बदली

Sunday, 16 April 2023

मत्स्यवर्गातील पिल्लांचे संगोपन

 🔭 मराठी विज्ञान परिषदेचे🔬


      🤔 कुतूहल 🤔


🎯 मत्स्यवर्गातील पिल्लांचे संगोपन


भूचर प्राण्यांप्रमाणेच सागरी अधिवासातील प्राण्यांमध्ये ‘बालसंगोपनाच्या’ विविध पद्धती दिसून येतात. सागरी मत्स्यप्रजातींपैकी ७० ते ८० टक्के प्रजाती मोठय़ा प्रमाणात अंडी घालतात, कारण यांच्यात अंडी-पिल्लांचे संगोपन केले जात नाही. मात्र सागरातील इतर मासे आपल्या पिल्लांच्या जगण्याची शक्यता वाढावी म्हणून अंडी, पिल्लांचे संगोपन करतात. संगोपनाची जबाबदारी दोन्ही पालक मिळून किंवा एकटा नर वा मादी उचलताना दिसतात. माशांमध्ये अंडी चिकट पदार्थात अथवा पडद्यात ठेवणे, अंडय़ांवर जिलेटीनचे आवरण असणे, अंडय़ांचे एखाद्या चिकट धाग्याला अथवा वनस्पतीला चिकटून राहणे आणि अंडी देण्यासाठी योग्य ठिकाण शोधणे, ही अनुकूलने दिसून येतात.


अटलांटिक समुद्रातला सामन हा रावस-सदृश मासा दगडांमध्ये उत्खनन करून छोटय़ा खड्डय़ात अंडी घालतो, तर सायप्रिनी कुळातील गोडय़ा पाण्यातील रोहू, कटला असे मासे मृत शंखात अंडी घालतात. काही मासे विविध प्रकारची घरटी तयार करून, त्यांत अंडी घालतात. गोडय़ा पाण्यातील डार्टर मादी हौदासारखा खड्डा करून त्यात अंडी घालते. घरटी गोल आकाराची, पिंप किवा नळीसारखी, कपाच्या आकाराची, तरंगणारी, बुडबुडय़ांची, फेसासारखी अशा विविध प्रकारची असतात. घरटे तयार करताना वनस्पतींचे तुकडे, मुळे, तण यांचा वापर करून ते शरीरातील चिकट द्रवाने एकत्र बांधलेले असतात. माशांच्या काही प्रजातींमध्ये अंडय़ांच्या रक्षणासाठी शरीरात बदल झालेले दिसतात. ‘तिलापी’ची मादी फलित अंडी आपल्या तोंडात ठेवून त्यांचे संकटांपासून रक्षण करते. शिंगाळय़ासारख्या माशांमध्ये (कॅट-फिश) नर हे काम करताना दिसतो. ब्राझिलीयन शिंगाळय़ामध्ये नराचा खालचा ओठ मोठा आणि थैलीसारखा झालेला असतो, ज्यामध्ये अंडी उबविली जातात. यादरम्यान तो अन्नग्रहण करत नाही. 


बटरफिश हा पापलेटप्रमाणे असणारा मासा अंडय़ांना चेंडूप्रमाणे एकत्र करून त्याभोवती स्वत: वेटोळे करून बसतो. न्यूगिनीच्या नर्सरीफिशचा नर मस्तकावरील आकडय़ाच्या साहाय्याने अंडी डोक्यावर ठेवतो. काही शिंगाळय़ांत मादी प्रजननकाळात पोटाच्या खालील भागाला अंडी चिकटवून ठेवते. समुद्रघोडय़ाची मादी अंडी सांभाळण्यासाठी नराची निवड करते. नर फलित अंडी पोटाच्या खालील भागातील एका पिशवीत ठेवून त्यांना ऑक्सिजन आणि पोषण देतो. नर नळीमाशामध्ये भ्रूणथैली ही पोटाच्या खालच्या बाजूला कातडीच्या दोन पट्टय़ांनी तयार झालेली असते.


🖊डॉ नीलिमा कुलकर्णी

office@mavipamumbai.org

=============

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! ! 

 📡 जय विज्ञान 🔬

संकलक - नितीन खंडाळे

              - चाळीसगाव

दै_लोकसत्ता

दिनांक- १७ एप्रिल २०२३

==============

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...