बदली

Tuesday, 7 June 2022

वाक्प्रचार आणि अश्रूंची अभिव्यक्ती

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वाक्प्रचार आणि अश्रूंची अभिव्यक्ती


‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या? का ग गंगायमुनाही ह्या मिळाल्या?’ या बी कवींच्या ओळी प्रसिद्ध आहेत. रडणाऱ्या छोटय़ा मुलीला विचारलेले हे प्रश्न आहेत. गाई पाण्यावर येणे म्हणजे डोळय़ातून अश्रू येणे, गाल फुगवून रडणे. यात दुसराही वाक्प्रचार आला आहे. त्यात दोन डोळय़ांतून वाहणाऱ्या अश्रूंना गंगायमुना या नद्यांची उपमा दिली आहे. ‘गंगायमुना डोळय़ात उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा!’ सासरी जाणाऱ्या मुलीच्या भावना चित्रित करणाऱ्या या प्रसिद्ध गीतामुळे समाजमनात या वाक्प्रचाराला अढळ स्थान मिळाले आहे.

वयपरत्वे रडण्याचे स्वरूप बदलते. जरा काही मनाजोगे झाले नाही की लहान मुले रडताना मोठा आ वासतात. त्यासाठी ‘भोकांड/ भोकाड पसरणे’ हा वाक्प्रचार वापरतात. बोक्क (म्हणजे दंतविरहित तोंड) या कन्नड शब्दापासून हा शब्द तयार झाला आहे, असे कृ. पां. कुलकर्णी यांनी ‘मराठी व्युत्पत्तिकोश’ मध्ये लिहिले आहे.

काही वेळा रडण्याचा मोठा उद्रेक होतो. त्यासाठी टाहो फोडणे, हंबरडा फोडणे, ओक्साबोक्शी रडणे यांच्या प्रमाणे धाय मोकलणे हाही वाक्प्रचार रूढ आहे. धाय म्हणजे मोठी आरोळी आणि मोकलणे म्हणजे कसलेही बंधन न मानता आकांत करणे. मुक्तेश्वर यांनी द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचे वर्णन करताना लिहिले आहे :


‘सहस्र व्याघ्रांमाजी गाय। सांपडता जेवी बोभाय


तेवीं तूंतें मोकलिली धाय। कृष्णा! धांवें म्हणउनी’


खोटे अश्रू हेही अश्रूंचे रूप असू शकते. त्यासाठी भाषेत! ‘नक्राश्रू ढाळणे’ हा वाक्प्रचार रूढ आहे. नक्र म्हणजे मगर. मगर जेव्हा भक्ष्य खात असते, तेव्हा तिच्या डोळय़ांत अश्रू येतात. त्यामागचे कारण काय असेल ते असो! त्यामुळे खोटा कळवळा येऊन रडणे यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. हे वाक्प्रचार कधी कधी चित्रदर्शी असतात, कधी सूक्ष्म रीत्या भावनाटय़ देखील टिपतात.


🖊 डॉ. नीलिमा गुंडी nmgundi@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- ८ जून २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...