भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 कात टाकून टिकणारी भाषा
आपण रोज आरशात पाहतो आणि हळूहळू जाणवू लागते, की आपला चेहरा बदलत चालला आहे! आपण आता म्हातारे होत आहोत. तसेच, आपली भाषाही म्हातारी होत असेल का? भाषा म्हातारी होत नाही, ती रूप बदलते. बदल शाश्वत आहे. ‘भाषिक बदल’ ही अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला कोणी थोपवू शकत नाही. हा बदल ध्वनी, शब्द, वाक्य, अर्थ या सर्व पातळय़ांवर होतो.
चक्रधरकालीन वा ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा यामध्ये फरक आहे. प्रपंचु, रसु, रामचंद्रु हे शब्द कालौघात प्रपंच, रस, रामचंद्र असे झाले. हे बदल कधी रूपात होतात, तर कधी अर्थात होतात. परभाषेतील शब्द मराठीत सामावून घेत असताना व्याकरणिक पातळीवरसुद्धा बदल होतात. जसे, मूळ भाषेत नपुसकलिंगी असणारी सायकल मराठीत स्त्रीलिंगी होते, तर नपुसकलिंगी फ्रिज पुल्लिंगी होतो.
आम्ही वाढदिवस ‘मनवतो’, पाहुण्यांना काही ‘खिलवतो’, असे म्हणावेसे वाटते याचे कारण भाषिक अभिव्यक्तीमध्ये नावीन्य हवे असते. अगदी कवीसुद्धा आपापल्या परीने साहित्याची भाषा बदलत असतात. ‘मनमोर’, ‘उधळ’, ‘मोकळा’ असे शब्द कवींनी आपल्याला दिले आहेत. कधी हा भाषेतला बदल अमर्याद उत्साह, अनुकरणाची प्रवृत्ती, वेगळय़ा पद्धतीने काहीतरी सांगतोय असा आविर्भाव यातूनही झालेला असतो. तरुणांना ‘रापचिक’, ‘डिमलाईट’, ‘अड्डस’, ‘चाबूक’, ‘सख्याहरी’, ‘फंडू’, ‘चिल’ हे शब्द वेगळेपणा, बंडखोरी, धाडसातून वापरावेसे वाटतात. राजकीय-सामाजिक स्थित्यंतरातून, औद्योगिक-आर्थिक स्थित्यंतरातून भाषेत नवीन शब्द येतात, रुळतात, स्थिरावतात. भाषिक बदलाची एकच एक दिशा सांगता येत नाही. विविध भाषांच्या प्रभावातून येणारी स्थित्यंतरे मराठीने पचवली आहेत. त्यातून मराठी भाषा रोडावली नसून तिचे रूप बदलते आहे. खेडय़ापाडय़ांतील मराठी आणि जागतिकीकरणाच्या रेटय़ातील महानगरातील मराठी यातही वेगळेपण दिसतेच. भाषांचे सततचे संपर्क आणि सहअस्तित्वातून होणारी स्थित्यंतरे आपण टाळू शकत नाही, हे सत्य आहे, ते स्वीकारायला हवे. थोडक्यात काय, कात टाकते तीच भाषा टिकते.
🖊डॉ. निधी पटवर्धन nidheepatwardhan@gmail.com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- २ जून २०२२
No comments:
Post a Comment