संस्कार आर्थिक साक्षरतेचा
बचतीमधून आपण आकस्मित गरजांची पूर्तता करत असतो.म्हणूनच बचत हा दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक आहे.या बाबी मुलांना शालेय स्तरावर समजल्यास त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरतेची बीजे रुजतील असा माझा ठाम विश्वास आहे.
ग्रामीण भागात पालक मुलांना खाऊ खाण्याकरिता पैसे देतात.मुले त्या पैशाचा कोणताही विचार न करता काहीही खाऊ घेऊन खातात.तसेच ही लहान मुले पैसे हरविण्याच्या अनेक तक्रारी घेऊन येतांना दिसतात.यावर उपाय म्हणून मुलांच्या बचत बँकेचा उपक्रम राबविण्याचे आम्ही ठरविले. पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा केली गेली. मग शालेय स्तरावर बँकेची रचना करून शक्य होईल त्या नुसार मुले पैसे जमा करू लागली.गेली सहा वर्षे "बचत बँक" हा उपक्रम आम्ही आमच्या जि. प. शाळा - शिळ,ता.अंबरनाथ (ठाणे) येथे राबवत आहोत.जून ते मे शैक्षणिक वर्षांमध्ये मुले बचत बँकेत पैसे देत असतात. परत पुढील जून महिन्यात विद्यार्थ्याना साठवलेली रक्कम वापस केली जाते.सन 2019-20 या शैक्षणिक वर्षांमध्ये कोविड 19(लॉक डाऊन) मुळे पैसे वाटप करण्यासाठी थोडा उशीर झाला.आज दिनांक 15 ऑगस्ट निमित्त "बचत बँक" विद्यार्थ्याना वाटप करण्यात आली.
आमचा विद्यार्थी पालक वर्ग हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा कष्टकरी जमातीतील आहे.आज अशा परिस्थितीत साठवलेली रक्कम हातात पडताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. आज 104600 (एक लाख चार हजार सहाशे )रुपये वाटतांना तो आनंद आम्ही न्याहाळत होतो ...आणि "बचत बँक" हा उपक्रम राबवत असल्याचं ते समाधान मनाला मिळत होतं.
बँकेत ठेवलेल्या पैशाच्या व्याजातून मुलांना संपूर्ण वर्ष पुरेल असे पेन,पेन्सिल,रबर,पट्टया, अंकलिपी,पाट्या,स्केचपेन,वह्या अशा अनेक शालेय वस्तू शाळा सुरू झाल्यावर आम्ही खरेदी करतो.आणि विद्यार्थ्याना वर्षभर त्या वस्तू पुरवितो.त्या मुळे पालकांना वर्षभर कोणतीही वस्तू घेण्याचा त्रास वाचतो. विद्यार्थ्याना बचतीचे महत्व समजते.शिक्षणासाठीच्या पैशाची सहज सोय होते. विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक गुंतवणुकीचे फायदे कळतात...
या जागतिक संकटात बचतीची सवय नसल्याने काही महिन्यातच सुस्थितीत असलेले सुशिक्षित लोकही आर्थिक बाजूने हातघाई वर आलेले पहात असताना आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यात दूरदृष्टीने वागण्याची नि व्यावहारिक दृष्ट्या सक्षम करण्याची ही संधी आज "बचत बँक" वाटप करत असतांना मिळाली आणि पुन्हा एकदा मनाला आनंद मिळाला.... याचे पडसाद विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडताना नक्कीच उमटणार याची खात्रीच जणू समस्त पालक वर्गाच्या विश्वासातून मिळते. आणि म्हणूनच या उपक्रमाला संपूर्ण पाठबळ देणाऱ्या पालकवर्ग, समस्त ग्रामस्थ शिळ यांचे आभार मानावेसे वाटले... मनःपूर्वक धन्यवाद🙏
संजय ग. मराठे
9421973888
No comments:
Post a Comment