भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 जकात
कालपरवापर्यंत मालाची ने-आण करताना गावाच्या वेशीपाशी सगळी वाहने थांबवली जात. तिथेच एक छोटेसे सरकारी कार्यालय असायचे. कुठल्या मालाची ने-आण केली जात आहे आणि त्याची किंमत किती आहे यानुसार त्या कार्यालयात कर भरावा लागायचा. त्याला ‘जकात’ म्हणतात. हा मूळचा अरबी शब्द! या जकातवसुलीचे मूळ इस्लाम धर्मातील एक परंपरेत आहे. प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा अडीच टक्के भाग हा धर्मासाठी ठेवावा आणि जकातीच्या स्वरूपात तो राज्यकर्त्यांकडे द्यावा, असे इस्लाम धर्म सांगतो. ती रक्कम नंतर त्यांच्या इमामाकडे जाई व धार्मिक कार्यासाठी तिचा वापर होई. त्यातून गरिबांना मदत वगैरेही केली जाई. तसे पाहिले तर ही खूप चांगली प्रथा. योगायोग म्हणजे ख्रिस्ती धर्मातही साधारण अशीच प्रथा आहे. उत्पन्नाचा एक ठरावीक हिस्सा स्थानिक चर्चकडे सुपूर्द करायची. ख्रिस्ती धर्म खूप संघटित असल्याने ती रक्कम नंतर एकत्र आणणे व त्याचा नियोजनबद्ध विनियोग करणे, हे त्या धर्मात अधिक सुलभ असते. पण या दोन्ही प्रथांमागचा विचार एकच आहे- आपण जे पैसे कमावतो ते फक्त स्वत:साठी नसून त्यातील काही भाग आपण समाजासाठी द्यायला हवा.
जिथे ही जकात भरली जाई त्या जागेला जकात नाका असेच म्हणतात. खूप पूर्वी राजा ज्यांच्यावर हे जकातवसुलीचे काम सोपवत असे, त्या व्यक्तीला जकातदार म्हटले जाई. पुढे तेच आडनाव झाले. अशी अनेक आडनावे व्यवसायपरत्वे आली. जसे की, दप्तरदार, किल्लेदार, ठाणेदार, जमादार, हवालदार, मुजुमदार वगैरे. काळाच्या ओघात हे जकात नाके म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले. तिथे प्रचंड प्रमाणावर काळा पैसा जमू लागला; त्याचा हिस्सा सरकारदरबारी अगदी वपर्यंत जाऊ लागला. सुदैवाने आता जीएसटी आल्यानंतर ही जकातवसुली थांबली. पण याचेच एक रूप असलेला ‘टोल’ हा प्रकार अजून फास्टटॅग नसलेल्या बऱ्याच ठिकाणी सुरू आहे आणि जिथे तो वसूल केला जातो त्या टोलनाक्यांवरदेखील मोठय़ा प्रमाणावर काळा पैसा जमा होतो. पण त्या ‘टोल’ शब्दाचे मूळ ‘टोलोस’ या रोमन शब्दात आहे. युरोपच्या उत्कर्षांचे एक मोठे कारण रोमन लोकांनी बांधलेले रस्ते. ‘रस्ते बांधणारे’ (रोड बिल्डर्स) ही त्यांची एक महत्त्वाची ओळख. ‘रस्ता बांधण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी भरलेला कर’ हा त्यांच्या लॅटिन भाषेतील टोल शब्दाचा अर्थ.
🖊भानू काळे bhanukale@gmail.com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- २९ एप्रिल २०२२
No comments:
Post a Comment