बदली

Tuesday, 24 May 2022

एकाक्षरप्रधान वाक्प्रचार

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 एकाक्षरप्रधान वाक्प्रचार


भाषा ही चिन्हव्यवस्था मानली जाते. काही वाक्प्रचार म्हणजे भाषेच्या चिन्हव्यवस्थेतील चिन्हरूपे आहेत. ‘ओ की ठो न कळणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मुळीच न कळणे . ‘ओ’ हे अक्षर ‘ओनामासिधम्’ या मंत्राचे आद्याक्षर असून येथे ते त्या मूळ शब्दाचे प्रतीक/ चिन्ह ठरते. शिक्षण सुरू करताना पूर्वी हा मंत्र लिहिला जात असे. त्यामुळे ‘ओ’ न कळणे म्हणजे शिक्षण नसणे, काहीही न कळणे. ‘ठो’ हे अक्षर ‘ओ’ या अक्षराला अनुप्रास साधणारे म्हणून घेतले आहे. ‘ठो’ म्हणताना ‘ठोंब्या’ हा शब्द आठवतोच! ठोंब्या म्हणजे अक्षरशत्रू. त्यामुळे हा वाक्प्रचार चपखल ठरतो.


‘त/ता’ वरून ताकभात ओळखणे म्हणजे अचूक तर्क करणे. पहिले अक्षर ऐकताक्षणी पुढची अक्षरे हेरून संपूर्ण शब्द ओळखणे, यातून तल्लख तर्कबुद्धी कळते. मनकवडेपणा असणाऱ्या व्यक्तीसाठीदेखील हा वाक्प्रचार वापरला जातो. साधारणत: स्त्रियांमध्ये ‘त’ वरून ताकभात ओळखण्याची ताकद असते, असा समज आहे.


‘ध’ चा ‘मा’ करणे, हा वाक्प्रचार एका ऐतिहासिक घटनेशी जोडला गेला आहे. राघोबादादा पेशवे यांनी ‘नारायणराव यांना धरावे’ असा हुकूम गारद्यांना दिला होता. राघोबादादा यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी त्यात ‘ध’ च्या ठिकाणी ‘मा’ करून ‘धरावे’ या ऐवजी ‘मारावे’ असे केले; असा प्रवाद आहे. यावरून ‘मूळ गोष्टीत फेरफार करणे’ या अर्थी हा वाक्प्रचार रूढ झाला.


‘मी मी म्हणणे’ म्हणजे बढाई दाखवणे. ‘मी’ चा दोनदा वापर केल्यामुळे त्यातून फाजील स्वाभिमान व्यक्त होतो. ‘मी म्हणणे’ असाही वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ आहे प्रभाव दाखवणे. ‘मी’ हे सर्वनाम स्वत:साठी वापरले जाते. त्यामुळे स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणे त्यातून घडते. उदा. ऊन मी म्हणत होते. या वाक्याचा अर्थ आहे- ऊन आपला प्रभाव दाखवत होते.


हे वाक्प्रचार कोडय़ासारखे वाटतात. त्यांच्यातील एकाक्षरांमधील गर्भितार्थ ओळखणे महत्त्वाचे आहे. संक्षेप ही भाषेची किती मोठी शक्ती आहे, हे अशा वाक्प्रचारांमधून कळते.


🖊डॉ. नीलिमा गुंडी nmgundi@gmail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

 दिनांक-२५ मे २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...