड’ हा शब्द बनला आणि हिंदीतून तो मराठीत आला. त्याचा अर्थ कचरा, अडगळ, रद्दी असा आहे. कबाडी (जुनेपुराणे सामान विकत घेणारा किंवा भंगारवाला), कबाडखाना (वेडय़ावाकडय़ा, अनावश्यक, अस्ताव्यस्त वस्तू ठेवलेली जागा) हे शब्द त्यातूनच निघाले. त्यालाच पुढे ‘कष्ट’ शब्दाची जोड देऊन ‘काबाडकष्ट’ म्हणजे ‘निरर्थक’ किंवा ‘बिनमहत्त्वाचे श्रम’ या अर्थाने तो वापरला जाऊ लागला. उदाहरणार्थ, ‘‘इतके काबाडकष्ट करून पदरी काहीच पडले नाही.’’


अर्थात काबाडकष्ट हा शब्द मराठीत चांगल्या अर्थानेही वापरला जातो. उदाहरणार्थ,‘‘त्या गरीब आईने खूप काबाडकष्ट करून आपल्या तिन्ही मुलांना वाढवले.’’


🖊 भानू काळे

bhanukale@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १५ जुलै २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...