शाळा

Monday, 3 April 2023

सागरी प्राण्यांपासून औषधे

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 सागरी प्राण्यांपासून औषधे


खूप वर्षांपूर्वी समुद्रातील काही वनस्पतींचा औषध म्हणून वापर केला जात असे. त्यावेळच्या माणसाने पाकट माशाच्या (स्टिंग रे) काटय़ांचे चूर्ण करून ते व्हिनेगरमध्ये मिसळून दातदुखीच्या इलाजासाठी वापरल्याचा उल्लेख आहे. १९६० पासून अशा प्राण्यांच्या जैवक्रियाशील पदार्थाचा शोध घेऊन अशी द्रव्ये औषधे म्हणून वापरतात. डायनोफ्लॅजेलेटस विशेषत: गोनॅउलक्स प्रजातीतील प्लवकांच्या बेसुमार वाढीने समुद्राच्या पाण्याला लाली येते. या लालीला ‘रेड टाईड’ म्हणतात. अशा वेळी हजारो मासे मृत्युमुखी पडतात. परंतु याच प्लवकांच्या शरीरात निर्माण होणाऱ्या ‘सॅक्सिटॉक्सिन’ या जैवक्रियाशील पदार्थाची योग्य प्रमाणातील मात्रा रोग्यांना रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी दिली जाते.


समुद्र काकडय़ा (सी ककुम्बर) हा कंटकीचर्मी प्राणी स्वत:च्या शरीरातील अंतर्गत अवयव फेकून देऊ शकतो आणि नवे निर्माण करू शकतो. त्याचे हे अवयव विषारी असतात आणि त्यात हॉलोथुरिन नावाचे द्रव्य असते. त्याचा वापर वेदनाशामक म्हणून आणि काही प्रकारच्या अर्बुदांची (टय़ुमर) वाढ थांबवण्यासाठी केली जाते.


कोनस या शंख-प्रजाती ज्यावेळी संथगतीने समुद्राच्या किनाऱ्याने सरकत असतात तेव्हा त्यांना त्यांचे भक्ष्य दिसल्यास त्याच्यावर ते जोरात विषारी पिचकारी मारतात. कोनस जॉग्रफस या प्रजातीचा शंख माणूस मृत्युमुखी पडेल इतकी जबरदस्त विषारी पिचकारी मारू शकतो. परंतु याच द्रव्याचा वापर स्नायूंना आराम पडण्यासाठीच्या औषधात केला जातो.


ऑक्टोपसच्या लाळेपासून इलेकॉईसिन नावाचा पदार्थ मिळवता येतो. त्याचा अर्क रक्तात होणाऱ्या गुठळय़ा, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर होणारी अनियमित हृदयस्पंदने सुधारण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. टेट्रोडॉक्सिन हे द्रव्य पफर म्हणजेच फुगी माशापासून मिळवले जाते. यापासून बनवलेले औषध कर्करोगाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी देण्यात येते. अंटार्क्टिकातील शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले आहे की तेथील पेंग्विनच्या आतडय़ात जिवाणूंची जवळपास वानवा असते याचे कारण हॅलोस्फेहेरीन हा घटक! तो तेथील हिरव्या शैवालात आढळतो. असे शैवाल खाणारे क्रील जीव हे पेंग्विनचे भक्ष्य! त्यामुळे पेंग्विनच्या शरीरातील हा घटक प्रतिजैविक म्हणून काम करतो. स्पंजापासून मॅनॅसालिड आणि फ्लॅलीकॉन्ड्रीन ही द्रव्ये मिळवता येतात, त्यांचा वापर अनुक्रमे संधिवातासाठी दाहशामक म्हणून आणि रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी केला जातो.


🖊डॉ. नंदिनी विनय

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- ४ एप्रिल २०२३

==============

No comments:

Post a Comment

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...