बदली

Monday, 28 November 2022

क्रियापदासाठी वाक्यातील शेवटचा कर्ता महत्त्वाचा!

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 क्रियापदासाठी वाक्यातील शेवटचा कर्ता महत्त्वाचा!


वाक्यात सर्वात आवश्यक असते ते क्रियापद. वाक्यातील क्रियापद हा वाक्यरचनेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. क्रियापद म्हणजे क्रिया दर्शविणारा आणि वाक्य पूर्ण करणारा शब्द. केव्हा केव्हा बोलताना व लिहितानाही आपण क्रियापद वगळतो. पण ते त्या वाक्यात अध्याहृत असते. उदा. ‘तुझं नाव काय?’ उत्तर येते ‘सुहासिनी.’ ‘आणि आडनाव?’ उत्तर- ‘गोखले.’ या चारही वाक्यांत क्रियापदाची योजना केलेली नाही; पण क्रियापद वगळले असले, तरी ते त्या वाक्यात असतेच. फक्त आपण ते उच्चारत नाही. ही वाक्ये अशी आहेत- ‘तुझं नाव काय आहे?’ ‘माझं नाव सुहासिनी आहे.’ ‘आणि तुझं आडनाव काय आहे?’ ‘माझं आडनाव गोखले आहे.’ अशा वाक्यांत क्रियापद जरी उच्चारले किंवा लिहिले नाही, तरी ते असतेच. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होणार नाही. एखाद्या वाक्यात फक्त क्रियापदच असते. उदा. ‘उजाडलं’, ‘किती अंधारून आलं?’


नियम असा आहे- कर्तरी प्रयोगात एकापेक्षा अधिक कर्ते असल्यास क्रियापद अनेकवचनी राहते. सर्व कर्ते पुल्लिंगी असतील, तर क्रियापद पुल्लिंगी अनेकवचनी होते, स्त्रीलिंगी असतील, तर क्रियापद स्त्रीलिंगी अनेकवचनी होते. पण कर्ते भिन्न लिंगी असले, तर क्रियापद शेवटच्या कर्त्यांप्रमाणे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी अनेकवचनी होते; किंवा शेवटचा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी राहते.


उदाहरणार्थ, ‘दोन घोडे व दोन बैल रानात चरत होते.’ ‘एक बैल आणि दोन गायी रानात चरत होत्या.’ ‘त्याने पपई, आंबे व डाळिंब खाल्ले.’- कर्मणी. कर्मणी प्रयोगात ‘त्याने एक घोडा व दोन बैल विकत घेतले.’ किंवा ‘त्याने दोन गायी व दोन बैल विकत घेतले.’ ‘त्याने दोन बैल व दोन गायी विकत घेतल्या.’ वाक्यरचना करताना कर्तरी व कर्मणी प्रयोगातील कर्त्यांवर व कर्मावर लक्ष ठेवून वाक्यरचना करावी. जसे- रस्त्यात दोन मित्र आणि तीन मैत्रिणी उभ्या होत्या. चुकीची रचना- ‘माझ्या मुलाचे जेवण झाले असे वाटून त्याचे ताट उचलायला गेले, तर ताटात भाजी, आमटी, भात, दोन लाडू तशीच राहिली होती.’ हे वाक्य असे हवे. ‘..ताटात, भाजी, आमटी, भात, दोन लाडू तसेच राहिले होते.’


मात्र कवीला कवितेतील वृत्ताप्रमाणे बदल करण्याचे स्वातंत्र्य असते. जसे- ‘तुतारी’ या कवितेत केशवसुतांनी ‘भेदुन टाकिन सगळी गगनें.’ असे ‘गगन’ या शब्दाचे अस्तित्वात नसलेले अनेकवचनी रूप योजले आहे! तसेच भेदून, टाकीन या शब्दांतील मधले अक्षर दीर्घ असले, तरी ऱ्हस्व अक्षर दीर्घ करण्याचे, दीर्घ अक्षर ऱ्हस्व करण्याचे स्वातंत्र्य कवीला असते.


  *🖊यास्मिन शेख

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- २८ नोव्हेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...