बदली

Thursday, 9 June 2022

अत्तर आणि उदबत्ती

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 अत्तर आणि उदबत्ती


पार्टी असो की लग्न, नाटक असो की वाढदिवस; अत्तर (परफ्यूम) आपण सगळेच प्रसंगपरत्वे वापरत असतो. अगदी अत्तर म्हणून नाही, तरी आफ्टर-शेव्ह लोशन आणि शॅम्पूपासून अनेक ठिकाणी अत्तराचा वापर होतच असतो. भेटवस्तू म्हणूनही, प्रेमाचे प्रतीक म्हणूनही. अगदी खाद्यपदार्थातसुद्धा सुगंधी द्रव्ये वापरतात. हा अत्तर शब्द आला कुठून?


‘अत्तर’ शब्द ‘इत्र’ या अरेबिक शब्दापासून आला. अत्तर म्हणजे एक प्रकारचे सुगंधी तेल. मुळात तो फुलांचा अर्क असतो. ही अत्तरे कृत्रिम तशीच नैसर्गिक अशा दोन्ही प्रकारची असतात. २०० किलो गुलाबाच्या पाकळय़ांपासून फक्त एक ग्रॅम नैसर्गिक गुलाबतेल मिळते! म्हणूनच कृत्रिम गुलाबतेलाचा भाव लिटरला सात-आठशे रुपये असतो, तर नैसर्गिक गुलाबतेलाचा भाव सुमारे १८ हजार रुपये! 


काही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रांत एक बातमी आली होती. कनोज येथील एका अत्तर उत्पादकाच्या घरावर आयकर विभागाने छापा घातला आणि तब्बल २५७ कोटी रुपये रोख आणि २३ किलो सोने जप्त केले. कानपूरजवळील कनोज ही भारतातील अत्तरांची राजधानी मानली जाते. जहाँगीर बादशाहने आपली पत्नी नूरजहाँ हिच्यासाठी इराणमधून तिच्या आवडीचे गुलाब आणले आणि कनोज येथे अत्तर बनवायला सुरुवात केली. पण तरीही तिथे एवढी संपत्ती एखाद्या अत्तर निर्मात्याच्या घरात सापडावी हे थक्क करणारे होते. आसाममध्ये अगर नावाचे एक दुर्मीळ झाड सापडते. त्याच्या खोडाची साल काढतात व त्यापासून उद (४) नावाचे भारतातील सर्वात महागडे अत्तर तयार होते. त्याची किंमत एका मिलिलिटरला चार-पाच हजार रुपये असते! देवघरातली अगरबत्ती किंवा उदबत्ती हे शब्द ‘अगर’ आणि ‘उद’ याच शब्दांना ‘बत्ती’ शब्दाची जोड देऊन बनले. चेन्नईमधील मोगऱ्याचे अत्तर आणि बंगलोरमधील चंदनाचे अत्तर प्रसिद्ध आहे. ग्रास हे फ्रान्समधील गाव परफ्यूमची जागतिक राजधानी मानली जाते. अत्तराला देवघरात स्थान आहे तसेच शृंगारातही. म्हणूनच ‘अत्तराचा फाया तुम्ही, मला आणा राया’ अशा ओळी लिहिल्या गेल्या. स्वागतार्थ गुलाबपाणी शिंपडतात आणि मृतदेहावरही फुले वाहतातच. मानवी स्मृतिकोशात सुगंधाची आठवण सर्वाधिक काळ टिकते.


🖊 भानू काळे

bhanukale@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १० जून २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...