भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 ..रडू आलं पावसाळय़ात
आपल्या घरातली सर्व नाती समजू शकतात, पण सासू-सुनेचे नाते मात्र समजण्याच्या दृष्टीने अवघड! तसे जरा रूक्षच. आपल्या संस्कृतीत इतर कोणत्या नात्यांपेक्षा सासू-सुनेच्या नात्याविषयी आणि सावत्र आईच्या नात्याविषयी अनेक प्रकारे खूप वाईट पद्धतीने लोकांच्या मनात बरेच काही पेरलेले आहे. तेच मग मनावर बिंबवले जाते आणि त्याचे प्रतिबिंब वागण्यात उमटत जाते.
हल्लीच्या काळात या नात्यातील वाईट किंवा चुकीची भावना बदलत आहे आणि ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. या नात्यात एक मजा अशी आहे, की दोन्ही व्यक्ती त्यांच्या जागी अतिशय चांगल्या असतात. पण दोन्ही व्यक्ती एकत्र आल्या की त्यांच्यात काय बिनसते ते मात्र कळत नाही, हे काय गौडबंगाल आहे याचा उलगडा होत नाही.
काही वेळा वाटते की याच्या मागे सत्तेचे राजकरण तर नाही? सासूला आपल्या मुलावरील प्रेमात आता आणखी एक वाटेकरी येणार असे वाटते की काय? किंवा आपल्या घरातील आपली एकहाती सत्ता आता संपणार, असे वाटते की काय? सुनेलाही इतर कोणी सत्ता गाजविणे आवडत नसावे.
सुनेलाही सासूबद्दल काय वाटते ते बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून त्यांनी सांगितले आहेच. त्यांच्या कवितेत त्या जसे इतर नात्यांचे वर्णन करतात त्या प्रमाणे त्या सासूच्या नात्याचेही अतिशय खुबीने वर्णन करतात. त्या म्हणतात..
जी जी म्हनता म्हनता, झाले जिभेले निवारा
सासू म्हनता म्हनता गेला तोंडातून वारा
सर्व सांस्कृतिक संचितात सासू-सुनेच्या नात्याविषयी जी काही टीकाटिप्पणी केलेली असते त्यानुसार ‘सासू मेली उन्हाळय़ात आणि रडू आलं पावसाळय़ात’ ही एक जुनी म्हण आहे.
या म्हणीत कधीकधी सासू-सुनेच्या नात्यात जो दिखाऊपणा येतो त्यावर प्रकाश टाकलेला आहे. लोकांना दाखवण्यासाठी तरी तिला दु:खाचे उमाळे येतात, पण ते खूपच उशीरा! नातेसंबंधांचे पैलू उलगडणाऱ्या अनेक म्हणींनी मराठी भाषा समृद्ध केली आहे.
🖊 डॉ.माधवी वैद्य
madhavivaidya@ymail.com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- २६ जुलै २०२२
No comments:
Post a Comment