भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 घर खाल्लं अन् अंगण तोंडी लावलं
मुकुंदा तसा उधळय़ा स्वभावाचाच. तोंडात चांदीचा चमचा धरूनच जन्माला आला होता. वडिलांनी खूप कमावून ठेवले होते. मुकुंदानी नुसते घरी बसून सर्व सांभाळले असते, तरी खूप होते. पण त्याला तशी बुद्धी असावी लागते ना! आपल्या उधळय़ा स्वभावामुळे आणि श्रीमंती दाखवण्याच्या हव्यासापायी त्याने वडिलांनी कष्टाने संपादन केलेल्या पैशांची उधळपट्टी करायला सुरुवात केली. हे न पाहवून घरातली कर्ती माणसे आणि त्यांच्या घराण्याचे काही सल्लागार यांनी त्याला वेळोवेळी समजावण्याचाही प्रयत्न केला. पण त्याला काही समजेल तर ना! शिवाय त्याच्या जोडीला काही टोळभैरव होतेच जे त्याच्या पैशावर फुकटची मजा लुटायला एका पायावर तयार असत. यालाही आपल्या संपत्तीचा असा कैफ चढलेला होता की बेफिकीरी वाढतच गेली. हवा तसा खर्च होत होता आणि पैसा घरात येण्यासाठी मात्र मुकुंदा काहीच कष्ट घेत नव्हता. त्याला अनेक व्यसनेही लागली.
मग काय घरातल्या लक्ष्मीने हळूहळू काढता पाय घ्यायला सुरुवात केली. मग कर्ज काढण्याचीच वेळ आली. ते फेडण्यासाठी घरचे दागिने, मौल्यवान वस्तू मोडीत काढाव्या लागल्या. शेवटी घरावर येणाऱ्या जप्तीपासून घर वाचवण्यासाठी शेत, बागायत सर्व विकावे लागले. हाती पैसा नाही आणि खायला शेती, बागायतीचे उत्पन्नही नाही, असे झाले. ही स्थिती सावरण्यासाठी अंगी कर्तृत्व तरी असावे! ते ही नाही. एकदा सर्व बाबतीत घसरण सुरू झाली की भोवती जमलेली भुतावळ सोडून जाते. तसेच झाले. ‘असतील शिते, तर जमतील भुते’ ही म्हण अगदी खरी झाली. ही परिस्थिती सावरायला पुढे येणारे कोणी नव्हते. मुकुंदाची अवस्था ‘घर खाल्लं आणि अंगण तोंडी लावलं’ अशी झाली. मुकुंदासारखी अनेक उदाहरणे तुम्हाला तुमच्या अवती भोवतीही दिसत असतील. त्यांच्यासाठी ही म्हण आहे.
🖊डॉ. माधवी वैद्य
madhavivaidy@ymail.Com
==============
संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव
दिनांक- ११ऑक्टोबर २०२२
No comments:
Post a Comment