बदली

Tuesday, 8 November 2022

वाक्प्रचारांमधील प्रादेशिक संदर्भ

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 वाक्प्रचारांमधील प्रादेशिक संदर्भ


स्थळ आणि काळ हे दोन संदर्भ जीवनाशी निगडित असतात. त्यापैकी वाक्प्रचारातील प्रादेशिक संदर्भ या लेखात जाणून घेऊ. ‘अनागोंदी कारभार’ हा वाक्प्रचार आपण सहज वापरतो. अव्यवस्था, खोटेपणा, पोकळ बडेजाव असा त्याचा अर्थ आहे. त्यामागचा प्रादेशिक संदर्भ असा आहे: अनागोंदी हे गाव तुंगभद्रा नदीच्या डाव्या तीरावर विजयनगरच्या विरुद्ध दिशेला वसलेले आहे. विजयनगरची स्थापना होण्यापूर्वी अनागोंदी ही राजधानी होती. ते राज्य लहान होते, मात्र खोटे जमाखर्च करून मोठेपणा मिरवत असे.


‘राजापुरी गंगा’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, अकस्मात होणारी गोष्ट. कोकणातील राजापूर या गावी असणारी गंगा अकस्मात वाहू लागते आणि अकस्मात नाहीशी होते. या गूढ नैसर्गिक रूपाला वाक्प्रचाराचे कोंदण प्राप्त झाले आहे. ‘धारवाडी काटा’ या वाक्प्रचारामध्ये धारवाड शहराचे एक वैशिष्टय़ गोंदले गेले आहे. धारवाड शहर खऱ्या मापाविषयी प्रसिद्ध आहे. हा काटा बरोबर वजन दर्शवणारा असतो. त्यामुळे समतोल, नि:पक्षपाती अशा वर्तनासाठी हा वाक्प्रचार वापरतात.


‘जुन्नरी हरहुन्नरी’ असाही वाक्प्रचार पूर्वी रूढ होता. यातून जुन्नर शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. हुन्नर म्हणजे कला. पूर्वी जुन्नर शहर व्यापारासाठी प्रसिद्ध होते. बंदरातील मालाची वाहतूक नाणे घाटाने जुन्नरमार्गे होत असे. तेथील लोक व्यापारात कुशल असत. त्यांच्याशी व्यवहार करताना सावध राहण्याची सूचना या वाक्प्रचारात अभिप्रेत आहे.


‘द्राविडी प्राणायाम’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, सरळ मार्ग सोडून लांबचा मार्ग स्वीकारणे. प्राणायाम करताना सरळ उजव्या हाताने नाकपुडी न धरता डोक्याच्या मागून हात नेऊन नाकपुडी धरतात. दक्षिणेकडील प्रांतांना द्रविड असे म्हटले जाते आणि द्राविड याचा येथे अर्थ आहे ‘चमत्कारिक’. उदा. संगणकाविषयी सुबोध जावडेकर लिहितात : ‘याच्या अतर्क्य वेगामुळे द्राविडी प्राणायाम करून सोडवलेल्या गणिताची उत्तरेसुद्धा डोळय़ाचे पाते लवते न लवते तोच आपल्यापुढे हजर होतात.’ अशा वाक्प्रचारांमुळे जुन्या काळच्या मराठी भाषक समाजाचा नकाशाही समोर येतो.


   🖊डॉ. नीलिमा गुंडी

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- ९ नोव्हेंबर २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...