भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 दर्शक नव्हे प्रेक्षक!
कधी कधी कानावर येते.. ‘‘वसंत कानेटकरांचे ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक पाहायला नाटय़गृहात खूप दर्शक आले होते.’’ तसेच हे दुसरे वाक्य- ‘माझ्या भावाच्या विवाहसोहळय़ाला मित्र, नातेवाईक तर आले होतेच, पण अनेक दर्शकही उपस्थित होते.’ या दोन्ही वाक्यांत ‘दर्शक’ या शब्दाची योजना चुकीची आहे. योग्य शब्द आहे- ‘प्रेक्षक’. दर्शक आणि प्रेक्षक या शब्दांचे अर्थ लक्षात घेऊ या.
दर्शक (विशेषण) अर्थ- दाखवणारा, सांगणारा, तज्ज्ञ, मर्मज्ञ. दर्शन (नाम, नपुंसकिलगी, एकवचनी) अर्थ-अवलोकन, पाहणे. ‘दर्श’ या धातूपासून दर्शक (वि.) दर्शन (नाम) हे शब्द सिद्ध झाले आहेत. आणखी काही शब्द- दर्शनी दरवाजा- अर्थ-पुढचे दार, दर्शनी देखावा- अर्थ- समोरील देखावा, दर्शनक्षमता- दिसण्याचा गुण, सामर्थ्य. दर्शविणे (क्रि.) दाखवणे. सूचित करणे, खुणावणे, निर्देश करणे. हे अर्थ लक्षात घेता वरील दोन्ही वाक्यांत योजलेला ‘दर्शक’ हा शब्द चुकीचा आहे, हे लक्षात आले असेल.
योग्य शब्द आहे- प्रेक्षक (नाम, पुल्लिंगी ए.व. आणि अ.व.) अर्थ- पाहणारा प्रेक्ष(धातू) पाहणे, प्रेक्षणे-अर्थ-पाहणे. प्रेक्षक(नाम, पुल्लिंगी) अर्थ- पाहणारा. प्रेक्षण (नाम, नपुसकिलगी) पाहणे, दृष्टी, प्रेक्षणीय- (वि) पाहण्यालायक, सुंदर, मनोहर, अवश्य पाहिले पाहिजे असे. वरील वाक्ये अशी हवीत.- ‘..हे नाटक पाहायला नाटय़गृहात खूप प्रेक्षक आले होते.’ आणि ‘..,पण अनेक प्रेक्षकही उपस्थित होते.’ अशीच एक चुकीची वाक्यरचना- ‘अनेक दर्शकांच्या साक्षीने त्याचे लग्न लागले’- येथे दर्शक हा शब्द ‘वऱ्हाडी’ या अर्थाने योजला आहे!
नाटक, चित्रपट, तमाशा, चित्रप्रदर्शन पाहायला येणारे प्रेक्षक आहेत, दर्शक नाहीत. व्याख्यान, परिसंवाद, मुलाखत, गायन इ. कार्यक्रमाला उपस्थित राहतात ते श्रोते (श्रोता (नाम.ए.व.) श्रोता म्हणजे ऐकणारा. त्यांना प्रेक्षक (पाहणारे) म्हणत नाही. पुढील काही शब्द पाहा. मार्गदर्शक (नाम.पु.) योग्य मार्ग दाखवणारा.
देवदर्शन-देवाचे (पूज्य देवाचे) अवलोकन, तसेच युद्धकलादर्शन, पूजनीय व्यक्ती भेटली, तर ‘आपले दर्शन झाले, नमस्कार’ असे आपण म्हणतो. मराठी भाषकांनी ‘प्रेक्षक’ शब्दाऐवजी अगदी निराळय़ा अर्थाचा ‘दर्शक’ हा शब्द लेखनात तरी वापरू नये, एवढेच मला सुचवायचे आहे.
🖊 यास्मिन शेख
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- २५ जुलै २०२२
No comments:
Post a Comment