बदली

Tuesday, 31 May 2022

वाक्प्रचारांमधील देहबोली

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वाक्प्रचारांमधील देहबोली


आपल्या लहानसहान हालचाली कळतनकळत आपल्या भावभावना प्रकट करीत असतात. हीच देहबोली होय. वाक्प्रचारांमधून ही देहबोली कशी व्यक्त होते, याची काही उदाहरणे पाहू या.


भावना व्यक्त करण्याचे काम डोळे प्रभावीपणे करतात. डोळय़ांच्या खुणांवर आधारित संवादाला ‘नेत्रपल्लवी’ असेही म्हटले जाते. त्यामुळे डोळय़ांच्या हालचालीशी निगडित वाक्प्रचार आढळतात. लहानपणी भीम बकासुराची गोष्ट ऐकताना ‘डोळे गरागरा फिरवणे, डोळे मोठे करणे’ या वाक्प्रचारांची ओळख आपल्याला झालेली असते. राग येणे हा त्याचा अर्थ आपल्याला त्या नाटय़पूर्ण हालचालींमधून प्रत्ययाला आलेला असतो. तसेच डोळे मोडणे/ मुरडणे हा वाक्प्रचार ‘नेत्रकटाक्ष टाकणे’ असा अर्थ व्यक्त करतो. संत एकनाथांच्या एका रचनेत राधेच्या डोळय़ांच्या लाडिक विभ्रमाचे वर्णन आले आहे, ते असे : ‘वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले’.


बोलताना वापरावयाचे दर्शनी अवयव म्हणजे तोंड, दात, जीभ हे होय. तोंड वेंगाडणे याचा शब्दश: अर्थ आहे, तोंड पसरणे नि वाक्प्रचाराचा अर्थ आहे – गयावया करणे. उदा. कोणत्याही स्वाभिमानी माणसाला कोणापुढे तोंड वेंगाडायला आवडत नाही.  दात विचकणे हा वाक्प्रचारही चित्रदर्शी आहे. हसण्याचे नाना प्रकार असतात. जेव्हा हसण्यात उपहासाची छटा मिसळते तेव्हा त्याला दात विचकणे म्हणतात. जीभ ही रसना असल्यामुळे आस्वाद घ्यायला आसुसलेली असते. तिचा तो स्वभाव अवाजवी रूपात जेव्हा प्रकट होतो, तेव्हा ‘जिभल्या चाटणे’ हा वाक्प्रचार चपखल ठरतो, त्याचा अर्थ आहे आशाळभूत, दयनीय होणे. ‘बोबडी वळणे’ ही अवस्था बोलणाऱ्याच्या मानसिक अवस्थेचे प्रत्यंतर देते. अडखळत बोलणे, सुसंगतपणे बोलता न येणे हा त्याचा सूचित अर्थ ‘भीती वाटणे’ या मन:स्थितीची अचूकश कल्पना देतो. उदा. ‘गोष्टीत भूत हा शब्द येताच काही मुलांची बोबडी वळते.’  पायाच्या हालचालीसुद्धा बोलक्या असतात. हातपाय आपटणे या वाक्प्रचाराचा अर्थ ‘रागावणे, नापसंती व्यक्त करणे’ असा आहे, हे न सांगताच कळते. देहबोली टिपणारे असे वाक्प्रचार साहजिकच अधिक प्रमाणात वापरले जातात.


🖊डॉ. नीलिमा गुंडी nmgundi@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १ जून २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...