भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 घोडा अपना अरबी है..
‘एक आणा अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा.’ ही लावणीच्या गाण्याची ओळ गुणगुणताना ‘अबलख’ घोडा म्हणजे नेमका कसा? असा प्रश्न पडला. दोन-चार जणांना विचारल्यावर त्यांनी ‘अरबी’ घोडा असे सांगितले होतेच. पण कोश पाहूनच समाधान होते म्हणून कोशात पाहिले. व्युत्पत्ती कोशात ‘अबलख’ म्हणजे तयार, सशक्त आणि पांढरे व काळे पट्टे असलेला घोडा असे वाचले. आणि मूळ अरबी ‘अबलक’ याचा अर्थ पांढरा आणि काळा. संस्कृत ‘अवलक्ष’ म्हणजे पांढरा, फारशी ‘अब्रक’ म्हणजे काळा करडा आणि पांढरा मिश्रण असलेला, हिब्रूमध्ये अबरक.
हिब्रू, अरबी, फारशी, तुर्की भाषांतील शब्दांचा समावेश मराठीत झाला आहे. हे शब्द परकीय असले तरी महाराष्ट्रीय व त्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा ४००-६०० वर्षांचा घनदाट संबंध आला आणि या दीर्घ संबंधांमुळे हे शब्द मराठीने आत्मसात केले. आता अंजीर हा शब्द पहा. भारतात हा शब्द आणि हे फळ अरबांनी आणले. अरबस्तान- रोम- ग्रीस- आशियामायनर- इटली- पोर्तुगाल-खोरासान-हिरात-अफगाणिस्तान-चीन असा प्रवास या शब्दाने केला आहे. या फळाला मराठी पर्यायी शब्द उपलब्ध नाही. आज ‘अ’ने सुरू होणाऱ्या अरबी शब्दांना पर्यायी मराठी शब्द सुचवू शकतो असे काही शब्द पाहूया. अजब – विलक्षण, चमत्कारिक, आश्चर्यकारक. अजबखाना- विचित्र वस्तुसंग्रहालय. अफवा- कंडी, आवई. अमली – गुंगी आणणारे. अमानत/अनामत – ताब्यात दिलेली ठेव. अंबारी – हौदा, छत्री, हत्तीवरचे आसन. अशील- पक्षकार. अस्सल- पहिले, मूळचे, मूळ. असामी- मनुष्य, मोठे प्रस्थ. अर्ज- विनंती, निवेदन, अभ्यर्थना, प्रार्थना. अलबत- खरोखर. अलाहिदा – पृथक्, वेगळा. अलिशान – उच्च दर्जाचे, अव्वल – उत्तम, उच्च, पहिला. अवलाद/औलाद – मुलाची संतती. मुलीच्या संततीला ‘अफलाद’ म्हणतात. अर्वाचीन मराठीत याच्या अर्थामध्ये फरक झाला आहे आणि याचा शिवीसारखा उपयोग होतो हे अर्थभ्रंशाचे उदाहरण आहे. (संदर्भ- मराठी व्युत्पत्ती कोश – कृ. पां. कुलकर्णी) काही परकीय शब्दांचे फक्त अर्थच वरती सांगितले आहेत. त्याला पर्यायी मराठी शब्द निर्माण करणे, कोणा येरा-गबाळय़ाचे काम नोहे. बघा तुम्हाला जमतात का!
🖊डॉ. निधी पटवर्धन
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- १४ जुलै २०२२
No comments:
Post a Comment