भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 साधित शब्दांमधील इंग्रजी
‘‘या विषयावर लिहू इच्छिणाऱ्या दुसऱ्या कोणासही माझ्या या विचारांचा मनमुराद फायदा घेता यावा म्हणून मी मुद्दाम या विचारांचे १८३७ च्या २५ व्या आक्टान्वये सर्व हक्क राखून ठेविले नाहीत.’’ खरंतर माझंही मत असंच असलं, तरी हे वाक्य मात्र माझं नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या ‘संपूर्ण बाळकराम’ मधलं राम गणेश गडकरी यांचं हे वाक्य आहे. अॅक्टसाठी पूर्वी आक्ट, आक्टान्वये असेही शब्द वापरले जात. त्रिं. ना. आत्रे यांच्या ‘गावगाडा’ पुस्तकाच्या १९२५ सालच्या आवृत्तीतही सब्-पोस्टमास्तर, फॉरेस्ट, रजिस्ट्रार, मनिऑर्डरी, देवीडॉक्टर, ढोर-डॉक्टर असे इंग्रजी किंवा इंग्रजीमिश्रित शब्द आढळतात.
मागच्या लेखांत इंग्रजी तद्भव आणि तत्सम शब्द पाहिल्यानंतर आज आपण साधित प्रकारातल्या उपसर्गघटित, प्रत्ययघटित आणि जोडशब्दांमधले इंग्रजी शब्द पाहू. उपसर्गघटित शब्दांमध्ये मुख्यत: मराठी, संस्कृत आणि फारसी-अरबी उपसर्ग मोठय़ा प्रमाणात आढळतात. मात्र इंग्रजी उपसर्ग किंवा शब्द दिसत नाहीत. ‘नापास’ मध्ये ‘पास’ इंग्रजी असला तरी ‘ना’ फारसी आहे. मग आत्ताच्या मेगाउत्सव, मेगाभरती, मायक्रोबचत अशा काही शब्दांना इंग्रजी उपसर्गघटित म्हणता येईल? प्रत्ययघटितांमध्येही इंग्रजी प्रत्यय आढळत नाहीत. आपण वाचणेबल, परवडेबल, खाणेबल असे शब्द गमतीत तसेच काही औपचारिक लिखाणात वापरतो तेवढेच.
जोडशब्द या प्रकारात मात्र ई-पत्र, महापोर्टल, आगबोट, कृषिपंप, रेल्वेमार्ग, मोटारगाडी असे अनेक इंग्रजी-मराठी शब्द आढळतात. आयनीभवन, ऑक्सिडीकरण, पाश्चरीकरण अशा काही पारिभाषिक संज्ञांमध्ये इंग्रजी-मराठी मिश्रण दिसतं. अलीकडच्या काळात समाजमाध्यमांमध्ये नेटकर, व्हॉट्सपीय, विकान्त, लोक्स (लोक-अनेक वचन), पोस्टी (पोस्ट-अनेक वचन) क्लिकणे, मेलणे असे काही इंग्रजी-मराठी मिलाफाचे नवशब्द तयार होताना दिसतात. पण त्यांची दखल आणि स्वीकाराबाबत काय?
एकतर पूर्ण मराठी शब्द वापरा नाहीतर पूर्ण इंग्रजी शब्द वापरा, असे दोनच पर्याय समोर ठेवून आपण उलट इंग्रजीचंच पारडं जड करत आहोत का? अशावेळी आवश्यक तिथे इंग्रजी शब्दांचं आदान करून त्यांच्या मराठीकरणाचा मार्ग मोकळा करायला हवा. तुम्हाला काय वाटतं?
🖊 वैशाली पेंडसे-कार्लेकर
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- १३ ऑक्टोबर २०२२
No comments:
Post a Comment