भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 वजनाचा धोंडा अन् फुकण्याचा कोंडा
काही माणसे दिसायला अवाढव्य असतात पण तशी अगदीच फोपशी असतात. आपण एखाद वेळेस म्हणतो देखील ‘नुसता एरंडासारखा वाढलायस पण काही उपयोग नाही तुझा!’ असे म्हणतात की एरंड वाढतो अफाट पण आतून अगदी पोकळ असतो. अशीच यांची स्थिती असते. ते असतात फक्त आकारानेच मोठे पण कामाला मात्र खोटे! धान्य उखळात घालून सडल्यावर जो कोंडा निघतो त्याचा काहीच उपयोग होत नाही तशासारखी यांची स्थिती असते.
यश आणि जय दोघे सख्खे भाऊ. यश जरा प्रकृतीने दणकट पण जय यशच्या मानाने अंगापिंडाने बेताचाच. अगदी किरकोळ शरीरयष्टीचा. सगळे त्यांना ‘लॉरेल-हार्डी’ची जोडी असेही चिडवत असत.
यशच्या दणकट शरीरयष्टीकडे पाहून साहजिकच त्यालाच काम करण्यासाठी बोलावण्यात येई. यश अगदी अभिमानाने कामासाठी होकारही देत असे पण थोडय़ाच वेळात दिलेले काम करताना तो अगदी घामाघूम होऊन जात असे. त्यामुळे ते काम त्याला सोडून द्यावे लागत असे. मग अर्थात जयला बोलावले जात असे. त्याची किरकोळ शरीरयष्टी बघून सगळीकडे एकच हशा पिकत असे.
सगळय़ांच्या मनात एकच भाव असे की जे काम यशला जमू शकले नाही ते जय काय करून दाखवणार? आणि थोडय़ाच वेळात जय ते काम करून मोकळाही होत असे. हे बघूनघरातली सगळी मंडळी अचंबित होत. मग कोपऱ्यात बसून हे सर्व नाटक बघणारे आजोबा म्हणत, ‘‘मला माहीतच होतं की हे काम यश नाही जयच करून दाखवेल म्हणून. तो जरी शरीराने यश इतका दणकट नसला तरी फोपसा नाही, चांगला काटक आहे. यशसारखा ‘वजनाचा धोंडा अन् फुकण्याचा कोंडा’ नाही. आणि बरं का! शक्ती-युक्ती जिये ठायी, तिथे भगवंत नांदती! हे म्हणणेही जयच्या बाबतीत खरे आहे.’’
🖊डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- ३१ मे २०२२
No comments:
Post a Comment