बदली

Monday, 23 May 2022

लिंब पडला ठेंगणा आणि बाभळ गेली गगना

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 लिंब पडला ठेंगणा आणि बाभळ गेली गगना


एकदा महिला मंडळातील बायका आपल्या मैत्रिणीच्या नातवाच्या मौजीबंधनाला गेल्या. मुंज अगदी थाटात होत होती. मैत्रिणीच्या सुनेने तिचे लग्न झाल्यावर खूपच प्रगती केली होती. त्यावरून महिला मंडळात जोरदार कुजबूज सुरू होती. एक बाई म्हणाली, ‘तिच्या सुनेचं पाणी काही वेगळंच आहे बरं का!’ दुसरी म्हणाली,‘हो तर! अहो, खरं सांगायचं तर घरात सर्वात जास्त कमावती तीच आहे.’ तिसरी म्हणाली. ‘रूप, गुण सगळय़ाच बाबतीत तिचा नवरा तिच्यापेक्षा जरा कमीच आहे बरं का.’ आणखी एक जण म्हणाली, ‘खरंच गं बाई, याच्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगला नवरा मिळाला असता तिला.’ आणखी एक जण म्हणाली, ‘गप्प बसा बघू आता जरा. अगं बायांनो, त्यांच्या लग्नाला आता इतकी वर्ष झाली आहेत. मजेत संसार चालला आहे त्यांचा आणि तुम्ही कसली चर्चा करत बसलायत इथे?’ पण तरीही एकीला रहावले नाहीच. ती म्हणाली,‘‘नाही, आम्हाला इतकंच म्हणायचं आहे की ‘लिंब पडला ठेंगणा आणि बाभळ गेली गगना’ तशातली गत आहे या नवराबायकोच्या जोडीची! इतकंच.’’ अनेक बायका एकत्र जमल्या की अशा चर्चाना उधाण येते.


समाजाच्या  काही कल्पना अगदी ठाम झालेल्या असत. उदा. बाईने नम्र असावे. तिने कोणाला उलट बोलू नये. घरातली सर्व कष्टाची कामे करावीत. स्त्री दिसायला सुंदर असावी इत्यादी. पती-पत्नीची जोडी कशी असावी या विषयीही काही मते समाजात पक्की रुजलेली आहेत. म्हणजे पत्नी सुंदरच असावी, पती गुणाने उजवा असावा. पण कधी याविरुद्ध दृश्य असेल तर समाज ते चटकन सकारात्मकतेने स्वीकारत नाही. त्यावर टीका केली जाते. आता हे चित्र हळूहळू बदलत आहे, हेही चांगलेच आहे.


 🖊डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

 दिनांक- २४ मे २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...