🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬
🤔 कुतूहल 🤔
🎯 सागरी मार्ग
‘जहाज या बंदरातून त्या बंदराला घेऊन जाणे आणि तेही कमीत कमी वेळेत, कमीत कमी इंधन खर्चून, सुरक्षित रीतीने, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना हवामानाचा त्रास होणार नाही, जहाजाचे आणि मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन आणि आंतरराष्ट्रीय नियम पाळून’, हे नाविकाचे काम!
किनाऱ्याच्या जवळून गेल्यास अंतर कमी पडते, तरीही मोठी जहाजे सामान्यत: किनाऱ्यापासून १२ ते १५ सागरी मैल अंतर राखून प्रवास करतात. याचे कारण किनाऱ्याजवळचे उथळ पाणी, खडक, प्रवाह, हजारो मच्छीमार बोटी आणि कधीकधी आंतरराष्ट्रीय नियम यांमुळे किनाऱ्यापासून पुरेसे अंतर राखून मार्ग आखावा लागतो. जास्त अंतर ठेवल्यास किनारा, दीपगृहे इत्यादी खुणा दिसेनाशा होतात. त्याशिवाय रडारवर किनाऱ्याचे चित्र अस्पष्ट दिसते. खुल्या समुद्रात प्रवास करताना सरळ रेषेत (ऱ्हंब लाइन) प्रवास केला जातो; म्हणजेच नकाशावर हे दोन बिंदू घेऊन एका पट्टीने सरळ रेघ मारली आणि त्या रेघेवरून प्रवास केला तर त्या प्रवासाला ऱ्हंब लाइन सेलिंग हे नाव देतात.
महासागरात एका टप्प्यात हजारो मैलांचा प्रवास करताना मात्र ही पद्धत जास्त खर्चीक ठरते कारण सपाट नकाशावर काढलेली सरळ रेघ ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे कमीत कमी अंतर दाखवीत नाही. अशी रेघ महावर्तुळ (ग्रेट सर्कल) या नावाने ओळखली जाते. ही रेघ सपाट नकाशावर वक्राकार दिसते आणि अंतर जास्त असल्याचा भ्रम निर्माण होतो. दोन बिंदूमधला महावर्तुळ- मार्ग काढण्यासाठी गोल- त्रिकोणमितीचा वापर करावा लागतो. हल्ली जीपीएसमुळे हे काम सुलभ झाले आहे.
सागरी मार्ग आखताना अंतराशिवाय इतर बाबींचाही विचार करावा लागतो. कधीकधी किनाऱ्यालगत काही तीव्र प्रवाह वाहत असतात. त्यांचा फायदा घेता अंतर वाढले तरी इंधनाची, वेळेची बचत होते. असेच प्रवाह भर समुद्रातही असतात. मेक्सिकोच्या आखातातून निघणारा उष्ण प्रवाह हे एक उदाहरण आहे. याखेरीज वादळे, उंच लाटा, हिमनग या संकटांपासून दूर राहून वाऱ्यांचा आणि समुद्री प्रवाहांचा फायदा घेऊन मार्ग आखण्याला ‘वेदर रूटिंग’ अशी संज्ञा आहे. या तंत्राचा वापर करून जहाजे वेळ आणि पैसे वाचवून सुरक्षितपणे प्रवास करतात.
🖊कॅप्टन सुनील सुळे
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
संकलक - नितीन खंडाळे
- चाळीसगाव
दै_लोकसत्ता
दिनांक- २२ जून २०२३
==============
No comments:
Post a Comment