भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 मराठीवरील अन्य भाषांच्या परिणामांची मीमांसा
परकीय शब्दांचा मराठी भाषेत शिरकाव, त्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द आणि मराठीपुढची सद्य आव्हाने याविषयी या सदरातून वर्षभर माहिती देण्यात आली. या मंथनात वाचकांनीही भाग घेतला आणि प्रतिक्रिया दिल्या. अनेक पर्यायी शब्द सुचविले. आता या सगळय़ाचे फलित आणि निष्कर्ष काय?
भाषा ही नित्य परिवर्तनशील असते. तीत शब्दसंग्रहाच्या बाबतीत त्वरेने तर व्याकरणाच्या बाबतीत कालांतराने परिवर्तन जाणवते. ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, वैज्ञानिक, व्यक्तिवैशिष्टय़ात्मक अशा सर्व प्रभावांचा भाषेवर परिणाम होतो. मराठीशी फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजीचा जो संबंध आला त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मात्र, इंग्रजीच्या आजच्या प्रभावामागे जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाची क्रांती दिसून येते. कानडी, तेलुगु, गुजराती, हिंदी या भाषा महाराष्ट्राला जवळच्या आहेत. या शेजारपणामुळे या भाषांचा मराठीवर आणि मराठीचा या भाषांवर देवाण-घेवाणीच्या रूपात कमी-अधिक परिणाम झालेला असणे स्वाभाविक आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून हिंदी मराठीवर थेट धडकत आहे. कानडीचा परिणाम तर फार सखोल आणि सुस्पष्ट आहे. अक्का, अम्मा, उसळ, कोशिंबीर, आप्पा, अण्णा यासारखे शब्दऋण, होत-होय, पुरे-पाहिजे यांसारखे क्रियापद वापरलेल्या व्याकरणिक रचना आपण कानडीकडून स्वीकारल्या आहेत. या सर्वच भाषांचे आपल्यात मिसळलेले शब्द आता बरेचसे आपले होऊन गेले आहेत. सहजस्फूर्त अभिव्यक्तीची जी लकब मराठीत आलेली आहे ती या मराठीत एकजीव होऊन गेलेल्या परकीय शब्दांच्या वापरामुळे आलेली आहे.
शेवटी एका गोष्टीकडे लक्ष वेधणे आवश्यक वाटते. परकीय भाषेतले शब्द जर आपले वेगळेपण राखून न ठेवता मराठीच्या वळणाप्रमाणे चालले तर ते नक्कीच तिला अधिक सुदृढ आणि प्रगल्भ करतील. त्यामुळे भाषा ‘बिघडत’ नाही तर ‘घडत’ जाईल. एकूणच या सदरलेखनातून काही महत्त्वाचे विषय सर्वासमोर मांडता आले याचे समाधान आहे. लेखनाच्या निमित्ताने आमचाही भाषाविषयक अभ्यास अधिक सखोल झाला आणि त्यासंदर्भातील जाणीव विस्तारली. तुम्हा वाचकांसह या प्रवासातील सर्वाचे मनापासून आभार.
🖊 निधी पटवर्धन, वैशाली पेंडसे-कार्लेकर
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- २९ डिसेंबर २०२२
No comments:
Post a Comment