बदली

Friday, 25 November 2022

गनीम आणि गँगस्टर

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 गनीम आणि गँगस्टर


‘गनीम्’ हा मूळ अरबी शब्द फार्सीच्या वाटेने मराठीत आला. त्याचा अर्थ लुटारू. ‘समोरासमोर न येता फसवून युद्ध करणारे’ असाही त्याचा अर्थ शब्दकोशात आहे. पण मराठीत दुष्मन किंवा शत्रू या अर्थाने गनीम शब्द वापरला जातो. मोगल कागदपत्रांत मराठय़ांचा उल्लेख ‘गनीम’ म्हणून होई. पण डॉ. यू. म. पठाण यांच्या मते मराठे हे स्वत:साठीच कधी कधी ‘गनीम’ हा शब्द वापरू लागले! ‘भाऊसाहेबांची बखर’मध्ये ‘‘गनिमांस झाडाला बांधले तर ते झाड घेऊन निघून जातील’’ अशा प्रकारची वाक्ये आढळतात. पुढे ‘गनिमी कावा’ हा एक वेगळाच अर्थ असलेला शब्दप्रयोग मराठीत होऊ लागला. उर्दू किंवा फार्सीत तो शब्दप्रयोग नाही. मूठभर मावळे बलाढय़ मोगल सेनेवर अचानक, शत्रूला पूर्ण गाफील ठेवून हल्ला करत व शत्रूपक्षाची बरीच हानी करत. मोगलांना अशा हल्ल्यांची खूप भीती वाटत असे. मराठय़ांचे संख्याबळ कमी असल्याने हा एक लष्करी डावपेचाचाच भाग होता. आधुनिक युद्धशास्त्रातही ‘गनिमी कावा’ हा युद्धनीतीचा एक प्रकार म्हणून अभ्यासला जातो. व्हिएतनामी सैनिकांनी बलाढय़ अमेरिकन फौजांशी लढताना याच गनिमी काव्याचा यशस्वी वापर केला होता आणि हल्लीही पॅलेस्टिनी स्वातंत्र्ययोद्धे इस्रायली फौजांविरुद्ध या रणनीतीचा प्रभावी वापर करतात.


'गँगस्टर’ म्हणजे गँगचा सदस्य आणि ‘गँग’ म्हणजे ‘गुंडांची टोळी’ हे सर्वश्रुत आहे. पण ‘गँग’ शब्द मुळात गुंडांशी संबंधित नव्हता. एकोणिसाव्या शतकात एखाद्या खाणीत विशिष्ट भागात काम करणाऱ्या कामगारांच्या समूहाला ‘गँग’ म्हटले जाई. रेल्वेमध्ये आजही अशा कामगारांच्या समूहाला ‘गँग’ असेच म्हटले जाते. विशेषत: रेल्वे रुळांची देखभाल करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम अशा वेगवेगळय़ा गँग्स करत असतात. गँग शब्द गुंडांशी प्रथम जोडला गेला तो १९०६ साली ए. एच. लेविस याने लिहिलेल्या ‘कन्फेशन्स ऑफ द डिटेक्टिव्ह’ या पुस्तकात. आपल्याकडेही प्रत्येक वेळी गँग शब्द वाईट अर्थानेच वापरला जातो असे नाही. उदाहरणार्थ, ‘‘आमची आठ-दहा जणांची गँग चौपाटीवर खूप भटकायची.’’ मात्र बहुतेकदा गँग म्हणजे गुंडांची टोळी असेच समजले जाते. जसे की, दाऊद गँग किंवा करीम लाला गँग.


  🖊 भानू काळे

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- २५ नोव्हेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...