भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 भाषा बदलतेय
आभाळ ढगांनी भरलेलं पाहून आठवणीनं त्यानं छत्री घेतली.’ लेखाचं हे सुरुवातीचं वाक्य वाचताच तुम्ही म्हणाल, की आजच्या भाषासूत्राचंही हवामान बदललं की काय? तर होय. आपण या वाक्यातून भाषेच्या हवामानातल्या बदलांकडेच जाणार आहोत. दुसरं वाक्य- ‘आभाळ ढगांनी भरलेले पाहून आठवणीने त्याने छत्री घेतली.’ या वाक्यांची तुलना केल्यावर लक्षात येईल, की पहिल्या वाक्यात लं, नं असे शिरोबिंदू देण्याची पद्धत वापरली आहे. डॉ. द. न. गोखले यांनी याला ‘दीर्घ अ’ म्हटलं आहे. तर दुसऱ्या वाक्यातल्या पद्धतीला त्यांनी ‘ए ची भाषा’ असं म्हटलं आहे.
कोणतीही भाषा सुलभीकरणाच्या दिशेने प्रवास करत असते. पहिल्या उदाहरणातली शिरोबिंदूयुक्त भाषा सहजसोपी, बोलभाषेशी जवळीक साधणारी असल्याने प्रमाण लेखनामध्ये अशी पद्धत दिवसेंदिवस अधिकाधिक रूढ होत आहे. खरं तर १३ क्रमांकाच्या लेखननियमानुसार ‘लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी अशी बोलण्याची भाषा घालावी. अन्य प्रसंगी ही रूपे एकारांत लिहावी’ असं सांगितलं आहे. तरीही आज आपण गंभीर प्रवृत्तीचं लेखन असो किंवा ललित, हलकंफुलकं लेखन सगळय़ासाठी अशी भाषा वापरतो. प्रस्तुत लेखाची भाषाही याच प्रकारची आहे. ही पद्धत रूढ झालेली दिसते आहे तर त्याची दखल घेऊन लेखनभाषेच्या या नियमाचा विस्तार करणं आवश्यक आहे. अर्थात हा मुद्दा यापूर्वी अनेक भाषा अभ्यासकांनी मांडला आहेच, पण आता त्याची आत्यंतिक गरज आहे.
शिरोबिंदूयुक्त भाषेच्या लेखनातही त्याने- त्यानं- त्यानी, इकडे- इकडं, इथे- इथं, आतील- आतलं, मधील- मधलं अशा काही शब्दांच्या लेखनाबाबत व्यक्तीगणिक विविधता आढळते. या सर्व लेखनाची नोंद घेऊन त्याविषयीच्या स्पष्टीकरणाचा या नियमाच्या विस्तारात समावेश करायला हवा.
शिरोबिंदूयुक्त भाषेच्या लेखनातही त्याने- त्यानं- त्यानी, इकडे- इकडं, इथे- इथं, आतील- आतलं, मधील- मधलं अशा काही शब्दांच्या लेखनाबाबत व्यक्तीगणिक विविधता आढळते. या सर्व लेखनाची नोंद घेऊन त्याविषयीच्या स्पष्टीकरणाचा या नियमाच्या विस्तारात समावेश करायला हवा.
बोलण्याची भाषा वेगाने बदलते आहेच, पण लेखनाच्या भाषेमध्येही घडणाऱ्या अशा काही बदलांकडे लक्ष द्यायला हवं.
🖊वैशाली पेंडसे-कार्लेकर
vaishali.karlekar1@gmail.com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- ९ जून २०२२
No comments:
Post a Comment