बदली

Monday, 22 August 2022

हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या पाठी

 भाषासूत्र, दै.लोकसत्ता


🎯 हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या पाठी


अशोकने एक व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्याला वाटले आपण जर हा व्यवसाय सुरू केला तर यशस्वी होऊ शकू. आपल्याला खूप प्रसिद्धी मिळेल आणि त्याचबरोबर खूप पैसाही मिळेल. हल्ली सगळय़ांना पैसा आणि प्रसिद्धी लवकरात लवकर प्राप्त व्हायला हवी असते. त्यासाठी ते उतावीळपणे चुकीच्या वाटांनी जायचा मोह टाळू शकत नाहीत. तसेच अशोकचे झाले.

तो जो व्यवसाय सुरू करत होता ती वाट फार आकर्षक, पण निसरडी होती. त्याला त्याच्यातील धोके त्याच्या अनेक मित्रांनी, नातेवाईकांनी, सल्लागारांनी सांगितलेही होते. त्याच्या एका गुरुंनी सुद्धा त्याला सल्ला दिला होता की, ‘‘अरे अशोक, या वाटेने जाणे तुला जमणार नाही. तुला यश मिळवायचे असेल तर खूपच कष्ट, मेहेनत घ्यावी लागेल. तुझ्यात तेवढी ताकद आहे, असे मला वाटत नाही. त्यासाठी कामात जे सातत्य असायला हवे, ते तुझ्यात नाही, असेही मला वाटते. तेव्हा हा व्यवसाय सुरू करण्याबाबत खूप विचारांती पाऊल उचल. नाहीतर ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या पाठी’ अशातली गत होईल तुझी.’’ पण अशोक तेव्हा कुणाचाच सल्ला विचारता घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने हुरळून जाऊन व्यवसाय सुरू केला आणि अपयशाचा धनी होऊन बसला.


लांडग्याकडे आकर्षित झालेली मेंढी त्याच्यावर भाळून जर त्याच्यामागे धावली तर काय होणार? लबाड लांडगाच तो! तो तिच्या भावना किती जाणणार? आणि आपल्या हाती आयतेच आलेले सावज तो कसे सोडणार? आणि मेंढीचे जे होणे अपेक्षित आहे तेच होणार! म्हणूनच कोणतीही कृती करण्याआधी फार भावूक होऊन निर्णय घेणे चुकीचे असते. तसे केले तर आपल्याच पायावर धोंडा पडतो. आपलेच नुकसान होते. प्रत्येक पाऊल माणसाने अत्यंत विचाराने आणि विवेकाने उचलणे आवश्यक असते नाहीतर कदाचित ते त्याला सर्वनाशाकडेही नेऊ शकते.


🖊 डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- २३ ऑगस्ट २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...